प्रदीप माने

Inspirational Others

3  

प्रदीप माने

Inspirational Others

मला भावलेलं व्यक्तिमत्व- डॉ.चंद्रकांत भागवत चौधरी

मला भावलेलं व्यक्तिमत्व- डॉ.चंद्रकांत भागवत चौधरी

3 mins
244


गुरुंना शिष्याचा अभिमान वाटावा, अशा कितीक शिष्यांच्या कथा प्रचलित आहेत.पण एखाद्या शिष्याला गुरुचा अभिमान वाटावा,असा अवलिया गुरु लाभणं,हे खरोखरच भाग्याचं ! असा गुरु मला मिळाला,याहून मोठं भाग्य ते काय!

    मी तेव्हा आठव्या इयत्तेत होतो. आजच्या इतकी तेव्हा स्पर्धा नसली, मुलांना चांगले मार्क्स पडावेत म्हणून सजग पालक मात्र होते.घरची परिस्थिती तेव्हा बेताचीच होती. तरीदेखील घरून आम्हाला क्लासेसला पाठवलं गेलं. क्लासेस हा तेव्हा व्यवसाय म्हणून चांगलाच नावारुपाला येऊ लागला होता.अगदी शाळांसारखे दोन शिफ्ट मध्ये चालणारे,वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळे शिक्षक असणारे,मुलींसाठी व हुशार विद्यार्थ्यांसाठी वेगळे वर्ग असणारे,मोठमोठे वर्ग असलेले वगैरे कितीतरी क्लासेस नाशिकमध्ये फोफावत होते.त्याबरोबर त्या क्लासेसची अव्वाच्या सव्वा फी म्हणजे पालकांच्या स्टेटसचा विषय!

    आमच्या आईने मात्र आम्हाली परवडेल अशा बडेजाव नसलेल्या चौधरी सरांच्या स्वामी समर्थ क्लासेस मध्ये आम्हाला पाठवलं.पहिल्या भेटीत आपलंस करणारं व्यक्तिमत्त्व,म्हणजे चौधरी सर.हळूवार बोलणं,मिश्किल वागणं, मन लावून पण गमतीदार पद्धतीने शिकवणं आणि वयाने लहानांनाही अहो-जाओ करणं, या त्यांच्या गुणांमुळे त्यांनी सगळ्याच विद्यार्थ्यांना आपलंस केलं होतं.

     फक्त क्लासेसच्या फी वर घर चालवणारी ही व्यक्ती,व्यवहारीकदृष्ट्या मात्र शून्य होती.कोणत्याही विद्यार्थ्याला कधी स्वतःहून फी मागितली नाही किंवा कुणी किती फी दिली ,हे नोटा मोजून बघितलं नाही.इतर क्लासेसमध्ये फी गोळा करायला एक स्वतंत्र इसम असायचा,अशीही बाब इथे नव्हती.किती फुकट शिकले,याची गणनाच नव्हती.गणितातली अवघडात अवघड समीकरणं सोडवणा-या या व्यक्तीला,दुनियादारीचं समीकरण कधी जमलंच नाही.

    असं असेल तर संसार कसा चालेल? शेवटी मँडमना अर्थात सरांच्या पत्नींना कठोर व्हावं लागलं.मग सरांच्याच काही विद्यार्थ्यांना फी गोळा करण्याचं काम त्यांनी सोपवलं.तेही अगदी मनोभावे,ते काम करु लागले.विना फी अटकाव करु लागले.पण त्यातही काही महाभाग थेट सरांना जाऊन भेटायचे आणि मुदत मागायचे. अर्थातच ही मुदतवाढ त्यांना मिळायची.

    एकदा असंच या फी गोळा करणा-यांनी फी साठी मला अडवलं.वडिलांचा पगार झाला नव्हता.मी म्हटलो,"सरांशी बोलतो मी." तर त्यांनी परवानगी दिली नाही.मग परत घरी आलो.तावातावाने आईला म्हणालो, "माझा अभ्यास मी घरी करेन.पण आता क्लासला जाणार नाही." सरांचं प्रत्येक विद्यार्थ्याच्या उपस्थितीकडे वैयक्तिक लक्ष असायचं.मी दोन दिवस नाही आलो,हे लक्षात येताच सरांनी विचारणा केली.आणि कोणीतरी मी क्लास सोडल्याचं सरांना सांगितलं.क्षणाचाही विलंब न करता सरांनी आमचं घर गाठलं.मला समजावून आपल्या सोबतच क्लासला घेऊन आले.फी गोळा करणा-याला बजावलं,"यापूढे ह्या मुलाकडून कधीच फी घ्यायची नाही." आणि अगदी दहावी सुटेपर्यंत त्यांनी कधी फी घेतली नाही.

     एकदा क्लासची साफसफाई करताना मला सरांच्या ड्रॉव्हरमध्ये शंभराच्या,पन्नासच्या आणि दहाच्या काही नोटा व नाणी सापडली.सर येताच सरांना ते पैसे देत मी म्हणालो,"सर, हे असे कुलूप न लावता,तुम्ही यात पैसे कसे ठेवले?" त्यावर सरांनी किंचीत स्मित केलं व म्हणाले,"ते तिथेच राहू दे.नेहमी तिथेच असतात.ज्याला गरज असेल तो घेऊन जाईल.काम झालं की आणून ठेविल." आम्ही अवाक होऊन बघत राहिलो."कोणी चोरले तर?"यावर सरांचं उत्तर,"समजावं त्याला जास्त गरज होती."

    असं हे आगळं व्यक्तिमत्त्व.गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणंच नव्हे,तर त्यांना सगळ्या सोयी पुरविणे,अनाथ आश्रमांना कपडे व पुस्तकं गोळा करुन देणं,क्लासच्या विद्यार्थ्यांना घेऊन परिसर स्वच्छता करणं असे कितीतरी उपक्रम त्यांनी राबवले.

    दहावीची परिक्षा संपली.आता क्लासशी असलेला शैक्षणिक संबंध संपला.पण इथूनच एक भावनिक नातं जुळत गेलं.आता सर मित्र होऊ लागले होते.आम्ही दोघं तासनतास वेगळवेगळ्या विषयावर गप्पा मारायचो,विचार विनिमय करायचो.वैयक्तिक आणि कौटुंबिक विषयही मुक्तपणे हाताळायचो.आता ते एक घरातली व्यक्ती होऊन गेले होते.


Rate this content
Log in

More marathi story from प्रदीप माने

Similar marathi story from Inspirational