गुरुपौर्णिमा विशेष: अेक हिम्मतवाला
गुरुपौर्णिमा विशेष: अेक हिम्मतवाला
२०२१ मधे १९९४ सालची दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर तब्बल २६ वर्षांनंतर झाला. त्यावेळी शाळेत वाटवेसर , जे.बी.पाटील सर , भोसले शिपाई काका , माळी मॅडम
(नाईक मॅडम) आणि माळी सरांचा आम्ही सत्कार केला आणि आशिर्वाद घेतले.
तब्बल सव्वीस वर्षांनंतर माळी मॅडम आणि माळी सरांना मी भेटतं होतो. माळी मॅडमनी प्रेमानं जवळ घेतलं अगदी सव्वीस वर्षांपूर्वी सारखंच. माळी सरांनी मला पहाताचं ओळखलेलं. मला खूप आनंद झालेला. आम्ही सगळ्या शिक्षकांच्या सगळ्या आठवणी अुराशी कवटाळून होतो . आम्ही सगळेच विद्यार्थी खूप खूप आठवणी सांगत होतो . पण जेव्हा सत्कार समारंभात असलेल्या शिक्षकांनी त्याच पध्दतीने त्या आठवणींना आठवणींने अुजाळाला दिला तेव्हा आनंदानं अुर भरून आलं . डोळे पाणावले. आपल्या प्रत्येक विद्यार्थाच्या आठवणी शिक्षकांच्या लक्षात असणं कठिणंच .पण तरीही आमच्या बद्दल वाटवे सर , जेबी पाटील सर , माळी मॅडम आणि माळी सर साऱ्यांनी ज्या आठवणी बोलून दाखवल्या ते अैकून हृद्य अुचंबळून आलं . आम्हां साऱ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
समारंभ संपल्यावर माळी मॅडम आणि सरांनी खास आम्हाला त्यांच्या घरी आणि हॅाटेलवर बोलावलं. मी , मनिष गेलेलो. हॅाटेलवरचं भेटलो. हॅाटेलवर गर्दी होती.त्यांच्या घरातली सगळीचं मंडळी .. सरांचा मुलगा गणेश, गणेशची पत्नी , माळी मॅडम ,माळी सर सारे हॅाटेल मध्ये बसलेल्या ग्राहकांसाठी जेवण करण्याच्या घाईत होते. त्याहीही घाईत मॅडम आणि सरांनी सगळ्यांशी ओळख करून दिलेली. निघताना मॅडम आणि सरांच्या पाया पडून निघालेलो.निघताना मन्या दादा आणि गुलाब ताई भेटलेले त्याच्या हॅाटेल समोर टाटाच्या माळाच्या कॅार्नरवर. पनवेलला आल्यावर आठवड्याभरानंतर मॅडम आणि सरांशी फोनवर बोलणं झालेलं. सरांशी झालेली त्यावेळची भेट अखेरची असेल कधीच वाटलं नव्हतं . तसं सरांचं वयं नव्हतं झालं. अजून दोन वर्ष होती रीचायर्ड होण्यासाठी.
त्या दिवशी सरांच्या निधनाबद्दल अैकलं आणि सरांच्या आणि मॅडम बद्दलच्या माझ्या बालपणापासूनच्या - दहावीपर्यंतच्या आठवणींत मन गुरफटलेलं …
आठवतयं ..जांभूळपाड्यात आम्ही गणपतीच्या देवळासमोर रहात होतो तेव्हा माळी सर , कोन्हाळे सर जुन्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मागे विनायक काकाच्या घरासमोरच्या चाळीत रहायचे . इतकसं आठवतं नाही पण माळी सर आणि नाईक बाई यांच लग्नं झालेलं. नाईक बाई .. लग्नानंतर माळी बाई झाल्या. नदीवर कपडे धुवायला जाण्याचा रस्ता माळी बाईंच्या घरांवरून जात होता त्यामुळे माळी बाई आणि माझी आई यांची चांगली ओळख झालेली. त्यामुळे माझ्याकडे त्याचं खास लक्ष असायचं .
मी पाचवीत गेल्यापासून सातवी पर्यंत दोघेही माळी सर आणि माळी मॅडम आम्हांला शिक्षक म्हणून होते.
माळी सर चित्रकला आणि हिंदी शिकवायचे ,माळी मॅडम समाजशास्र
मला अभ्यासासोबत चित्रकलेची पण आवड होती आणि लागली . त्यामुळे सरांशी गट्टी जमलेली. मी खूपदा चित्र काढण्यासाठी , सरांनी काढलेली चित्र पहाण्यासाठी त्याच्यांकडे जायचो. सर चित्र काढत असायचे आणि मी खूपवेळ त्यांच निरीक्षण करत बसायचो. त्यांच्याकडे वेगळ्या नंबरचे खूप खूप ब्रश असायचे.खूप सुंदर चित्र काढायचे. सर कलर मिक्सिंग करायचे आणि ते पाहून शिकण्या सारखचं होतं. सरांनी काढलेली भरपूर चित्र सरांनी खूप जपून ठेवलेली , मला दाखवायचे . मी खूप काळजीने आणि प्रेमाने ती चित्र हाताळायचो. ते खूप महत्वाचं होतं कारण कागद खूप जुना झालेला असायचा , गहाळ होऊ शकतं होता म्हणून खूप काळजी पूर्वक हाताळणं गरजेचं होतं.
सरांना नेहमी नेहमी चित्र काढताना पाहून.. खूप शिकायला मिळत होतं .. हलक्या हाताने पेन्सिलने चित्र काढणं , कलर मिक्सिंग , चित्राला आऊटलाईन करणं, ब्रश कुठला वापरणं, ब्रश कुठल्या चित्रासाठी , कुठल्या प्रकारच्या चित्रासाठी कुठला सिलेक्ट करणं , ब्रशचे केस चांगले का खराब कसं चेक करायचं .. अजून खूप काही शिकायला मिळालं … चित्र काढायची प्रॅक्टीस करणं मात्र सगळ्यात महत्वाचं .. हे पण कळालं … हळू हळू शिकतं गेलो .. आवडं पण लागली … विजय रावताळे कडे पण कधी - कधी जायचो , तो पण सुंदर चित्र काढायचा. आवडायचं मला तासं-तासं ह्या दोघांकडे बसायला.
ड्राईंगची प्रीइलिमेंटरी परीक्षेला सरांमुळेचं बसलो. तितकसं काही येत नव्हतं . पण पास झालो. मला “सी” ग्रेड मिळालेली. सरांनी भरपूर मेहनत घेतलेली.
मधेच १९८९ जुलै महिन्यात जांभुळपाड्याचा महापूर येऊन गेला. मी सहावीत होतो. सारं छिन्न विछिन्न झालेलं. शाळा वगैरे काहीसं पूर्ववत व्हायला वर्ष निघून गेलं.
आम्ही वह्राडला तर माळीसर टाटाच्या माळावर रहायला आलेले.
नंतर पुढे इलिमेंटरी परीक्षेला पण बसवलं सरांनी.त्यावेळी सरांच्या घरीच सर क्लासला बोलवायचे. तासंतास चित्र काढत बसायला मज्जा यायची. माझी तर तंद्रीच लागायची.
अभ्यास सोबत , क्रिकेट , चित्र काढणं आणि पुस्तकं वाचणं ह्या छंद लागलेला.इलिमेंटरी परीक्षा द्यायला आम्ही खोपोलीला जायचो . दोन-तीन दिवस पेपर होते . सर आमच्या सोबतचं असायचे. इलिमेंटरी परीक्षेत थोडी सुधारणा झालेली आणि “बी” ग्रेड मिळालेली.
चित्रकलेमधे करीअर वगैरे नाही . पण मला स्वत:ला आनंद मिळेल अशी चित्र काढतं राहीलो. छंद म्हणून चित्रकला जोपासली. सरांची आठवण नेहमीच राहीलं जो पर्यंत मी माझ्या चित्रकलेचा अेक विद्यार्थी म्हणून आणि छंद म्हणून जोपसना करत राहीन.
आठवी नंतर सरांशी नेहमी पेक्षा सहवास कमीच होत गेला . नववी आणि दहावीत अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रीत झालं.
दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर सगळ्या शिक्षकांना पेढे द्यायला गेलेलो. माळी सरांचा आनंद त्यावेळी गगनात मावेनासा झालेला. पठ्ठ्या कमावलसं असं म्हणतं पाठीवर थाप मारलेली.
आणि जवळ घेतलेलं. माझंही मनं भरून आलेलं आणि डोळे पाणवलेले.
दहावीला मी मेहनत घेतलेलीचं.
पण ….
अेखाद्या चलतापटासारखं सरांचे कष्ट , त्यांची मेहनत आणि कुठुंबाबद्दलचं समर्पण माझ्या डोळ्यांसमोर तरळलं.
अेक कष्टकरी कुटुंबातला कर्ता मुलगा चित्रकलेचं शिक्षणं घेऊन शिक्षक झाला. अमळनेरच्या अस्सल अैरणी भाषेचा खाशा बाज असलेला पण कणाचाही माज नसलेला ,शांत स्वभावाचा, मित्तभाषी, कुटुंबवत्सल व्यक्तिमहत्वाचा अेक शिक्षक जांभूळपाडा शाळेत शिक्षक म्हणून रूजू झालेला . आपल्या सोबत आपली लहान सात भावंड , तीन भाऊ आणि चार बहीणी-ह्याचं बालपणं, शिक्षणं आणि नंतर लगनापर्यंतची सारी सारी जबाबदारी मनापासून निभावत गेला. प्रत्येक पावलोंपावली त्यांच्या धर्मपत्नी माळी मॅडम ह्यांची मोलाची साथ त्यांना लाभलीचं.आपल्या प्रत्येक भावंडाच्या आयुष्यालाअेक स्वतंत्र दिशा त्यांनी दाखवली , स्वत: खस्ता खात त्यांची आयुष्य सुखकर बनवली.
स्वत: सोबत आपल्या कुटुंबाला गराबीतून समृध्दीची वाट दाखवणारं.
शांत स्वभावाचं हे व्यक्तीमहत्व म्हणजे
हिम्मत पुंडलिक माळी….
नावा प्रमाणेच .. खरा ..
अेक हिंम्मतवाला…
शतश: प्रणाम ..
सर , गुरूपौर्णिमेच्या मनस्वी शुभेच्छा
तुम्ही जीथे कुठे असाल तिथून नक्कीच मला पहात असाल आणि तुमचे शुभाशिर्वाद माझ्या पाठीशी असतीलच
