Amit Joharapurkar

Inspirational

3.6  

Amit Joharapurkar

Inspirational

जान

जान

6 mins
15K


सलिम घराबाहेर पडला तेव्हा सातही वाजले नव्हते. पण एप्रिलच्या सुरुवातीसच उन्हाची काहिली सुरू झाली होती. घराजवळच्या पानाच्या गल्ल्याखाली माचिसचे छाप गोळा करायला तो थांबला आणि मागून लगेचच अम्माचा ओरडा ऐकू आला,"इकडे तिकडे फिरूनको, जलदी दूध घेऊन ये. तुझे अब्बा   येतीलच एवढ्यात." सलिमने वेग वाढवला पण वस्तीच्या बाहेर येताच तो मंदावला.रोजची सकाळ त्याला जिवावरच यायची. आणि सोमवारची तर     जास्तच. रविवारी तो, उमर, जाफर, आणि कनू जमालपुरहून फिरत कांकरियाला जायचे. तलावाच्या पाळीवर खेळताना दिवसभर त्यांची तहानभूक हरपायची. तो कोपर्‍यावर वळला तो त्याला आवाज आला, "दिकरा, ऐक जरा." ती कोपऱ्यावरच्या बंगल्यातली कांताबेन होती. सलिमची वस्ती जुहापुर्‍याच्या अगदी टोकाला होती. जुहापुरा संपताच जुन्या मोठ्या बंगल्यांची रांग होती. त्यात टोकाचा बंगला कांताबेनचा होता. बंगल्याच्या फाटकातून मोठा व्हरांडा दिसत होता. त्याच्या झरोक्यातून कांताबेन आवाज देत होती. कांताबेनला सलिम ओळखायचा कारण कनूची बा कांताबेनकडे कामाला जायची. सलिमनं म्हातार्‍या कांताबेनकडे पाहिलं. कांताबेन संथ आवाजात म्हणाली," दिकरा, मला थोडा किराणा आणून देशील, आणि दूध?" सलिमने नकळत मान हलवून होकार दिला. कांताबेनने त्याला सामानाची यादी आणि पैसे देऊन म्हटले, "उरलेले पैसे तू ठेव." सलिमने मान हलवली आणि कांताबेन किती म्हातारी असेल याचा अंदाज लावत तो निघाला. सलिम परत आला तेव्हा कांताबेन आरामखुर्चीत बसून हातातली माळ जपत होती. सलिमला बघताच हसून म्हणाली, "ठेव बेटा ते इथंच ओट्यावर."  दुसऱ्या दिवशी रस्त्यानं जाताना सलीम कांताबेनच्या बंगल्यासमोर थोडासा घोटाळला. त्याने समोर बघितलं तर कांताबेन व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर बसून मंद झोके घेत होती. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर शांत प्रसन्न हसू होते. सलीम भारावल्यासारखा तिच्याकडे बघत राहिला. तेवढ्यात कांताबेनचं लक्ष सलीम कडे गेलं. तिनं हसून त्याला आत बोलावलं. सलीम व्हरांड्यात जाऊन उभा राहिला. पांढऱ्या खांबांवर तोललेल्या व्हरांड्याच्या छपराला आतून नक्षीकाम होतं. खाली थंड संगमरवर आणि चारी बाजूला दोन फूट उंच जाळी. घराच्या शिसवी दारातून आतला फर्निचर दिसत होतं. बाहेर अंगणात फुलांचा दरवळ येत होता. सलीमला या जगाची नवलाई वाटली. त्याच्या घरातला अंधार, धूर, कलकल या सगळ्याचा त्याला विसर पडला. या घराच्या आत कसे असेल याचे कुतूहल त्याच्या मनात दाटून आले. कांताबेनच्या आवाजाने तो भानावर आला. "मी तुला थोडे सामान आणायला सांगितले तर आणशील?" त्याने नकळत मान हलवली. "तू फार चांगला मुलगा आहेस. इथल्या इतर मुलांसारखा नाहीस." स्वतःची स्तुती ऐकून सलीम ओशाळला. त्याला फक्त शिव्या खायची सवय होती घरी. तिनं कापऱ्या हातांनी बटवा चाचपला आणि त्याला काही पैसे दिले. तो सामान घेऊन परत आला तेव्हा ती झोपाळ्यावरच बसली होती. त्यांना सुटे पैसे दिले तेव्हा तिनं त्यातले थोडे त्याला परत दिले. "बस बाळ." ती म्हणाली. सलीम उभाच राहिला. "तुझं नाव काय बाळ?" सलीमनं त्याचं नाव सांगितलं, आणि मग पत्ता आणि त्याला दहा भावंडं आहेत तेही. "दहा?"ती चकित होऊन म्हणाली. "आम्ही फक्त दोघी बहिणी आहोत, आणि माझी बहीण तर कित्येक वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाली". ती आपल्या बहिणीबद्दल, तिच्या लहानपणाबद्दल, तिच्या बा बापूजींबद्दल काय काय सांगत राहिली. सलीमला त्यातलं अक्षर काळात नव्हतं. तरी तो ऐकत राहिला. त्याच्या दहा वर्षाच्या जिवाला त्यातलं काही काळात नाहीये हे तिच्या गावीही नव्हता. थोडा वेळ शांत राहून सलीम म्हणाला, "मी आता जायला पाहिजे". "तुझ्याशी बोलून किती छान वाटलं." कांताबेन म्हणाली. सलिमनं तिच्या पैशानं घेतलेली सगळी मिठाई घरी नेली. अम्मा चक्रावून म्हणाली, "तुझ्याजवळ पैसे कुठून आले?" "बंगल्यातल्या कांताबेननी दिले?" तो धास्तावून म्हणाला. हातातला पिठाचा गोळा मळायचे विसरून अम्मा त्याच्याकडे बघत राहिली. मोरीत भांडी घासणारी सगळ्यात मोठी बहीण कनीझ ताडकन उठून उभी झाली. "कांताबेन?" अम्मा तिखट स्वरात म्हणाली. "तिनं बाजारातून काही सामान आणायला सांगितलं," सलीम म्हणाला, " आणि मग वाचलेले पैसे मला दिले"."सरस. म्हणजे कांताबेनशी तुझं चांगलं जमलं म्हणायचं." कनीझ फणकाऱ्यानं म्हणाली. "चूप कर." अम्मा रागात ओरडली. " काही गरज नाही त्या लोकांचे पैसे घ्यायची. मी चांगली ओळखून आहे त्या लोकांना!" "अम्मा, पण सलिमनं थोडंसं काम केलं त्याचेच पैसे दिले ना?" कनीझ म्हणाली. "तू अक्कल चालवू नकोस, आपलं काम कर." अम्माच्या मनात दीड महिन्यापूर्वी दंगलीत मेलेल्या भावाची आठवण ताजी झाली. त्यानंतर घरात कुणी कांतांबेनाचा विषय काढला नाही. पण सलीम आता कांताबेनचे सामान जवळजवळ रोजच आणू लागला होता. एक दिवस सरत्या दुपारी कांताबेनने सलीमला चहा प्यायला दिला. सोबत नानकटाई पण होती. सलीमला ती खूपच आवडली. त्यांना ते लगेच बोलूनही दाखवला. कांताबेन समाधानानं म्हणाली," मी बनवली स्वतः तुझ्यासाठी. आवडली ना?" सलीम बावचळला. कसाबसा चहा संपवून तो रस्त्यावर आला. त्यानंतर कांताबेनसोबत तो रोजच चहा घेऊ लागला. त्याचं संकोच मावळला आणि आता त्याला कांताबेनच्या गोष्टी ऐकायला मजा येऊ लागली. त्याच्या दहा वर्षाच्या आयुष्यात त्यानं अम्माला ओरडताना कावतानाच पाहिलं होतं. त्याच्याशी अम्मा कधीही प्रेमानं बोलली नव्हती. तिला कामातून अशा गोष्टींसाठी मोकळीक आणि उसंतच मिळायची नाही. पण कांताबेनकडे वेळच वेळ होता. सलीम त्याला त्याच्या शाळेबद्दल सांगायचा, मित्रांबद्दल सांगायचा. ती अगदी लक्षपूर्वक त्याच्या गोष्टी ऐकायची. कधी कधी अगदी प्रेमाने त्याला समजवायची, काय बरं आणि काय वाईट. कनीझची शादी जमल्याची बातमी सलीमनं सगळ्यात आधी कांताबेनला दिली. मुबीन त्याच्या मोडासाला राहणाऱ्या काकांचाच मुलगा होता.लग्न झाल्यावर तो अहमदाबादला रिक्षा चालवणार होता. शादीच्या आधी कनीझ साठी घर शोधायचे होते. कांताबेन थोडावेळ विचारात पडली. मग म्हणाली, "किती जागा लागेल तिला? माझ्या वरच्या मजल्यावर दोन खोल्या आहेत.मलाही सोबत होईल." अशा रितीने अम्माच्या इच्छेविरुद्ध कनीझ आणि मुबीन कान्ताबेनच्या घरी राहायला आले. अशीच काही वर्षे गेली. आता कान्ताबेनची बहुतेक कामे कनीझने सांभाळली होती. कांताबेन दिवसेंदिवस कमजोर होत चालली होती, खासकरून संधिवाताने तर तिला चार पावले चालणेही मुश्किल करून टाकले होते. तिला भेटायला येणारेही फार कमी लोक होते. तिला दर महिन्याला व्याजाचे पैसे आणून देणारा एक सोनी किंवा तिची इतर कामे करणारा म्हातारा वकील सोडला तर कुणीही तिला भेटायला यायचे नाही. तिचा सगळी सेवाचाकरी आता कनीझच करायची. कांताबेन व्हरांड्यात बसून आपल्या बहिणीला पत्र लिहित बसायची. तिचं ते विकल रूप सलिमला अजिबात बघवत नव्हतं. आणि अखेर एक दिवस कांताबेन मेली.  कांताबेननं देहदान केलं होतं. तिचा मृतदेह हॉस्पिटलचे लोक घेऊन गेले. तिच्या मरणाच्या अगदी दोन दिवस आधी तिची बहिण येऊन पोचली. ती कांताबेनपेक्षा खूपच तरुण आणि उत्साही होती. दोन आठवड्यांच्या आत तिनं सारं सामान आवरलं आणि घरही विकायला काढलं. शेवटी एक दिवस त्या बंगल्यावर बिल्डरची पाटी लागली आणि कांताबेनचं घर जमिनदोस्त झालं.

त्या रात्री सलिमच्या घरी विचित्र शांतता होती. अम्मा कपड्यांना इस्त्री करत होती, आणि कनीझ रोटी शेकत होती. अचानक कनीझ कडवटपणे म्हणाली,"बघ, आमच्यासाठी एक नवा पैसा ठेवला नाही म्हातारीनं." "मी तर आधीपासून तेच सांगत होते," अम्मा हडसून बोलली, " या लोकांवर विश्वास का ठेवायचा? चला बरं झालं, तुम्हाला धडा मिळाला". सलिमला ते ऐकून विचित्र शिसारी आली. तो उठून घराबाहेर पडला. बाहेर ठंड हवा होती आणि रात्रीची शांतता. सलिम चालत कांताबेनच्या बंगल्याजवळ आला. त्याला भरून आले. त्याला वाटले, कांताबेननं त्याला काय दिलं ते खूप मोलाचं होतं. त्याला ते व्यक्त करता येत नव्हतं, पण आतून पक्कं जाणवत होतं. कांताबेननं त्याला माणूस म्हणून विचार करायला शिकवलं होतं. त्याला प्रेम दिलं होतं, बर्‍यावाइटाची जाण दिली होती. आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं होतं. त्याच्या बकाल जीवनाला सोन्याची किनार दिली होती. त्याला वाटलं कांताबेनचा बंगला तोडला तरी त्याच्या अंतरी कांताबेन कायम राहील. तिनं त्याला वेळोवेळी दिलेल्या पैशांपेक्षा तिनं दिलेली माणुसपणाची जाण त्याला फार मोलाची वाटली. आणि कांताबेनच्या मरणानंतर महिनाभरानं त्याला भरभरून रडू आलं.  


Rate this content
Log in

More marathi story from Amit Joharapurkar

Similar marathi story from Inspirational