माणिकस्पर्श
माणिकस्पर्श


आयुष्यात एखादा प्रसंग बरेच काही शिकवून जातो. नववीत वार्षिक परिक्षा संपल्यानंतर, माझे वडील एक पुस्तक घेऊन माझ्याजवळ आले. तारुण्यात नुकत्याच पदार्पण केलेल्या मुलीला भोवताली घडत असलेल्या घटनांविषयी सचेत करण्यासाठी त्यांची धडपड जाणवली. समर्पकपणे जाणीव करुन देणारी त्यांची पद्धतीही मला भावली.
झाले असे की, परीक्षा संपल्याबरोबर माझे वडिल प्रा. माणिकराव रंगराव पाटील ( संक्षिप्त लिहायचे असल्यास प्रा.एम.आर.पाटील, पण ते देखील दोन आहेत लातूरमध्ये म्हणून पूर्ण नाव लिहिण्याचा खटाटोप ) माझ्याजवळ वि. स. खांडेकर लिखित 'ययाति' नाम कादंबरी घेऊन आले अन् संबोधले, "तायडे, ही कादंबरी मन लावून वाच, वाटलंच तर आठ दिवसही घे, पण हा 'पण' नेहमी आदरयुक्त भीती निर्माण करणारा असायचा..!) वाचून झाल्यानंतर यातून तुला काय बोध झाला ,हे मात्र सांगावे लागेल..!" मी " !!??"
(अर्थातच मनातल्या मनात) हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता त्या काळी.
आजकालची लेकूरे उदंड असली तरी त्यांना तो धाक उरला नाही आताशा...तशीही मी वाचनाबाबतीत आधाशी प्राणी( काही सुज्ञांना खटकते, तो भाग वेगळा) अगदी दोन दिवसांत मी ती संपवलीही. मी विजयीभावाने पप्पांना सांगितले, "पप्पा झाले वाचून (एकदाचे), विचारा आता तुम्हाला जे विचारायचे आहे ते..!" ते वदले," आणखी एकदा वाच, आपण नंतर चर्चा करु." परत तेच वाचणे खरे तर जीवावर आले होते, कारण एकदा का पुस्तक नजरेखालून गेले की त्यातील नवलाई लोप पावते. तरीही 'आदेशावरुन' दुबार वाचन करावेच लागले. पण दोन वेळा वाचल्यानंतर, त्या मागे दडलेला मथितार्थ नव्याने उलगडला. कादंबरीत नावारुपाला आलेले प्रसंग व त्यामागील बोध यांची उकल झाली.
ठरल्याप्रमाणे तो दिवस उगवलाच ! पप्पा बोलले," हं ,ओका आता, जे सांगायचे आहे,झाले आठ दिवस पुस्तक हातात देउन..!" मी 'ययाति' अगदी घट्ट पकडून समोर उभी (नजरेचा दराराच तसा होता) तरीदेखील उसण्या बळाने मी बोलती झाले, " पप्पा ही कादंबरी मला बरेच काही शिकवून गेली, शर्मिष्ठेसारख्या स्वार्थी माणसापासून सतत सावधानता बाळगावी, देवयानी जरी सम्राटाची कन्या असली तरी तिला भयाण प्रसंगास तोंड द्यावे लागले. अर्थात तुमचा उच्चकुलीन जन्म नाही, तर तुमचे कर्म तुमचे आयुष्य ठरवतात. ययाति सम्राट असूनही त्याने भोग-विलासात आयुष्य व्यय केले आणि वृद्धापकाळापर्यंत तो मनावर ताबा घेण्यास अयशस्वी ठरला, हव्यासापाई स्वतःच्या मुलाचे तारुण्यदेखील पणाला लावले. याचा मूळ गाभा 'मोह' आहे. पुढे पाऊल टाकायचे असेल तर, या दोन अक्षरी विखारी शब्दापासून चार हात लांब राहण्यातच शहाणपण आहे.
या सर्व पात्रांमध्ये मला राजकुमार पुरू भावला. वडिलांसाठी त्याने तारुण्याचा त्याग केला आणि समर्पण वा त्याग हे अंतिम सत्य आहे न् तेच आयुष्यभर सोबत राहते हे पटवून दिले.(जे आजकाल आभावानेच आढळते.)"
पहिल्यांदा पप्पांच्या डोळ्यात पाणी दिसले, क्षणभर हृदय स्तब्ध झाले. ते म्हणाले,"तुला आयुष्याचा अर्थ कळाला, मी निश्चिंत झालो..!!"
तो सुवर्णक्षण मराठी साहित्यावरील माझी आस्था वृद्धिंगत करुन गेला. माणिकस्पर्शाने "अबोली" घडली.