मनस्थिती: अंतरंगातील एक सुंदर कोलाज*
मनस्थिती: अंतरंगातील एक सुंदर कोलाज*
मनस्थिती म्हणजे केवळ एका क्षणाची भावना नव्हे, तर ते आपल्या अंतरंगात उमटणारे एक सुंदर, सप्तरंगी कोलाज आहे. मानवी मन हे एका अथांग सागरासारखे आहे, ज्याच्या गर्भात कधी शांततेची संथ लाट असते, तर कधी विचारांचे काहूर माजलेले असते. परंतु, या सागराची खरी श्रीमंती त्याच्या स्थिरतेत आणि सकारात्मकतेत दडलेली असते. जेव्हा आपण आपल्या मनस्थितीला आशेच्या आणि आनंदाच्या सुवर्णकिरणांनी सजवतो, तेव्हा भोवतालची परिस्थिती आपोआपच नंदनवनासारखी प्रफुल्लीत भासू लागते.
आपली मनस्थिती ही एका पारदर्शक स्फटिकासारखी असते. आपण ज्या रंगाचा चष्मा डोळ्यांवर चढवू, तशीच ही सृष्टी आपल्याला दृगोच्चर होते. जर मनात नैराश्याची धूळ साचली असेल, तर सुवर्णकाळातही काळोख दाटून येतो; पण जर मनात इच्छाशक्तीचा आणि सकारात्मकतेचा पारिजात फुललेला असेल, तर सुकलेल्या पानांमध्येही वसंत ऋतूचे आगमन झाल्यासारखे वाटते. म्हणूनच, बाह्य जगातील वादळांपेक्षा आपल्या अंतर्मनातील शांतता अधिक बलवान असणे गरजेचे आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात "मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दीचे कारण" — हा केवळ एक सुविचार नसून, जगण्याचा खरा महामंत्र आहे.
एक निरामय आणि प्रफुल्लीत मनस्थिती मानवाला ध्येयाच्या शिखराकडे घेऊन जाणारी सुवर्णपेटी ठरते. जीवनातील प्रत्येक क्षणाला हसतमुखाने सामोरे जाण्याची ताकद यातूनच निर्माण होते. जेव्हा आपण कृतज्ञतेचा भाव मनात बाळगतो, तेव्हा नकारात्मकतेचे मळभ आपोआप दूर पळून जाते. आपल्या अंतर्मनातील विश्वासाचा दिवा तेवत ठेवून, प्रत्येक दिवसाचे स्वागत एका नव्या उत्साहाने करणे हीच खरी मनःशांती आहे. चला तर मग, आपल्या विचारांची बाग सुसंस्कारांनी आणि सकारात्मकतेने अशी फुलवूया, जेणेकरून आपली मनस्थिती नेहमीच आनंदाचा निखळ झरा बनून प्रवाही राहील.
