लक्ष नाहीं द्यायचे
लक्ष नाहीं द्यायचे




आपण एखादा नवा शर्ट घालून बाहेर पडतो. आपल्याला वाटत असतं की हा शर्ट आपल्याला खूपच खुलून दिसतोय. इतक्यात कुणीतरी लांबचा मित्र वगैरे भेटतो आणि म्हणतो, "कसला शर्ट घेतलायस रे?...हा शर्ट तुला अजिबात शोभत नाही. नुसता कार्टून दिसतोस बघ या शर्टात." मग आपलं मत बदलतं आणि आपण तो शर्ट काढून ठेवतो आणि इतर शंभर जणांनी हा शर्ट तुम्हाला चांगला दिसतोय म्हणून सांगितलं तरी तो पुन्हा घालत नाही.
आपण युनिक कलर म्हणून एखाद्या चांगल्या कलरची गाडी घेतो. चार दोन दिवसांत आपण त्या रंगाच्या प्रेमातच पडतो. कुणीतरी फुकट्या मग गाडीला हात वर करून गाडीत बसतो आणि उतरताना तुम्हांला म्हणतो, "साहेब, गाडी चांगली आहे पण हा रंग नको होता. लैच भडक दिसतोय बघा. याच्याऐवजी पांढरा रंग घेतला असता ना, तर गाडी लै म्हणजे लै चांगली दिसली असती." झालं ! त्यानं एवढं बोलायचा अवकाश की आपल्या मनात द्वंद्व सुरू होतं. आपण दिवसभर विचार करत बसतो की खरंच आपण पांढरा रंग घ्यायला हवा होता का?
तुम्ही खूप चांगलं लिहता. लोकांना ते आवडतंही. पण एक दिवस कुणाकडून तरी एखादी कॉमेंट येणार, "काय भुक्कड लिहलंय हो?...आणि तोच तोचपणा किती? " आता या शहाण्याला कसं सांगायचं की बाबारे, जीवनात बऱ्याच गोष्टीत तोच तोचपणा असतो म्हणून त्या गोष्टी करायचं सोडतं का कोणी?
आपल्या आनंदावर विरजण घालणारे असे लोक पावलोपावली भेटत असतात. आता काल डॉक्टर्स डे झाला. बहुतेक लोकांनी डॉक्टरांच्याबद्दल चांगलंच लिहलं. पण एकदोन कॉमेंट तिरकस होत्याच.
आता अशावेळी काय करायचं?..... काही करायचं नाही... दुर्लक्ष करायचं आणि पुढे चालत जायचं !... पुढे चला.....यही जिंदगी है!