मराठी भाषा दिन
मराठी भाषा दिन
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी .....
कवी / गझलकार सुरेश भटांच्या या ओळी कानावर पडल्या की कसा अगदी अभिमानाने छाती/उर भरून येतो. अशी गोड आणि तेवढीच सुंदर मराठी भाषा आपल्या महाराष्ट्राची मायबोली आहे.
मराठी भाषा अतिशय जुनी असुन या भाषेला महान परंपरा आहे.
आपल्या महाराष्ट्राला संताचा- संत साहित्याचा वारसा लाभलेला आहे. बहुतेक संत साहित्य प्रामुख्याने मराठीत लिहिलेले दिसून येते.
१३व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी मराठीत असल्याने महाराष्ट्राच्या घराघरात वाचली जाते.
संत एकनाथ महाराजांची भारूडं, संत तुकारामाचे अभंग असे वारकरी संप्रदायातील बहुतेक संतानी आपले साहित्य मराठीत लिहिलेले आहे.
नंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कवी, लेखक, नाटककार कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांनी मराठीत विपुल प्रमाणात लेखन करून मराठी भाषा , मराठी साहित्याला समृद्ध केले.
२७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
आज मात्र महाराष्ट्रात अशा या आपल्या सुंदर , महान परंपरेचा वारसा लाभलेल्या, समृद्ध मराठी भाषेला टिकविण्याचा, वर्धित करण्याचा, तिच्या संवर्धनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याचे कारण आपण महाराष्ट्रीयन मराठी माणूसच आहे.
आपल्या मुलामुलींना शाळेत घालताना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालण्याकडेच पालकांचा कल दिसतो.
हल्ली बहुतेक घरातील मुलेमुली इंग्रजी शाळेतच शिक्षण घेत असतात. मराठी विषय फक्त तेव्हढ्या तासापुरताच असतो. जवळपास सर्वच इंग्रजी शाळांमधे इंग्रजी किंवा हिन्दी भाषा बोलली- वापरली जाते. ही मुले घरी देखील हिन्दी इंग्रजी भाषेतच बोलतात. आणि घरातील इतर सदस्य देखील त्यांना मग त्याच भाषेत बोलायला लागतात. त्यामुळे या मुलांना मराठीत बोलणे कठीण वाटते. परिणामी मुलं मराठी पासून आणखी जास्त दूर जातात.बाहेर रोजच्या दैनंदिन व्यवहारात देखील फारसे मराठी बोलले जात नाही. मग तो सुशिक्षित असो की अशिक्षित. आणि जो मराठी बोलतो.मराठीचा अट्टाहास धरतो त्याला समोरचा मागास समजतो.
मुलामुलींच्या शिक्षणासाठी इंग्रजी शाळेला प्राधान्य देण्याचे कारण म्हणजे मराठी माध्यामांच्या शाळांची दुरावस्था, मराठी शाळेचा दर्जा, गुणवत्ता, सोयी सुविधा इत्यादींची कमतरता. या चढाओढीत मराठी माध्यमांच्या शाळा टीकू शकत नाहीत. यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सरस ठरतात. या इंग्रजी शाळा आता गावोगावी पोहोचत आहेत.
या शर्यतीत मराठी माध्यमाच्या शाळांना उतरण्यासाठी टिकून रहाण्यासाठी शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मराठी शाळेची गुणवत्ता उंचावली पाहीजे. या शाळांचा दर्जा, गुणवत्ता, सुखसोयींनी परिपूर्ण अशा दर्जेदार शाळा बनविल्या तर नक्कीच भविष्यात मराठी शाळांना चांगले दिवस येतील. मराठीत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच वाढेल. लोकांच्या मनात मराठी शाळेबद्दल प्रेम निर्माण होईल आणि वर्ग भरलेले दिसतील.
महाराष्ट्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली आहे. हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे.
अलीकडे उच्च शिक्षणासाठी मुलंमुली परदेशी जातात त्यामुळे
जागतिक स्तरावर संवाद होत असल्याने इंग्रजी भाषेचा वापर जास्त होत आहे. परंतू जीथे शक्य आहे तेथे मराठी मायबोलीच आग्रहाने बोलली पाहीजे. त्यामुळे मराठीचे संवर्धन होण्यास मदत होईल.
इतर राज्यात त्या त्या राज्याच्या भाषेचा आग्रह धरला जातो. मी हल्लीच दक्षिण भारतात फिरायला गेले होते . तेथील बसवरील गावांची नावे,रस्त्यावरील फलक, देवालये, संग्रहालय, वस्तुंची नावे बहुतेक ठिकाणी त्यांचीच भाषा वापरलेली होती.
गुजरातमधे रस्त्यावरील नामफलक, दुकानांची नांवे,पदार्थांची नावे बहुतेक सर्व तेथील गुजराती भाषेत लिहिलेली दिसुन आली.
आपल्या महाराष्ट्रात मात्र चित्र वेगळे आहे.मराठीची सक्ती असल्याने दुकानांची नावे मराठीत दिसतात परंतु त्यासोबत इंग्रजी नावाचा फलक देखील असतो. वस्तुंची नावे मराठीत नसली तर एकदा चालतील पण इंग्रजीत मात्र आवर्जून असतातच. महाराष्ट्राची मायबोली मराठी आहे त्यामुळेआपणही आपल्या राज्यात मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे.
आपली मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर आपण आपल्या घरापासूनच मराठी भाषेला बळकटी देण्याचे काम केले पाहिजे.
घरातील मुल-मुली इंग्रजी शाळेत असतील तरी घरात त्यांच्याशी मराठीतच बोलले पाहिजे. मराठीतील बाल साहित्य, संत साहित्य, मराठी गोष्टी इत्यादी सतत ऐकवून त्यांच्या मनात मराठीची गोडी निर्माण केली पाहिजे.त्यांच्यावर मराठीचे संस्कार करायला हवेत.
मराठीचा जास्तीतजास्त वापर झाला पाहिजे. आपण बोलताना (समोरचा कोणत्याही भाषेत बोलला तरी)कमीपणा न बाळगता मराठीतच बोलले पाहीजे.परंतू जे मराठी भाषेचा आग्रह धरतात त्यांना आपलेच मराठी बांधव मागास समजतात हे आपले दुर्दैव आहे. मराठी माणसांच्या याच वृत्तीमुळे आपल्याच मायबोली मराठीचे संवर्धन करण्याची वेळ आली आहे.
मराठी साहित्य, पुस्तकांना वाचक वर्ग मिळाला पाहिजे. मराठी नाटक, सिनेमा यांना प्रेक्षक वर्ग मिळाला पाहिजे. म्हणजे आपोआपच मराठीत उत्तमोत्तम साहित्य निर्मिती होऊन मराठी भाषा वृद्धिंगत होण्यास मदत होईल.
मराठी भाषेचा जागर करून तीला प्रतिष्ठित अभिजात मराठीचा दर्जा मिळवून देण्याची जबाबदारी आता आपलीच आहे.
