STORYMIRROR

Ranjana Karaledharmale

Inspirational Others

3  

Ranjana Karaledharmale

Inspirational Others

जिव्हाळा

जिव्हाळा

3 mins
283


शेजारच्या रिकाम्या घरात आज सकाळपासूनच वर्दळ जाणवत होती. वीणा अंगणात येऊन कानोसा घेऊ लागली. बहुतेक कुणीतरी भाडेकरू राहायला आले होते. केतकी आणि शरद झोपूनच होते. त्यांच्या आॅनलाईन क्लासेसला वेळ होता, म्हणून तिनं त्यांना उठवलं नाही. तिला बरं वाटलं की चला, कुणीतरी शेजारी राहायला आलं. एकटेपणा जरा कमी होईल.विरळ वस्ती असलेला हा एक शहरी भाग होता. हळूहळू दोन्ही कुटुंबात स्नेहभाव निर्माण झाला. ते एक मध्यमवर्गीय मुस्लीम कुटूंब होतं. वरदएवढाच त्यांचा मुलगा अमन. पोरं एकमेकाला भेटली तसं सोबत खेळणं, पतंग उडवणं, मस्ती करणं सुरू झालं. जणू त्यांची जुनीच ओळख, जवळीक असावी.


   वीणाच्या घराबाहेर एक कडुनिंबाचं झाड होतं. वरद अमनचं जिव्हाळ्याचं ठिकाण. शाळा बंदच होत्या त्यामुळे ते दिवसभर झाडाखाली कधी बॅडमिंटन तर कधी बॅटबाॅल खेळत. वीणाला समाधान होतं की सतत सोशल मिडियाला चिकटून असलेला वरद आता अमनसोबत मोकळेपणानं खेळत होता. केतकी वरदपेक्षा पाच वर्षांनी मोठी. लहानपणापासून त्यांची सतत भांडाभांडी होतं असे.


ती ओरडायची,"वरद,आई बोलवत आहे, चल ये घरात." 

"काय गं हे ताई,खेळू दे ना..". तोंड वेडेवाकडे करत अमनच्या गळ्यात हात टाकून तो झाडाभोवती फेऱ्या मारत खेळायला लागायचा.. वीणा ठरवल्याप्रमाणे एका बाऊलमध्ये गुलाबजाम घेऊन अमनच्या घरी गेली.झेबा,अमनची अम्मी खुप हसतमुख अन् प्रसन्न व्यक्तीमत्व असलेली होती.

वीणाला पाहून तिला खूप आनंद झाला.तिचा हात धरुन झेबाने तिला बसवलं.वीणाला तिच्या घराचं नीटनेटकेपण ,स्वच्छता.... खुप आवडलं.एक मंद सुगंध दरवळत होता ज्याने मनही सुगंधित होत होतं.


मनमोकळेपणानं गप्पा मारतामारता वेळ कसा गेला कळलंच नाही.वीणाची हिंदीही बोलताबोलता दिवसेंदिवस बरीच सुधारली. असंच एक दिवस विकास ड्युटीवर गेल्यावर टीव्हीवर बातम्या पाहतांना मुख्य शहरात उसळलेली दंगल नजरे

स पडली. पेटलेली वाहनं, सैरावैरा धावत असलेले

सामान्य लोक, प्रचंड आरडाओरडा... छोट्याशा कारणावरून सुरु झालेलं ते युद्ध एक भयानक स्वरुप घेऊ पाहात होतं. वीणा हादरली.त्याच भागात विकासचं तिच्या नवऱ्याचं ऑफिस होतं. अशी धुमसतच ही आग हळूहळू रौद्ररुप धारण करते.घराबाहेर पडलेलं माणूस परत येईपर्यंत घरच्यांचा जीव थाऱ्यावर नसतो.छोट्याश्या ठिणगीचं रुपांतर एका भयावह दंगलीत होते,आणि जनसामान्यांचं जगणं मुश्कील होते. कर्फ्यु लागतो.

पोटापाण्याचे व्यवसाय गटांगळ्या खातात. लाखोंची मालमत्ता स्वाहा होते. रस्ते निर्मनुष्य आणि भेदरलेले. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात गुदमरलेलं शहर एका भयक्रांत वेष्टनाखाली... ती अस्वस्थ झाली. फोनही लागत नव्हता. कळल्याबरोबर झेबा तिच्या नवऱ्यासोबत आली. तिनं वीणाला समजावलं,"रो मत वीणा, अल्लाह सब ठीक करेंगे. विकासजीको कुछ नहीं होगा,धीरज रखो..." तिनं घरुन बनवून आणलेलं जेवण बळेच वीणाला खायला लावलं. मुलांना खायला दिलं. सायंकाळपर्यंत विकासचा ना फोन ना कुठली माहिती. वीणा काळजीनं अर्धमेल्यागत झाली होती.


   अचानक विकासाचा फोन लागला अन् कळलं की तो सुखरूप आहे आणि आज मित्राकडेच मुक्काम करतोय म्हणून... तिचा जीव भांड्यात पडला. तिचं विचारचक्र सुरु होतं... आज लोकशाहीत सारेच स्वतंत्र आहेत. प्रत्येकानं एकमेकाला समजुन घेतलं, द्वेष.. विखारीपणाला कायम तिलांजली दिली तर जगण्यातला खरा आनंद प्रत्येकाच्या वाट्याला भरभरुन येईल.


  तिचं सहज लक्ष गेलं, घरासमोरच्या कडुनिंबाभोवती अमन, वरदची मस्ती सुरु होती. साऱ्या जगाला विसरुन ते त्यांच्याच विश्वात मश्गूल होते. दोघेही बॅडमिंटनमध्ये कधी हरत होते तर कधी जिंकत होते. पण मध्येच खिशातलं चाॅकलेट एकमेकांना देत होते. एवढ्या लहान वयात त्यांना असलेली समज कल्पनातीत होती. जिव्हाळ्याच्या विश्वाचं रहस्य त्यांना पुरतं उमगलं होतं.


Rate this content
Log in

More marathi story from Ranjana Karaledharmale

Similar marathi story from Inspirational