जिद्द
जिद्द


(कथा सत्य घटनेवर आधारित असून कोणालाही दुःख किंवा मानसिक इजा पोहोचवण्याचा माझा कोणताही हेतू नाही)
एक छोटेसे गाव होते. शांत आणि सोज्वळ... जो तो आपापल्या कामात गुंतलेला असे. एक कुटुंब या गावात वास्तव्यास येतं. लहान आणि सुखी घरातील कर्ता पुरुष शासकीय नोकरीत असल्याने त्यांचे बाहेरगावी जाणे येणे चालूच असे, तर त्याची पत्नी गृहिणी असल्याने तिचा पूर्ण दिवस घरातील कामं करण्यात व मुलाला सांभाळण्यात जात असे. खूप वर्षांनी मूल झाल्याने हा खूप नवसाचा होता. त्याचे सारे हट्ट पुरवले जायचे. हळूहळू हा मोठा होत होता. आई-वडलांच्या चेहर्यावरील हास्य फुलू लागले होते.
घराची परिस्थिती खास नसल्याने याला मराठी माध्यमाच्या शाळेत टाकण्यात आले. पण हा इतका बंड होता की रोज शाळेतून याची तक्रार येत असे. कधी कोणाची टिंगल, तर कधी कोणाला मारणे असे उद्योग हा करत असे. कसे होईल याचे या विचारांनी नेहमीच याचे आई-वडील त्रस्त असत. साप्ताहिक पेपरांमध्ये याला शून्य गुण मिळत असे. असेच दिवस लोटले वर्ष लोटली... हा चालढकल करून एका वर्गातून दुसर्या वर्गात जात होता. त्यातच याला एक वाईट संगत लागली, पेपर फोडणाऱ्या टोळीच्या हा संपर्कात आला. आता मात्र याला जे पाहिजे होते, तसेच होत होते. पेपरांमधले गुण वाढले. घरच्यांचा आत्मविश्वास संपादन करण्यातदेखील हा यशस्वी झाला. यातच याचे वडील पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष झाले त्यामुळे याची फजिती झाली. तरीही हा आपले काम करतच राहिला आणि एक दिवस हा पुराव्यासकट पकडला गेला. आता काय होणार या विचाराने याला घाम फुटला. दुसरा दिवस उजाडला याच्या घरी शाळेतून पत्र पाठवण्यात आले. याला ते कळाले व याने शिताफीने पत्र मिळवून ते फाडून फेकून दिले.
पुढे हा दहावीत आला तो त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा होता. याने मेहनत घेतली पण ऐन परीक्षेच्या वेळीच हा आजारी पडला. त्यामुळे गुणांवर परिणाम झाला. पुढे याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला तेथेदेखील बारावीला हा एवढा आजारी पडला की एक डोळा बंद असूनसुद्धा याने पेपर दिले व काठावर पास झाला. आता पुढे कसे होईल याच विचाराने सर्व त्रस्त होते. वडिल म्हणायचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घ्यायचे तर आई म्हणायची महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळात प्रवेश घ्यायचा. या चढाओढीमध्ये खचलेला हा शांत होता. याच्या मनावर खोलवर याचे परिणाम उमटत होते. मग आईच्या हट्टापुढे वडिलांनी तंत्रशिक्षण मंडळात प्रवेश करवून दिला. हा आता सुधरणार वर काहीतरी करून दाखवणार याची खात्रीच जणू आईला होती. इतके धक्के बसल्यावर हा आता आतून पूर्ण हलला होता. त्यावेळीच याने स्वतःशीच एक शपथ घेतली की अभ्यास पूर्ण जोमात करायचा. प्रथम सहामाहीचे पेपर झाले, निकाल लागला. जणू चमत्कारच घडला होता. पूर्ण पेपर हा प्रथम श्रेणीत पास झाला होता. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक सत्रात पासच होत गेला. अभियांत्रिकीतही याने हेच कायम ठेवले. स्वतःवरील विश्वास व मेहनतीच्या बळावर हा झिरोतून हिरो बनला. चांगली नोकरी मिळवली व आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला.
"स्वतःवरील विश्वास व मेहनत या बळावर सामान्य वाटणाऱ्या व्यक्तीला असामान्य बनवलं. प्रत्येक क्षेत्रात त्याचं वर्चस्व तयार केलं..."