धेय्यवेडी
धेय्यवेडी
आज इतक्या वर्षांनी आपल्या शाळेच्या प्रांगणात पाउल टाकताना प्रणिताचे मन भरून येत होते. ज्या शाळेच्या बाकावर बसून खूप खूप अभ्यास केला होता, मोठे ऑफिसर बनण्याची स्वप्ने पहिली होती, मैत्रिणींच्या सोबत गुजगोष्टी केल्या होत्या,खेळाच्या सामन्यांमध्ये खो खो ,कब्बड्डी खेळत असताना ज्या मैदानाच्या मातीची धूळ आपल्या वेण्याना लागली होती, मैत्रीणींबरोबर केलेल्या धम्माल गोष्टींच्या ज्या भिंती साक्षीदार होत्या, त्याच शाळेत ती आज जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणी म्हणून पाउल टाकत होती.गेट मधून आत आल्या आल्या ,नऊवारीसाडी नेसलेल्या नटून थटून आलेल्या चिमुकल्या मुलींनी तिचे औक्षण केले .मोठ्या मानाने तिला सगळ्यानी ऑफिस पर्यंत नेले.प्रिन्सिपल मॅडम च्या केबिन मध्ये तिला बसवण्यात आले,सगळ्या तिची सरबराई करत होत्या,ताई ताई हे घे पाणी म्हणून एक छोटी मुलगी तिला हाक मारत होती. त्या मुलीकडे बघून तिच्या समोर तिचा भूतकाळ उभा राहिला .
अगदी छोट्याशा खेडेगावात ती राहत होती.त्याच गावातील हायस्कूल मध्ये तिचे शिक्षण सुरु झाले.दिसायला नाकीडोळी उठावदार आणि अतिशय चुणचुणीत अशी प्रणिता अभ्यासात तर हुशार होतीच पण वक्तृत्वस्पर्धा,निबंध स्पर्धा ,खेळ यातही अव्वल होती.सगळेच चांगले चालू होते पण त्यांच्या त्रिकोणी कुटुंबाला दृष्टच लागली कुणाचीतरी आणि असे काही झाले की आईला म्हणजेच साधनाताईना प्रणिताला सोबत घेऊन ते घर सोडावे लागले.काय चाललंय हे काहीही न कळण्याच्या वयात प्रणिताला आणि तिच्या आईला तिच्या बाबांनी घर सोडावयास भाग पाडले.आता या छोट्या मुलीला घेऊन कुठे जायचं,काय करायचं या विचारांनी साधनाताई एकदम गळून गेल्या,डोळ्यासमोर गडद अंधार आणि अश्रूंचा समुद्र एकाच वेळी दाटून आलाआणि त्यांनी डोळे गच्च मिटून घेतले , आणि अचानक त्यांचे दोन्ही हात मायेने कुणीतरी पकडले ,त्या स्पर्शामध्ये मोठ्ठा आधार,प्रेम आणि मूक आश्वासन होते, त्यातला एक हात होता साधना ताईंचा लहान भाऊ ईश्वर आणि दुसरा हात होता त्याची पत्नी रश्मी यांचा.
आता या वेळेला दोघी मायलेकी प्रणीताच्याआजोळी राहायला आल्या. आजोळी तिचे आज्जी आजोबा आणि मामा मामीनी अगदी मनापासून त्यांना आपल्यात सामावून घेतले. खरतर साधना ताईंचा भाऊ ईश्वर आणि त्याची पत्नी रश्मी ही दोघेही त्यांच्या पेक्षा वयाने लहान होती पण आभाळा एवढा समंजसपणा या दोघांमध्ये भरलेला होता, अगदी देव माणसे होती म्हणाना. दोघांनीही साधनाताईना धीर दिला,ईश्वरच्याच ओळखीने साधना ताईंना काही दिवसातच अंगणवाडी मध्ये नोकरी लागली.लहान भावाने खूप मोठ्ठःहोऊन दोघींना पण आधार दिला होता. आता ईश्वरपेक्षा अधिक जबाबदारीने रश्मी प्रणीताचे करत होती. आपली शिक्षिकेची नोकरी सांभाळून सर्व जबाबदाऱ्या अगदी आनंदाने पार पडत होती .जणू काही स्वतःच्या दोन मुलांबरोबर आता तिला ही तिसरी मुलगी होती. प्रणीता सुद्धा सर्व छोट्या मोठ्या गोष्टी मामी ला शेअर करू लागली.आईपेक्षा तिला मामी अधिक जवळची वाटू लागली ,वयाच्या प्रत्येक टप्प्यावर रश्मीने तिला कधी आईच्या मायेने तर कधी मैत्रिणीच्या प्रेमाने समजून घेतले होते.वेळोवेळी प्रत्येक निर्णय घेण्यासाठी बारकाईने कसा विचार करायचा हे ती तिला शिकवत असे.अतिशय हुशार प्रणिता आपल्या मामी कडून सर्व ज्ञान आत्मसात करत करत मोठी झाली दहावीमध्ये शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.रश्मीच्या आणि ईश्वरच्या मार्गदर्शनाखाली प्रणीता बारावी सायन्सला सुद्धा उत्कृष्ट मार्काने पास झाली.पुन्हा रश्मीच्याच सल्ल्याने तिने गणित घेऊन त्यात बी.एस.सी. केले.
आता गावातील लोक काय म्हणतील या विचाराने साधना ताई प्रणीताच्या लग्नाचा विचार करू लागल्या .पण इथेही रश्मी मामी प्रणीताच्या पाठीशी उभी राहिली आणि तिला एम.एस.सी ला प्रवेश घेतला.एम.एस.सी करत असतानाच रश्मीने प्रणिताला एम.पी.एस.सी. ची तयारी करायला प्रवृत्त केले.हे बघ तू हुशार आहेस,शिक्षण घेऊन अधिकारी होऊ शकतेस तेव्हा प्रयत्न कर ,लग्न जमले तर आपण करूच पण शिक्षण सोडू नकोस ,असे वेळोवेळी रश्मी प्रणिताला उपदेशाचे डोस पाजत असे.असेच जिद्दीने प्रणीताने एम.एस.सी पूर्ण केले.एम.पी.एस.सी.ची प्री सुद्धा पास झाली ,आणि तिचे लग्न ठरले.तिला साजेसा अगदी हुशार,समंजस , शिकलेला, चांगल्या पगाराची नोकरी असलेला मुलगा होता तो,कुठेही नावं ठेवायला जागा नव्हती त्यामुळे अगदी सहज लग्न ठरले सुद्धा.ईश्वरला अगदी पोटच्या मुलीचे लग्न ठरल्यासारखा आनंद झाला होता आणि त्याच वेळी नकळत गळाही दाटून आलेला. साखरपुडा ,हळद,लग्न कुठेही उणीव काढायला जागा नव्हती असे या दोघांनी केले.प्रणीताचे पहिले सण,सासू सासऱ्यांचे सगळे मानपान ,सगळे सगळे कसे मनापासून करत होती रश्मी.पण त्याच वेळी अभ्यासाचा विसर पडू नये म्हणून परत परत प्रणिताला आठवण करून द्यायला तिने सुरुवात केली .आताशा लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले होते ,नव्याची नवलाई संपली होती .
पुन्हा प्रणीताने एम.पी.एस.सी चा अभ्यास चालू केला.प्रत्येक वेळेला प्री ,मेन्स पास व्हायची पण पुढे अडचण यायची कधी मेन्स मध्ये कमी मार्क पडायचेतर कधी मुलाखतीमध्ये कमी पडायची.संसारातील कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तिची तारांबळ उडत होती आणि अभ्यास कमी पडू लागला होता. यातच तिला बाळाची चाहूल लागली आणि ती अंतरबाह्य मोहरून गेली.आता डोहाळे आणि अभ्यास सोबतच चालू झाला. बाळंतपणासाठी घरी आलेली असताना साधनाताई ,रश्मी सर्वांनीच खूप उत्साहाने सगळे केले. दिवस भरताच एका गोंडस मुलाला तिने जन्म दिला.बाळाचे करता करता दिवस कुठे उगवायचा आणि कुठे मावळायचा हेही कळत नसे.साधनाताई ,ईश्वर,रश्मी,सतत सतत बाळाच्या ओढीने तिच्या सासरी जाऊन तिला भेटू लागले. आता पुन्हा एकदा तिची आणि अभ्यासाची गट्टी जमली.आता बाळाचे करत असतानाच जाणीवपूर्वक स्वतःच्या अभ्यासाकडे ती जास्त लक्ष देवू लागली .यावेळी पती, सासू सासरे या सर्वांनीच तिला खूप सपोर्ट केला आणि यावेळी मात्र प्रणीताची क्लास २ अधिकारी म्हणून आयकर खात्यात नेमणूक झाली.आज जग जिंकल्याचा आनंद तिला झाला होता.मोठ्या जिद्दीने आणि प्रचंड मेहनतीने तिने हे यश तिच्याकडे खेचून आणले होते.सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव तिच्यावर होऊ लागला. ईश्वर आणि रश्मीच्या आनंदाला तर पारावार उरला नाही.
ताई ताई हे घे पाणी म्हणून तीच छोटी मुलगी तिला हाक मारत होती.आणि एकदम भूतकाळातल्या विचारातून प्रणिता बाहेर आली .तिने एक गोड स्माईल देत त्या छोट्या मुलीच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला.सर्व गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रमामध्ये तिने खूप सुंदर प्रेरणादायी भाषण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.विद्यार्थिनी तर तिच्या फॅनच झाल्या होत्या .
खरच,विंदा करंदीकरांची कविता ती खरोखरच जगली होती जसे,
“असे दांडगी इच्छा ज्याची,मार्ग तयाला मिळती सत्तर ,
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर,
संकाटासही ठणकावून सांगावे,आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर”.
@प्रतिभाराईटस
सौ प्रतिभा राजेंद्र चव्हाण
