Vandana Gavane

Inspirational

4.8  

Vandana Gavane

Inspirational

गोष्ट गुलमोहराची...

गोष्ट गुलमोहराची...

4 mins
567


आज साने सरांच्या चेहऱ्यावर भरभरून आनंद दिसत होता. अगदी शांत चेहरा पण आनंद लपत नव्हता. स्वतःच स्वतःवर खूप खुश होते ते. आज दहावीचा निकाल लागला होता ना! खूप कष्ट घेऊन मुलांना शिकवले होते त्यांनी, सरांना जसा हवा होता तसाच निकाल लागला होता. जणू काही तेच परिक्षा पास झाले होते. “गुलमोहर” बंगल्याच्या अंगणात आरामखुर्ची टाकून शांत बसलेले सर स्वतःशीच जणू गप्पा मारत होते, मधेच मान डोलावून आनंद, समाधान अनुभवत होते. एव्हाना सर्व मुले सरांना भेटून कौतुकोत्सव साजरा करून गेली होती. 

मीही साने सरांकडूनच शिकलो. गेली ५० वर्षे सर शिकवीत होते, आता थोडे थकले होते. वय वर्षे ७५ पूर्ण होत होते त्यांना. आजूबाजूची वस्ती साधारण मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबाची होती. मुलांना अशा सरांची गरज होती, आणि ती गरज सरांकडून पूर्ण होत होती. सर सेवानिवृत्त झाले. शाळा सुटली पण मुलांना शिकवणे सुटले नाही. विद्यार्थी, पालक, पेढे, फुले, आणि टाळ्या असा कौतुकोत्सव दरवर्षी साजरा होत असे. अधूनमधून आम्ही मुले सरांना भेटायला येतो. आज मीही सरांच्या अंगणात एका बाजूला उभा राहून हा सोहळा अनुभवत होतो.


त्यांच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता माझ्या मनातील आठवणींचे कप्पे हळू हळू उलघडत गेले. सरांचा हा 'गुलमोहर' बंगला म्हणजे आमची हक्काची जागा होती. होती काय अजूनही आहे. बंगल्यात, अंगणात, आजूबाजूला मुले अभ्यास करत असत. मुलांच्या प्रश्नांना , मुलांच्या हाकेला 'ओ' देणारे सर सतत हजर असत. गणित आणि विज्ञान या विषयात त्यांचा हातखंडा होता. गणितामधील आकडे आणि विज्ञानातील शास्त्रे यांची सांगड त्यांनी आमच्या मनात सहजच रुजवले, या कौशल्यामुळे हे विषय आम्हाला कधी कंटाळवाणे वाटलेच नाहीत. अभ्यास, खेळ, गप्पा सर्व इथेच. शाळेतून घरी आल्यावर जेवण करायचे व गुलमोहर गाठायचे. संपूर्ण दिवस छान जायचा. त्यामुळे नको त्या वाईट सवयी कधी लागल्याच नाही. तो बंगला म्हणजे आमचे विश्वच बनले होते. व्यक्तिमत्वाला पैलू पडले ते इथेच!


हळूहळू मी पुढे चालत गेलो. नेहमीप्रमाणे बंगल्याभोवती फेरफटका मारत होतो. सरांचे लहान भाऊ शंतनूकाका, वय वर्षे ७० ते ७२ असावे. ते समोरून येताना दिसले. मला पाहताच त्यांनी हसत हसत त्या झाडाकडे बोट दाखविले. एका अपघातात त्यांच्या डोक्याला इजा झाल्याने शारीरिक हालचाली थोड्या वेगळ्या होत्या. 'बघ, तू ह्याच झाडाखाली अभ्यास करीत होतास. हो ना?’ मीही मान डोलावली. बंगल्यामागच्या ज्या गुलमोहराखाली आम्ही अभ्यास करायचो, तो गुलमोहर आजही तसाच फुललेला होता. हिरव्यागार पानांमधून डोकावणारी लालभडक फुले आणि त्याची गच्च सावली आजही मन शांत व प्रसन्न करत होती.


वर्षानुवर्षे मुलांच्या प्रयत्नांना त्याचाही हातभार लागला होता. कित्येक मुलांनी या गुलमोहराखाली अभ्यास केला होता. जवळ जाऊन मी त्याला कवटाळले आणि पुन्हा बालपण आल्यासारखे वाटले. खरंच रे गुलमोहरा, आता तुझेही वय झाले पण तू ही मनाने थकला नाहीस, अगदी सरांसारखाच! ओळखलस ना मला? तुझ्याच छायेखाली बसून अभ्यास केला. परोपकाराची भावना सरांप्रमाणे तुझ्यातही तितकीच आहे. एक दीर्घ श्वास घेतला. आजूबाजूला नजर गेली. जवळच पाण्याचा नळ दिसला. सरांनी मुलांसाठीच तो बसवून घेतला होता. पाणी प्यायलो, जसे लहानपणी हाताची ओंजळ करून प्यायचो ना अगदी तसेच... पुढे गेलो सरांच्या खोलीची खिडकी दिसली, याच खिडकीतून पेटीचे स्वर कानावर पडायचे. काकू म्हणजे सरांच्या सौ. पेटीचा सराव करायच्या. गीतरामायण, भावगीते, भक्तिगीते, कानावर पडायची. थोडा थांबलोच, वाटले पेटीचे स्वर आता ऐकू येतील, पण त्याच खिडकीतून आवाज आला, 'अरे कृष्णा, ये आत... काकू बोलावत होत्या. 'हो, येतो ' म्हणालो आणि पुढे निघालो.


मी घरात गेलो, सरांची बहीण अनुताई दिसल्या. आरामखुर्चीत बसून संस्कृत श्लोक म्हणत होत्या, त्या मुलांना संस्कृत शिकवीत असत. थोड्या कडक स्वभावाच्या पण प्रेमळ ही तितक्याच. काकू आल्या ते चहा घेऊनच. सर आले सर्वांनी चहा घेतला. सरांना नमस्कार करून मीही सरांशी गप्पा मारल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आता सर बोलत होते आणि आम्ही सर्वजण ऐकत होतो.' आता शरीर थकल्यासारखे वाटते, थकवा येतो. पण मुलांना शिकवताना मन पुन्हा ताजे, टवटवीत होते, पुन्हा उत्साह यतो. कितीही थकलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत पुस्तके आणि मुले यांना जोडलेला असेन...' पण आता याचबरोबर मला शंतनूकाका, अनुताई, आणि काकू यांची काळजी घ्यायची आहे. थोडी शरीराला विश्रांतीही द्यायची आहे. काकूंची पेटी ऐकायची आहे, शंतनूबरोबर गप्पा मारायच्या आहेत. अनुताईंचे संस्कृत श्लोक ऐकायचे आहेत. बंगल्यामागील गुलमोहराच्या सावलीखाली बसून विसावा घ्यायचा आहे. अभ्यासासाठी बसलेल्या सर्व मुलांना कडक उन्हाची साधी झळ ही लागू न देणाऱ्या त्या गुलमोहराचे कौतुक करावे, त्याचे आभार मानावे असे वाटते आहे’.


व्वा. खरेच किती छान विचार होते सरांचे. अजूनही इतरांचा विचार करणारे, इतरांच्या सुखातच आपले सुख शोधणारे, नाही, इतरांच्या सुखालाच स्वतःचे सुख मानणारे माझे सर, म्हणजे माझा गुलमोहरच आहे असे वाटले. आजही ते मला आयुष्याचा धडा शिकवून गेले होते. आता हा माझा गुलमोहर मनाने नाही तर शरीराने थकला होता, आता त्याला आनंद देण्याची वेळ आली आहे, आता आपली वेळ आली आहे त्याच्यासाठी गुलमोहर बनण्याची!


एक दिवस सरांच्या बंगल्यात आम्ही सुरांची आणि आम्हा साऱ्यांची मैफल जमवली. बरेच विद्यार्थी, सर, काकू, अनुताई, शंतनूकाका सारे एकत्र आले. काकू छान नटून आल्या आणि पेटीपुढे बसल्या. अनुताईंनी सरस्वती श्लोकांनी सुरुवात केली. l ॐ सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी ! अजूनही स्पष्ट उच्चार, स्पष्ट आवाज कानांना सुखावत होता. जणू अनुताई एकेका श्लोकाने सरस्वतीची मूर्ती सजवीत होत्या, सुरुवात तर छान झाली. आता काकूंचा हात पेटीकडे गेला आणि अभंग सुरु झाला, पेटीचे सप्तसूर सप्तरंगांची उधळण करू लागले, वातावरण रंगून गेले. टाळ्यांचा आवाज ऐकताच काकूंना गहिवरून आले. शेवटी काकूंनी 'अजि सोनियाचा दिनु' अभंगाने शेवट केला. सरांचा चेहरा काकूंचे कौतुक करत होता. काकूंना आता आनंदाश्रू आवरेनात, पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि काकू शांत झाल्या. शेवटी सरांनी चार ओळींचे मार्गदर्शन केले, आम्हा मुलांचे भरभरून कौतुक केले. असे छोटेछोटे क्षण आपल्याला आयुष्यात खूप आनंद आणि ऐश्वर्य देऊन जातात, फक्त आपल्याला ते वेचता आले पाहिजेत.


आज आमचे सर, आमचा गुलमोहर भरभरून आशिर्वाद देत होता... पुन्हा परत येण्यासाठी आम्ही सरांचा निरोप घेतला. आणखी काय हवे होते माझ्या गुलमोहराला ज्याने अनेक गुलमोहर तयार केले...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational