मंजीरी
मंजीरी
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लग्न होऊन मंजीरी सोलापुरात नंदूबरोबर नांदत होती.सुरुवातीला मंजीरीला घराच्या परीस्थिती बद्दल जरा सुद्धा भनक नव्हती.नंदू सांगेल त्या गोष्टीवर ती विश्वास ठेवत होती.
एके दिवशी जेव्हा नंदूच्या सोबत मजूरी करणारा गणप्या दारावर आला तेव्हा तिला नंदूचे सर्व राजकारण समजले.
"वो..वयनी...नंद्या हाय का घरात...?"गणप्या दारातूनच आत डोकावत ओरडला.
तशी मंजीरी घराच्या मुख्य दरवाज्याजवळ येत त्याला म्हणाली,"नाही जी...ते तर कामावर गेलेत ना...."
तसा रागाने फणफणून लालबुंद चेहऱ्यानी गणप्या सांगू लागला.
"थो लय दिस झालं कामावर फिरकलाच नाय...नायतर म्या कायले आलो असतो इथ...अहो...त्यानं माह्याकडून पैसे उसने घेतले होते ना बाँ..आता दिन महीनं हूतीन...कधी पावतोर थांबू..सांगा बा तूमीच..."
गणप्याच्या ह्या सा-या कथनीने मंजीरीचे डोळे उघडले व ती गणप्याला म्हणाली...
"भावजी...इतके दिस थांबला ना ..अजून जरा महिनाभर कळ सोसा..तुमचं सारं ओझं मी हलकं करून दावते"
गणप्यानं मंजीरीच्या डोळ्यात निर्धाराची चमक पाहीली व तो माघारी फिरला.
दुसऱ्या दिवसापासून मंजीरी नंदूच्या कामावर जाऊन मजूरी करू लागली.
आत्मसन्मानाची भाकरी खात मंजीरीने नंदूची सारी उसनवारी फेडली.
