कर्तृत्ववान स्त्रिया
कर्तृत्ववान स्त्रिया
स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्वान स्त्रियांमध्ये महाराष्ट्रभूमीत पावन झालेल्या लोकांच्या कायम स्मरणात असणाऱ्या अश्या दोन स्त्रिया म्हणजे स्वराज्य संस्थापीका माँ जिजाऊ आणि अवघ्या स्त्री जातीचा उद्धार करणारी आद्य शिक्षिका सावित्री फुले दोघी वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दल लिहावे तेवढे कमीच.त्यांचा इतिहास पाहता त्यांचे विचार किती प्रगल्भ होते ते दिसून येते.
महाराष्ट्र भूमीला साधुसंतांचा जो बहुमूल्य वारसा लाभला हे जेवढे सत्य आहे तेवढेच सत्य हेही आहे की जर या दोन स्त्रिया आपल्याला लाभल्या नसत्या तर आपली हिंदू संस्कृती व स्त्री जाती खितपत पडली असती.
शालीनतेची सौजवळ मूर्ती
कणखर बाणा प्रगटली
स्वराज्याची देऊन स्फूर्ती
इतिहासाची सुवर्ण पाने रचीयली
शिवाजी महाराज १४ वर्षाचे असतांना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीरी सुपूर्त केली.परंतु पूर्व परिस्थिती पाहता स्थिती बिकट होती यवनांचे राज्य होते. स्त्री ,रयत सुरक्षित नव्हती.जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाऊवर येऊ पडता कुशल अधिकाऱ्यांमार्फत निजामशाही व आदिलशाहीला टक्कर देण्यासाठी शिवाजी महाराजांना सदरेवर शेजारी बसून राजकारणाचे धडे दिले.समान न्याय देण्याची वृत्ती अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्र प्रशिक्षणावर जातीने लक्ष देत शिकविले.राजघराण्यात जन्म झाल्यामुळे या सर्व गोष्टी त्यांनी अवगत केल्या होत्या त्यांच्या व्यक्तीमत्वात, धैर्य शौर्य प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती ओतप्रोत होती.रयतेचे हाल,धर्माची हानी त्यांना बघवत नव्हती म्हणून तुळजाभवानीला साकडं घातलं होत शूरवीर पुत्राची मागणी केली होती व माता पित्याची दोन्हीही भूमिका यशस्वीरीत्या पार पाडत त्या आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी बाळ शिवाजीला घडवीत होत्या.
वीरमाता जिजाऊंच्या प्रेरणेमुळेच स्वतंत्र स्वराज्य स्थापित केले रयतेचा वाली शिवाजी राजे छत्रपती झाले.माँ जिजाऊ व शिवाजी म्हणजे शिव आणि शक्तीचा मेळच म्हणावा लागेल.
एकोणिसाव्या शतकात पुण्यासारख्या सनातन्याच्या बालेकिल्ल्यात एक स्त्रीने शूद्र अतिशूद्र स्त्रियांच्या उद्धारासाठी स्वतः शिक्षित होऊन त्यांना शिकवण्याचे जे कार्य केले ती एक नवीन क्रांतीच जन्माला आणली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.स्त्री शिक्षण म्हणजे त्या काळी फार मोठे पातक समजले जायचे.ज्योतिबांची ज्योत घेत स्वतः वात बनून प्रज्वलित झाल्या आणि
वातीसारखच स्वतः जळत त्यांनी इतरांना प्रकाश दिला.
हातात पाटी लुगड्याला गाठी
सोसले किती स्त्री उद्धारासाठी
ज्योतिबांच्या साथीने सावित्रीबाईने बालहत्या प्रतिबंधक गृह विधवा विवाह, केशवपन बंदिसाठी न्हाव्याचा संप इ.सामाजिक सुधारणा करून जे युग निर्माण केले ते नवयुग क्रांतीचे ठरले.भारतातली पहिली शिक्षिका ,मुख्याध्यापिका स्त्री,अनाथांची माता,आणि स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या प्रणेत्या ठरल्या त्या म्हणजे सावित्रीबाई.
ज्योतिबाप्रमाणेच सत्य, समता आणि मानवतासाठी प्रखर विरोधाला आणि छळाला टक्कर दिली.स्त्रीसुद्धा मानव आहे पुरुषांइतकी कर्तबगार आहे हे जगाला दाखवून दिले. त्या काळात काशीबाई नावाच्या ब्राह्मण स्त्रीला आत्महत्येपासून परावृत्त करीत तिचे मूल दत्तक घेतले त्याचे नाव यशवंत ठेवले त्याला डॉक्टर केले हे क्रांती कार्यच आहे ढोंगी धर्माविरुद्ध व धर्ममार्तंडविरुद्ध
त्यांनी बंडाचे निशाण फडकविले.
आज स्त्री कर्तृत्ववान होत आहे आणखी बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकारे जे अत्याचार होत आहे त्यासाठी माँ जिजाऊ आणि सावित्रीबाईंच्या कर्तबगार कार्याची थोरवी लक्षात घेऊन त्यांना स्वतःला लढा देऊन कार्य करावे लागणार आहे.
