STORYMIRROR

Kalpesh Bagad

Crime Thriller

3  

Kalpesh Bagad

Crime Thriller

खविस

खविस

38 mins
488

"ए पोरी, कुठ निघाली? जाऊ नग तिकडं."


"हितच चाललीये. अडवा कडं."


"अग यडी का खुळी तू? तिकडं 'खैस' असतो. तुला म्हाईत नाय का?"


"नानी तू नको काळजी करू, घरला जा"


"काय अगाव पोर बाई... लवकर ये घरला" अस म्हणत एक वयस्क बाई 'म्हातारी' म्हणा हवं तर... एका मुलीला समजावत होती.


एक नुकतीच तारुण्यात उतरलेली गावाकडची मुलगी काही तरी शोधत होती जणू. काळोख होत चालला होता. सूर्य मावळून चमकणारे ढग देखील दिसेनासे झाले होते. ती मुलगी मात्र जंगलाच्या दिशेने जात होती. कदाचित काही हरवलं असेल कारण काही शोधत होती ती. नजर अशी कावरी बावरी करत होती. वाट चालत चालत बरीच पुढे आली. मागून कुणीतरी येतंय असा भास झाला त्यावेळी ती थबकली. तिने मागे वळून पाहिलं पण तिला कोणीच दिसलं नाही. पुन्हा वाट चालू लागली. रात्र होत चालली होती. तसा मिट्ट काळोख तर नव्हता. पण सर्व काही अंधुक दिसत होत. अचानक बाजूच्या झुडुपात काही तरी हालचाल झाली. ती थबकली...


'वारा तर न्हाई दिसत.. मग हे...? कोण तरी असल..'


तिने आवाज दिला "कोण ? बाहेर ये नायतर दगड घालीन." अस म्हणत तीने दगड उचलला. तोच कुठून तरी एक दगड तिच्या पाया जवळ येऊन पडला. आजू बाजू ला कोणीच दिसत नव्हते. तिला भीती वाटत होती. तिने हातातील दगड जमेल त्या दिशेने फेकला. आणि मिळेल तो दगड उचलत ती एकडे तिकडे फेकू लागली. अचानक कुणी तरी मागून खांद्यावर हात ठेवला. ती स्तब्ध झाली. तिच्या हातात एक दगड होता. हृदयाचे ठोके वाढत होते तरी तिने हळु हळू मागे मान फिरवली. आणि


"तू आहे का खैसा?" तिच्या समोर एक तरुण उभा होता. तिचे हे शब्द ऐकून मोठ मोठ्याने हसू लागला.


"मार खाशील तू आता तर..."


"गप ग ... घाबरगुंडी.."


"बोल पटापट... निघायचंय मला... काम हाईत..."


"भित्रे..." परत हसू लागला.


"काय सांगायचं व्हत, सांग... टाईम नाहीये माझ्याकड? का जाऊ मी?" आणि जाऊ लागते तोच तिचा हात धरत थांबवत बोलतो.


"थांब ग... घाबरली म्हणून चालली का?"


" हात सोड..." अस म्हणत तीने हात झटकला. " इकडं येतनी नानीनी पाहिलंय.. घरी जाऊन बोंबलली पण असल... आईला काय सांगू आन काय नको असं झालंय मला.... लवकर सांग काय सांगतोय.." आता पूर्ण काळोख झाला होता. चेहेरा ठीकसा दिसत नव्हता. त्याने परत तिचा हात धरला


"तुला चांगलच माहीत आहे मी का बोलावलंय? नाय तर तू एवढ्या लांब आली पण नसती."


"केश्या, पट पट बोल बाबा..." तिने परत त्याच्या हातून हात सोडवला.


"धरू दे की हात..." म्हनत पुन्हा हात धरला अगदी घट्ट. "काळीज धडधडायला होत ग तुला पाहून... मनात भरलीय ग तू माझ्या." अस म्हणत त्याने तिला मिठी मारली.


"केश्या अंगाला झटू नको. आवडत नाय मला." म्हटत ती बाजूला झाली.


"मी पण नाय आवडत?" त्याने विचारलं तशी ती लाजली.


"अस कुठ बोलली? तू आवडतो पण... "


"पण काय?"


दोघं बोलत होते तेवढ्यात झुडुपात परत हालचाल होऊ लागली. झाडा चा वाळलेला पालापाचोळा कुणी पायाखाली तुडवत आहे असा आवाज येत होता. ती घाबरून त्याला बिलगली. "तुला बोलत होती जाऊ म्हणून.... आता बघ कोणी तरी पाहिलं आपल्याला..." ती म्हणाली. त्याने तिला बाजूला केलं.


"अग रानच जनवार असल.. थांब... घाबरु नको मी पहातो."


अस म्हणत तो पुढे जाऊ लागला. तेवढ्यात -

"केश्या, नको ना रे... जाऊ चल" तिच्या बोलण्या कडे त्याने लक्ष दिल नाही. तो पुढे जात रहायला. तोच त्या झुडुपातून माणसाच्या आकाराची काळी आकृती उठून बाजूला गेली. उठून गेल्या बरोबर भाजलेल्या मांस सारखा वास येऊ लागला. तो एका जागी स्थिर उभा राहिला काही हालचाल न करत. ती आकृती उठून बऱ्याच अंतरावर जाऊन बसली. जणू यांच्या वर नजर गेली नसावी. हातात काही तरी होत जणू. त्याने निरखून पहिलं माणसाचं अर्धवट शरीर होत जणू त्याच्या हातात. बसून तो मांस काढत होता. एक हात वर केला तेव्हा हातात नक्की माणसाचाच पाय आहे हे स्पष्ट झाले. हात वर करत तो त्या पायावरच मांस खाऊ लागला. हे पाहून केश्या च्या पाया खालची जमीन सरकली. हळूच तिच्या जवळ गेला आणि तिला बोलला "मिने चल इथून..."


"कोण आहे तो?"


"हळू बोल... आन चल तू.." अस म्हणत तू हात ओढू लागला.


"केश्या, अरे यानं आपल्याला पायलय... तो कोण आहे ते तर बघ " अस म्हणत ती पुढे झाली. तिने ते पाहिलं नव्हत जे केश्या ने पाहिलं होत. ती पुढे झाली त्या काळ्या आकृती च्या दिशे ने जाऊ लगली. "तू माझ्या मागच थांब केश्या" ती हळूच बोलली.


ती आकृती तिला काही खाताना दिसली. ती थांबली आणि तिने मागे वळून पाहिलं. मागे कुणीच नव्हत, केश्या ही नाही. हे पाहून तिची धड धड वाढली. "केश्या..." ती त्याला आवाज देऊ लागली. उत्तर येत नव्हते. ती अजून मोठ्या आवाजात हाक दिली. आणि ती कदाचित त्या आकृती ने ऐकली आणि ती ताडकन उभी राहिली. अक्राळ विक्राळ रूप होत तिचं. पुरुष असेल बहुतेक. घोंगडी पांघरली होती जणू. फक्त काळी सावली दिसत होती. हातात कुण्या माणसाचा पाय दिसत होता, अर्धवट कुर्तडलेलं त्या पायच मांस खाली लोंबत होत. तिला समजून चुकलं की हा जे काही खात होता ते हेच. माणसाचे मांस. काही विचार न करता तिने तिथून पळ काढला. आता मात्र ती समजून गेली होती... गावात ज्याची लोक भीती घालत होते तो हाच...


............................................


भाग २

मीना अचानक दरात धापा टाकत आली. आई लगबगने दरवाजा जवळ आली "काय ग मिने....? येवढं धापा टाकायला काय झालं?" मीना चा श्वास कोंडत होता इतकी घाबरलेली. घामाने भिजलेली आणि अंग तर नुसतं थरथरत होत तिचं. आई ने पदराने च घाम पुसला..


" मीने अग... एवढी कमुन घाबरलीस ग...?" आई पुन्हा विचारू लागली. तरीही मीना काही बोलेनासी होती. तिची धाप जरा कमी झाली, तेव्हा आई ने पाण्याचा तांब्या पुढे सरकवला.


" धर पाण्याचा घोट घे.." तांब्या भर पाणी मिनी ढसाढस प्याली.


" मीने, अग कुठ भूत बित पायल का काय तूवा ... असं का करून राहिली...?"


" हं.... भूत च पाहिलंय ..." मिनी हळूच बोलली.


" कुठ ? कश्याला फिरती कुठ? " आई चिंतातुर झाली.


" खैस ...."


" काय सांगू लागली मीने?"


" जनावरं जस असतय तस व्हता... हातात माणसाचं मड ... ढोरागत तुटून पडत होता त्या मड्यावर... मला पाहिलं आणि - "


मीना ला मध्येच थांबवत आई मध्येच म्हणाली.


" मिने, आता सकाळ सांग तूही गोष्ट ... आता झोप बर..." आई ने मीना ला झोपी लावले. मीना झोपी गेली पण मध्ये मध्येच ती दचकल्या सारखं करत होती. आई चिंतातुर तो होती.


सकाळ उजाडली मीना कधीच उठून रोजची कामं करत होती. आई ला आज उशिरा जाग आली होती. आई ची झोप नीट झाली नव्हती. " अग ये मीने... उठवायच की मला..."


"काय ग...? काय झालं ? " मीना च्या हातात झाडू होता झाडत असेल कुठेतरी. काम टाकून आली होती ती.


" रात्री कुठ गेलतीस...? कुठ बी हुंदडू नको... कळलं ना ? " आई उठून पांघरूण च्या घड्या करत बोलली. "जा, जरासक टोपात पाणी आन जा... जायचंय मला बाहेर ..."


मीना पाणी घेऊन आली आणि आई कडे देत विचारलं " कुठ निघाली ?"


" तू मोठी मला सांगून जाती ना ...! " आई रागात बोलत होती जणू. मीना काहीच बोलली नाही. आई ने चपला घातल्या आणि निघून गेली. मीना ने झाडू बाजूला टाकला आणि ती देखील बाहेर निघाली.


एका घरा समोर येऊन मीनाने आवाज दिला " खूरपी झाल्यात का तयार...?"


"काय ग पोरी ?" घरातून आवाज आला


" खुरपी ... खुरपी..." तिने अजून मोठ्याने उत्तर दिले कदाचित नीट ऐकू जावे म्हणून.


" कालच तर टाकून गेली ... तूही आई... राती तून बनून व्हत्यात व्हय ? उद्या ये.." आतून आवाज आला.


" आन केश्या हाय का ?" तिने परत आवाज दिला.


" न्हाय .." आतून उत्तर आले.


" कुठ गेलाय ?" मीनाने विचारलं


" तुला ग काय करायचय त्याच...?" आतून आवाज आला.


" काय न्हाय असच ... कुठंय तो ?" मीना परत विचारले


" आजारी पडलाय तो ... तालुक्याला नेलय सकाळ सकाळी ..."  आतून उत्तर आले. हे ऐकुन मीना च्या चेहेऱ्यावर काळजी दिसू लागली. तिने पुन्हा घरची वाट धरली.


घरी आई आली होती. मीना ला पाहताच आई ने विचारल "कुठ गेली व्हतीस ग दार उघडं टाकून ?"


" खुरपी अनायला ... " मीना बोलली


" तो काय आज देईल का ग...? जाऊ दे ... भेटल तव्हा करू ती निंदनी..." आई बोलली


" तू ग कुठ गेली व्हती येवढ्या घाईत...?" मीना आई ल विचारू लागली.


" सावडायला... तो पुढच्या वाडी चा भीमा वरला ना ग... त्याची व्हती. " आई नीट उत्तर दिलं.


" मग ? लगेच कशी आली ? " मीना ने विचारलं.


" अग, सावडच कुठ झाली...?"


" का ग?"


" अग काही. असायला तर पायजे त्याच ...? "


" म्हणजे..? "


" रात झाली म्हणून सगळी लोकं निघून आली. कंच्या तरी जनावरांनी वढून नेला त्याला .. काय सगळा पांगुन पुंगुन दिला व्हता... " आई च हे वाक्य ऐकून मीनाच्या डोक्यात पुन्हा चक्र फिरू लागलं.


" आई ... जनावरांनी न्हाय नेल ते... "


" मग ? "


" खैस ... खैस घेऊन गेला होता. आडवा कडल्या रानात "


" तुला कसं माहीत ..?"


" मी माझ्या डोळ्यांन पाहिलंय ... "


" तू तिकडं कश्याला गेली व्हती ..?"


मीना काही बोलली नाही. आज पर्यंत फक्त ऐकत आली होती पण आता ती देखील या खाविस च्या असण्याची ग्वाही देऊ लागली होती. मीना च्या डोक्यात परत तेच विचार फिरू लागले.


' म्हणजे तो खैस च होता ... आणि त्यानं तर मला पाहिलंय.. आता माझ कसं होणार... केश्या तर आजारी झाला ... तो नक्की मला शोधणार... "


आता सतत तिच्या मनात एकच विचार येत होता...


खविस..!


.......................................................

भाग ३


संध्याकाळची वेळ होती. मीना एकटीच घरात काही काम करत होती. तोच तिला कुणीतरी हाक दिल्याचे ऐकू आले.


" ए मिने..." आवाज अगदी बारीक तिने बाहेर येऊन इकडे तिकडे पाहिले कुणीही नव्हते. ती पुन्हा आत गेली व तिच्या कामात रमली. पुन्हा तसेच झाले. तिला हाक ऐकू आली आणि ती पुन्हा बाहेर येऊन पाहू लागली. 'बाहेर तर कुणीच दिसत नाही. पण आवाज कोण देतय?' असा विचारच करत होती तेवढ्यात तिला मागून कुणी तरी मिठी मारली. तिच्या काळजात धस्स झाल. ती त्या क्षणाला ओरडणार तोच तिच्या तोंड कुणी हाताने दाबले आणि आवाज निघू दिला नाही. ती सोडवण्या साठी धडपड करू लागली. आजू बाजू ला कुणी ही नव्हत. कशी बशी तिने स्वतः ला सोडवलं आणि क्षणात मागे वळून पाहिलं. मागे केश्या उभा होता. तिच्या जीवात जीव आला. ती त्याला पाहण्या साठी अशीही बेचैन होती. "कुठे होतास? " तिने त्याला विचारलं.


" गप्प बस... घाबरगुंडी... " आणि मोठ्याने हसू लागला.


" दवाखान्यात गेलता ना तू ? काय झाल होत ? " तिने त्याच्या वर हात लावला तर बर्फा प्रमाणे थंड जाणवला तो. " एवढा कसा रे गार तू?" तिने हात बाजूला केला.


" केव्हढी काळजी करती तू ...? जास्त जीव नको लाऊ मरल मी ..." आणि परत हसू लागला.


" बावळ्या... मरणाच्या गोष्टी का करतोय? टाईम बघत जा घड्याळात..."


" दहा वाजले असतील ... का काय झालं ? "


" येवढ्या रात्री इकडं कुठ ?"


"तुला भेटायला आलोय..."


" अजून थोडा वेळ थांबला ना माझ्या आई ला पण भेटून जाशील. "


" येवू दे की ... "


" येडा बिडा झाला का तू...? तिला काय सांगशील, कश्याला आलाय ते?"


" खुरपी द्यायला ..." हातातील खुरपी दाखवत तो म्हणाला


"निघ चल आता..." लाडाने मारत मीना त्याला म्हणाली.


" गप ग घाबरगुंडी..." आणि हसू लागला. तसा तिला राग आला आणि ती म्हणाली


" मी नाय घाबरत ... कळलं ना ?"


" अस ना ? मग आताच्या आता अडवाच्या रानात चल ... लगेच."


"नाय .. तू जा बर इथून"


" तू जर आली नाय ना तर बघ "


" केश्या ... येडपन नको घेऊ तू जा आता..."


" हे बघ, मीने... तू यायचं की नाय तुझ तू ठरव, पण मी तुझी तिकडे वाट पाहतोय लक्षात ठेव... आली नाय ना तर परत तुझ तोंड बी नाही पाहणार..." अस म्हणत तावा-तावात निघून गेला.


मीना पुढे आता खूप सारे प्रश्न होते. तिला भीती वाटते हे जरी खरं असलं तरी तिचं मन तिला केश्या कडे ओढत होत. ' खरचं जाईल का तो तिकडं...? तो म्हटला तर गेला पण असेल... पण जर तिकडं परत खैस बिस आला तर... पण खैस त्याच काही बर वाईट करणार तर नाय ना... नाय अस नाय होणार... पण तो एकटा आहे... गेलं तर आई ला काय सांगू... जाऊ दे आई च बघू काय पण ... पण पाहिलं या येडोबा ला घेऊन येते.'


अस म्हणत ती घरा बाहेर पडली, थेट जंगलाच्या दिशेने. ज्या ठिकाणी तिने खवीस पहिला होता, तिकडेच. कसली परवा न करता ती लगबगीने जात होती. मिट्ट काळोख होता. रात किड्यांचा आवाज चाहोबाजुंनी येत होता. मीनाच्या मनात भीती च वातावरण तयार होत होत. तरी आपल्या प्रेम साठी धडपड करत का होईना जायचं होतच. मीना आता त्या जागी पोहोचली जिथे ती केश्या ला भेटली होती. तिने आजू बाजूला नजर फिरवली, मात्र केश्या कुठेच दिसत नव्हता. ' हा जर एकडं आलाच नसल तर...?' ती मनातच विचार करू लागली.अचानक कुठे तरी कोणत्या तरी पाखराच ओरडणं कानी आलं. खूपच भयानक आवाज होता चिरचिरन्याचा, तिच्या काळजाचं पाणी पाणी झाल. '' केश्या...'' ती हळू आवाजात हाक देऊ लागली. तिच्या मनात भीती होती की ही हाक केश्या च्या आधी खविसाला ऐकू जायला नको. "केश्या... मी शेवटचं हाक देतेय बर का... आलाय का तू...? नको ना रे त्रास देऊ ..." काहीच उत्तर नाही. " ये ना समोर.. आहे मी घाबरट... पण जीव आहे रे खूप तुझ्या वर ... ये ना पण... " अस म्हणून तिला रडू येऊ लागलं आणि अचानकच समारच्या झुडुपात हालचाल सुरू झाली, त्या दिवशी प्रमाणे.


तिची धड धड प्रचंड वाढली, काही न बोलता स्तब्ध उभी राहिली. झुडुपात हालचाल वाढत होती. मीना ला तिचा प्राण जातोय की काय असं वाटायला लागलं होतं. झाडा खाली पडलेला पाला पाचोळा आवाज करू लागला आणि अचानक मागे कुणी उभ असल्याचा तिला भास झाला. मागे वळून पाहण्याची तिची हिम्मत होईनाशी झाली होती. तिने मान फिरवली तर पाहते तर काय...? केश्या येऊन उभा होता. " कुठे होतास तू... ?" आणि रडतच त्याला मिठी मारली. तो पूर्ण ओला झाला होता. तिला काहीच उत्तर न देता तसाच उभा होता. "चल, घरी चल... " अस म्हणत तीने मिठी सोडली आणि पुन्हा त्याच्या चेहेर्याकडे नजर फिरवली. पाहते तर काय तो केश्या नव्हताच. काळा कुट्ट रंगाचा, अंग अंग भिजलेला आणि राक्षस सारख्या तबियतीचा खावीस होता. तिची वाचा खुटली गेली. जीव मुठीत धरून तिने घराच्या वाताच्या दिशेने पळ काढला. वाटा मध्ये कुणी उभे दिसले. जवळ गेली तर तिला केश्या दिसला, ती लगबगिन त्याला म्हणाली " केश्या, पळ इथून ..." आणि हात धरून पळू लागली. जीव खाऊन ती पळत होती हातात केश्या चा हात होता तो ही पळत होता. का कुणास ठाऊक तिला परत काही तरी जाणवले. ती मागे वळून पाहणार तोच कुण्या दगडा ला पाय लागून ती पडली. बरीच गडबडत गेली केश्याचा हातात हात तसाच होता. तिने स्वतः ला सावरले आणि उठली. हात हलका जाणवला केश्याचा तिची नजर त्या कडे गेली. केश्या नव्हता कुठेच आणि तिच्या हातात अर्धवट भाजलेला, अर्धवट कुर्तडलेला हात होता. घाबरून तिने तो हात लांब फेकला आणि अचानक तिच्या अंगावर काही येऊन पडलं. ती जमिनीवर कोसळली. खविस तिच्या अंगावर बसला होता. तिला कच्च खाणार या तयारीत होता. कुत्रा - मांजर जसे मांस ओरंबडतात तसे त्याने तिचे अंगावरचे मांस ओरंबडायला सुरुवात केली....


ती मोठ्याने ओरडली... मोठ्याने किंचाळू लागली. आईने तिला हलवून उठवले. तिला जाग आली, तेव्हा घामाने ओली ओली झालेली. 'स्वप्न होत ते.... किती भयानक. बाप रे...' तिचा श्वास फुलत होता.


"का किंचाळत होती ग ? " आई ने विचारलं तशी ती आई ला बिलगली.


"खैस .... "


"नीट सांग बर तू "


मीनाने घडला प्रकार पूर्ण सांगितला. कुणाला भेटायला गेलेली आणि तिने तिथं काय पाहिलं सर्व काही. सर्व सांगून झाल्या वर ती शांत झाली. आईच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपी गेली. अगदी शांत.


...................................................

भाग ४


मीनाच्या आईच मन तिला सकाळ पासूनच खात होत, काही तरी वादळ चाललं होत मनात. तिला मीना ची खूपच काळजी वाटत होती. मीनाला अस का होत आहे, मीना अस का वागत आहे; तिला काही समजत नव्हत. मीनाच अस दचकून उठने, किंचाळणे आणि सतत खविसा च्या विषयी बोलणे या सर्वच गोष्टी मीना च्या आईला सतावत होत्या.


" कपाळाला हात लाऊन कमुन बसली ग, धुरपे..." कोणी तरी आवाज दिला तेव्हा ती भानावर आली. एक वयस्क बाई आवाज देत होती. ही तीच बाई होती, जी मीना ला त्या दिवशी आडवत होती.


" काय न्हाय हो... अशीच बसली व्हती कवळ्या ऊन्हात..." मीनाच्या आईने सांगितलं आणि मीना ला मोठ्याने आवाज दिला, " ए मिने... अग चहा ठेव ग... नानी आलीय..."


" साखर नाय राहीली... "आतून तीने आवाज दिला.


" नसल तर राहू दे बाई... चहा वाचून काय राहत... "


" नाय .. अस कसं..." अस म्हणत पुन्हा मीनाला आवाज दिला. " मीने अग त्या... भानुशी जवळच्या डब्यात पैस ठेवलंत... वाण्याकड जाऊन घेऊन ये जा... " कदाचित मीनाच्या मन नव्हत, तरी आई च्या सांगन्या वरून ती बाहेर जायला निघाली. मीना जाताच आई ने त्या बाई जवळ विषय काढला.


" आमची मीना नुसती झोपत दचकून उठती बघा... कधी कधी मोट्यानी आराडून उठती... मला काही कळनं झालंय हो..."


" तरी म्या सांगल व्हत तेव्हाच तिला... म्हटलं 'नग जाऊ तिकडं' पण पोरी नी एक नाय ऐकली... खैस असतो तिकडं अस बी सांगल व्हत." त्या बाई ने उत्तर दिला. ही नानी म्हणजे सल्लागार होती. वयस्क असल्याने बऱ्याच बायका तिचा सल्ला घेत. अनेक खेडे गावात आजही आहे अस काहीस. तिलाही सगळ्या गावाची खबर असायची.


" भूता-खेतानं तर झपाटल नसल ना...? मला तर लयीच काळजी वाटून राहिली हो..." मीना ची आई काळजी ने म्हणाली.


"कश्या ला एवढी काळजी करती... माझ्या वळखितला भगत बाबा हाय. बाडात बी पाहातो आणि खुटवणुकीच बी करतो... तू चल माझ्या संग... " त्या बाई ने सांगितले.


" नाय हो आज नको... " मीना ची आई म्हणाली.


" सांग तुला कव्हा यायचं .. अन सांग मला.. फक्त अमुश्याच्या आधी सांग." इतक्यात मीना साखर घेऊन आली. दोघीही बोलायच्या गप्प झाल्या. मीना ने चहा करून दिला. चहा झाल्या वर ती बाई निघून गेली आणि थोड्याच वेळात मीना ची आई देखील निघून गेली.


केश्या ऐरणीवर हातोड्याने घाव घालत होता आणि त्याचा बाप लोखंड लालबुंद करून ऐरणीवर ठेवत होता. संवाद काहीच होत नव्हता दोघांत फक्त घनाचा मोठा आवाज येत होता. इतक्यात तिथे मीना ची आई आली. "खूरपी झाल्यात का?"


तिने मोठ्याने आवाज दिला. तिचा आवाज ऐकू गेला नसावा कदाचित, आवाजा मुळे. काम तसेच चालू होते. केश्या क्या बापाचे लक्ष गेले तेव्हा त्याने काम थांबवले. मात्र केश्याने लक्ष दिलच नाही. तो तसाच रिकाम्या ऐरणीवर घनाचे घाव घालत होता. "केश्या.... " मीनाच्या आई ने मोठ्याने आवाज दिला. तरीही त्याचे लक्ष नव्हते. पुन्हा आवाज दिला तेव्हा त्याचे लक्ष गेले आणि विनाकारण ऐरणीवर घालत असलेले घाव थांबले.


" अरे काय बहिरा बिहिरा झालाय काय रे...? किती आवाज द्यायचे रे तुला?" मीनाची आई म्हणाली.


केश्याच्या बापानं खुरपि मीना च्या आई कडे देत फक्त " हं... " एवढच बोलला. खुरपी घेत मीना ची आई केश्याला हळूच म्हणाली, " तू जरा इकडं ये रे... इचारायचेय तुला काही..?" केश्या जरा अंतर सोडून लांब गेला. काही तरी कुजबुज सुरू झाली, मात्र केश्या चा बाप काही समजू शकला नाही.


" केश्या आडवाच्या रानात तुम्ही गेला व्हतात तिथं तुम्ही काय पाहालय ते मला नीट नीट सांग..." आई ने विचारले.


" काय ? आणि कधी ?" केश्याने अवाक होऊन विचारले.


" हे बघ केश्या... मिनीनं मला सगळं सांगितलंय मला तुझ्या कडून ऐकायचय... खरच तिथं तुम्हाला खैस दिसला व्हता का?" आई केश्याला विचारलं. तसा केश्या आणखी अवाक झाला.


" पण मी तर तिकडं गेलोच नाय ना... "


" केश्या खोटं नको बोलू नीट सांग..."


" मी काय खोटं काय बोलण... मिनी तिकडं गेली का नाय ते माहीत नाय पण मी नव्हतो गेलो कधीच. आणि हेच खरय."


आई शांततेत म्हणाली, "आणि तूमच्यात काही आहे?"


" नाय... " त्याने उत्तर दिलं. " माझं बोलण आठ दिवसा पूर्वी झाल होत तिच्याशी ... नंतर एकदा पण नाय... "


" तू खर बोलून राहिला का पण... "


" मी तर खर तेच सांगितलं पण विश्वास ठेवायचा नाय ठेवायचा तुमचा प्रश्न. " अस बोलून तो पुन्हा घन हातात घेतला. मीना ची आई त्याच्या कडे पाहतच राहिली. पुन्हा बाप बेट्याचे काम सुरू झाले.


खुरपं हातात घेऊन चालू लागली. तिच्या डोक्यात आता प्रश्नांची आणखीच भर पडली होती. 'केश्या जर तिकडं गेलाच नव्हता तर तिच्यासोबत कोण होत. तीनं सांगितलेला खैस खरच दिसला असल का? केश्या खोटं तर बोलत नसलं ? पण जर खरं बोलत असल तर... ? माझ्या पोरी वर काही काळी जादू तर नसल झाली? खरच झपाटल असल का पोरीला ?' असे अनेक प्रश्न डोक्यात घिरक्या घालत होते. चालत चालत ती एका घरा जवळ थांबली.


" काय ग, धूरपे?"


" डोस्कच काम करीना हो... सकाळ तुम्ही म्हटला व्हतात बाबा बद्दल... जाऊ म्हटलं दाखून आणूत निघलं काय तो तोडगा. "


" बर बाई चल... पण ध्यानात ठेव ... भगत बाबा ला कोण हसलेल जरा बी चालत न्हाय. "


" हां चाललं....चला."


पंचक्रोशीत चर्चित होता हा भगत बाबा. भूतबाधा काढण्यासाठी मंतरलेले तविज वगैरे द्यायचा. शेजारील गावात राहत होता तो. बाजूच्या लोकांची श्रद्धा होती त्या वर. अंतर जास्त होते आधीच उशीर झाला होता जायला कदाचित रात्रच होणार होती, पण मीनाच्या आई ने जाण्याचे ठरवलेच होते.

...................................................................

 

भाग ५


साधारण अर्धी रात्र उलटली होती. गावाच्या लगतच एक घनदाट जंगल होते. एक जुनाट डांबरी रस्ता डोंगराला वळसा घालून गावाकडे येत होता. प्रसंग त्या जंगला जवळचा होता. प्रचंड शांतता होती मध्येच पक्षांचं ओरडणे भयभीत करणारे होते. एक कार त्या ओबड धोबड रस्त्याने गावा कडून जंगलाच्या दिशेने येत होती, त्या शांत वातावरणात गाडीचा आवाज पुर्ण जंगल फिरत होता. का कुणास ठाऊक गाडी अचकच थांबली गेली आणि गाडीतून एक धस्ट पुष्ट माणूस उतरला. गाडी भोवती फिरत त्याने गाडी ची पूर्ण पाहणी केली, गाडीचे मागचे चाक पंक्चर झाले होते.


" अरे रे..."


" काय हो काय झालं ...?" त्याचा सोबत त्याची पत्नी होती.


" चाक पंक्चर आहे... "


" छे... काही खर नाही... आडमध्येच अस काही होईल वाटलं नव्हत... स्टेपणी असेल ना गाडीत...?"


" हो... सोनू बसली तिथे बघ..."


" मला जमणार आहे का ? तुम्हीच बघा..."


"मी फक्त सांगितलं काढून आणायला नाही सांगितले... बर सोनू झोपली आहे का...?"


" हां... ती झोपली आहे, पण जिगी जागा आहे..." ती गाडीतच मागे पाहत म्हणाली. मागच्या सीट वर एक छोटी सी ८ ते १० वर्षांची मुलगी तिच्या विदेशी कुत्र्याच्या अंगावर डोकं ठेऊन गोड झोपली होती आणि कुत्रे बीट बीट इकडे तिकडे बघत होते. तेवढ्यात तिचे वडील गाडीचा मागचा दरवाजा उघडून सीट खाली ठेवलेलं गाडीच चाक काढू लागले. त्याचा खुपच कर्कश आवाज झाला, त्यामुळे कुत्रा भयभीत होऊन खाली उतरला आणि ती लहानशी मुलगी जागी झाली. "मम्मा... जिग्गी..." अस म्हणत रडू लागली. गाडीच्या खाली उतरली. आई जवळ आली. तिचे वडील चाक खोलण्यात व्यस्त होते आणि तिच्या आई च्या हातात मोबाईल चा टॉर्च पकडला होता. आई ने तिला धमकावत " जा गाडीत बस. " अस म्हटले. ती मागे फिरली व गाडीत बसणारच होती तोच तिला रस्त्याच्या समोरच्या बाजूला कुणाचे तरी डोळे चमकताना दिसले. कदाचित तिचा डॉगी असेल अस समजून ती त्याला आणायला पुढे जाऊ लागली. त्या चमकणाऱ्या डोळ्यांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा ते जंगला च्या दिशेने जाऊ लागले. ती मुलगी देखील त्या मागे जाऊ लागली. त्याच्या जेवढी जवळ जाई तेवढे ते आत जंगलात जात होते. " जिग्गी गंमत नको करू बर का चल परत जाऊ... " अस म्हणत ती त्याला पकडायला धावत होती तेवढ्यात तिला दुरून डॉगी च्या भुकण्याचा आवाज आला, तेव्हा मात्र तिला समजले की, 'हा आपला जिग्गी नाही..' तिने मागे वळून पाहिले तिला कोणीच दिसत नव्हते. तिच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल होते.


" हा तर जिग्गी चा आवाज आहे हो... जंगलातून येतोय... " त्या मुलीची आई बोलू लागली.


" टॉर्च धर नीट ... झालंय काम पूर्ण ... जिग्गी गेला तर नवा आणू आपण... जुगलात जात नको बसू..." अस बोलत तो पुन्हा कामात व्यस्त झाला.


इकडे लहानशी मुलगी आई ला आवाज देऊ लागली, रडू लागली. पण तिची हाक कुणा पर्यंत जात नव्हती. वाट तिला कळत नव्हती. लहानशा चिमुरडीला आता काय करायचं अस झालं होत. पक्षी मोठ मोठ्याने चीर चीर करून अजूनच भय घालू लागले होते. आजू बाजू काळा कुट्ट अंधार, घनदाट जंगल आणि तिच्याच उंचीच गवत ज्या मुळे तिचा रस्ता चुकला होता.  इतक्यात तिच्या कडे कुणी येत असल्याचा भास होऊ लागला.


डोंगरावर एक घर होते, त्या समोर ३ माणसाच्या आकाराच्या आकृत्या उभ्या होत्या. त्यातल्या एका व्यक्तीने दार वाजवल तेव्हा आतून कुणीतरी दार उघडलं. "एवढ्या रातच्या टायमाला कोण आहे..."


" भगत बाबा आहेत का? लयीच महत्वाचं काम व्हतं. " मिनाची आई म्हणाली. हे ऐकून तो दरवाजा च्या बाहेर आला आणि अलगत दाराची कडी बाहेरून लाऊन घेतली. हातातला कंदील घेऊन रस्ता दाखवत म्हणाला.


" या माझ्या संग..." तो त्यांना जवळच असलेल्या एका झोपडी जवळ घेऊन गेला पण झोपडी कडे न जाता बाजूला असलेल्या शेतात कंदील ठेऊन, त्यांना म्हणाला, "बसा..." अस म्हटल्यावर सर्व जण बसले. "काय काम होत...?"


" बाबा... पोरगी लयिच येगळं वागती दोन तीन दिवसा पासून... काही कळना झालंय... काही भुताटकी -" वाक्य पूर्ण होण्या आधीच भगत हात करत शांत बसायला सांगितलं. पण इतक्या वेळ शांत असलेली मीना चिढलीच... " आई .. तू या साठी अनलय मला इकडं... घरी मला सांगितलं त्या आमक्या आमक्या ची हळद आहे... आणि एकड येऊन हे अस... "


" पोरी, शांत बस... आई आहे ती... ती तुझ्या भल्यासाठीच बोलली असल... घे हे पान खा फक्त..." अस बाबा म्हनाला आणि तिच्या हातात एक गर्द निळ्या रंगाचं रसाने भरलेले कोणत्या तरी झाडाचे पान दिले. ती कधी त्या पाना कडे तर कधी आई कडे पाहत होती. "खा... पोरी..." तिच्या वर जवळ जवळ रागातच ओरडला. ती दचकली आणि भीतीने टी पान तिने तोंडात टाकले. जिभेवर तेवतच वेगळी झनझन जाणवली पूर्ण तोंडात आणि डोळ्यांना तर अंधाऱ्या आल्या सारखं झाल. ती मटकन खाली शेतातल्या मातीवर बसली, हे पाहून त्याने तिच्या भोवती काडीने एक गोल केला आणि म्हणाला. "सांगा काय झालं ते सगळं सांगा?" मीनाच्या आईने सगळं त्याच्या समोर सांगितले. मनात असणारे सगळे च्या सगळे ती बोलून मोकळी झाली. सर्व ऐकून घेऊन तो म्हणाला, " हे बघा... या घडीला पोरीच्या अंगात खैस बीस काहीच नाय. गावच्या वेशी जवळ मावलाई आहे म्हणून त्या दिवशी खैसाने हिला बोलवून घेतलं कारण त्याला गावची वेस ओलांडायची व्हती... हिला भेटणारा केश्या नव्हता... खैस व्हता..."


मीना तशीच बसून होती, सारखे झाकणारे डोळे उघडत होती परंतु ते तिचे डोळेही तीच ऐकत नव्हते. दोघी अवाक होऊन पाहत होत्या. "मीना ला काय होणार ते नाय ना...?"


"हे बघा... या पोरीला काय बी व्हणार नाही... अस असतं तर खैस आता बी तिच्या अंगात असता. पण गावचं काय बी खर दिसत नाय..." असे म्हणत त्याने अस म्हणत. कुठून कुणास ठाउक एक अंड मीनाच्या समोर ठेवलं. त्याला हळद कुंकू लावला आणि काहीतरी पुटपुटला... पुन्हा कुठून तरी एक लिंबू काढून हातावर ठेवला आणि हात खाली ठेवलेल्या अंड्या च्या काही अंतर वर धरून पुन्हा पुटपुटायला लागला. मीना तर शुद्धी वर राहिली नव्हती आणि या दोघी शुध्दीवर असूनही काही समजू शकत नव्हत्या. समजेल अस काही घडातही नव्हतं. अचानक बाबा ने डोळे उघडले आणि म्हणाला, "अनर्थ... " दोघी अवाक होऊन पाहत होत्या. " काही तरी भयाण घडणार आहे... गाव धोक्यात आहे... एक एक करून तो सगळ्यांचे बळी घेईल..." त्या शांत होऊन त्याच्या बोलण्या कडे लक्ष देऊन असतात. "पण तुम्हाला काही होणार नाही... मी सांगितलं तसच जर केलं तर... "


" काय करावं लागेल ...? " मीनाच्या आई च्या काना जवळ तो काहीतरी पुटपुटला. मीनाच्या आई ने फक्त होकाराची मान डोलावली.


"येतो मग आम्ही... आशीर्वाद द्या" अस म्हणत पाया पडू लागल्या.


"पाया नका पडू देव नाय म्या... फक्त धेनात ठेवा रस्त्यात कोणी बी दिसलं तर त्याच्या कड बघायचं बी नाय." अस म्हणत त्याने मीनाच्या डोक्यावर हात फिरवला आणि एक बोट तिच्या तोंडात टाकत ते पान बाहेर काढून फेकले. पानाचा रंग रक्ता प्रमाणे लाल झाला होता. "तिच्या तोंडावर पाणी मारा या माठातलं, मग पाच मिनिटांत शुध्दीवर येईल ती..."


" ती किरकिर करल हो... अशीच राहू द्या गुंगीत तर गुंगीत."


" नाय नाय.. ती काय नाय करणार... घरी जाऊ पर्यंत तुमचं ऐकलं ती... घरी जाऊन निवांत झोपी लावा तिला... "


अस म्हणत तो कंदील घेऊन निघून गेला.


" खरच गावातला यक यकाचा बळी जाणार का ?" मीनाच्या आई ला आता मीनाची चिंता नव्हती पण एक नवीन चिंता तिला सतावू लागली होती.


" तू डोक्यात आता काय बी इचार घेऊ नग... रात लयी झालीय चल जाऊ आपूनी..." अस म्हणत म्हातारी झोपडी लगतच्या माठा मधील गार पाणी घेऊन आली आणि हातावर घेऊन मीनाच्या तोंडावर शिंतोडे मारले. मीनाच्या आईने मीनाच्या गळ्यात एक ताविज बांधत म्हणाली. " बाबानं, हे तीन ताईत दिलेत... त्यानं आपण तर वाचणार पण बाकीची... त्यांचं काय..?"


" तू का येवढा ईचार करत असती... अख्या गावाला ताईत देता येईल... उठ निघ बर .. "


" त्यानं जर आज पहिला बळी घेतला तर...?" मिनाची आई मीनाला उठवत त्या म्हातारीला म्हणाली.


कारच चाक कधीच बसवून झाल होत आणि आपली मुलगी गाडीत नाही हे त्यांना समजलं होत. मोठ्या मोठ्याने आवाज देत, तिचा शोध घेत ते दोघंही सैरा वैर धावत होते. तिचा कुठेच आवाज येत नव्हता आणि तीही कुठे दिसत नव्हती. आता होती ती फक्त भयाण शांतता आणि काळा कुट्ट अंधार.

.......................................................

भाग ६


सकाळचे वातावरण होते. एक खूपच जुनी कौलारू पण सिमेंट बांधकाम असणारी बिल्डिंग होती. त्या बिल्डिंग समोर एक कार येऊन थांबली. त्यातून एक माणूस हळूच उतरला. केस विस्कटलेले आणि अंगातील कपडे कुसळ गवताने भरले होते. चेहेरा अगदीच थकल्या भागल्या सारखा होता, जणू रात्रभर जागरण केले असावे. तो त्याच चिमुकलीचा बाप होता. रात्रभर तो त्या जंगलात त्याच्या मुलीला वेड्यासारखं शोधत राहिला. त्याची मुलगी त्याला कुठेच सापडत नव्हती. आता तो त्याच गावच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशन समोर उभा होता. मुलीला शोधण्यासाठी तो आता पोलिसांकडून मदत घेण्यासाठी तो आला होता. आत गेला नेहमी प्रमाणे सर्वजण ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त होते. "कंप्लेंट द्यायची आहे... " कुणाला तरी तो म्हणाला, तर त्याने इशाऱ्यानेच पुढे जा असे प्रतिउत्तर दिले. खुर्चीवर काहीतरी फाईलींची चाळाचाळ करणारा पोलीस होता. " साहेब, माझी मुलगी रात्री पासून बेपत्ता आहे हो..." त्याने हातात घेतलेली फाईल बाजूला ठेवत बसण्यास इशारा केला. " साहेब रात्रभर शोधलं हो काही पत्ता लागेना झालाय... बघा ना काही... खचून गेलोय हो... " हात जोडत अगदीच रडक्या स्वरात तो बोलत होता. 


" मिसिंग केस आहे का ? इकडचे दिसत नाही तुम्ही... कुठून आलात...?" पोलीस म्हणाला.


  "होय साहेब... मिसिंग केस आहे. माझं नाव सुभाष आहे... मी पुण्यात राहतो, साहेब. नाशिकला नेहमी काम असतं माझं. नाशिकहून येत असताना वाटेत रोड जॅम होता, म्हणून शॉर्ट कट घेतला. या आधी पण खूप वेळा या रस्त्याने आलो होतो. अचानक गाडीचा टायर पंक्चर झाला आणि - " तो माणूस पोलीस त्याला मध्येच थांबवत म्हणाला.


" जरा थांबा..." त्याने एक कागद आणि पेन घेत म्हणाला... "हां... आता बोला..."


"पंक्चर काढताना ती गाडीत झोपली होती हो... पण अचानक कुठे गेली काही कळलं नाही..." तो सांगू लागला.


"ओ... अगोदर तीच नाव सांगा... तीच वय... दिसते कशी... "


" तनुजा नाव आहे... तनुजा सुभाष गीते... नऊ वर्षांची आहे. रंगाने गोरी पान... तबियतीने जाड आहे जराशी... पण फुलासारखी नाजूक... काटा टोचला तरी आजारी पडते हो ती... उपाशी राहणं माहितही नाहीये तिला... आणि आता तर -"   त्याच्या तोंडातील वाक्य पूर्ण होण्या आधीच त्याला रडू कोसळले आणि हमसून हमसून रडू लागला. त्याची लहानशी मुलगी त्याच्या डोळ्या समोरून जात नव्हती.


" हे पहा रडू नका..." त्याला धीर देत म्हणाला. " रात्रीच्या वेळी तुम्हाला आणखी कोणी दिसलं का...?" हा प्रश्न ऐकून त्याने स्वतःला सावरले.


" हो साहेब... माझी पत्नी होती माझ्या सोबत..." तो डोळे पुसतच सांगू लागला "आणि हो .... साहेब आणखी कुनी तरी होत ..." तो आठवू लागला.


" वर्णन सांगा... "


" साहेब एक नाही तर तीन... त्या तीन बायका आल्या होत्या तिथे... विचित्र होत त्यांचं वागणं... तिन्ही वेगवेगळ्या वयाच्या... एक अतिशय तरुण सातरा अठरा वयाची, एक जवळ जवळ चाळीशीची आणि एक तर जास्तच म्हातारी वाटत होती. मुलीला शोधण्यात मी अर्ध जंगल चाळल होत. अचानक कुणी येताना दिसल. या बायका येत होत्या रस्त्याने चालत चालत. कुणी कुणाशी बोलत नव्हतं, शांततेत चालत होत्या. त्या तरुण मुलीला त्या दोघी धरून धरून चालवत होत्या, जस काय ती आजारी आहे की काय? मी त्यांना पाहून त्यांच्या जवळ गेलो. त्या थांबल्या देखील नाहीत, चालतच राहिल्या. मी त्यांना माझ्या मुली बद्दल विचारणाही केली पण त्यांचा काहीच रिप्लाय नव्हता. माझी पत्नी हे सगळं पाहून घाबरलीच. माझ्या कडे न पाहता तश्याच निघून गेल्या. " आणि त्याच्या समोर तो प्रसंग दिसू लागला.


" आणि मुलीची आई कुठे आहे?"


" ती बाहेर कार मध्ये झोपली आहे. "


"बर, कंप्लेंट लिहून घेतली आहे... मुलीचा फोटो आणि तुमचा फोन नंबर देऊन ठेवा. मी काही कळलं तर मी तुम्हाला कळवतो... हं...?" असे म्हणत त्याने जणू दुर्लक्षच केले.


" साहेब अहो रात्रभर मला झोप नाहीये... वेड्या गत अख्ख जंगल पायाखाली घातलय आणि तिच्या आईचे रडून रडून हाल झाले आहेत. आणि तुम्ही हे असं बोलत आहात... आताच्या आता माझ्या सोबत चौकशीला चला... तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या... " तो जणू रागातच बोलत होता.


" गीते साहेब... नीट नीट सांगतो... तुम्ही कोणतं जंगल शोधल?  रस्त्याच्या वरच्या बाजूच की खालच्या बाजूच? "


" वरच्या... "


" खालच्या बाजूच्या जंगलात शोधायला गेला असतात ना तर तुम्ही माझ्या समोर हे अस बोलायला नसता... एकदा त्याच्या बदल माहिती विचारा कुणाला तरी... आणि मग बोला... "


" नेमकं काय बोलायचय त्यात जंगली प्राणी असतात...? "


" नाही, त्या पेक्षा भयानक... खविस..." हे अस काही ऐकून तो जरा नजर इकडे तिकडे करत पाहू लागला.


" साहेब... तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला माहीत... मला खविस बिविस काही ऐकायचं नाही... जर माझ्या मुलीला काही झाल ना तर गावात एक माणूस जिवंत ठेवणार नाही मी... " तो जवळ जवळ खूप मोठ्या आवाजात म्हणाला. ज्यामुळे कुणीतरी वरिष्ठ अधिकारी तिथे आला.


" काय झालं रे...? काय प्रकार आहे हा?" तो अधिकारी म्हणाला. तसा सर्व स्टाफ उठून उभा राहिला.


" साहेब, तुम्ही ? आज रजेवर होतात ना?" त्यावर अधिकारी काही बोलला नाही. सर्वजण पुन्हा ज्याच्या त्याच्या कामात रमले. थोडा वेळ शांत गेला आणि मग तो अधिकारी म्हणाला,


" वा... दामले तुम्ही तर केस सॉल करून टाकली... एक काम करा, सर्चचा रिपोर्ट तयार करा. त्यात लिहा की मुलगी खविस ने किडन्याप केली आहे. तो खूप भयानक आहे आम्ही तिथे जाऊ शकत नाही आणि खाली तुमची सही... ओके?" तो अधिकारी मोठ्याने बोलत होता सर्वांना ऐकू जाईल या स्वरात. तो पोलीस पुन्हा उभा राहून फक्त "सॉरी सर..." एवढच बोलला. 


" व्हॉट सॉरी ? नॉन सेन्स... कंप्लेंट लिहायची टाकून तुम्ही त्यांना स्टोरी ऐकवत आहात... रबिष" पुन्हा ओरडून म्हणाला " आणि हे मिस्टर... पोलीस म्हणजे तुम्हाला तुमच्या घरगडी वाटतो काय? तुम्ही सांगणार तस नाचायला... आणि पैसा तुमच्या घरी ठेवा... रितसर तक्रार नोंदवा आणि जा... पोलिसांना त्यांचं काम करू द्या..." सुभाष त्या अधिकाऱ्याकडे पाहून काही बोलणार तोच तो अधिकारी पुन्हा म्हणाला. "आणि हो... माझ्या कडे आजूबाजूच्या कोणत्याही गावातून मर्डर ची एक जरी केस आली ना मी तुम्हाला आत टाकेल लक्षात घ्या." अस म्हणत तो अधिकारी तेथून निघून गेला.


मीना रस्त्याने जात होती, तेव्हा अचानकच तिला समोरून केश्या येनाना दिसला.


" केश्या... मला बोलायचय तुझ्या संग."


" बोल ना... पण जरा पटापट बोल... जम्याला जायचंय कुठतरी?"


"कुठ?"


" रमजान मूळ पंधरा दिवस कुठतरी गावाला चाललाय अन् त्याला हे पैस द्यायला चाललोय... "


" कश्याचे ?"


" मटणाचे अन कश्याचे? उधरीचं पैस द्यायचं म्हणून आलोय... तू बोल बर..."


" त्या दिवशी काय म्हणत होतास तू त्या अडवाच्या रानात?"


"कधी...? यडी का खुळी तू...? मी कधी गेलो व्हतो तिकडं?"


" केश्या, मी गमतीचा मूड मधी नाय हे मी तुला आधीच सांगते..."


" तू कंच्या बी मूड मधी रहा... वाट सोड त्याला टाईम व्हतोय..."


" केश्या, मला राग येतोय..."


" का बरं..?"


" माझा तुझ्यात जीव अडकलाय म्हणून..."


" काय बी बडबडत नको जाऊ... घरी जा..."


" केश्या, जीव देईन मी तू अस काय म्हणशील तर.."


" काय बी कर... पण वाट सोड आधी... " केश्याच अस बोलण ऐकून ती अजूनच चिढली


" मी जीव घेइन मग..."


" कुणाचा, माझा ?"


"न्हाय समद्या गावाचा ..." अस म्हणून ती तिथून निघून गेली.


पोलीस घटनस्थळी पाहणी करत होते. गाडी थांबली होती त्या ठिकाणी काही न भेटल्याने रस्त्याच्या खालच्या बाजूला असलेला जंगलात शोधायला सुरुवात केली. जंगलात काही अंतर पुढे गेल्यावर एक पोलीस मोठ्याने म्हणाला. " दामले बुवा, इकडे पहा... " जमिनीवरचे गवत रक्ताने लाल झाले होते. एका काडीने गवत बाजूला करत एक पोलीस म्हणाला, " बॉडी तर नाहीये रे इथ कुठंच... पण रक्त लयीच सांडलेल दिसतंय." गवता खालच्या मातीवर खूपच रक्त साचल्या सारखं दिसत होत. साचणार कसं? ते तर मातीने पिऊन घेतलं होतं, वर फक्त लाल रंगाचा थर साचला होता.


" बघ किसन्या, मी म्हटलो होतो ना तेव्हाच. पोरगी खविसाच्या हाती सापडली. नाहीतर तिच्या बापानं एवढी शोधली म्हणजे सापडली असलीच की त्याला." दामले म्हणाला. किसन ने त्या जागेचे फोटो काढून घेतले आणि दामलेला म्हणाला.


" अरे, पण तू येडा बीडा झाला होता का...? तक्रार लिहून घ्यायची ना... कशाला तिच्या बापाला सगळं सांगत बसला... त्यात साहेबांनी कुठून हे सगळं ऐकलं काय माहीत..?" किसन म्हणाला.


" जाऊ दे, झालं ते झालं... आता हीच काय करायचं ?"


" बॉडी तर भेटू दे..."


"खविसाने काही ठेवलं असल तर भेटल ना...! चल जाऊ चल" अस म्हणत दोघे चालू लागले.


"ते पण आहे... एक विचारू का? म्हणजे तू स्थानिक आहेस आणि तुला इकडची माहिती आहे म्हणून विचारतो... खविस नेमकी काय असतय रे? आणि कोणी पहिल आहे का आता पर्यंत?" किसन शंका घेत विचारू लागला.


" लहान होतो तेव्हा पासून ऐकत आलो आहे. लहानपणी तर खूपच भीती वाटायची. नंतर नंतर वाटायला लागले होते हे सगळं खोटं असावं. गावच्या स्मशानातील हाड, अर्ध जळालेल्या शरीराचे काही भाग राना - वनात दिसायचे. अगोदर वाटले एखादं जनावर करत असेल पण गावात अनेक जण त्यांनी प्रत्यक्ष मांस खाताना पाहिल्याच सांगतात."


" तू पाहिलंय का कधी ? "


" नाही रे बाबा... आणि बघायची इच्छा पण नाहीये माझी... तेवढी हिंमत नाही माझ्यात... अक्राळ विक्राळ रूप असतं म्हणे त्याच... हातात म्हणे आगीचे निखारे असतात आणि काळेकुट्ट शरीर. कोणाला आवडेल मरणाला समोर पाहायला?" अस म्हणत ते रस्त्या जवळ उभ्या असलेल्या दुचाकी गाडी जवळ पोहोचले. किसनने गाडी चालू केली आणि म्हणाला. " मला एकदा बघायचय हे खविस..."


" हो का ? ये मग एखाद्या रात्री या जंगलाकडे... "


" तू ? तू येणार नाही माझ्या सोबत... ?"


" मी का येऊ...? मला थोडीच माझा जीव जड झाला आहे. हाताने बळी व्हायला कुणाला आवडेल?"


" बघ मग... मी मग... मी मात्र येणार आहे... वाटलं तर ये मग..." असे म्हणत किसनने गाडीचा वेग वाढवला.

.......................................

भाग ७


रात्रीचे दहा अकरा ची वेळ होती. गाव पूर्ण शांत झोपी गेला होता, अगदी वाऱ्याचा देखील आवाज नाही. इतक्यात गावातल्या रस्त्याने एक कार गावात मधोमध येऊन थांबली. गाडी पाहून आजू बाजूची कुत्री भुंकू लागली, दिसत एकही नव्हते. मात्र भुकण्याच्या आवाजावरून गाडी पासून फार कमी अंतरावर असतील अस वाटत होत. गाडीमध्ये सुभाष आणि त्याची पत्नी होती. " घे तू काही खाऊन घे काल रात्री पासून काही खाल्ले नाहीस तू..." सुभाष तिला म्हणाला आणि कागदा मध्ये काही बांधले होते ते तिला देऊ लागला. तिने त्याकडे न पाहताच मानेने नाही म्हटले. " बर ठीक आहे... तू गाडीतच बसून रहा. मी येतो तासा भरात परत." अस म्हणून तो गाडीच्या खाली उतरला आणि ती देखील त्याच्या पाठोपाठ खाली उतरली. "येवढ्या रात्री कुठं जाताय...? नका जाऊ कुठेच?"


अस म्हणत ती त्याला बिलगली आणि रडू लागली. तिची मिठी सोडवत तो तिला म्हणाला, " मला जायला पाहिजे... आज त्या दिवशी ज्या जंगलात गेलो नाही तिकडे जायचं आहे. बघू देत मला की यात आहे तरी काय?"


" नाही नका उद्या जा प्लिज..." अस म्हणत तीने पुनः त्याला मिठी मारली.


"आणि आपली सोनू जर त्या जंगलात असेल तर-" अस म्हणताच तीच हृदय भरून आले. काय बोलावं तिला सुचेना झाले आणि ती गाडीत जाऊन बसली. ज्या शिटवर तिची मुलगी बसली होती त्या शिटचे चुंबन घेत हमसून हमसून रडू लागली. " सोनू कुठे आहेस ग तू...? " अस म्हणत हंबरडा फोडला. काही वेळ गेला आणि ती स्वतःला सावरत भानावर आली. तिला सुभाषची आठवण झाली, तिने लगेचच गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण हे काय? दार लॉक झाले होते, म्हणजे सुभाष गाडी लॉक करून गेला होता. गाडीच्या चारही बाजूंनी तिने नजर फिरवली मात्र तिला सुभाष कुठेच दिसत नव्हता, तो कधीच तेथून निघून गेला होता.


हातात एक काठी घेऊन सुभाष जंगलाच्या दिशेने जाऊ लागला होता, त्या वेळी अर्धी रात्र उलटून गेली होती. जंगल खूप जवळ आले होते. मोबाईलचा प्रकाश चालू करून तो झपा झप पाऊल टाकत जंगलाच्या दिशेने जात होता. त्याच्या आजू बाजूला इतकी शांतता होती की त्याला त्याच्याच पायातील चपलांचा आवाज त्याच्या मागून येत होता. अस वाटत होत की कुणी तरी खूपच जवळून त्याच्या मागे मागे येत आहे. आता तो जंगलाच्या अगदीच जवळ उभा होता. त्याने आकाशात एक नजर फिरवली एक एक चांदणी स्पष्ट दिसत होती मात्र चंद्र आज आलाच नव्हता. जंगला कडे पाहत त्याने मोबाईलचा प्रकाश लाऊन अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. जंगलात झाडी आणि गवत इतकं वाढलेलं होत की काही दिसतच नव्हत. त्याला आता ' जंगलात जावं की नाही ' असा प्रश्र्न पडू लागला होता. त्याने जंगला कडे पाहत त्याच्या अंगातील सर्व च्या सर्वच ताकद एकवटून मोठ्याने आवाज दिला "सोनू....S..S.." इको साऊंड सारखा तो त्याचाच आवाज फिरून परत त्याला ऐकू येऊ लागला. जणू त्याच्याच आवाजात कुणीतरी तीच हाक जंगलाच्या आतून देत आहे, असा भास होत होता. जरा वेळ तो शांतच राहिला आणि कानावर ताण देऊन काही ऐकू येतेय का याची खात्री करू लागला. कुठेच काहीच आवाज येत नव्हता. त्याने मोबाईल चा प्रकाश चारही बाजूंनी फिरवून आजूबाजूला नजर फिरवली. अचानकच मोबाईल वर काही नोटिफिकेशन दाखवले 'मोबाईल गोइंग टू ऑफ डिऊ टू बॅटरी लो...' त्याची नजर मोबाईल च्या चार्जिंग दाखवत असलेल्या आकड्यांवर गेली. बॅटरी चार्जिंग फक्त दोनच टक्के दाखवत होती आणि नुसतं पाहतच होता तर लगेचच ऑफ सुद्धा झाला.


  इकडे सुभाषच्या पत्नीने कारचं दार कसं उघडलं तिच्या तिलाच माहीत. कारच्या खाली उतरली आणि ती सुभाषला शोधत वाट चालू लागली. हे गाव तिला पूर्ण नवीन होते आणि गावाचे रस्ते देखील. इकडे तिकडे पाहत ती गावच्या बाहेर आली. सगळी कडे काळोख असल्याने तिला ठीक असे दिसत नव्हतेच, पण तिच्या पासून बऱ्याच अंतरावर एक इलेक्ट्रिक पोल होता आणि त्यावर ग्रामपंचायत कडून लावण्यात आलेला बल्प लटकत होता. बल्प जळत होता, फार नाही पण बऱ्या पैकी प्रकाश खांबाच्या आजू बाजूला पडत होता. वाऱ्याने बल्प झोके घेत होता आणि पोल वरच्या इलेक्ट्रिक तारा वाऱ्या मुळे एक वेगळाच आवाज करत होत्या. प्रकाशा ची एक वेगळीच हालचाल सुरू होती आणि ती त्याकडे पाहत होती तोच त्या प्रकाशाकडे कोणी तरी येताना दिसलं. अंगावर काळ्या रंगाची शाल पांघरली होती. तबियातीने दांडगी पण जख्खड झालेल्या म्हाताऱ्या सारखी वाकून अगदीच कासवाचे पाऊले चालणारी ती आकृती हळू हळू त्या प्रकाशा पासून दूर जाऊ लागली. चेहेरा ठीक दिसत नव्हता, म्हणून ती जवळ जाऊ लागली. ती आकृती हळू चालत असल्याने ती अगदीच जवळ गेली होती. आता त्या आकृतीत आणि तिच्यात एकच हाताचे अंतर उरले होते. हळूच हात खांद्यावर ठेवणार त्या आकृतीचा वेग वाढला. वाऱ्या सारखी पुढे निघून गेली, हे पाहून ती दचकून जागीच थांबली. ती आकृती कुठे गेली हे तिला कळलेच नाही. आता जेवढं अंतर जंगलाचं होत तेवढंच अंतर गावाचं होतं तिच्या पासून. अगदीच जवळ कुठे तरी पक्षी मोठमोठ्याने चिरचिर करू लागला तिने वर आकाशाकडे पाहिलं एक पक्षी तिच्या भोवती घिरट्या घालू लागला. अचानक तिला आपल्या मागे कुणीतरी उभे आहे असा भास झाला. तिचा श्वास मंदावला, हृदयाची कंपने वाढली पण तिने मोठ्या हिमतीने मागे वळून पाहिले. तिच्या समोर एक काळी विद्रूप आकृती उभी होती. ती मोठ्याने ओरडणार होती पण तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते तोंडातून फक्त हवा बाहेर निघत होती, जणू काही तिच्या गळ्यात कंठच नसावा. तिला काही कळण्या आत तिचे डोळे मिटले गेले आणि ती जमिनीवर कोसळली.


  सुभाष अजूनही त्याच जंगला जवळ होता, आता आत जंगलात जाऊन करणार काय? दिसणार तर काहीच नाही. परत गावच्या वाटेने जायला जायला समजते की नाही हा पण प्रश्न आहे.' असा विचार करत त्याने खिशातून एक पाकीट काढले आणि त्यातून एक सिगारेट काढली. दोन्ही ओठांच्या मध्ये ठेवत त्याने लाईटरने सिगारेट पेटवली. पेटवलेल्या काडीचा प्रकाश त्याच्या चेहेऱ्यावर पडत होता म्हणून त्या काळोखात त्याचा चेहेरा अगदीच स्पष्ट दिसत होता. पेटलेल्या काडीच्या प्रकाशा कडे तो पाहत होता तोच त्याच्या बोटाला त्या काडीचा चटका बसला आणि त्याने ती काडी कुठेतरी भिरकावून दिली. हातातल्या सिगारेटचा एक एक कश मारत तो विचार करू लागला आणि अचानकच गवत आणि झुडुपात कश्याची तरी हालचाल होऊ लागली. ' आता जर प्रकाशच नाही तर काय समजणार... ?' असा विचार करत तिथेच सिगारेट मारत होता.


सकाळच्या वेळी पोलीस स्टेशन मध्ये हवालदार किसन बसले होते, काहीतरी चिंता त्यांना सतावत होती. बाकी सर्वांचेच कामकाज नेहमी प्रमाणे सुरु होते. किसन उठून साहेबांच्या केबिन मध्ये आला आणि साहेबांना म्हणाला, "साहेब, काहीतरी सांगायचे होते." साहेब त्यांच्याच कामात व्यस्त होते. त्यांनी त्यांचे चाललेले काम तशेच चालू ठेवले आणि स्वतःला व्यस्त ठेवत ते किसनला म्हणाले, "अरे, किसनराव? बर झालं तुम्हीच आलात. मी सकाळी आलो तेव्हाच समजून गेलो होतो कि, तुमची तबियत ठीक नाही ते. जाऊ शकता तुम्ही... घरी जाऊन आराम करा." बराच वेळ शांतच गेला. किसन तिथेच थांबून होता, विचारात गुंतला होता कशाच्या तरी. अचानक बाहेरून दामले हवालदार आले खूपच धावपळ करत आले कि काय असं वाटत होत. "साहेब .... साहेब..." त्याने अगदीच घाईत साहेबांना आवाज दिला.


"दामले काय झालं... कुठे खजिना सापडला कि काय ?" साहेब गमतीने पण कामात व्यस्त राहतच म्हणाले.


"साहेब, ती लहान मुलगी सापडली, साहेब..." दामले म्हणाले तसे साहेब हातातले काम टाकून ताडकन उठून उभे राहिले.


" चांगले झाले... तिच्या आई-वडिलांना बोलावून घ्या... आणि तिला रीतसर त्यांच्या कडे सोपवा." साहेबांना दामलेंचं वाक्य ऐकून जरा धीर आला. 


" साहेब, पोस्टमार्टम साठी जावं लागणार आहे." दामले शांततेत म्हणाला.


" म्हणजे...? " साहेब अचानक अवाक होऊन म्हणाले.


" मयत आहे... डेड बॉडी सापडली आहे साहेब तिची... "


" काय सांगता? एवढी लहानशी मुलगी कशी...? अरे देवा...! " साहेब थोडे गांगरून गेले. "दामले, जरा सविस्तर सांगता का?"


" साहेब, आज सकाळी ड्युटीलाच निघालो होतो अचानक कुणीतरी येऊन सांगू लागलं. जंगला जवळ अर्धवट जळालेली लहान मुलीची बॉडी आहे म्हणून मांस निम्म अर्ध खाऊन टाकलंय कश्याने तरी. कदाचित खविसाच काम असावं. कुरतर्डून काढलंय सगळं नुसतं."


“तुम्ही गेला होतात तिथे?” साहेब ओरडतच म्हणाले.


" नाही, मला असंच सांगण्यात आलं होतं.”     


"ठीक आहे, घटनास्थळी जाऊन पोस्टमार्टम करून घ्या. आणि हो… परत हे खविस बिवीस काही बोलायचं नाही, कळलं दामले तुम्हाला?" असं म्हणत पुन्हा खुर्ची वर बसले. दामले निघून गेले पण इतक्यावेळ शांत असलेले किसन मध्येच म्हणाले.


'साहेब…. खविस आहे." किसनराव असं बोलल्यावर त्याकडे साहेबांचे लक्ष गेले.


" तुम्ही अजून इथेच आहात, किसनराव ? आणि दामले सोबत राहून तुम्ही पण तेच बोलायला लागले कि काय ? खविस आहे म्हणे... अस काही तुम्ही बोलाल अस वाटलं नव्हतं मला."


" साहेब, मी स्वतः च्या डोळ्यांनी पाहिलंय... खरंच खविस आहे." किसन सांगत होता.


" किसन राव, या बसा... नीट सांगा काय पाहिलं तुम्ही, ते...?" साहेब किसनला बसायला सांगितले तसा तो बसला आणि घडला प्रकार सांगू लागला. सांगताना सर्व चित्र पुन्हा त्याच्या नजरेस समोर येऊ लागले.


 " साहेब... मलाही वाटत होत खविस बिवीस काही नाही ... या सगळ्या गावच्या लोकांच्या कल्पना असतील. म्हणून मी माझ्या मनाची खात्री करण्या साठी रात्री जंगलात गेलो. दामले घाबरट आहे येणार नाही याची खात्री होती. तिथे गेल्या वर मी एका आडोश्याला शांत बसून राहिलो. रात्र इथेच काढायची ठरवून आलो होतो. बऱ्याच वेळानं हाक ऐकू आली 'सोनू ' नावाची... मी बारीक पावलांनी पुढे गेल्यावर कोणी तरी दिसलं. अजून पुढे जाणार तोच माझ्या पाया खालचा पाचोळा वाजला. त्या मुलीचा बाप दिसला, तो सिगरेट ओढत होता. त्याला ऐकायला गेले नसेल कदाचित. सिगारेट संपल्यावर तो तिथून निघून गेला. नंतर सिगारेटच्या मुळे कदाचित तिथे आग लागली. नजरेत यायला नको म्हणून मी पुन्हा अगोदरच्या जागेवर येऊन बसलो. तेव्हा आग कशी शांत झाली काही कळले नाही. विस्तवाचा लालसर प्रकाश दिसत होता मी तिकडेच पाहत होतो, तेव्हा मला एक काळी आकृती तिथे येताना दिसली हातात काहीतरी होत. विस्तवा जवळ आली तेव्हा नीट पहिल त्या छोट्या मुलीचं अर्ध शरीर होतं त्याच्या हातात आणि पेटलेल्या निखाऱ्या जवळ येऊन दाताने ओरंबडत हातातील मुलीच्या अंगावरचं मास खात होता. माणूस कोंबडीच मास पण अस खात नसेल येवढं भयानक खात होता नुसता अधाष्या सारखा खात होता. हात आणि पाय खात होता जसा आपण कोंबडीचा लेग पीस खातोय. हे इतकं भयानक वाटत होत की मला काय करावं ते कळेच ना... भीतीने थरथरत होत होती. त्याला जर मी दिसलो तर माझे पण हेच हाल करेल हा विचार येत होता. तरीही मी कॅमेरा काढला आणि फोटो काढला, तसा फ्लॅश चमकला गेला बंद करायचं लक्षात नव्हत माझ्या... त्याच लक्ष माझ्या कडे गेलं. मला तर काही सुचालच नाही मी. तो मागे येण्या आधीच पडत धडत तिथून निघालो. बाईक जवळ पोहोचलो आणि सेल मारून घाईतच घरी आलो. रात्र भर झोप लागली नाही मला." किसन सांगत होता. तेवढ्यात तिथे दामले आले.


" साहेब, तो मुलीचा बाप आला आहे..."


" ठीक आहे, त्यालाही घेऊन जा. घडणास्थळाच्या पाहणी साठी." साहेब म्हणाले.


" अहो साहेब, तो पुन्हा एक मिसिंग केस नोंदवायला आला आहे."


" काय ? " साहेब आश्चर्याने म्हणाले "कुणाची,?"


" त्याच्या बायकोची... रात्री पासून बेपत्ता आहे अस म्हणत आहे तो..." हे ऐकून सर्वत्र शांतता पसरली.

.........................................................

भाग ८


पोलीस गाडी जंगलाच्या दिशेने येत होती, वेळ सकाळचीच होती. गाडी जंगलाच्या जवळ येऊन थांबली आणि गाडी मधून तीन चारजण उतरले.


" किसनराव... चला घटना स्थळ दाखवा" साहेब किसनला गाडीतून खाली उतरत असताना म्हणाले. किसन मात्र त्याच्याच विचारांत गुंतला होता आणि अजूनही गाडीतच बसून होता.


" किसनराव... मी तुमच्याशी बोलतो आहे..." साहेब पुन्हा म्हणाले. तो मात्र काहीच बोलत नव्हता.


" साहेब, चला मी दाखवतो... तो बोलणार नाही काही." अस म्हणत दामले.


" का बर ..? "


" भीती ..." एवढच संभाषण झाल साहेबांचं आणि दामलेच. साहेब व दामले पुढे चालत होते आणि तिघे जण त्यांच्या मागे मागे येत होते. त्यात त्या मुलीचा बाप होता, पण तो आता निशब्द झाला होता आणि का कुणास ठाऊक, पण घटनास्थळ येई पर्यंत कुणी बोलेच ना. घटनास्थळी आल्यावर तर आणखीच शांतता पसरली. समोर दृष्यच तितके भयाण होते. जंगलाच्या सुरुवातीलाच म्हणजे जंगल ज्या ठिकाणाहून सुरू होते त्या ठिकाणी लहान मुलीचा सांगाडा पडला होता. अगदीच थोडेच मांस बाकी होते. सांगाडा जळालेल्या अवस्थेमध्ये होता आणि आजू बाजु ची बरीचशी जागा देखील जळून राख झाली होती. सुभाष चे डोळे उघडेच्या उघडेच राहिले, कारण रात्री ज्या ठिकाणी त्याने सिगारेट पिली होती हीच ती जागा होती. ती निरागस मुलगी कोंबडी भाजावी तशी भाजून निखली होती आणि अंगावरील मांस ओरंबडून खाल्ले गेले होते. ' कुणी केले असेल हे की त्या सिगारेट ने तर पेट नसेल घेतला? मी का आत गेलो नाही त्या वेळी? का पित बसलो इथे सिगारेट? ' असा विचार करत तो मोठ्याने रडू लागला.


इतक्यात तिथे कुणीतरी तरुण धापा टाकत आला. अंगाने धिप्पाड होता. गावचा स्थानिक असावा तो.


" साहेब... " तो धापा टाकत म्हणाला. साहेबांनी एक नजर त्याच्याकडे फिरवली.


" काय रे? येवढं का पळत आलास...? " साहेब त्याच्याकडे पाहत म्हणाले.


" साहेब, महत्वाचं होत..." अजूनही त्याचा श्वास दम लागल्याने फुलत होता. " बोलायचं होत जरा..."


" बोल की मग..."


" आता नको... मला तुमचा फोन नंबर द्या... " श्वास फुलणे जरा कमी झाले होते. " मी तुम्हाला फोन वर सांगतो. "


" का रे? मग एवढा पळत पळत फक्त नंबर मागायला आला..." साहेब जरा हसत म्हणाले.


" होय साहेब... तुम्हाला वाटलं तर तस म्हणा ... पण आता काहीच सांगू नाही. " अस म्हणत मोठ्याने रडणाऱ्या सुभाषकडे पाहू लागला.


" ठीक आहे... नाव काय आहे तुझ... ?" साहेबांनी विचारलं.


" नितीन... स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहे. या पोलीस भरती मध्ये फॉर्म भरला आहे. ठीक आहे साहेब... येतो... " अस म्हणत तिथून निघून गेला. सुभाष मात्र धाय मोकलून रडत होता आणि पोलीस पाहणी करत होते.


" आजू बाजूला काही सापडते आहे का ते पहा. " अस म्हणत तो देखील शोधा शोध करू लागला. एक हवालदार साहेबांच्या जवळ आला आणि म्हणाला.


" त्या दिवशी पण कोणीतरी मुलगा आला होता साहेब... तुम्हाला भेटायचं म्हणत होता. "


" अहो जाधव... मग तुम्ही मला हे आज सांगत आहात?" साहेब म्हणाले


" मी त्याला बोललो, साहेब बाहेर गेलेत थोड्यावेळ बस... जरावेळ बसला आणि निघून गेला... परत आलाच नाही. मला वाटलं छोटी मोठी तक्रार असल... मिटलं असेल सगळं म्हणून परत आला नाही. म्हणून नाही सागितलं. " हवालदार सांगत होता.


" हाच होता का तो?"


" नाही, साहेब... तो हा नव्हता. रंगानं काळा होता जरा."


"ठीक आहे बघू नंतर... तुम्ही तुमचं काम करा..."


साहेबांचं हे ऐकून सुभाष ने एक नजर साहेबांना पाहिलं आणि पुन्हा रडू लागला.


" अता कशी हाय ती ? " केश्या मीनाच्या घराच्या दाराजवळ उभा होता आणि तिच्या आई ला विचारपूस करत होता. घरातील लाकडी बाजावर (कॉटवर) मीना झोपली होती, अगदीच शांत. जणू तिला कश्याचीही शुध्द नसावी अशीच.


" काय रं केश्या? " बाहेर येत मिनाची आई केश्या ला म्हणाली.


" मिनी, बरीये ना ? " केश्या काळजीने विचारत होता. मीनाच्या आईने फक्त "हं..." येवढच म्हटले.


" काय होतंय तिला...?" केश्या हळूच म्हणाला.


" म्हाईत नाय... दोन दिस झालं नुसतच घडी घडीला ताप यतोय आन ताप निवतोय..." मीना ची आई सांगत होती. "केश्या... जरा नानाऊ म्हातारीला बोलीवतो का?" अस म्हणत तिची आई मीना जवळ जाऊन बसली. केश्या ला काही कळले नाही आणि तो धावतच निघून गेला.


* * *


" एवढ खचून चालत न्हाई रं..." हताश झालेला सुभाष गाडी रस्त्याच्या बाजूला लाऊन बसला होता. त्याला कुणी तरी आवाज दिला. आवाजाच्या दिशेने त्याने मान फिरवली. भगत बाबा कुठेतरी जात होते, त्यांनी आवाज दिला होता. सुभाष मात्र काहीच न बोलता फक्त व्याकूळ नजरेने पाहत होता. " पोरा, तुह्या बद्दल मला समदच म्हाईत हाय. तू ह्या गावात अडकला न्हाईस, तू ह्या गावाला तारण्या साठी आला हाईस..."


" बाबा, तुमचा गैरसमज होत आहे... प्लिज जा तुम्ही... अगोदरच डोक्यात कमी ताण नाही... " मध्येच सुभाष म्हणाला


" बाळा, ताण घेतल्यानी कधी अडचण सुटत असती का? "


" हे बघ म्हाताऱ्या ... जा इथून नाही तर -" सुभाष आता वैतागलेला होता.


" बर बर ... जातो... पर... ध्यानात ठेव... तुला याच्या काळ्या सावली पासून वाचायचं असल तर मला येऊन भेट" अस म्हणत निघून गेला. सुभाष ने त्याच्या बोलण्या कडे जराही लक्ष दिले नव्हते कारण त्याला त्याचे वाक्य अर्थहीन वाटत होते.


* * *


सकाळी सकाळी साहेब जेव्हा पोलीस स्टेशनला आले तेव्हा ते खूप अस्वस्थ वाटत होते. दमालेंना साहेबांनी बोलवून घेतलं.


" काय झालं, साहेब?" दामले म्हणाले.


" झोप लागली नाही रात्री... रात्रभर तो मुलगा नजरे समोर येत होता. "


" कोणता साहेब? "


" नितीन... जो काल आपल्याला घटनास्थळी भेटला होता तो..." साहेब म्हणाले, तेवढ्यात दामलेचा फोन वाजला. साहेब काहीतरी सांगत आहे, म्हणून त्यांनी उचला नाही. पण पुन्हा रिंग वाजू लागली.


" दामले अगोदर फोन घ्या. जा बोलून या हवं तर. " अस म्हटल्यावर दामलेंनी फोन उचलला आणि बोलत बाहेर गेले आणि काही वेळात परत आले


" साहेब... त्याची बायको पण गेली साहेब... ती लहान मुलगी होती त्याच ठिकाणी. "


" काय सांगता?" साहेब आश्चर्याने म्हणाले.


" आणि विशेष म्हणजे तिचीही तीच अवस्था आहे जी त्या मुलीची होती."


" बाप रे..." साहेब अवाक होऊन उठले "दामले गाडी काढा निघुयात आपण." 


  घटनास्थळी गेल्यावर समोर जे काही होते ते तितकेच भयानक होते. अगदी तसाच जळालेल्या अवस्थेत एक सांगाडा त्याच ठिकाणी पडला होता, पण मांस अर्धवट शिल्लक होत. सुभाष बाजूला बसून रडत होता. आता त्याच काहीही उरलं नव्हत. साहेब आणि त्यांची टीम घटनेची पाहणी करत होते. पाहणी करत असताना पुन्हा साहेबांना नितीन ची आठवण झाली.


" दामले... निती शी काही कॉन्टॅक्ट झाला तर पहा." अस साहेब दामलेंना म्हणाले.


" त्याचा रात्री पासून काही पत्ता लागत नाहीये. त्याचे घरचे त्याचा शोध घेत होते." मध्येच सुभाष रडता रडता म्हणाला.


" काय ? हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं."


" सकाळी ही बातमी कळताच त्याच्या घरी गेलो होतो. " सुभाष सांगत होता. आता साहेबांच्या पुढे खूप सारे प्रश्न उभे होते, या सर्व घटना घडतात मात्र हाती काहीच पाठपुरावा लागत नव्हता. जे ते एकच नाव घेत होता. खविस करतो हे सारं...


खविस... खरंच सत्य की कोणी खविसच्या आडून तर हे सगळं घडवत नसेल, असे अनेक प्रश्न साहेबांना त्रास देत होते.


(क्रमशः)

वाचा " खविस " पूर्ण कथा, वाचा प्रतिलिपि वर : खालील लिंक तुमच्या लिंक कॉपी करून तुमच्या ब्राउजर मध्ये पेस्ट करा. किंवा प्रतिलिपि ॲप डाऊनलोड करून ' खविस ' कथा सर्च मध्ये टाका.

https://marathi.pratilipi.com/series/%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8-tzhmhq7vfae6?utm_source=android&utm_campaign=content_series_share

भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा


Rate this content
Log in

More marathi story from Kalpesh Bagad

Similar marathi story from Crime