Lockdown
Lockdown


आमच्या घरी गेल्या वर्षापासून एक नारळपाणीवाला मुलगा रोज शहाळे विकायला यायचा. त्याच्याकडे पाहुन त्याचं वय वर्ष १६/१७ असेल असं वाटायचं. न चुकता सकाळी १०:३० वाजता दरवाजा वाजवायचा.
दार उघडलं की दिलखुलास हसायचा. बोलायचा कधीच नाही, काही विचारलं तर मानेनेच होकार-नकार द्यायचा. एक दिवसही खंड न पाडता रोज ठरल्या वेळेत हजर व्हायचा. क्वचित त्याला येणं शक्य नसेल तेव्हा बदलीवर दुसऱ्या कुणाला तरी पाठवायचा. हळुहळु त्याच्यासोबत एक विश्वासाचं नातं जडत गेलं. कधी पैसे त्याच्याकडे सुटे नसायचे, कधी आमच्याकडे नसायचे. मग दुसऱ्या दिवशी हिशेबाचा समतोल राखला जायचा. वयाने तसा लहान असल्याने माझे यजमान त्याची थट्टा-मस्करी करायचे, तो मात्र फक्त हसायचा. एक गंमतीचा प्रसंग सांगते.
रोज सकाळी माझे यजमान मला ऑफिसला सोडायला यायचे, तेव्हा माझी मुलगी घरात झोपलेली असायची, म्हणून आम्ही दाराला बाहेरुन कुलुप लावून जायचो. ऑफिस जवळ असल्यामुळे ते मला सोडून पंधरा एक मिनिटात परत येत असत. नारळपाणीवाला आला की ते नारळ घेऊन ठेवत. असा रोजचा ठरलेला नित्यक्रम. एक दिवस यांना मला सोडून परतायला थोडा उशीर झाला. नेहमीप्रमाणे नारळपाणीवाला नारळ घेऊन आला. दाराला कुलूप बघून तो जायला मागे वळला आणि तेवढ्यात माझ्या मुलीने खिडकीतून त्याला जाताना पाहून आवाज दिला, तसा तो थांबला. माझ्या मुलीने त्याला खिडकीतून तिच्याकडे असलेली दाराची किल्ली दिली व दार उघडण्यास सांगितले, दार उघडताच त्याच्याकडून तिने नारळ घेतला व तो पैसे घेऊन निघून गेला. वडील घरी येताच मुलीने नारळ कसा घेतला याचा किस्सा त्यांना सांगितला. दुसऱ्या दिवशी नेहमीच्या वेळेला तो मुलगा नारळ घेऊन आला. माझ्या यजमानांना त्या मुलाची गंमत करावीशी वाटली.
ते त्या मुलाला म्हणाले, "कल मेरी बेटी की बात मानकर उससे चाबी लेकर तुमने दरवाजा खोला, दोबारा ऐसे वो ताला खोलने को कहेगी तो ताला मत खोलना, हमारी बेटी दिमाग से पागल है, दरवाजा खोलने पर वो कही भी भाग जाती है, इसलिये हम उसको ताला लगाकर अंदर रखते है..." त्या मुलाला ते खरंच वाटलं.
तो बिचारा घाबरला व कधी नव्हे ते त्याने विचारलं, क्या सच में वो पागल है?
मग माझे यजमान हसू लागले व मुलगी त्याला म्हणाली, "नही भैय्या ऐसा कुछ नही है, मेरे पप्पा मस्ती कर रहे है..."
तेव्हापासून त्याची आमची चांगलीच गट्टी झाली. पण तरीही तो बोलायचा कधीच नाही. यायचा, शहाळे द्यायचा, हसायचा व पैसे घेऊन निघून जायचा. २२ मार्चला लॉकडाऊन सुरु झाला आणि तो यायचा बंद झाला. ५ महीने तो आला नाही आणि कुठे दिसलाही नाही. दुसरं उपजीविकेचं साधन नसल्याने बहुधा गावी निघून गेला असावा. १ सप्टेंबरला सकाळी १०:१५ कुणीतरी दरवाजा ठोठावला, बाहेर येऊन पाहिलं तर, हातात शहाळं घेऊन तो मुलगा उभा होता. त्याला पाहताच मी एकदम आनंदाने त्याला विचारलं, अरे वा तुम आ गये? अब रोज आओगे ना? त्याने होकारार्थी मान हलवली आणि पूर्वीसारखंच गालातल्या गालात हसला. मला कोणत्या गोष्टीचा आनंद झाला होता, ते मला स्वतःलाही माहीत नाही पण एक सुखद लहर मनाला उभारी देऊन गेली. कदाचित त्याला सुखरुप पाहून किंवा लोक घाबरुन घरात बसलेले असताना तो पुन्हा पूर्वीच्याच आत्मविश्वासाने सध्याच्या परीस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाला होता म्हणून, नक्की कारण सांगता येणार नाही पण त्याच्या येण्याने माझ्या मनातील नकारात्मक परीस्थितीचा एका क्षणात नाश झाला.
५ महीन्यात मनाला आलेली मरगळ त्याच्या पुन्हा येण्याने मनाला उभारी देऊन गेली. तो कोण, कुठला परप्रांतीय लहान मुलगा इतक्या कठीण परीस्थितीत नव्याने उभा राहू शकतो तर आपण का नाही? या विचाराने मला क्षणभर तरी खूप छान वाटलं. देशातील व राज्यातील लॉकडाऊन कधी संपेल माहीत नाही, पण माझ्या मनातील लॉकडाऊन पुर्णपणे त्याच क्षणी संपला होता जेव्हा त्या मुलाला दारात उभं राहून मी हसताना पाहीलं.