हिंदू नववर्ष
हिंदू नववर्ष
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*"सोनेरी किरणांचा स्पर्श*
*दारी गुढी उभी शोभिवंत*,
*मनी दाटले सुख नि हर्ष*
*चैतन्य फुलविण्या आला वसंत"*!!
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाचा प्रारंभ,वसंत ऋतूची चाहूल अन् वेदांग ज्योतिषानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच, लक्षात आलंच असेल.अहो, *आपला गुढीपाडवा...!!*
संत चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतात......!!!
*"टाळी वाजवावी,गुढी उभारावी!*
*वाट ही चालावी पंढरीची!!*
सण,उत्सवांचा खजिना म्हणजेच हिंदू संस्कृती.हिंदू संस्कृतीचं नववर्ष म्हणजेच *गुढीपाडवा* हा सण.हिंदू संस्कृतीतील सण,उत्सवाला ऐतिहासिक,सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्वही असतं.बरं का!
पौराणिक दृष्ट्या पाहिलं तर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली.तो दिवस म्हणजे,चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच *गुढीपाडवा* तसेच दुष्ट शकांना पराभूत करणाऱ्या शालिवाहनाचा विजय दिन ही हाच...!!
म्हणून याच दिवसापासून शालिवहन शक सुरू झाला. शालिवहनाच्या विजयाचं स्वागत गुढ्या उभारून केल्यामुळे गुढीपाडवा हा सण सातव्या शतकापासून सुरू झाला.
प्रभू श्रीरामांनी वालीचा वध करून त्याच्या असुरी शक्तीचा नाश केला.आणि 14 वर्षे वनवास संपवून, चैत्र शुद्ध प्रतिपदेला अयोध्येत परत आले. त्यांच्या विजयाचं स्वागत अयोध्येतील प्रजेनी दारोदारी गुढ्या उभारून केलं.
संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी ग्रंथात म्हणतात....,
*"अधर्माची अवघी तोडीं*
*दोषांची लिहिली फाडीं*
*सज्जनांकरवी गुढी*
*सुखाची उभवीं!!*
सुख,समृद्धी,विजयाचं प्रतिक आणि आनंदाचा,गोडधोडाचा पवित्र सण म्हणजे गुढीपाडवा.हा सण संपूर्ण भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
दारासमोर लांब बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र,साखरेची माळ,कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने,फुलांचा हार बांधून उपडा कलश ठेवतात.स्नेह, मांगल्य,आनंदाचं प्रतीक असणारी ही गुढी दारोदारी उभी केली जाते.पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सण गोड करतात.तसेच कडूनिंबाच्या कोवळ्या पानांचा नैवेद्य दाखवून सेवन करतात.
*दारोदारी गुढी उभी*
*संदेश देई आनंदाचा*,
*राग,द्वेष नष्ट होऊन*
*घरात येवो बहर स्नेहाचा*...
जणू हाच संदेश आकाशाच्या दिशेने उभी असलेली गुढी देत असते.
वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर तांब्याचा उपडा कलश प्रजापती लहरींना घराकडे आकर्षित करतो.त्यातील पाणी पिल्याने आरोग्य लाभते.कडूलिंब कफ, पित्तनाशक असून त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते.
या वर्षी आपल्या देशात आणि एकूणच जगात म्हणता येईल कोरोनाने हाहाकार माजवला आहे.कोरोनाच्या संकटातून लवकर मुक्त होऊन माझ्या देशात सुख,शांती,मांगल्य नांदावे हीच अंतकरणातून प्रार्थना...!!!
*"कोरोनाचा विळखा साऱ्या*
*जगताला बसला आहे,*
*गुढीमाई कर मुक्त आता*
*श्वास साऱ्यांचा कोंडला आहे "*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
