मनीषबाबू
मनीषबाबू


अलीकडे ' संचेत मॉलचा खुप बोलबाला झाला होता. स्पर्धेच्या युगात तालुका लेव्हलच्या एका गावात सर्व सोई सुविधांनी युक्त असा प्रशस्त, भव्यदिव्य, आधुनिक मॉल बांधणे म्हणजे खूपच धाडसाचे काम होते. असो, तर हा मॉल झाल्यापासून सर्वच पारंपरिक दुकानांना जवळपास टाळेच लागले होते. एवढेच नव्हे तर अगदी होलसेल वाले सुध्दा आपला माल संचेतमधूनच भरायला लागले होते. वर्षा सहा महिन्यांकाठी शहरात कपडे खरेदीसाठी जाणारे मध्यमवर्गीय ग्राहक सुद्धा आता संचेतमध्ये खरेदी करायला लागले होते. त्याचे कारण म्हणजे संचेतमध्ये कपड्यांचे एकसोएक ब्रॅंड उपलब्ध झाले होते. शिवाय किंमती शहरातल्या दुकानांच्या इतक्याच होत्या उलट डीस्काउंट सारख्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या अनेक नवनवीन ऑफर्स होत्या. किराणा, भांडी, कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ इत्यादी सर्व एकाच छताखाली होते. त्यामुळे 'संचेत मॉल' हे लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. व अत्यंत अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरले होते. याचा मालक कोण आहे असा विषय निघाल्यावर अर्थातच, "असेल कोणी तरी गुजर-मारवाडी "असे कोणीतरी म्हणायचे. बरेचदा कोणी महेश बाबू नावाच्या मारवाड्याचे नाव कानावर यायचे. पण "असेल कोणीतरी आपल्याला काय त्याचे ! "असे म्हणून मी दुर्लक्ष करीत असे. मी बरेच दिवसांपासून या मॉलची कीर्ती ऐकून होतो. तिथे खरेदीसाठी जाण्याची इच्छा होती परंतु अनेक दिवस तो योगायोग येत नव्हता. अखेरीस एक दिवस घरच्या मंडळींच्या आग्रहाखातर मी किराणा खरेदीच्या निमित्ताने संचेत मॉलला गेलो.
संचेत मॉल बद्दल मी जेवढे ऐकले होते त्यापेक्षा कितीतरी पटींनी मॉल भव्यदिव्य होता ! मी कल्पनासुध्दा केली नव्हती इतका तो प्रशस्त मॉल होता. अर्धापाऊण एकराचा परिसर, त्याला सहासात फुट उंचीचे कंपाउंड आणि मध्यभागी सुंदर प्रवेशद्वार ! आत गेल्यावर लक्षवेधून घेणारी चारमजली आकर्षक इमारत. चोख सुरक्षा व्यवस्था. तळघरात पाचपन्नास गाड्या आरामात मावतील एवढे 'पे पार्किंग' पहिल्या मजल्यावर किराणा व घरगुती वस्तूंचे भांडार, दुसऱ्या मजल्यावर भांडी विभाग, तिसऱ्या मजल्यावर कपडे तर चौथ्या मजल्यावर खेळणी व खाद्य विभाग.......
हे सगळे पाहून आपण खरेच पुण्या मुंबईत आहोत की काय असा भास झाला. इथे वस्तू आणि ब्रॅंड तर होतेच पण स्वच्छता, टापटीप, व्हरायटी आणि वाजवी किंमत होती. खास ऑफर्स तर होत्याच परंतु प्रत्येक वस्तूवर किमान पाच टक्के डिस्काउंट होता. तेच तर संचेतचे खास वैशिष्ट्य होते. अगदी होम डिलिव्हरीची सुध्दा सोय होती. चारपाच इलेक्ट्रॉनिक बीलिंग काउंटर होते. एकंदर काय तर ग्राहकांच्या आवडीनिवडी व सोईसुविधांकडे संचेतनेविशेष लक्ष पुरविले होते.
मनसोक्त खरेदीचा आनंद घेउन बील पेड करून आम्ही पायऱ्या उतरत होतो तोच एक नोकर धावत येउन काचेच्या केबिनकडे हात करून मला म्हणाला," साहेब, तुम्हाला शेठने बोलावले आहे. " मी सुरवातीला न ऐकल्यासारखे केले पण त्याने दुसऱ्यांदा विनंती केल्यावर सामान बाजूला ठेवून केबिनच्या दिशेने गेलो. मी केबिनचा दरवाजा उघडून आत प्रवेश करताच खुर्चीत बसलेला गलेलठ्ठ शेठ उभा राहून म्हणतो कसा," या साहेब वेलकम !" शेठच्या त्या आकस्मित स्वागताने मी गोंधळून गेलो होतो. देहबोली वेगळी होती पण आवाज परिचयाचा वाटत होता. " काय साहेब तुम्ही आपल्याला ओलखलेले दिसत नाय ?" तो पुन्हा म्हणाला. मी खुप प्रयत्न करून आठवण्याचा प्रयत्न करु लागलो पण काही आठवेना.... अखेरीस मी नकारार्थी मान डोलाविल्यावर शेठ म्हणाला, " अहो, मी मनिष बाबू ! "
मी व
िचार करायला लागलो कि हा मॉलचा मालक आहे म्हटल्यावर मनिष बाबू असण्यात काही आश्चर्य नव्हते. पण मुद्दा हा होता की हा एवढा मोठा शेठ मला कसा ओळखत होता !
अरे मी शांतीशेठचा मुलगा ! मग मी आठवू लागलो आणि हळूहळू सगळे आठवू लागले..........
साधारणपणे वीस वर्षापूर्वीची गोष्ट. मी नुकताच सर्विसला लागलो होतो तेव्हा एकमेव किराणा दुकान होते ते म्हणजे शांतीशेठचे ! अगदी छोटेखानी सामान्य दुकान. परंतु तिथे गर्दी खुप असायची कारण दुकान छोटे असले तरी शांतीशेठचे मन खुप मोठे होते.वाजवी दर,तत्पर सेवा व गरजवंताला उधारी ही शांतीशेठची वैशिष्ट्य होती त्यामुळे दुकान छान चालले होते. शांतीशेठच्या मदतीला त्याचे दोन मुलगे होते. मनिष मोठा जो वडिलांना मदत करायचा व दुसरा महेश जो फार्मसीच्या अभ्यासक्रमाला होता. दोन्ही मुले अतिशय गुणी होती.
महेशला स्वतःच्या जागेत मेडिकल सुरु करून दिले की मनिषच्या ताब्यात दुकान देवून आपण आनंदाने निवृत्ती घ्यायची ! असे शांतीशेठने ठरविले होते. पण ठरविल्याप्रमाणे गोष्टी थोड्याच घडतात !
नियतीच्या मनात जे असते तेच तर घडते !
शांतीशेठच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली.....! त्याच्या पत्नीला अचानक ब्लड कॅन्सर झाला. निदान होइपर्यंत आजार खूप बळावला होता. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. दुसरीकडे महेशच्या मेडिकलचीन उभारणी चालू होती. अशातच परिसरात नवीन दोन दुकाने स्पर्धेत उतरल्याने गिर्हाईक घटत होते. त्यामुळे शांतीशेठच्या पत्नीच्या तब्येतीप्रमाणे दुकानसुध्दा रसातळाला पोहोचले होते. अखेरीस एके दिवशी संगीताबेन गेल्या आणि त्यानंतर काही दिवसात दुकानालाही टाळे लागले !
या दोन्ही गोष्टींचा परिणाम असा झाला कि शांतीशेठने अंथरूण धरले.....!
मनिष आईनंतर वडिलांची सेवा करण्यात मग्न होता तर महेश आपले मेडिकल उभे करण्यात व्यस्त होता.
एकेदिवशी शांतीशेठ अनंताच्या प्रवासाला गेले आणि मनीषचा संसार उघड्यावर आला ! आईवडिलांचे आजारपणात राहते घर गेल्याने व नंतर दुकान बंद झाल्याने शिवाय
महेशने आपली मालकी मेडिकलवर सांगितल्याने मनीषला अक्षरशः भिकेचे डोहाळे लागले होते.
एकेकाळचा शांतीशेठचा मुलगा आता एकवेळच्या अण्णाला मोताद झाला होता. आता पावलो पावली नियती त्याची परीक्षा घेत होती. पण मनीष हार मानणाऱ्यापैकी नव्हता.
काही दिवस तो दुसऱ्याच्या दुकानात काम करु लागला. मनीषला दुसऱ्याच्या दुकानात काम करताना पाहून लोकांचे डोळे पाणावत होते. परंतु मनीष आपल्या पोटासाठी लाज बाजूला ठेवत होता.
एकदा उन्हाळ्याच्या दिवसात मी मनीषला सायकलवर पेप्सी विकताना पाहिले......! त्यावेळी मी त्याच्या नजरेला नजर भिडवू शकलो नव्हतो. त्यानंतर काही दिवस कोण म्हणे मनीष बाजारात कपडे विकताना दिसला तरी कोणाला तो जत्रेत मिठाई विकताना दिसला......!
पुढे प्रामाणिकपणा, जिद्द सचोटी, चिकाटी, या गुणांच्या जोरावर यशाच्या एकेक पायऱ्या चढत होता. अहोरात्र घाम गाळत होता. केवळ त्यामुळेच तो आज सुप्रसिद्ध, भव्यदिव्य " संचेत " मॉलचा मालक झाला होता. हे काही एकादिवसात घडले नव्हते. त्यासाठी मनीषने आपल्या उमेदीची वीस वर्षे खर्च केली होती. रात्रीचा दिवस केला होता. स्वकर्तृत्वावर व कष्टावर त्याचा विश्वास होता म्हणूनच तो मनीषचा आज मनीषबाबू झाला होता !
माझा हात हात हातात घेऊन माझ्यासारख्या एकेकाळच्या सामान्य ग्राहकाला ओळख देत होता त्यावेळी तो मला एखाद्या विशालकाय पर्वताप्रमाणे भासत होता ! भव्यदिव्य, महान, प्रचंड, महाकाय आणि उत्तुंग.....!!!