STORYMIRROR

Madhuri Nagine

Inspirational

3  

Madhuri Nagine

Inspirational

हाक हृदयाची...

हाक हृदयाची...

3 mins
814

       हॉस्पिटलचा सिक्युरिटी गार्ड असलेल्या सखारामची दिवसभरातली पाचवी फेरी होती त्या वॉर्डमध्ये. त्याच्याही नकळत तो ओढला जात होता त्या चिमुरडीकडे. ती मात्र बेशुद्धावस्थेतच होती. तिच्या आई-वडिलांनाही खटकू लागले होते त्याचे येणे मात्र ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. नळ्यांच्या पिंजऱ्यात अडकलेला तो चिमुकला जीव पाहून खूप अस्वस्थ व्हायचा सखाराम! त्याला त्याच्या पाच-सहा दिवसांपूर्वी देवाघरी गेलेल्या सोनुली ची तीव्र आठवण यायची. जीव की प्राण होती ती त्याची! घरची परिस्थिती बेताची, घरी बसून राहणं जमणार नव्हतं म्हणून छातीवर दगड ठेवून लगेचच हॉस्पिटलमध्ये रुजू झाला होता तो. 

   

सारं हॉस्पिटल ओळखायचं त्याला, त्याच्या बोलक्या स्वभावामुळे. सखाराम आपल्यापरीने प्रत्येकाला मदत करायचा परंतु त्याच्यावर ओढावलेल्या या प्रसंगात मात्र त्याला आधार देण्यापलीकडे कोणतीच मदत कोणाला करता येत नव्हती. हल्ली तो आपले काम शांतपणे यंत्रवत करत रहायचा,सतत सोनुलीच्या आठवणी येत रहायच्या. आज अचानक त्याच्या कानात सोनुलीचा "बाबा, बाबा" आवाज आला, कावराबावरा झालेला सखाराम आवाजाच्या दिशेने वेड्यासारखा पळू लागला आणि त्या वॉर्डमध्ये चिमुरडीच्या कॉटजवळ येऊन थांबला. त्याला कळेना, नेमकं काय चाललंय??

   

तेव्हापासून दिवसातून बऱ्याचदा तो तिथे येऊ लागला. त्या निपचित पडलेल्या चिमुरडीला पाहून त्याचा जीव पिळवटून निघायचा कारण काय? हे त्यालाच कळत नव्हत. बरं मन मोकळं करावं, तर कोणाजवळ? कारण दुःखात बुडालेली बायको सावरलीच नव्हती अजून. का होतं आपल्याला असं? काय संबंध या मुलीशी आपला? हॉस्पिटलमध्ये आणखी पेशंट असूनही फक्त याच मुलीसाठी का तुटतोय जीव? या सार्‍या विचारांनी त्याची झोप उडाली होती. या सगळ्यात त्याला हे मात्र कळत होतं की गेले चार-पाच दिवस ती मुलगी शुद्धीत नव्हती.

   

एके दिवशी ड्युटीवर असतानाच मुख्य डॉक्टरांचा त्याला निरोप मिळाला, डॉक्टरांना त्याच्याशी बोलायचे होते. केबिनमध्ये येताच डॉक्टरांनी त्याला खुर्चीवर बसवले, आता मात्र नक्कीच काहीतरी गंभीर आहे हे त्याला कळून चुकले. डॉक्टरांनी सखारामला जे काही सांगितले ते ऐकून तो धाय मोकलून रडू लागला आणि काही वेळाने एका ठाम निर्धाराने उठून त्या वॉर्डकडे चालू लागला. वार्डमध्ये मुलीचे आई आणि वडील रडून रडून सुजलेल्या डोळ्यांनी आपल्या पोटच्या गोळ्याकडे पाहत होते. त्याची चाहूल लागताच ते बाजूला झाले कारण त्यांनाही सगळ्या प्रकाराची कल्पना डॉक्टरांनी दिलेली होती. 

   

थरथरत्या हाताने त्याने त्या निपचित पडलेल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या कानात अतीव प्रेमाने हाक दिली," सोनुली उठ, हे बघ तुझा बाबा आलाय, उठ बाळा उठ" आणि त्याच क्षणी चमत्कार झाला नि त्या जीवाची हालचाल जाणवली. बस! तो तीरासारखा निघून गेला तिथून दूर कारण आता नसून असलेल्या सोनुलीच्या मोहात अडकणं त्याला परवडणारं नव्हतं कारण ते दुसऱ्याचं लेकरू होतं. चिमुरडीचे आई-वडील मात्र झाल्या प्रकाराने आनंदमिश्रित आश्चर्यचकित झाले.

   

सखारामला आता आपल्याला जाणवणाऱ्या अस्वस्थतेचे कारण कळू लागलं होतं. आपल्या पोटच्या गोळ्याचे अस्तित्व सखारामला त्या मुलीमध्ये जाणवत होतं कारण चिमुरडीच्या शरीरात त्याच्या सोनुलीचं हृदय धडधडत होतं. सोनुलीचा अपघात झाला त्यावेळी तिला याच हॉस्पिटलमध्ये आणलं होतं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. स्वस्थ अवस्थेत असलेल्या सोनुलीचे अवयव दान करावेत कारण ती कुणाच्यातरी रुपात जिवंत राहील असं डॉक्टरांनी सांगितल्यावर दुःखाच्या भरातही त्याने तिचे अवयव दान केले होते. नेमकं त्याच रात्री हृदयाचा गंभीर आजार असलेली ही चिमुरडी इथे येऊन दाखल झाली आणि प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी सोनुलीचे हृदय चिमुरडीच्या शरीरात ट्रान्सफर केले होते. ऑपरेशन यशस्वी होऊनही चार दिवस चिमुरडी बेशुद्धच होती. तेव्हा जेथे विज्ञान थांबतं तिथं प्रेमाची हाक जिंकते हे अनुभवलेल्या डॉक्टरांना मात्र आता सखारामच आपली मदत करू शकतो हे चांगलेच समजले होते आणि म्हणूनच त्यांनी सखारामला सगळी कल्पना दिली. शेवटचा प्रयत्न म्हणून केलेला प्रेमाचा हा उपचार कामी आला होता, चिमुरडी शुद्धीत आली होती. 


   चारच दिवसात त्या चिमुरडीला घरी सोडण्यात आलं. जाता जाता तिच्या आईवडिलांसाठी देव ठरलेल्या सखारामचे त्यांनी मनापासून आभार मानले. वडिलांच्या कडेवर असलेल्या चिमुरडीला डोळे भरून बघत सखारामने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पाठमोरी जात असलेल्या त्या लेकराकडे तो कितीतरी वेळ बघत होता आणि अचानक तिने मागे वळून "बाबा" अशी हाक देत त्याला टाटा केला. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहत असणारे डॉक्टरही आपल्या अश्रूंना थांबवू शकले नाहीत. सखाराम मात्र अश्रू भरल्या नजरेने समाधानात आपल्या लेकराच्या दिशेने हात हलवत उभा होता, ती नजरेआड होईपर्यंत!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational