माझे दादा
माझे दादा
काही स्मृती अशा असतात की काळाच्या ओघात सुद्धा पुसट होत नाहीत. त्याची अमीट छाप स्मृतीपटलावर असते .आणि खास करून जन्मदात्या आई वडिलांशी जुळलेल्या आठवणी तर आठवताच मन हळवं करून जातात .आम्ही वडिलांना दादा म्हणायचो. एकदम देव माणूस. ह्याच नावाने ते सगळीकडे ओळखल्या जायचे. कधीच कुठल्या गोष्टीचा हव्यास नव्हता. शुद्ध विचार. कधी आत-बाहेर वेगळं असं काहीच त्यांच्या स्वभावात नव्हतं. माझे वडील गव्हर्मेंट शाळेत शिक्षक होते. त्यावेळी शिक्षक म्हटला की आर्थिक परिस्थिती जेमतेम असायची. त्याहून आम्ही वेगळे नव्हतो .घरी ट्युशन साठी मुले येत पण फक्त परीक्षेच्या दिवसातच. आणि मुलांकडून ट्यूशन फी घ्यायची नाही हा त्यांचा अट्टाहास. बिचारी गरिबांची मुले जेमतेम पोट भरणारी. गरिबीचा मार काय असतो हे त्यावेळचा एक शिक्षक चांगले समजू शकत होता. गरिबांनी गरिबांची जाण ठेवायची नाही तर कुणी ठेवायची हे त्यांचे धोरण. फावल्या वेळात देवाचे चिंतन ,भजन मंदिरात प्रवचनाचे श्रवण हा त्यांचा छंद. व्यवहारात फार पडत नसत .ते सर्व आईचे डिपार्टमेंट .संसारात राहून संसाराच्या भानगडीतून अलिप्त राहणारे, अत्यंत प्रामाणिक. त्यामुळे शाळेच्या खाजगी कामासाठी एकत्र केलेला पैसा असो किंवा एखाद्या मंदिराच्या उद्धारासाठी गोळा केलेला पैसा असो एकमताने तो दादां जवळ सुरक्षित असायचा. इतका लोकांचा विश्वास अर्जित केलेला होता.
कधी आम्हा मुलांवर शैक्षणिक दबाव टाकला नाही. पण आमच्या समस्या मात्र अचूक सोडवायचे. फिजिक्स ,मॅथ्स, बायोलॉजी, केमिस्ट्री या सर्व विषयात त्यांचा हातखंड. पैसा नाही म्हणून आयुष्यात कधी त्याच्या मागे धावले नाहीत. एक वर्ष त्यांनी नागपूर जवळ पांढरकवडा गाव आहे तिथे सर्विस केली. चार-पाच दिवस सुट्ट्या होत्या म्हणुन नागपूरला येण्यासाठी बस मध्ये बसले. आणि लागलीच त्यांना आठवले की काही महत्त्वाचे कागदपत्र शाळेतच राहिले. म्हणून ते बसमधून उतरले व शाळेत कागदपत्र आणायला गेलेत. वापस आले पण ती बस चुकली. व नंतरच्या बसनी ते निघाले. रस्त्यात बघतात ते काय ! त्यांच्या आधी जी बस निघाली होती तिचा एक्सीडेंट झाला होता. पांढरकवड्याला एक नदी आहे .दर वर्षी ती तिचा भोग घेते अशी तिची कुख्याती आहे .सर्व प्रवासी नदीमध्ये डुबले. एकही माणूस वाचला नव्हता. दादा घरी आले आणि हा किस्सा सांगितला तेव्हा आम्ही ऐकूनच सुन्न झालो होतो. आणि विशेष म्हणजे दादा ज्या बसने आले त्यात दोनच प्रवासी होते. दादांना देव माणूस उगाच म्हणत नाहीत. आमचा पण त्यावर विश्वास बसला.
घरातल्या कुठल्याच बऱ्या वाईट गोष्टींशी दादांचे सोयरसुतक नव्हते. एकदा आमची आई आजारी पडली. आम्ही सर्व भावंडे आईच्या अवतीभवती बसून चर्चा करीत बसलो की घरगुती औषध काय द्यावे. आज रविवार आहे डॉक्टर भेटणार नाहीत काय करावे समजत नव्हते. प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करीत होतं. दादा मात्र निर्विकार होते .थोड्याच वेळाने मेन गेटचा आवाज आला. दादा कुठून तरी येत होते.त्यांनी स्वयंपाक घरातून एक ग्लास पाणी आणले आणि आईला औषध दिले. आम्ही बघतच राहिलो. दादा केंव्हा डाॅक्टरांच्या घरी गेलेत आणि हकीकत सांगून औषध घेऊन आलेत कळले सुद्धा नाही. नेहमी निर्विकार राहणारे दादा कर्तव्याला चुकले नव्हते. दादांना आम्ही गमतीत विचारले दादा हे काम तुम्ही कसे काय केले .सहजच हसता हसता ते म्हणाले एक चाक बिघडले तर दुसऱ्या चाकावर जबाबदारी वाढणारच.प्रेमाची अभिव्यक्ती अशा छोट्या छोट्या प्रसंगातून होत असते जी नेहमी लक्षात राहते.
मी बी .एस. सी. झाल्यावर मला दादांनी सांगितले होते की मी तुला एम एससी करवू शकत नाही. कारण माझ्या भावाला इंजिनियर करणे जास्त जरुरी होते.दोघांच्या शिक्षणाला पैसा लाऊ शकण्याची आमची परिस्थिती नव्हती. माझी जिद्द होती शिकायची .दादांना एका कोपऱ्यात बसून आसवे गाळताना मी पाहिले. तेव्हा मलाही खूप वाईट वाटले. की आपल्यासाठी आज दादांच्या डोळ्यात पाणी आले .पण माझ्यातही त्यांचं सांत्वन करण्याची ताकद नव्हती. पण खरोखरच देवाला सुद्धा आपली काळजी असते म्हणतात ना की जो त्याचा खरा भक्त असतो त्याच्यावर आपल्या मुलीला शिकवू न शकल्याचे दूषण लागू नये म्हणून तो ही खबरदारी घेतो. मला मॅट्रिक झाल्यावर दोन स्कॉलरशिप सॅन्क्शन झाल्या होत्या .एक ओपन मेरीटची आणि दुसरी ओपन मेरिट फाॅर टीचर्स चिल्ड्रन. दोन मधून कुठली सिलेक्ट करायची हे आपल्यावर होते. आणि दादा मला म्हणाले कि तू शिक्षकांच्या मुलांसाठी जी स्कॉलरशिप आहे ती सिलेक्ट कर .आणि मी ती केली. दैवयोग असा की एमएससीला सर्वच कॉलरशिप बंद होतात.फक्त एकाच डिग्रीसाठी तुम्हाला स्काॅलरशिप मिळते.असा रूल होता. फक्त मी सिलेक्ट केलेली स्काॅलरशिप अशी होती की जी पुढच्या डिग्रीसाठी पण चालू राहते. आणि माझी इच्छा पूर्ण झाली. त्यांच्याच म्हणण्यावर मी ही स्कॉलरशिप सीलेक्ट केली होती. वास्तविक पाहता दादांना सुद्धा ह्या स्कॉलरशिपची अशी विशेष माहिती नव्हती .पण देवाने दादांच्या रुपाने माझ्या शिक्षणाची बेगमी आधीच करून ठेवली होती. माझे आई-वडील गजानन महाराजांचे कट्टर भक्त .त्यांच्या चरणी त्यांची अगाध श्रद्धा होती .त्यांचेच आशीर्वाद आजही आमच्या पाठीशी आहेत असे क्षणाक्षणाला वाटते. आर्थिक पाठबळ कमजोर असून लहानशा घरात माझ्या वडिलांनी आपल्या भावाची सात जणांची फॅमिली पूर्ण वर्षभर पोसली. जे आपण खाऊ त्यातून अर्धे त्याच्या कुटुंबाला देऊ. आजच्या परिस्थितीत विचार केला तर आज एकही व्यक्ती कोणी समावून घेत नाही .पैसा असल्यावर करणं वेगळं .पण नसताना दुसऱ्याची जाण ठेवणं खूप कठीण आहे. दादांची वाक्ये नेहमी आठवतात की आयुष्यात जे काही चांगलं घडतं ते मोठ्यांच्या आशीर्वादाने. आणि देवाच्या कृपेने .आणि जे काही वाईट घडतं ते आपल्या चुकांनी. फार मोठी शिकवणूक देऊन गेलेत ते.
