'ज्ञानाचा कंदील'
'ज्ञानाचा कंदील'
मी लग्न करून अशा एका घरात आली आहे जिथे खुद्द सरस्वती नांदते!! अगदी माझ्या सासऱ्यांपासून सगळेच उच्चशिक्षित. त्यामुळे शिक्षणाची गोडी रक्तातच रुजलेली आहे म्हणायला काही हरकत नाही.श्री. संजीव बागुल सर, म्हणजे माझे भाया(जेठ) जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजेच 'राष्ट्रपती' पुरस्काराने सन्मानित!! त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांचे अनुभव ऐकणे हा माझाच नाही तर कुटुंबातील सगळ्यांचाच अगदी आवडता छंद आहे. त्यांच्याच अनुभवातली ही एक मन पिळवटून टाकणारी पण प्रेरणादायी छोटीशी कथा, सत्य घटनेवर आधारित..
मांदेडे पुणे जिल्ह्यातील एक गाव, मुळशी तालुक्यापासून साधारण पाच किमी अंतरावर असेल,तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर बागुल सर कार्यरत असतानाची ही गोष्ट!
डोंगराच्या शिखरावर राहणारी काही आदिवासी मुलं या शाळेत रोज दोन तासाची पायपीट करून कशीबशी शाळेत पोहचायची. रोजच्याप्रमाणे परिपाठ झाल्यावर मुलं आपापल्या वर्गात पोहचली. बागुल सर वर्गात येताच सर्व मुलानी उभे राहून 'एक साथ नमस्ते' म्हंटलं.त्यांनीही मुलांना नमस्ते केलं आणि हजेरी घेतली.
रोजच्याप्रमाणे गृहपाठ तपासायला सुरुवात केली. एकामागून एक वह्या समोर येत गेल्या, सगळ्यांचा गृहपाठ तपासून झाल्यावर सरांच्या एक गोष्ट लक्षात आली की सुनंदा रामभाऊ आखाडे(नाव मुद्दामून जाहिर करत आहे ,कदाचित भविष्यात हे नाव खूप मोठं होऊ शकते, बागुल सरांच्या इतर विद्यार्थ्यांसारखे) ही खूप भेदरलेल्या नजरेने बघत होती.
खरंतर बागुल सर खूप मजेशीर रित्या आपला वर्ग घेत मग ते कडाक्याच्या थंडी मधे बाहेर वरहंड्यात कोवळ्या उन्हामध्ये वर्ग भरवणे असो की कडक उन्हाळ्यात मुलांना गारेगार बर्फाचा गोळा खाऊ घालणे असो, की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे असो सगळ्याच बाबतीत ते नेहमी तत्पर असत पण त्यांची शिस्त म्हणजे शिस्त असे, बहुधा म्हणूनच ती खूप घाबरली होती.
जरा चिडूनच सरानी तिला विचारले," सुनंदा तू गृहपाठ का पूर्ण नाही केलास?" सुनंदा काहीच बोलेना, सरानी पुन्हा एकदा विचारले असता ती ढसाढसा रडायला लागली. तिचे रडणे बघून खरंतर सरांचे हृदय हेलावले.निरागस मुलांचे रडणे बघून ज्या शिक्षकाचे मन हेलावते तोच खरा शिक्षक नाही का? सर्व मुलं स्तब्ध होती, सुनंदा अजूनही रडतच होती. सरांनी जवळ जाऊन प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत आधी तिला शांत केलं, धीर दिला मग अलगद आईच्या मायेने तिला विचारले की "बाळ, तू का रडतेस? काय झालंय सांगशील का? का पूर्ण नाही केलास अभ्यास?"
सुनंदा आता जरा शांत झाली, तिच्यात जरा धीर आला आणि ती सांगू लागली, "सर,शाळा सुटल्यावर दोन तास घरी चालत जावे लागते, घरी पोहचेपर्यंत संध्याकाळ होते. आमच्या घरी एकच कंदील आहे, तोच कंदील बाबा धारा काढण्यासाठी घेऊन जातात, मग त्याच कंदीलच्या प्रकाशात आई स्वयंपाक करते, मग आम्ही त्याच एका कंदीलच्या उजेडात जेवण करतो. जोपर्यंत तो कंदील माझ्या वाट्याला येतो तोपर्यंत झोपायची वेळ होऊन जाते.सर्व जण झोपून जातात म्हणून मी गृहपाठ नाही केला."
तिचे उत्तर ऐकून काही काळ सर स्तब्ध झाले, निरुत्तर झाले. ठीक आहे म्हणून सरानी पुढे शिकवायला सुरुवात केली. दिवसभर ते सुनंदाचाच विचार करत होते.शाळा सुटल्यावर परतीच्या वाटेवर असताना त्यांच्या मनात एकच चलबिचल सुरू होती, सुनंदाचे उत्तर ऐकून खरंतर त्यांचे मन खूप अशांत झालं होतं. त्यांना क्षणभर रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली. श्रीमंतांच्या घरात सगळ्या सुखसोयी असूनही अभ्यास न करणारी मुलंही त्यांना नजरेसमोर दिसत होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६५ वर्षानंतरही पुणे शहरापासून अगदी काही किमी अंतरावर असणाऱ्या गावात मुले विजेअभावी अभ्यास करू शकत नाहीयेत आणि अशी मुलं माझ्या शालेय आहेत या विचाराने त्यांच्या मनात काहूर माजलं होते, मन अस्थिर झालं होतं.
बागुल सरांना सुनंदाच्या घरातील अंधार अस्वस्थ करत होता. या मुलांसाठी काहीतरी करायलाच पाहिजे हे त्यांनी मनोमन ठरवले. घरी पोहचताच त्यांनी रानडे सरांना( समाजसुधारक व शाळेसाठी नेहमी मदत करणारे) फोन केला.घडलेली सगळी कहाणी सांगितली. रानडे सरांनी अशी किती मुलं या गावात असतील याची संपूर्ण माहिती घेतली.
प्रभात कंपनी कडून धनगरवाड्यात राहणाऱ्या अशा २५ मुलांना प्रत्येकी एक कंदील आणि दरमहा २५लिटर रॉकेल मिळवून देण्याच्या उपक्रमाला दोघांनी मिळून मंजुरी आणली. पुढच्या आठ दिवसात उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आला. कंदील मिळाल्यावर त्या मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो तुम्ही आम्ही उभ्या आयुष्यात अनुभवू शकत नाही. आणि मुलांचा आनंद आणि समाधान हाच बागुल सरांच्या जगण्याचा खरा आधार!! तेच त्यांच्या जगण्याचं खरं समाधान!! पुढचे दोन वर्षे हा उपक्रम असाच सुरू होता परिणामी मुलं नियमित अभ्यास करू लागली. मुलांच्या गुणवत्तेत कमालीची सुधारणा झाली, सरांना हायस वाटलं.
पण हे इथेच थांबले नाही.बरेच उद्योजक शाळेला भेट देत असत व शाळेच्या सुधारणेसाठी व प्रगतीसाठी नेहमीच मदत करीत असत, पुण्याच्या नामांकित कंपनी 'प्राज' च्या संचालिका सुनंदा मॅडम खास बागुल सरांच्या शाळेची ख्याती ऐकून शाळेला भेट देण्यासाठी आल्या होत्या. नेहमीप्रमाणे शाळेची व राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देत असताना सरानी ही कंदील कथा त्यांनाही सांगितली. ती कथा ऐकून सुनंदा मॅडम यांचेही डोळे पाण्याने तरळले! बागुल सरांच्या कार्याला सलाम करत त्या म्हणाल्या, "मलाही या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मदत करायला आवडेल, रॉकेलच्या कंदील पेक्षा मी या मुलांना सौरदिवे उपलब्ध करून देते."पर्यावरण पूरक आणि हाताळायला ही सोपे असे सौरदिवे त्यांच्या कंपनी कडून पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तेही फक्त मुलांनाच नाही, बाबांना धारा काढण्यासाठी एक दिवा, आईला स्वयंपाक करण्यासाठी एक दिवा आणि मुलांना अभ्यासासाठी एक दिवा, याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला ३ दिवे, असे एकूण ७५ सौरदिवे त्यांनी उपलब्ध करून दिले.
जगासाठी जरी सूर्य मावळला असला तरी धनगरवाड्यातील या मुलांसाठी तो सौरदिव्याच्या रूपाने उजाडत होता. त्याचे देदीप्यमान तेज मुलांच्या चेहऱ्यावर झळकू लागले. मुलं आनंदाने शिकू लागली!!
आज तीच मुलं उच्च शिक्षण घेत आहेत, आजही जेव्हा ती सरांना भेटतात तेव्हा त्यांची प्रगती बघून सर मनोमन सुखावतात!! हे सगळं शक्य आहे ते बागुल सरांमधील पालकत्वाच्या भावनेमुळे, ते नेहमी म्हणतात मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये माझ्या मुलांना बघतो, त्यांची प्रगती हाच माझा एकमेव ध्यास!
मैत्रिणींनो, शिक्षकांचा आपल्या जीवनात किती अमूल्य वाटा आहे हे तर आपल्याला माहिती आहेच पण त्यात बागुल सरांसारखे शिक्षक मिळणे म्हणजे भाग्यच म्हणावे लागेल. आपल्या प्रगतीचे, यशाचे श्रेय पालकांइतकच आपल्या शिक्षकांनाही आहेच, हो की नाही?
जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था आपल्याला काही नव्याने सांगायची गरज नाही. म्हणून तर आपण सगळे आपल्या मुलांना मोठमोठ्या इंग्रजी माध्यमात शिकवतो, पण मी खात्री देऊन सांगू शकते की बागुल सरांच्या शाळेला एकदा भेट दिली तर आपला जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारी शाळे कडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. आजवर ज्याही शाळेवर त्यांची बदली झाली असेल ती शाळा पुढच्या दोन वर्षात आदर्श शाळा म्हणून घोषित होते. लोकवर्गणी, समाजसुधारक, उद्योगपती व इतर राजकारणी मंडळी याना भेटून, त्यांच्याशी चर्चा करून, त्यांना शाळेच्या गरजांचे महत्व पटवून देऊन ते शाळेची सुधारणा करतात. एक स्त्री जशी चार भिंतीला घरपण देते तसेच बागुल सर शाळेला ज्ञानाचे मंदिर बनवते. आपण बोलक्या व्यक्ती, बोलक्या मूर्ती बघितल्या असतील पण मी बोलकी शाळा बघितली आहे. प्रोजेक्टर पासून ते टॅब्लेट पर्यन्त सगळ्या अत्याधुनिक वस्तू त्यांनी शाळेसाठी लोकवर्गणीतून उपलब्ध करून घेतल्या आहेत. परदेशातून मोठमोठे अधिकारी खास त्यांच्या शाळेला भेट देण्यासाठी येत असतात.हे सगळे शाळेसाठी करण्यात त्यांच्यासोबत डॉ. रानडे(समाजसुधारक) नेहमी त्यांची मदत करत असतात.
हे सगळं मी फक्त ते माझ्या परिवाराचा सदस्य आहे म्हणून नाही म्हणतये. एक उत्तुंग व्यतिमत्व ज्याच्या जीवनाचे ध्येय फक्त आणि फक्त आदिवासी,डोंगराळ भागातील गरिबीपायी शिक्षण न घेऊ शकणाऱ्या मुलांची प्रगती आहे त्यांचे कार्य तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी हा लेख लिहिण्याचा घाट! अवडल्याड लाईक आणि कंमेंट जरूर करा. नावासाहित शेअर करण्यात काहीच हरकत नाही. अजून छान आणि नवीन लेख वाचण्यासाठी मला नक्की फॉलो करा.
धन्यवाद!