STORYMIRROR

Atharva Admane

Abstract Comedy Drama

3  

Atharva Admane

Abstract Comedy Drama

मॅट्रिक

मॅट्रिक

3 mins
173

उन्हाळ्याचे दिवस होते. नुकतीच नववी संपली होती. त्यामुळे खुशीत होतो. परीक्षा संपल्याचा आनंद काही औरच असतो, नाही? पण या वेळी एक घोळ झाला होता. नेहमीप्रमाणे दोन महिन्यांच्या सुटीऐवजी फक्त पंधरा दिवसांची सुटी होती. हो अर्थात तुम्ही बरोबर विचार करताय. पुढच्या वर्षी मॅट्रीक. आता यात विशेष काय? पण प्रत्येक अजाण बालकाच्या दृष्टीने मॅट्रीक म्हणजे एक विषय असतो. सगळे नातेवाईक जणू आपल्याला काय ज्ञान आहे आणि ते वापरून आपल्या नातलगाचं कसं कल्याण करता येईल याच विचारात असतात. आमच्याकडे काय वेगळी परिस्थिती असणार? नुसतं भंडावून सोडलं होतं. मी काय म्हणतो?नऊ वर्ष पूर्ण झालेत ना? मग काही तर गोष्टी कळत असतील ना माणसाला? पण नाही. जिथे तिथे नाक खुपसलंच पाहिजे. 


एकीकडे नातेवाईक आणि दुसरीकडे आमच्या घरचे. उन्हाळ्याची कामं दणक्यात सुरू झाली होती. कुरडई, पापड्या, सांडगे आणि बाकी वाळवण करायला हमाल किंवा कामवाला या उच्च पदावर आमची नेमणूक खुद्द मातोश्रींनी केली होती. त्यामुळे बदलीच्या अर्जाला केराची टोपली दाखविण्यात आली. मध्यस्थी सुद्धा निष्फळ ठरली. आणि मी माझ्या इवल्याशा पंधरा दिवसांच्या सुट्टीची माती होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो. या पंधरा दिवसात वाळवणाची कामं वगळून जर कधी निवांत एखादा क्षण चुकून आलाच, तर मग बाबांना हिशेबात मदत करण्याच्या अजून एका उच्च पदावर आमची नेमणूक करून ठेवलेली होती. असं करत करत अर्धा एप्रिल संपला आणि मग आमचे अधिकचे तास सुरू झाले. 


रोज सकाळी ८.३० ते १०.३० या वेळात जोशीमास्तरांनी आमचे गणित,विज्ञान आणि इंग्रजीचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. आमच्या गावात चांगली म्हणावी अशी एकच ज्ञानोपासक विद्यामंदिर शाळा होती. तीर्थरूपांची परिस्थिती यथातथाच असल्यामुळे बऱ्याच प्रयत्नांनी आमचं तिथे admission झालं होतं. तिथलेच जोशी मास्तर दर वर्षी मॅट्रीक आधी अधिक तास घ्यायचे. मुलांनी जीव तोडून अभ्यास करावा आणि शाळेचं नाव मोठं करावं अशी ज्या मास्तरांची सामान्य अपेक्षा(या अपेक्षेला सामान्य म्हणण्याच्या मी विरोधात आहे) असे त्यात जोशी मास्तर अग्रणी होते. आणि या अपेक्षेत न बसणाऱ्या मुलांची दशा आम्ही पाचवीपासून पाहत आलेलो होतो. त्यामुळे ते एक वेगळंच tension असायचं. 


तास सुरू झाल्यापासून आपसूक मी घरच्या कामांमधून लक्ष काढून घेऊन ते अभ्यासावर केंद्रित करायला सुरुवात केली. सकाळी लवकर उठून आन्हिकं उरकून शिकवणीला जायचं. तिथून आल्यावर थोडा वेळ बाबांना हिशेबात मदत, मग जेवण. त्यानंतर जमलं तर जागं राहून सकाळच्या अभ्यासाची उजळणी अथवा ३ तासांची छोटी(?) वामकुक्षी. मग उठून आईला मदत करायचा व्यर्थ प्रयत्न. सायंकाळी प्रार्थना करून जेवणं, नंतर सद्यासोबत जराशी चर्चा.(याला चर्चा म्हणणं माझ्या जीवावर येतं, असो.) आणि मग साधारण १० वाजण्याच्या सुमारास निद्रादेवीच्या अधीन होणे. असा दिनक्रम जवळपास दीड महिना सुरू होता.


हे तर झालं प्रास्ताविक. अहो असे घाबरताय काय? अजून खरी गोष्ट तर पुढेच आहे. आधी जरा माझ्याबद्दल सांगतो. मी विनय मोडक. नुकताच नववी झालेला आणि पुढ्यात मॅट्रीकआणि त्याबद्दल निरनिराळे सल्ले, उपदेश आणि अनुभव ऐकून खरोखर कंटाळा आलेला एक निरागस पोर. माझी मॅट्रीकची पहिली आणि शेवटची वेळ असू दे म्हणून विठ्ठलाला दररोज साकडं घालणारा भाबडा श्रध्दाळू विद्यार्थी. शास्त्रीय संगीताची आवड आणि ध्यास असणारा, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांना गुरुस्थानी मानून साधना करणारा एक सच्चा साधक.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Atharva Admane

Similar marathi story from Abstract