एक सूर्यस्वप्न..!
एक सूर्यस्वप्न..!
जाग्रत ज्योती जेव्हा सूर्यस्वप्न पाहाते..! (सत्यकथा - वास्तव कथा)
ही कथा नाही; संघर्षगाथा आहे ,मातीतून उगवणार्या एका रत्नावलीची , रत्नांच्या खाणीची...! वाचाल तर स्तंभित व्हाल, दु:खी व्हाल ; आश्चर्यसुध्दा कराल अन् कौतुकाची माला सुध्दा या संघर्षपात्राला खुशालपणे घालाल.
गर्वही वाटेल तुम्हाला; कदाचित सहानुभूती सुध्दा किवा तुम्हीच स्वत: प्रकाशमान व्हाल या अंधारातून तळपलेल्या धगधगत्या ज्वाळेची संघर्षयात्रा ऐकून.
तिला कुणाची सहानुभूती नको आहे ...
आता नको आहेत तिला आधाराचे हात कारण ऊर्जेची अक्षय झेप तिने तिने घेतली आहे, प्रयत्नांवर ती स्वार आहे, आशेवर नियंत्रण ठेवून जबाबदारीचे भान सुद्धा जपले आहे तिने.
या पोरीचं नाव होतं राणी. आणि तिची ही संघर्षकथा..!
मी म्हणालो की तिचं नाव “होतं ” होतं यासाठी म्हणालो म्हणालो कि ती आता राणी राहिली नाही ती आज सूर्यस्वप्नजा आहे . एका सूर्यस्वप्नाला जन्म देणारी .
तर ऐका तिची कहाणी , एका चांगल्या आमदनीतील व लोकवस्ती मोठी असलेल्या गावातलं भटक्या समाजातलं गरीब घर .रामजी तुकाराम धनगर असं कर्त्या पुरुषाचं नाव. घरात तुकाराम व त्याची म्हातारी पत्नी गयाबाई .रामजी आणि निर्मला हे नवविवाहीत जोडपे. रामजीची एक लग्नाची बहीण पण होती तिचं नाव शारदा. तुकारामचं आयुष्य बकऱ्या चारण्यापासून ते थोडीफार शेतीवर गुजराण करण्यात गेलं .त्यावर आयुष्याची त्याने मात केली .आयुष्य पुरताना अखेरीस म्हातारपणात भावाच्या वादामुळे गाव सोडावं लागलं ,शेती मातीमोल भावात विकावी लागली आणि स्वाभिमान न विकता तुकारामने रामजी वर पुढील सगळ्या संसाराची धुरा सोपवून सर्वांनी गाव सोडला, स्थलांतर केलं .गांजाची लागलेली सवय अन् देवीचा गोंधळी म्हणून गाजलेला तुकाराम उरलेल्या आयुष्यात मेंदूवर परिणाम झाल्याचं निमित्त पाठीमागे ठेवून देवाघरी गेला .गांजा ने चांगलंच गाजलं होतं. आता रामजीवर आणि निर्मलावर जबाबदारी पडली .बहिणीचं लग्न केलं .रामजी सुद्धा संघर्षाच्या उंबरठ्यावर होता .मामाची नावडती पोर रामजीने महिनाभरात नाकारून काडीमोड केला आणि घरात निर्मला आली . तुकारामचे गांजाचे व्यसन ,गोंधळावर जगण्याची परिस्थिती, बकऱ्या चारण्यात बाकी आयुष्य गेलं. या साऱ्या आयुष्याच्या खेळात सामाजिक शहाणपण नसताना जेमतेम चौथीपर्यंत रामजी शिकलेला माणूस...
रोजंदारीने सुरूवात केली. पडेल ते काम १ ते २ रुपया रोजंदारीने रामजीने करावं आणि म्हातारीने शेळया चाराव्यात. अशा दिनक्रमात रामजीने जमेल तसा आठवडी बाजारात मसाला विक्रीचा धंदा सुरू केला. उद्योग सुरू झाला आणि धनगरांच्या घरात एका लक्ष्मीने पाळणा हलवला. रामजी निर्मलेला मुलगी झाली. मृगाच्या भर पावसात निर्मला बाळंतीण होऊन रामजीच्या घरात पोरीने पाळणा केला.
नाव ठेवलं राणी...!
याच राणीची ही संघर्षकथा आहे, प्रिय वाचक हो..!
१९९२ मधील तिचा पावसाळ्यातला जन्म. नेहमीप्रमाणे सामाजिक असमानतेतून मुलगी झाली म्हणून वाट्याला सन्मानाचं आणि कौतुकाचं जिणं आलं नाही.
रामजीची परिस्थिती मात्र सुधारण्याचं काही मनावर घेत नव्हती. राणी जन्मली तेव्हा सुध्दा एकावेळच्या जेवणाची वानवा असायची घरात. परिस्थितीला कंटाळून निर्मला काही दिवस पोरीसोबत माहेरी राहिली.
गयाबाई शेळ्या चारवणे व पिढीजात धनगरीवर मरमरत राहिली. ती तिचा दिनक्रम करत राहायची..!
हळुहळु रामजीने काही जमवाजमव करून किराणा दुकान थाटलं. परंतू उधारीत ते दुकान बसलं ते बसलंच. पुन्हा उठलंच नाही. शेवटी एक अग्नीसंघर्ष सुरू झाला. दुसर्या गावात विटभट्टीवर रामजी आणि निर्मला मजूरी करून राहू लागले. म्हातारी आणि राणी गावात राहायच्या. राणी शाळेत जायला लागली तोवर दुसर्या दोन मुली जन्माला आल्या..!
राजश्री आणि राधिका..!
दीडदोन वर्षाच्या फरकानेच निर्मला पोटाशी राहत होती. पोरगं होण्याची आस अन् त्यातच चौथ्यांदा गरोदर...!
चौथीसुध्दा मुलगीच. तिचं नाव भारती ठेवलं.
राणी मात्र पहिल्या वर्गातूनच चुणूक दाखवत होती. हालाखीत असतानाही पोरीने आपल्या हुशारीने सर्व शिक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
सुंदर अक्षर, शिकवलेलं लवकर ग्रहण करण्याची क्षमता, तशातच उत्तम जिज्ञासा आणि नियमितपणे शाळेत जाण्याची ओढ यामुळे राणीने प्राथमिक शिक्षणात शाळेत नाव केलं.
पोरगी शिकायला गुणी आहे हे कौतुक रामजीच्या डोक्यात ठाम होतं. या आशेत तो आता स्वत:ला मुलगा नसल्याचं सल हळूहळू विसरत चालला होता. यामुळे पोरींच्या शिक्षणाचा विचार करून निर्मला व रामजीने आपल्या गावाजवळच स्वत:ची वीटभट्टी टाकली. गावात रामजीने घरही बांधलं. पोरी भट्टीवर कधी कधी कामाला जात असत. राणी सुध्दा जायची. विटभट्टीत नेहमी सापविंचू लपतात म्हणून रामजी निर्मला पोरींना फारसं कामाला बोलावत नसतं. कष्टाच्या सगळ्या तयारीने निर्मलेने अर्धांगीकर्तव्याने आखून संसार बहरवला.
पण सल मात्र पाठ सोडत नव्हतं मुलगा नाही. कुठंतरी मोठं काहीतरी कमी आहे असं सारखं वाटायचं अाणि ते राग , असूया आणि स्वत:च्या स्वभावावरंच विद्रोह करण्यापर्यंत जायचं कधीकधी.. आता भरीत मोठी भर म्हणून निर्मला पाचव्यांदा गर्भवती होऊन तिने पाचव्या मुलीलाच जन्म दिला. पाचवी मुलगीच झाली ह्या धक्क्याने ती बाळंतपणात चक्क बेशुध्दच पडली. २००५ सालची ही घटना... म्हणजे अगदी पंधरा वर्षांपूर्वीची तरीही अजून या लिंगभेदाचा पडदा किती आहे समाजावर याचं भान आपल्यालाही कळायला हवं आणि आतातरी या मानसिकतेतून समाज बाहेर पडायला हवा. निर्मलेने पाचवी मुलगी झाली म्हणून तब्बल तीन महिने तिचं तोंड पाहिलं नाही. दरम्यानच्या काळात राणीनेच तिची सगळी सुश्रुषा केली. सोबत म्हातारी होती पण ती थकल्यामुळे राणीवर मोठी जबाबदारी होती. राणीने त्या बाळाला स्वत:च्या तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. निर्मला मुलीकडं पाठ करून झोपायची बाळंतपणात. रात्रीबेरात्री लेकरू रडायचं आणि राणीने कापसाच्या बोळ्याने लेकराला दूध पाजवायचं. निर्मलेने केलेलं दुर्लक्ष राणीला काळजाला पोचत होतं म्हणून तिच तिची आई झाली.
काय विदीर्ण स्थिती होती..! राणीनं हे सोसलं अन् पोसलंही. राजश्री राधिका तिच्या बरोबरीने कामाला हातभार लावत होत्या. वर्गातही राजश्री राधिका हुशार होत्या.
पाचवी पोर हळूहळू मोठी होत होती. तिचं नाव कल्याणी ठेवलं. दुसर्याच्या मुहूर्तावर जन्मलेली ती दुर्गाच नसेल कशावरून....!
राणी, राजश्री, राधिका , भारती अाणि कल्याणी अशा पाच कन्या. बापाला कन्या उजवायची सारखी चिंता. पोरींची लग्न करून संसार थाटून पितृऋणातून मुक्त होण्याचीच सदैव रामजीची धडपड आजही चालू आहे.
याचा मोठा भार राणीने उर्जेने उचलला. राणीने शाळेच्या पुस्तकातून संयम शिकला. एखादी संघर्षाची कहानीसुध्दा तिच्या मनात घर करून बसली असेल प्रेरणा देत सदैव. हळूहळू गावातील बसस्टॉप जवळ चहाचे व नाश्त्याचे टपरीवजा लहानसे हॉटेल टाकण्याचं रामजीनं ठरवलं. वीटभट्टी बंद करून चहाचं हॉटेल टाकलं. रामजीने व्यवसाय सुरू केला. मदतीला राणीचा आधार होता. राणी दररोज सकाळी शाळेत जाण्याआधी बाबांच्या हॉटेलात टेबल साफ करायची. शेणसडा करायची. झाडझूड करून लगोलग शाळेत जायची. तेव्हा ती १२ते १३ वर्षांची असेल जेमतेम. फार समजूत येण्याचं वय नव्हतं परंतू परिस्थितीने तिला तिच्या वयावर मात करून विचारांना प्रगल्भतेकडे घेऊन जाण्याचं शिकवलं असेल कदाचित.
शाळेत त्याच अवस्थेत जाणं, परत दुपारी हॉटेलात येणं चहा नाश्ता देणं , न लाजता लगबगीने काम करणं हा तिचा दिनक्रम. राणी आता ७ वीत होती. दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांक मिळवत होती. एरवी तिला फार मान न देणार्या मुली आता तिच्या अवतीभवती असायच्या ती शाळेत सर्वपरिचित चेहरा बणत होती. तिचं चैतन्य हेरून तिला सर्व सुविधा वेळेवर मिळवून देण्यासाठी सर प्रयत्न करायचे.
मुलीसोबत खेळायचं नाही, मनमुराद बागडायचं नाही. कारण वेळ नव्हता. कामं पडली होती. बापाचं हे लाडकं पोर होतं. जणू रामजीला वाटत असेल की, मुलगाच माझ्या हाताला आला. भातुकलीचं स्वप्नसुध्दा या संघर्षकन्येला पडलं नसेल हो..! कारण तिच्याकडे वेळ नव्हता. वाट्याला येईल ते जिद्दीनं मला करायचंच आहे हे तिला मात्र उमगलं होतं. मनात मात्र धगधगती जिज्ञासा होती शिक्षणाची. परिस्थितीला भेदून तिला सूर्यस्वप्न पाहायचं होतं कदाचित...!
असंच एका दिवशी दुपारी हॉटेलची जबाबदारी राणीवर टाकून रामजी बाहेर गेले होते. चहा देणं, खिचडी भजे पुरवणं पैसे घेणं यात तिचा संध्याकाळपर्यंतचा दिवस सरला. पण संध्याकाळ लोटून गेली तरीही बाबा परतले नाहीत म्हणून चिंता लागली. आठ वाजले, नऊ वाजले..
नऊनंतर हॉटेलसमोर एक कार थांबली. घाबरलेल्या अवस्थेत, थकलेल्या सुरात रामजीनं पोरीला हाक मारली. तेवढ्यात त्या गाडीवानानंच सांगितलं बाबांचा अपघात झाला म्हणून.. अंगात सगळीकडे काटे रुतले होते ; हातापायातून रक्त टिपत होतं. राणीनं सावरून दुसरी एकदोन माणसे गोळा करून त्याच गाडीत बाबांना हॉस्पिटलात घेऊन जाण्याची विनंती केली. दोन दिवसांनी आपल्या माणसांसोबत बाबा परतले परंतू पंधरा दिवसांचा पूर्ण आराम होता. त्या पंधरा दिवसात बाबांची काठीच बणली होती राणी जणू...!
राजश्री राधिका आता बर्यापैकी लहान सहान कामे करत होत्या. पंधरा दिवस राणीने हॉटेल चालवलं. वय वर्षे तेरा केवळ..!
तेरा वर्षाच्या पोरीने हॉटेलात काम करावं, लोकांच्या सगळ्या नजरा तिच्यावर पडायच्या तरीही तिला वेळ नव्हता त्याकडे लक्ष देण्यास. दु:ख करायलाही वेळ नव्हता. शिक्षणाची जिद्द होती, पुस्तकातलं बळ होतं अन् होतं बरंच काही चैतन्य...!
इतर चारही मुली वाढत होत्या. बापाचं काळीज नेहमी पोरींना उजवण्याच्या चिंतेने आतून चिंतातुर असायचं. आणि मुली अभ्यासात उत्तम प्रगतीकडे वाटचाल करत आहेत याचा गर्वही वाटत होता. पण सुर्यतेज अजून तळपण्याची वाट पाहत होतं. राणीच्या कर्तृत्वाचा प्रकाश अजून दीपला नव्हता. राणी, राजश्री, राधिका, भारती आणि कल्याणी पाच कन्येचा संसार..!
आजी थकली होती . भाऊ नसल्याचं दु:ख सर्व पोरींना भेडसावत होतं, पण आता आशा संपुष्टात गेल्या होत्या. रामजीने पाळणा थांबवला होता. हळूहळू राजश्री आणि राधिकाने रामजीला जमेल तेवढी मदत केली. सर्व मुलींना उद्योगी बणवण्याचं बापकर्तव्य रामजीने कसून निभावलं.निर्मला आता सर्व मुलीत रमली होती. ज्या पाचव्या पोरीकडे ती टाकून पाहत होती तीच पोर आईशिवाय राहत नव्हती अन् आई तिच्याशिवाय..!
राणी आता ९ वीत गेली होती. कुमारावस्थेतील बदलाने तिला विविध नजरांचा सामना करून संघर्ष करावा लागला. दहावीचं वर्ष तिच्या कुमारावस्थेच्या दोलायमान स्थितीतून गेलं पण तिने हार न मानता विकृत नजरांकडे दुर्लक्ष करून दहावीत ७७ टक्के गुण मिळवून ती शाळेत दुसर्या क्रमांकाने पास झाली. संघर्षाचं हे पहिलं मधुर फळ.
या राणीच्या यशाने रामजी, निर्मला आणि म्हातारी सकट पूर्ण परिवार आनंदात होता. वर्ष २००८ ला तिने दहावीचं एक शिखर पादाक्रांत केलं. थकल्याचा कसलाही आविर्भाव नव्हता... चढण्याचं , पुढं जाण्याचं बळ मात्र तसूभरही कमी झालं नव्हतं पोरीचं.
तिची स्वप्नं सतर्क होती. ती धीर आहे ; गंभीर आहे. संयमाचं बळ तिच्या तरल डोळ्यांत नेहमी दिसतं.
११ वी नंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिला गाव सोडावा लागला पण समाजबंधनं आणि विकृत नजरांनी रामजीची कानं भरल्यामुळे तिचं शिक्षण थांबलं. पण मनात जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. सर्वांचा राग आता राणीच्या मनात ठसठसत होता. शिकायचंच या जिद्दीमुळे पोरीने फार मोठा विद्रोह केला. समाजबंधनांविरुध्द... कौटुंबिक बंधनांविरुध्द आणि परिस्थिती विरुध्द..!
बंद पडलेलं विज्ञान शाखेचं ११ वीचं शिक्षण पूर्ण करता यावं म्हणून पोरीने २००८ मध्ये चक्क पोलिसस्टेशन गाठून परिस्थिती सांगितली. राणीने विद्रोह केला होता, सर्व अशुभाविरुध्द, अज्ञानी हट्टाविरुध्द..! खरंतर हा विद्रोह स्वर्णकांतीसमान होता. निद्रिस्त ज्वालामुखी पर्वतातून उफाळून बाहेर यावा अन् पर्वतालाच चटके बसावेत तसंच काहीसं झालं असावं. परंतू या शांत ज्वालारसातून उद्याची माणकं प्रकाशमान होणार आहेत पैलूंसह याची कुणाला तमा नसावी.
सर्व परिवाराच्या विरोधात राणीने तक्रारवजा भाष्य करून स्वत:ची तळमळ सांगितली. एका भल्या पोलिसाने थेट तिला अमरावती बालसुधारग्रहात ठेवण्याचा निर्णय घेतला.
कोंबडं झाकलं म्हणून कुठं तांबडं फुटायचं राहतंय का..?
त्या भल्या पोलिसाला पोर अजाण व नासमज वाटली असेल. तिच्या हृदयातला जिद्दीचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोचणार कसा.
या बालसुधारग्रहात शिक्षण होणार नाही हे तिला चार पाच दिवसांतच समजलं. तुरूंगापेक्षा वेगळं तिथे काहीच नव्हतं. १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत बाहेर पडायचं नाही अशी शिस्त. तिची घुसमट होत होती. मार्ग सापडत नव्हता. दररोज रडायची. शेवटी तेथील महिला प्रमुखाला तिची व्यथा कळून आली. पोरीची इथे प्रगती होणार नाही हे तिने ओळखून नियमबाह्य कागदं जमवून परवानग्या मिळवून राणीला एका मोठ्या शहरातील समाजकल्याण अनाथाश्रमात ट्रान्सफर केलं. वय वर्षे १७ ...!
याच अनाथाश्रमातून तिने एका मार्गदर्शकाच्या मदतीने शासकीय कोट्यातून १० वीच्या बेसवर ITI (DIPLOMA IN ARCHITECTURE) ला प्रवेश मिळवून घेतला व तिचा मार्ग मोकळा झाला. दहावीत ७७ टक्के मार्क असल्यामुळे सहज प्रवेश मिळाला. सकाळी १० ते ५ कॉलेज. तीन ते चार किलोमीटर पायी जायचं. त्या आधी त्या अनाथाश्रमात दररोज वाट्याला आलेलं एक काम करायचं. कधी झाडझुड कधी स्वयंपाक तर कधी भांडी घासणं वगैरे...! बाबांच्या हॉटेलात राहून ही कामं तिच्या अंगवळणी पडली होती. ती सक्षम होती.
अनाथाश्रमात फावल्या वेळेत ती शिवणकाम शिकली.
घरची आठवण यायची पण घरी जाता येत नव्हतं. कारण घरी सन्मान वाट्याला नव्हता. विद्रोहाचं सल परिवाराला होतंच. तरीही ती डगमगली नाही.
शिवणकामातून तिथे तिला ३०० ते ४०० रुपये मिळायचे महिन्याला त्यावर तिचा बाहेरचा थोडाफार खर्च व्हायचा. पुस्तके पेन साहित्य खरेदी करता यायची. एकटं वाटायचं तिथे. १८ वर्षे पूर्ण न झाल्यामुळे अनाथाश्रम सोडता येत नव्हता. घरच्यांना भेटता येत नव्हते. एकट्यातच रडायचं नि आपणच डोळे पुसून पुढच्या कामाला लागायचं.
जिंकलं होतं तिने अर्ध युध्द...! गाठला होता शिखरमाथा ..! आता लवकरंच ती प्रकाशमान होणार होती. वयाची १८ वर्षे पूर्ण झाली. वयाचं बंधन असल्यामुळे १८ वर्षांवरची मुलं अनाथाश्रमात ठेवता येत नाहीत.
ती मुक्त झाली बाहेर राहण्यासाठी. बाहेरचं जग पाहण्यासाठी तिला बंधनांची दारं नव्हती पण आव्हानांची यादी पुढे होती. राहायचं कुठे, खायचं काय..? कमवायचं कसं..?
आर्किटेक्चर डिझायनर डिप्लोमा पदवी चांगल्या मार्काने मिळवली होती. अनुभव नव्हता. काम नव्हते. मैत्रिण जमवून ३०० रुपये भाड्याची एक खोली करून राहण्यास सुरूवात केली. १५० रुपये वाट्याचे द्यायचे कसे या प्रश्नाने व गरजेमुळे जॉबची भटकंती सुरू झाली. आठवडाभराच्या अपयशी प्रयत्नांनंतर तिला २५०० महिना पगारीचं काम मिळालं. किती तो संघर्ष...! मदतीस कुणीच नाही. सारे निर्णय एकट्याचे. कुणाची कौतुकाची थाप नाही की कुणाचा मार्गदर्शनाचा शब्द नाही. आपलाच मार्ग राणीने आपणच प्रकाशमान केला. जॉब झाला असेल पंधरा वीस दिवस त्यातच एक नित्याचं संकट आलं. तिचं तारुण्यावस्थेकडे वळलेलं जीवन तिच्याकडे विक्षिप्त नजरेनं पाहत होतं. ऑफिसातील बॉस म्हणवणार्याने तिच्यावर हात टाकला. वेळेनंतर तिला आग्रहाने फाईल आणण्याच्या निमित्ताने बोलावून विक्षिप्त स्पर्ष करण्याचा अपयशी प्रयत्न केला. फसला त्याचा हलकट प्रयत्न. राणीने स्वत:ला सावरून रूमवर धाव घेतली. रडत रडत मैत्रिणीला प्रसंग सांगितला. मैत्रिणीने धीर दिला. दुसरं काय देणार अन् दुसरं कोण देणार.
जॉब सोडला. महिना पूर्ण होण्याआधीच तिला कामावरून निघावं लागलं. तिने काम केलेल्या दिवसांचं वेतनही घेतलं नाही. आता विद्रोह करण्याचं बळ नसेल तिच्याकडे कदाचित म्हणून तिने तो प्रसंग कडू घोटाप्रमाणे गिळला. म्हणूनच की काय तिला आता कुणाची सहानुभूती नको असावी. फक्त आदराचा सन्मान हवा आहे. तिच्या स्वाभिमानाला पोसणारे शब्द हवेत. दीनपणाचं जीणं तिला जगायचं नाही. तिला अजूनही सूर्य गवसला नाही.
याच धडपडीत तिने दुसरं उत्तम काम मिळवलं. ३००० रुपये पगारीवर तिला जॉब मिळाला.
वाचकहो , तिने तब्बल अडीच वर्षांनी घर गाठलं. घरी तिला आता सन्मानाची उब मिळायला लागली. म्हातारी लकव्याने पडून होती. त्यातच ती गेली. त्यामुळे वर्षाच्या आत पोरीचं लग्न करावं लागतं या अर्धवट समाजप्रथेची ती शिकार झाली. तिच्या नियमाविरुध्द तिचं लग्न लागलं.
या मोठ्या संघर्षाच्या काळात चारित्र्य जपणं, समर्थपणे संस्कार सांभाळून शिक्षण पूर्ण करणं. बिकट परिस्थितीत स्वत:च्या पायावर उभं राहाणं हे तिचं थोडं थोडकं यश नाही. हे अद्भूत आहे. साहसी आहे. आता राणी घाईघाईत विवाहबध्द झाली परंतू तिच्या मनात अजून शिकण्याची जिद्द होती आणि त्यातच नवरा मनोविकारी निघाला त्यामुळे वीस पंचवीस दिवसात तिने भविष्य जाणून पुन्हा यशस्वी विद्रोह केला. ती फसवल्या गेली होती. पुढील काही दिवसात तो मुलगा परतीच्या प्रवासाला गेला ही..! तो नाही आता. तिला वैधव्याचं गालबोट लागलं नाही. तिने घटस्फोट घेतला.
तिला अजुन बरंच काही करायचं होतं. मागच्या पाठीवरच्या बहिणींचं शिक्षण करायचं होतं. त्या धेय्याने ती झपाटली होती. लग्नानंतर ती पुन्हा त्याच शहरात आली. तोच जॉब नव्याने पकडला.
२०११ ला तीने आर्किटेक्चर डिझायनर डिप्लोमा पूर्ण केला. घटस्फोटानंतर तिने Auto Cad , Tally ,Ms-Cit , Typing (English, marathi) , 3D Max, Photoshop, Scechup इत्यादी संगणक कोर्सेस कम्प्लिट केले.
ती उत्तम ब्यूटीशिअन सुध्दा आहे.
याच काळात तिने B. COM पूर्ण केलं.2019 मध्ये Interior designer पुर्ण केलं. ती आता सिव्हिल इंजिनीअर आहे.
या दिव्यासोबत तिने अजून शिवधनुष्य पेलण्याचं काम केलं आहे. राजश्री, राधिका, भारती आणि कल्याणी या चौघींनाही तिने शिक्षणात मदत करून पुढे आणलं. सोबत ठेवून बहिणींची शिक्षणं पुर्ण केली.
राजश्रीने B. Sc करून D. M. L. T मध्ये PG Diploma केला. ती आता मोठ्या नामांकित लॅबमध्ये टेक्निशिअन म्हनून सन्मानाने काम करते.
राधिकाने B.com, fashion designer, MSCIT, Tally,Typing (English Marathi) पूर्ण केलं.ती आज राज्यसेवा परीक्षेची पूर्वतयारी करते आहे.
भारतीने १२ वी पुर्ण केली. ती आता वैद्यकीय पुर्वपरिक्षेची कसून तयारी करते आहे.तिला जिद्दीने डॉक्टर व्हायचंय.
आणि कल्याणी आता दहावीत आहे. हुशारीने अभ्यास करते. एकपाठी आहे. ती सुध्दा यशस्वी होईल नक्कीच.
हे सगळं राणीने कुणाच्या पाठबळावर केलं,माहित नाही. पण तिचा हा लढा कुण्या सामान्य स्त्रीचा लढा नाही.
आता समृध्दपणे राणी सन्मानाने शहरात नोकरी करते आहे. समाजातील सर्व वाईट नजरांना पुरून उरते आहे. मर्यादेचं पालन करून ती सर्वांशी संयमाने संवाद करते. कुणाच्या प्रशंसेने हुरळून जात नाही.
एक बुध्दिमान व कष्टाळू आर्किटेक्चर डिझायनर आणि इंटेरियर इंजिनीअर म्हणून राणी नाव करते आहे. तिच्या सर्व वास्तूडिझाईन सुंदर आहेत. ती कष्ट करते खूप.
राजश्रीचं नि राधिकाचं लग्न जमलं आहे.
आता राणी तिच्या गावी कधी जाते तर तेव्हा टाकून पाहणारा समाज आज तिची एक झलक पाहण्यासाठी पुढे येतो. सन्मानाची लाखोळी तिच्यावर आणि रामजीवर पडते. रामजी आज बाप म्हणून निर्भय आहे. त्याला कसलीही चिंता नाही.
म्हातारी गयाबाई नाही पण तिच्या डोळ्यातलं न पाहिलेलंसुध्दा सुखस्वप्न साकार झाल्याचा आनंद त्या आत्म्याला मिळत असावा. तुकारामचा आत्मा ही शांत झाला असेल. पोरीनं नाव केलं म्हणून सारा धनगर समाज आज रामजीकडे आदराने पाहतो. कोरोना काळातील एक वर्ष राणीने सहज संघर्षाने घालंवलं.या काळातच रामजी आणि निर्मलाचा अपघात झाला होता. निर्मलेला डोक्याला मार होता. तिला अजून कधीकधी गोळ्या घ्याव्या लागतात.
आता सर्व धनगर परिवार सुखी आहे.
काय वाचक हो....? काय बोध घ्यावा आपण..?
केवळ जिद्द..! केवळ कर्मावर लक्ष्य..! केवळ लढणं..!
राणीकडून हाच काय तो बोध घ्यावा. सर्वांना प्रेरणेचं अखंड बळ देणारा राणीचा हा प्रवास दुर्दम्य आहे. तिची ही कहानी माझ्या सुध्दा जीवनाचं कोडं सोडवते. ती आज अत्यंत सन्मानाने वावरते आहे. दु:ख तिच्या वाट्याला आलं तरी ती आता डगमगणार नाही, कारण जेव्हा जाग्रत ज्योती सुर्यस्वप्न पाहाते तेव्हा प्रकाशमान दीप्त सुर्य हाती लागतो.
