STORYMIRROR

Sayali Sakhalkar

Inspirational

3.9  

Sayali Sakhalkar

Inspirational

#Lockdown Life Lessons

#Lockdown Life Lessons

10 mins
807


लॉकडाऊन अशी ही कोणाला न सांगून आलेली परिस्थितीच म्हणावी लागेल. मागच्या वर्षी असं काही येईल पुढच्या वर्षी याची कल्पनादेखील नव्हती, पण एका दृष्टीने आपल्याला खूप काही धडे आणि अनुभव देऊन गेला म्हणावासं लागेल, खरंतय देतोय अस म्हटलं पाहिजे... कारण अजूनही संपला तर नाही आहे. असो आजचा आपला हा विषय खूपच मनोरंजक आहे. मला आधी वाटायचे की नेहमी वेळ कमी पडतोय. मला ज्या गोष्टी करायच्या असायच्या त्याला कधीच वेळ पूर्णपणे मिळायचा नाही, ऑफिसचे काम, स्वयंपाक आणि नंतर मित्रमंडळींना भेटणे आणि फिरणे यामध्येच सगळा वेळ पटकन संपायचा. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्त बाहेर जाऊ नाही शकल्यामुळे घरच्या घरी वेळच वेळ असतो. कमालच ना! आपण या वेळेचा वापर कसा करतोय हे पूर्णपणे आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. तुम्ही आसपास पाहिलंत तर काहीजण तुम्हाला आतुरतेने बाहेर जायची वाट पाहत उदास दिसत असतील अथवा काहीजण वेळेचा सदुपयोग करत वेगवेगळ्या नवीन गोष्टींचा प्रयत्न करत रोजचा उत्साह कायम ठेवत दिसतील.


तुम्हाला उत्सुकता असेलच माझ्याबाबतीत काय घडले, माझा अनुभव कसा आहे आणि आता कुठवर पोहोचले आहे.... सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन घोषित झाला तेव्हा खूप मज्जा वाटली.... ते म्हणतात ना, रोजच्या दिनचर्येेपेक्षा काहीतरी वेगळं घडलं की गंमत वाटते... अगदी मे महिन्याची सुट्टी सुरु झाल्यासारखं. पण ऑफिसचं काम तर घरून पूर्ण चालू होतंच. आता सगळ्यांचा प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे अधिक जास्त काम वाढले होते. यावर आधी घरी जेवण बनवायचा कंटाळा आला तर हॉटेलमध्ये जायचा पर्याय होता. पण आताच्या परिस्थितीमध्ये सगळं घरीच करणे हाच एक सुरक्षित पर्याय होता.

 

लॉकडाऊनची सुरुवात आम्ही आमच्या क्रियेटीव मित्र मंडळाबरोबर प्रत्येक शुक्रवारी ऑनलाईन खेळ आणि मज्जा करून केली. जसजसे दिवस पुढे सरकू लागले, लॉकडाऊनची तारीख पुढे पुढे सरकू लागली आणि माझी छंदांची यादी वाढू लागली. घरी मला "चित्रकला प्रदर्शनाची भिंत" बनवायची युक्ती सुचली. पहिले कॅनव्हास चित्र कुठले काढायचे असे बघताना, खूप सुंदर अशी म्हण मला आढळली : "प्रत्येक दिवशी आपण पुन्हा जन्मतो, आपण आज काय करतो ते महत्त्वाचे आहे." ही म्हण मला खूपच आवडली आणि असे वाटले की जर रोज सकाळी उठल्यावर समोर अशा म्हणी वाचून दिवसाची सुरुवात करायची संधी मिळाली, तर किती सकारात्मक छान सुरुवात दिवसाची होऊ शकते. ही कल्पना पुढे नेऊन मी प्रत्येक आठवड्यात एक चित्रकला आणि त्यावर एक सुंदर सकारात्मक प्रेरणादायक म्हण लिहीत गेले. बघता बघता आमची पूर्ण भिंत भरू लागली... रंगीबेरंगी एकदम. लॉकडाऊनच्या अनेक महिन्यानंतरही मला ही आमच्या घरातली भिंत खूप खूप आवडते आणि मला काहीतरी कलात्मक निर्माण केल्याचा अभिमानही वाटतो.


माझा पुढचा छंद स्वयंपाकगृहात निर्मित झाला. आपण जेवण तर रोजच करतो, पण त्यात काही नाविन्य आणता आलं तर? जस की प्लेटिंग करणे, निरनिराळे पदार्थ बनवणे. आजकाल तर इतक्या खानावळीच्या संकेतस्थळ आहेत. प्रत्येक हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थाची कृती आहे... आणि त्यावर लॉकडाऊनमध्ये बाहेरून मागवता येत नाही किंवा हॉटेलमध्ये जाता येत नाही. मग घरी पदार्थ बनवून खाण्याची उत्सुकता अधिकच वाढते. त्यातून मी खवय्यी, मग कोण थांबवतंय... अगदी "मास्टर शेफ" कार्यक्रमाची प्रेरणाच म्हणावं लागेल. असं माझं वेगवेगळा पदार्थ बनवणे, प्लेट सजवणे चालू झाले. परदेशी असल्यामुळे काही पदार्थ इथे बाहेर लॉकडाऊन नसतानाही मिळणं मुश्किल होते. ते सर्व पदार्थ बनवून मज्जा चालू होती. काही दिवस तर गंमत म्हणून आम्ही, म्हणजे मी आणि माझा नवरा, घरच्या घरी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाचा टेबल हॉटेलमध्ये खायला आल्यासारखा सजवून जेवायला बसायचो. घरबसल्या नवीन नवीन मजेशीर उद्योग!!

 

आता एवढे छंद जोपासल्यावर मला नक्कीच कंटाळा येत नव्हता घरी, त्याऐवजी मला अजून खूप काही शिकायची, नवीन काहीतरी करायची इच्छा होत होती. त्याप्रमाणे मी यादी बनवली : कॅलिग्राफीच्या पेनचा सेट मागवला आणि लहानपणी जे शिबिरामध्ये शिकले होते त्याचे स्मरण करून काढू लागले, आपल्याला आठवतंय का तरी बघुया, असा मनात अगदी उत्साह आणि जल्लोष होता. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की लहान असताना, आई-बाबांनी मला इतक्या छंदांमध्ये रमवले होते, त्यावेळेला नक्कीच मला कंटाळा यायचा खूप काही शिकायचा आणि शेवटी मी आई-बाबांना करायला बसवायचे... आता मला त्या सगळ्या गोष्टी एक एक करून आठवायला लागल्या आणि मी त्यात व्यस्त होत गेले आणि आवड निर्मित होऊ लागली. नवलच ना!! कधी कुठली गोष्ट उपयोगी पडेल काही सांगता येत नाही.


मला लहानपणी आई-बाबांनी शास्त्रीय संगीताच्या क्लासला घातले होते. त्यामुळे माझा तसा पाया आहे संगीतामध्ये आणि आवडही आहे. मी घरच्या घरी कराओके सिंगिंग स्टार्ट केले. आमच्या ओळखीच्या एका काकाकडून मला एक रेकॉर्डिंगचे उपयोजन मिळाले आणि माझी सुरुवात झाली. गाण्याचा सराव होऊन तयार झालं की मी सर्वप्रथम माझ्या नवऱ्याला, मग आई-बाबांना आणि काही जवळच्या मित्र-मैत्रिणींना ऐकवायचे आणि प्रतिसाद बघून परत पुढच्या गाण्यांचीही तयारी करायचे. गाणी गाताना अगदी माझं मन मंत्रमुग्ध व्हायचे आणि मला खूपच छान वाटायचं. पुढे माझी संगीतामध्ये रुची बघून, माझ्या नवऱ्याला पियानो इन्स्ट्रुमेंट शिकायची युक्ती सुचली. त्यांनी ऑनलाइन शिकायला सुरुवात केली आणि आमचं पहिल गाणं रेकॉर्ड केलं, आमचा पहिला प्रयोग. पहिलं गाणं आम्हाला एका जवळच्या काका-काकीने सुचवलं : "एक प्यार का नगमा है..." आम्ही आमचं हे गाणं दोघांच्या आई-बाबांना समर्पित करायचे ठरवले. त्यांना पण खूप आवडले. आता आमचं youtube वर चॅनेल आहे : SmallSasa आणि त्यावर अपलोड करतो आमच्या कलाकृतीचा खजिनाचा साठा.


लॉकडाऊन सुरु व्हायच्या आधी आम्ही थोडं बागकाम चालू केलं होतं आमच्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या साहाय्याने. मला आधी खूप रुची नव्हती बागकामामध्ये. माझा नवरा मुख्यतः सांभाळायचा सगळी झाडं. आता वेळ असल्यामुळे आणि घरीच असताना मी हळूहळू रोज झाडांना जाऊन बघायचे फक्त आणि फोटोग्राफीमध्ये रुची असल्यामुळे त्यांची वाढ फोटोमध्ये कैद करायला लागले. बघता बघता मलाही आवड निर्माण झाली आणि मीही त्यांची काळजी घेऊन पाणी घालायला लागले. वरतून पाईप असल्यामुळे फवाऱ्याने पाणी घालायला मला मज्जा येऊ लागली. 


बघता बघता जुलै महिना आला आणि गुरु पौर्णिमेचा सण आला. मी या सणाशी खूपच जोडलेले आहे कारण आमच्या घरी लहान असताना मला प्रत्येक वर्षी या वेळेला भेट मिळायची आई-बाबांकडून, माझी आरती ओवाळायचे आणि मला नमस्कार करायचे. तुम्हाला वाटेल हे काय नवीन!!! तर याच्या मागे कारण असे होते, मी ज्या शिबिराला जायचे लहान असताना, तिकडच्या मुख्य आजीने सांगितले होते सगळ्या पालकांना की मुले म्हणजे आपले गुरूच असतात, त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते आणि म्हणून या प्रथेचे माझे आई-बाबा अनुसरण करायचे. मला तर मज्जाच यायची, कारण तर तुम्हाला कळलेच असेल!


म्हणून मी हा सण नेहमी साजरा करते, अगदी परदेशीही. यावर्षी इकडे आमच्या कॅलिफोर्नियाच्या गजानन महाराज मंदिराच्या परिवाराने गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने ऑनलाइन सोहळा ठेवला होता. कार्यक्रम सकाळी ५ ते दुपारी १ पर्यंत होणार होता. शनिवार असल्यामुळे आणि दरवर्षी सकाळी मंदिरामध्ये उपस्थित असणं कठीण असल्यामुळे, मी यावेळेच्या ऑनलाइन संधीचा लाभ घ्यायचे ठरवले आणि सकाळी ५.३० ला उठले. सुट्टीच्या दिवशी एवढ्या सकाळी उठायचे साधारणपणे मला जमत नाही पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जोश आला होता. इंडियामध्ये आई-बाबांना आणि एका जवळच्या काकुंना, ज्

या महाराजांच्या खूप मोठ्या भक्त आहेत त्यांना मी कार्यक्रमाच्या तपशील पाठवल्या आणि आम्ही सगळे जॉईन झालो. ते बघता बघता मी महाराजांसाठी नैवेद्याच्या तयारीला सुरुवात केली : वरण, भात, बटाट्याची भाजी, उकडीचे मोदक आणि शेगावी कचोरी असा बेत ठरला आणि मी सुरुवात केली. शेगावी कचोरी मी पहिल्यांदाच प्रयत्न करत होते, त्यामुळे जरा मनात धुग धुग होती पण शेवटी झाली बरोबर. महाराजांची कृपाच म्हटलं पाहिजे!!! मागे "गण गण गणात बोते" अर्थात "प्रत्येक जीव हा ब्रह्मदेवाचा अवतार आहे" असा जप चालू होता. या वर्षांपासून मी ठरवले होते की मी जे पण स्तोत्र आणि जप देवाचं म्हणणार त्याचा मी अर्थ समजून करणार आणि मग त्याचा प्रसार करणार. त्या प्रमाणे मी या जपाचा पण अर्थ समजून घेतला, त्याचं महत्त्व समजून एक कागदावर लिहिले आणि माझी व्याख्या सगळ्यांना पाठवली. माझा नवरा गुजराती असल्यामुळे मला त्यालाही याचे महत्त्व समजावणे सोपे गेले आणि त्यालाही ते आवडले. नंतर आम्ही आरती करून, आई-बाबांचा व्हिडिओवर आशीर्वाद घेऊन, देवाला नैवेद्य दाखवून त्याचा आस्वाद घेतला. अशाच प्रकारे पुढे काही सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घरी साजरे केले जसे की दीप पूजन : मला याबद्दल एका जवळच्या मैत्रिणी काढून कळले आणि तिने सांगितल्याप्रमाणे मी केला आणि त्याचे महत्त्व जाणून आम्ही समारंभ पार पाडला. पुढे नंतर श्रावण शुक्रवार : याबद्दल मला आईकडून माहिती होतेच, ती दरवर्षी ना चुकता श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी देवीची पूजा करायची. तसे मी दर वर्षी ही पूजा आमच्या घरी इकडे परदेशी नाही करायची कारण वेळ नाही मिळायचा, आठवड्याचा दिवस असल्यामुळे ऑफिसची गडबड आणि सगळं प्रथेप्रमाणे करून नैवेद्य तयार करणे मला जड जायचे. आता "वर्क फ्रॉम होम" हे चालू असल्यामुळे वेळापत्रक बदलले आहे आणि त्यात हे करणे शक्य वाटू लागले. आई-बाबा प्रत्येक शुक्रवारी आम्हाला या पूजेसाठी मार्गदर्शन करू लागले आणि अगदी भटजीसारखे आम्हाला एक एक मंत्र म्हणून सांगू लागले, आता हे करा मग हे. अशाप्रकारे आमची पूजा पार पडली. प्रत्येक शुक्रवारी पूजा असली तरी त्याचा कंटाळा नाही आला कारण प्रत्येक शुक्रवारी आम्ही थोडा थोडा बदल करून सुधारणा करायचो. त्यामुळे अजूनच मनोरंजक आणि सर्जनशील कार्यक्रम होत गेला. ते म्हणतात ना, मनात श्रद्धा आणि भक्ती असेल तर ती आपल्या काढून कार्य छानपैकी करून घेते आणि त्याचा प्रचंड आनंद मिळतो. 


जसजसा श्रावण महिना संपत आला तसा गणपती बाप्पाच्या आगमनाची वेळ झाली. गणेश चतुर्थी तर माझा सर्वात प्रिय सण. नुसतं नाव जरी घेतलं तरी मनात सगळे नारे येतात : "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या", "एक दोन तीन चार, गणपतीचा जय जय कार", "गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला..." इत्यादी. किती तो जोश, उल्हास, उत्साह, कोणीतरी खरंच घरी येणार आणि नांदणार आपल्या घरी असं. दरवर्षी आम्ही हा सण आमच्या एका जवळच्या मित्रमंडळीबरोबर साजरा करायचो : अगदी आदल्या दिवशी जायचो राहायला आणि सजावट करायचो, पोरांची धमाल तर चालूच असायची, दुसऱ्या दिवशी मोदक आणि काय काय बनवायचो, गणपतीची गाणी लावायचो, अगदी पूर्ण धमालच. त्यांच्याकडूनच मी उकडीचे मोदक आणि खूप काही पदार्थ बनवायला शिकले. अगदी जिवलग कुटुंबासारखे मित्रमंडळी, मला सख्खी बहीण नाही आहे. पण मला त्याची जाणीव देखत होत नाही ते सगळे असल्यामुळे : परदेशी अशी नाती मिळणं खरंच नवल वाटते. यावर्षी लॉकडाऊनमुळे भेटून हा सण साजरा करणे थोडं अवघड होते. त्याप्रमाणे आम्ही व्हिडिओ कॉल करून ऑनलाइन समारंभ साजरा करायचे ठरवले. आमच्या घरी त्याच वेळेला दोन सण येतात. माझा नवरा जैन असल्यामुळे, त्याच वेळेला पर्युषण हा सणदेखील असतो. दोन्ही सण एकत्र असल्यामुळे आम्ही अजूनपर्यंत गणपती बाप्पाला आमच्या घरी नाही आणू शकलो होतो. थोडं व्यवस्थापित करणे जड जाईल आणि ऑफिसदेखील असल्यामुळे सगळं शक्य नाही, पुढे बघू अशी आमची नेहमी चर्चा व्हायची. या वर्षी संधी बनून आमच्या घरी बाप्पाला घेऊन आली, त्यावर दिवसही शनिवार आलेला. माझा उत्साह बघून माझ्या नवऱ्याने मला समर्थन दिले आणि मला प्रोत्साहन दिला. आई-बाबांना थोडा संकोच होता आधी कारण त्यांना वाटत होत गणपती बाप्पाचा करणे सगळं जमलं पाहिजे आणि काही गडबड नको व्हायला. पण माझा उत्साह आणि माझी खूपच इच्छा असल्यामुळे ते त्यांनी शेवटी परवानगी दिली आणि श्रावण शुक्रवारी जसे बाबा भटजी झाले तसे गणपती पूजनालादेखील त्यांना आम्ही भटजी बनवायचे ठरवले. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करायला मी आदल्या दिवशी सुट्टी घ्यायचे ठरवले. मूर्ती बाहेरून आणण्यापेक्षा मी विचार केला आपण घरीच बनवू मूर्ती. काही कलेचे काम करायला मी घरी रंगबेरंगी चिकणमाती आणलेली, त्याच्यातुन तयार झाला आमचा बाप्पा. नेहमीसारखेच उत्साह कायम ठेवून सजावट केली बाप्पासाठी आणि बाप्पा विराजमान झाले दिड दिवसासाठी आमच्या घरी. मला इतका आनंद झाला सांगू, शब्दात व्यक्त करणे कठीणच आहे. मी लहान असताना आम्ही सहपरिवार गोव्याला आमच्या गावी जायचो आणि ५ दिवस पूर्ण धमाल करायचो : आरती, भजन, फुलांचा हार बनवणे, सजावट करणे, खाण्याचे वेगवेगळे पदार्थ : पातोळी, मोदक, रोज वेगवेगळा मेनू. त्यावेळेला मी फक्त खाणारी होती, कारण जेवण तर आई, मावशी, आजी, काकी बनवायचे. आता आता मी बनवायला पण शिकले. अशा खूप खूप आठवणी डोळ्यांसमोर येऊन उभ्या राहिल्या. पुढचे दोन दिवस ठरल्या प्रमाणे खूपच छान उत्साहात गेले : बाप्पासाठी खास मी वरण, भात, भाजी, चपाती, उकडीचे मोदक आणि पुरणपोळी असा नैवेद्य बनवला. असा नैवेद्य आमच्या घरी प्रत्येक महिन्यामध्ये बनायचा कारण संकष्टीमध्ये आमच्या परिवारातील जवळचे भटजी काका येऊन अभिषेक करायचे. या सगळ्यामुळेच माझ्यामध्ये ते सगळं पुन्हा निर्मित करायचा उत्साह कायम असतो. पुरणपोळीचा प्रयत्न बाप्पासाठी पहिल्यांदाच होता आणि बाप्पाच्या कृपेने छान झाली. आम्ही त्याचा आस्वाद प्रसाद म्हणून घेतला. पुढे मला या सोहळ्याला साडी नसायची खूप इच्छा होती. पण मला अजून साडी स्वतःहून निसता येत नव्हती. नेहमी कोणी ना कोणी मदत करायचे निसायला. लॉकडाऊनच्या निमित्ताने मी स्वतःला आव्हान दिले शिकण्यासाठी ऑनलाइन विडिओ बघून आणि आखिरकार शिकले मी. अशी परिस्थिती आली नसती तर मी नेहमी अवलंबून राहिले असते आणि स्वतः प्रयत्नदेखील केले नसते. मला या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभिमान वाटतो आणि खूप आनंदही मिळतो झाल्यावर. अंततः विसर्जनही छान पार पडले, आम्ही घरीच बाल्टीमध्ये आमच्या घरगुती गणपतीचे विसर्जन केले आणि बाप्पाला निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणालो. 


अशा प्रकारे आमचा लॉकडाऊन गेला आणि अजूनही चालू आहे. माझे बाबा मला नेहमी सांगतात, "जे होते ते चांगल्यासाठी होते." माझा यावर अतूट विश्वास आहे. मला खूपच कृतज्ञता वाटते की आम्ही या लॉकडाऊनमध्ये खूप काही नवीन अनुभव आणि क्षण आमच्या प्रिय आई-बाबा, जवळचे परिवार मंडळी आणि मित्रमंडळींबरोबर घालवले. या आठवणी कायमच्या आमच्या बरोबर राहतीलच. मला असे नेहमी वाटते आपण सगळ्यांनी उत्सवाची वाट न बघता प्रत्येक क्षण, जी पण परिस्तिथी आहे त्यामध्ये स्वतःचे मन रमवून आनंद लुटायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला नेहमी वेगवेगळ्या परीस्थितींमधून नेहमी काही ना काही शिकायला मिळते. प्रत्येक क्षण आपल्याला एक संधी दाखवत असतो आपल्या स्वतःचा चांगले आवृत्ती बनायला. अशातूनच आपली मानसिकता वाढते आणि आपण कायम शिकण्याचे दृष्टीकोन ठेवून लवचिक बनतो. भविष्य आपल्या हातात नाही आहे पूण वर्तमान आहे. या वर्तमानाचा सदुपयोग करून प्रत्येकाने आपल्या स्वतः धीट बनवून चिंतन करून, निरनिराळे पुस्तके वाचून कायम शिकत राहावे हाच हेतू. 

धन्यवाद !!!


Rate this content
Log in

More marathi story from Sayali Sakhalkar

Similar marathi story from Inspirational