मानसपूजा
मानसपूजा
मानसपूजेत सचेतन सद्गुरु मनःपटलावर आणून नित्यनियमाने त्यांची मानसपूजा केल्याने सद्गुरु संवादही करु लागतील, व तेव्हापासून साधकाला अचूक मार्गदर्शनही होऊ लागेल.
"अहं ब्रम्हास्मि" असे अध्यात्मशास्त्र सांगते. याचा अर्थ, "मी" ब्रम्हस्वरुप आहे.
येथे “मी” याचा अर्थ मानवी शरीर असा नाही. 'मी' म्हणजे सचेतन शरीराचे नियंत्रण करणारा 'आत्मा' होय. आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरुपे नाहीत. आत्मा किंवा परमात्मा निर्गुण-निराकार असल्याने, भगवंताचे प्रातिनिधिक स्वरुप म्हणजेच आपले सद्गुरु. साधकाला सद्गुरुंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरु सूक्ष्मरुपाने साधकाजवळच असतात. साधकाच्या हृदयात त्यांची वस्ती असते. हे वायुसुत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातील प्रभु राम चंद्राची मूर्ति सीतामाईला दाखविली, या वरुन स्पष्ट होते. अशा प्रकारे साधकाच्या हृदय कमलावर सूक्ष्मरुपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरुंना सचेतन देहस्वरुपात कल्पनेने निर्माण करुन मानसपूजेस प्रारंभ करावा.
पहाटेची वेळ मानसपूजेस चांगली असते. अशा वेळी सुखासन घालून बसावे. चर्मचक्षू बंद करावे. अंतर्मुख होऊन कल्पना करण्यास प्रारंभ करावा.
मानसपूजा
आकाशात क्षितिजावर गुलाबी रंगाची स्वैर उधळण होत आहे,
सुगंध चौफेर दरवळतो आहे,
सतारीचे झंकार उमटत आहेत,
मुरलीचा गोड मंजुळ ध्वनी आसमंतात घुमतो आहे, वेद घोषांचे मंद स्वर एकू येत आहेत.
हृदयातील रक्तवर्ण कमळाच्या पाकळ्या हळूहळू उमलतात. प्रफुल्लित कमळाच्या मध्यभागी सद्गुरुंच्या तेजस्वी पादुकांचे दर्शन घडते
त्यानंतर सूक्ष्मरुपातून प्रकट होण्यासाठी सद्गुरुंना मनोमन प्रार्थना करावी. एक तेजाचा झोत हृदयातील पादुकांपासून निघेल, आणि त्यामघून आपल्या समोर सद्गुरुंची सुहास्यवदन सगुण मुर्ती उभी राहील.
सुस्वागतम् सुस्वागतम् असे म्हणून आपण आपल्या सद्गुरुंचे स्वागत करावे.
त्यानंतर चंदनाचा पाट मांडून त्यावर उभे राहण्याची सद्गुरुंना विनंती करावी. ते पाटावर उभे राहील्या नंतर त्याच्या चरणकमलावर सुवर्ण कलशाने पाणी घालावे.
त्यानंतर चांदीच्या वाटीतील दुध घालून पुन्हा पाणी घालावे. अशा प्रकारे पादप्रक्षालन झाल्यावर एक शुभ्र वस्त्राने चरणकमल पुसून त्यावर हळद-कुंकू वहावे.
सद्गुरुंचा भाळी कुंकुमतिलक लावून सुवर्ण तबकातील रुपेरी नीरांजनांच्या ज्योतींनी पंचारती ओवाळावी.
आपल्या घरातील मखमली मंचकावर विश्रांती घेण्यासाठी सद्गुरुंना प्रार्थना करावी.
थोड्या विश्रांती नंतर त्यांच्या अंगातील कफनी काढून ठेवावी. गळ्यातील तुळशीमाळा, कुबडी आणि स्मरणी बाजूस काढून ठेवावी.
कौपीनधारी सद्गुरुंना स्नानगृहात घेऊन जावे. तेथे सुवर्णाच्या चौरंगावर बसवावे.
चांदीच्या वाटीतील सुगंधी तेल सद्गुरुंच्या सर्वांगास हळूवार लावावे.
रूप्याच्या घंगाळ्यातील गंगोदक सुवर्ण कलशांत घेऊन सद्गुंना अभ्यंगस्नान घालावे.
नंतर सर्वांगास उटणे लावून पून्हा गंगोदक घालावे.
स्नानानंतर स्वच्छ आणि शुभ्र वस्त्राने सद्गुरुंचे सर्वांग पुसून घ्यावे.
नवी कौपीन बदलण्यास द्यावी.
नंतर पुन्हा मखमली मंचकावर बसण्यास विनंती करावी.
त्यांना भरजरी कफनी घालावी. गळ्यात तुळशीमाळा घालाव्या हातात कूबडी स्मरणी द्यावी.
त्यानंतर रत्नजडित सिंहासनावर सद्गुरुंना आणून बसवावे. चरणकमल ठेवण्यास सिंहासनापुढे शिसवीचा चौरंग ठेवावा. जैसा शोभे राजा रघुवीर असे भासले पाहिजे.
त्यानंतर पाद्यपूजेची अनुज्ञा घेऊन, पाद्यपूजेस आरंभ करावा.
शिसवीच्या चौरंगावरील सद्गुरुंच्या गुलाबी चरणकमलावर सुवर्ण पात्राने शुध्दोधक घालून पादप्रक्षालन करावे. त्यानंतर पंचामृताने पादुकांना स्नान घालावे. पुन्हा एकदा शुध्दोदकाने स्नान घालावे. नंतर चरणकमलावर अत्तर लेपन करावे.
शेवटी आणखी एकदा उष्णोदकाने पादुकांना स्नान घालून शुभ्र चरणकमल पुसून घ्यावेत.
त्यानंतर स्वस्तिक चिन्हांकित चंदन गंध लेपन करावे.
सद्गुरुंच्या भाळी उभे गंधलेपन करुन मध्यभागी बुक्याचा टिळा लावावा.
दोन्ही नेत्रांच्या बाजुस गंधाच्या मुद्रिका लावुन घ्याव्या.
सद्गुरुंच्या गळ्यामध्ये जाई- जुईच्या शुभ्र फुलांचा सुंदर पुष्पहार अर्पण करावा.
दोन्ही हातांच्या मनगटावर छोटे गजरे घालावेत.
नंतर पादुकांवर विविध सुवर्णालंकार घालावेत. पादुका तुळशीहाराने सुशोभित करुन शेवंती, चंपक, गुलाब, पुष्पे अर्पण करावीत.
शेवटी अष्टभाव प्रतिक अष्टदल कमळ वहावे. अक्षता, हळद, कुंकू वाहुन घ्यावे.
अहंकाररुपी धूप घालावा.
निराभिमानी बोधवृत्तीच्या तेजाची निरांजने लावून घ्यावी.
सद्गुरुंना शिऱ्याचा नैवेद्य दाखवुन रुपेरी पात्रांतुन केशर-वेल दोडे मिश्रीत दुग्ध प्राशन करण्यास द्यावे.
शेवटी तेजाने तेजाची आरती करावी.
पूजेने नटलेल्या शांत सुंदर आणि तेजस्वी सद्गुरुंच्या मुर्तीचे अवलोकन करुन साष्टांग दंडवत घालावे.
सिंहासनारुढ सद्गुरुंसमोर हात जोडून उभे राहून शरणागतीकरीता आत्मकथन करावे.
आत्मकथनात एक दिवसातील आपल्या जीवनातील घडलेल्या बऱ्या -वाईट घटनांचे कथन करावे. चुकल्या मुकल्या गोष्टीबद्दल क्षमा याचना करावी.
त्यानंतर सद्गुरुंना भोजनासाठी भोजनगृहात घेऊन जावे.
भोजनगृहात पाटरांगोळ्या घातल्या आहेत, अगरबत्तीचा सुगंध दरवळत आहे.
चंदनी पाटावर सद्गुरुंना विराजमान करावे.
चांदीच्या ताटांत सोन्याच्या वाट्यांतुन सर्व भोज्य पदार्थ वाढले आहेत.
सद्गुरुंना भोजनास प्रारंभ करण्याची विनंती करावी.
खाऊन होताच रुपेरी पात्रातून गार पाणी पिण्यासाठी द्यावे. भोजनोत्तर तांबूल द्यावा.
आता आपल्या सद्गुरुंना स्थूलरुपातून सूक्ष्मरुपात हृदयकमलावर विराजमान होण्यासाठी विनवणी करावी.
सद्गुरुंच्या सगुणरुपामघून एक प्रकाश -शलाका निर्माण होईल आणि आपल्या हृदयांत प्रवेश करील. सद्गुरुंचे सगुणरुप अदृश्य होईल.
पण हृदयातील रक्तवर्ण कमळावर सद्गुरुंचा सतेज पादुका दिसतील. त्यांचे दर्शन घ्यावे.
हळूहळू कमळाच्या पाकळ्या मिटू लागतील. शेवटी जागेपणीच पाहात असलेल्या मानसपूजेच्या स्वप्नातून आपण भानावर येऊ. अशी मानसपूजा फारच लवकर संपल्याचे आपल्याला हूरहूर वाटल्यास आपण मानसपूजेत रमलो होतो असे समजावे.
सद्गुरुंना मानसपूजा फार आवडते. प्रत्येक साधकाने रोज नियमाने मानसपूजा करावी.
साधकाच्या दैवतालाही भक्ताकडे येण्याची ओढ लागते. एखादे दिवशी जर मानसपूजेला उशिर झाला तर साधकाचे मानसपूजेतील दैवत त्यास जाणीव करुन देते.
सद्गुरुंची मानसपूजा म्हणजे सदेह सद्गुरुंचा सहवास लाभणे होय. सगुणोपासनेचा हा कळस आहे.
