Sharad Thakar

Inspirational

2.5  

Sharad Thakar

Inspirational

मायीची मया

मायीची मया

2 mins
2.4K


परवा शेतात पिकपाणी पाहण्यासाठी शेताकडे निघालो होतो. आमच्या शेताच्या अर्ध्यात पोहोचतो न पोहोचतो तोच विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पाऊस सुरू झाला. मी पळत पळतच एका मळ्यामध्ये गेलो आणि एका झाडाखाली थांबलो. तिथे मळ्यात काम करणारी बाया माणसं बसलेलीच होती.आमच्या पाण्या पावसाच्या गप्पा सुरू झाल्या. तोच बाजूच्या गोठ्यातून वासराचा जोरात हंबरण्याचा आवाज आला आणि आम्ही गोठ्याकडे वासराला काय झालंय पहायला गेलो तर दोन कुत्रे छोट्याशा वासराला तोडण्याचा प्रयत्न करत होते.आम्ही कुत्र्याला हाकलले आणि पहातो तर काय तेवढ्यात ब-याच लांब अंतरावर चरायला गेलेली गाय वासराचं हंबरणे ऐकून पळत वासराजवळ आली आणि वासराला चाटायला लागली. हे दृश्य पाहून तिथेच झाडाखाली बसलेली आजी सहज म्हणाली "काय मायीची मया आहे! पण कितीही काही करा शेवटी काही नाही."

आजीचे ते बोल ऐकून आणि आजीचा तो चेहरा पाहून मनाला फार वाईट वाटले. खरचं आई किती निरपेक्ष भावनेने आपल्या लेकरांवर प्रेम करते, मग ती आपली आई असो की एखाद्या प्राणी, पक्षाची.आई तेवढेच प्रेम आपल्या पिलांवर करत असते. घासातला घास आपल्याला भरवते वेळ प्रसंगी उपाशी रहाते. आपल्या लेकराच्या हितासाठी आईवडील अपार कष्ट करतात. लेकरं सुखी, समाधानी, गुणवान व्हावी म्हणून ते त्यांच्या कडून जेवढे काही चांगले करता येईल ते सगळं करतात. मग लेकरांनीही आपल्या आई वडिलांची आपल्या विषयी असलेली धडपड लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपल्या परिस्थितीची जाणीव ठेऊन आपल्यावर प्रेम करणा-या माय बापासाठी आपण चांगले जगलो आणि वागलो पाहिजे. 

  माणूस कितीही शिकला ,कोणत्याही मोठ्या पदावर विराजमान झाला तरी तो त्याच्या माय-बापा पेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही आणि म्हणून त्याने आपले पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. माणूस थोडं फार कमवायला शिकला म्हणजे स्वतःला फार मोठं समजत असेल आणि स्वतःच्या मायबापाचे पालन पोषण करत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. 

 आज म्हाता-या झालेल्या मायबापावर जी वेळ आली आहे. ती वेळ उद्या आपल्यावर येणार आहे. हे माणूस कसे विसरतो कोण जाणे कारण "जशी करणी, तशी भरणी" या न्यायाने जर आपण आपल्या आईवडिलांचा सांभाळ केला नाही तर नकळतपणे आपल्या मुलांवरही हेच संस्कार होणार आहेत. मुलांना संस्कार वर्गात घालून आपल्या मुलांवर चांगले संस्कार होणार नाहीत तर आपल्या नेहमीच्या वागण्यातून, बोलण्यातून झालेले संस्कारच त्यांच्यावर होणार आहेत म्हणून आपण जाणीवपूर्वक घरात चांगले वातावरण ठेऊ आणि कोणत्याही मायबापाला, " कितीही करा ,शेवटी काहीच नाही" म्हणायची वेळ येऊ नये आणि कोणत्याही मायमाऊलीला शेवटच्या दिवसात हे वाईट दिवस येऊ नये म्हणून प्रयत्न करूया. आपल्यावर बालपणी केलेले प्रेम आठवूया आणि आईवडिलांना न विसरता प्रेम करूया

आईच्या प्रेमा विषयी एका कवितेत मी म्हटले आहे

पोट भरतं नाही आई

शेजारणीच्या भातानं 

तृप्ततेचा ढेकर येतो 

तुझ्या मायेच्या हातानं

आई तुझ्या हाता मध्ये 

जादू असते काय 

तुझ्या हातची ठेचाभाकर

वाटते साखर साय 


Rate this content
Log in

More marathi story from Sharad Thakar

Similar marathi story from Inspirational