Ashok Doiphode

Inspirational

3.0  

Ashok Doiphode

Inspirational

द लिजेंड - अॅलिस्टर कुक

द लिजेंड - अॅलिस्टर कुक

7 mins
619


 इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी अॅलिस्टर कुक याला 'सर' हा किताब देऊन त्याचा सन्मान केला आहे. 2007 नंतर अशा प्रकारचा किताब मिळवणारा तो पहिलाच क्रिकेटपटू आहे.मुख्य प्रवाहाचा नायक असूनही प्रवाहापासून अलिप्त राहून काम करता येतं हा धडा अलिस्टर कुकनं घालून दिला. टोकाच्या जीवघेण्या शर्यतीत स्वत्व कसं जपावं याचं कुकची कारकीर्द आदर्श वस्तुपाठ आहे.


कुकच्या करिअरची टाइमलाइन आहे- 2006 ते 2018- बारा वर्ष अर्थात एक तप. क्रिकेटमध्ये आणि एकूणही कुक हा नव्या पिढीचा प्रतिनिधी. पण कुकची वाट अनवट अशी. तो फेसबुकवर नाही, त्याचं ट्वीटर हँडल नाही, इन्स्टाग्रामवर अकाऊंट नाही. साहजिकच अमुक इतके फॉलोअर्स वगैरे चर्चा नाही. एका सोशल मीडिया पोस्टसाठी अमुक कोटी कमावण्याचा प्रश्नच नाही. वैयक्तिक आयुष्यातल्या घटनांची घोषणा, फोटो, व्हीडिओ अपलोड करण्याचा विषयच नाही.

तो केसांना जेल लावत नाही. अतरंगी रंगाच्या केशरचना करत नाही. त्याच्या शरीरावर टॅटू नाहीत. डीजेसदृश म्युझिक तो ऐकत नाही. सेलिब्रेटी गर्लफ्रेंड नाही. कोणाशी सूत जुळल्याच्या- ब्रेकअपच्या वार्ता नाहीत. नाइटक्लब/पब/बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याची नोंद नाही. तुफान वेगानं गाडी चालवल्यामुळे पोलिसांनी दंड केल्याची घटना नाही.


क्रिकेट हाच कुकचा ध्यास पण जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना उकसवण्यासाठी तो शिव्या-शेरेबाजी करत नाही. बॉल कुरतडणं-चावणं असलं लाजिरवाणं वागत नाही.

मॅचदरम्यान, आधी तसंच नंतर खोचक टोमणे, बढाया वगैरे मारायचा संबंधच नाही. कुक हे रसायनच अनोखं आहे. त्याचा वाण बावनकशी आहे. क्रिकेटपटूइतकंच कुकचं माणूस म्हणून योगदान मोलाचं आहे.पोरसवद्या वयात इंग्लंडसाठी खेळणारा मुलगा ते 33व्या वर्षी क्रिकेटपासून बाजूला होण्याचा निर्णय घोषित करणारा लिजंड कुक हा प्रवास खूप काही शिकवणारा. त्यासाठी थोडी पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे.


ही गोष्ट आहे 2006 मधली म्हणजे 12 वर्षांपूर्वीची. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर होता. मार्कस ट्रेस्कॉथिक हा त्यांचा भरवशाचा ओपनर. पण या पठ्यानं मानसिक आजाराचं कारण देत अख्ख्या दौऱ्यातूनच माघार घेतली. इंग्लंडला मोठा दणका होता. महिना होता मार्च- दिवस उकाड्याचे आणि तोंड द्यायचंय भारताच्या स्पिनर्सना. इंग्लंडसमोर अस्मानी-सुलतानी अशी दोन्ही संकटं. रिप्लेसमेंट म्हणून काही नावं चर्चेत होती. अलिस्टर कुक हे नाव अग्रणी होतं. पण एक अडचण होती. 21 वर्षांचा कुक त्यावेळी इंग्लंड अकादमी संघातर्फे खेळण्यासाठी वेस्ट इंडिजमध्ये होता. निवडसमिती ठाम राहिली आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं कुकला बोलावलं. दिवस कमी, सोंगं फार अशी परिस्थिती. व्हिसा आणि अन्य तांत्रिक गोष्टी उरकून कुक वेगवेगळे टाइमझोन्स आणि प्रदीर्घ विमानप्रवास करून मुंबईमार्गे नागपुरात पोहोचला. जेटलॅग वगैरे सबबी न देता त्यानं सरावही केला. पुढच्या काही तासात तो इंग्लंडचा क्रिकेटपटू झाला. रोलरकोस्टर गोष्टीचा हा पहिला टप्पा झाला. क्लिन शेव्ह, उंचपुरा आणि काटक शरीराचा, मोठं हेल्मेट घातलेला, रक्षणासाठी आर्म गार्ड न घातलेला, बेसबॉल प्लेयर्ससारखा स्टान्स असलेल्या कुकनं पहिल्याच इनिंगमध्ये 60 रन्स केल्या.


'बंदे में दम है' अशी नागपूरच्या प्रेसबॉक्समध्ये चर्चा झाली. दुसऱ्या इनिंगमध्ये या पोरगेल्या मुलानं चक्क शतकच झळकावलं आणि तमाम क्रिकेट चाहत्यांचे डोळे विस्फारले, कान टवकारले गेले. भारतात येऊन कुंबळे-हरभजनसमोर पदार्पणाच्या सामन्यात शतक! मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीचा प्रत्यय कुकच्या आगमन नांदीनेच दिला. त्या दिवसापासून एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे कुक वाटचाल करत आहे. आपण बरं- आपली बॅटिंग बरी या न्यायानं गेली बारा वर्ष त्याचा धावांचा यज्ञ अखंड धगधगतो आहे. हा प्रवास झापडबंद नाही, उलट तो विविधांगी बहरणारा झाला. माणसाचं मोठेपण त्याच्या सहकारी, समकालीनांशी, वर्तमानाशी संलग्न असतं. कुकनं ज्या मॅचमध्ये पदार्पण केलं, त्याच मॅचमध्ये अन्य तीन खेळाडूंनी पदार्पण केलं. एक होता आपला बॉलर- श्रीसंत.


करिअरची चांगली सुरुवात करणाऱ्या श्रीसंतची कामगिरीतली आणि वागण्यातली लय हरपली. फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळल्यानं श्रीसंतवर आजीवन बंदी आहे.

दुसरा प्लेयर होता माँटी पानेसर-इंग्लंडकडून खेळणाऱ्या या सरदारजींनी दणक्यात सुरुवात केली, मात्र नंतर त्याचं वर्तन बिघडत गेलं आणि तो बाजूला फेकला गेला. तिसरा प्लेयर होता- इयान ब्लॅकवेल. डेब्यू केला ती मॅच त्याची पहिली आणि शेवटची मॅच ठरली. हे तिघं एका पारड्यात आणि कुक दुसऱ्या पारड्यात. 12 वर्षांनंतर वयाच्या 33व्या वर्षी कुकच्या नावावर 32 शतकांसह टेस्टमध्ये 12,254 रन्स आहेत. टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत कुक सहाव्या क्रमांकावर आहे. कुकच्या पुढे असलेली नावं आहेत- कुमार संगकारा, राहुल द्रविड, जॅक कॅलिस, रिकी पॉन्टिंग आणि सचिन तेंडुलकर. कुक कोणत्या मखराच्या मांदियाळीत आहे हे या नावांवरून लक्षात यावं. टेस्टमध्ये सचिनचा सर्वाधिक रन्सचा विक्रम कुक मोडणार अशी चर्चा गेले काही वर्षं क्रिकेटविश्वात होती.


कुकच्या नावावर असलेला एक विक्रम खास लक्षात ठेवण्यासारखा. पदार्पण केल्यापासून कुकने सलग 158 टेस्ट खेळल्या. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर कुकच्या डेब्यूपासून इंग्लंडने 158 टेस्ट खेळल्या, त्या सगळ्या मॅचेसमध्ये कुक होता. अॅलिस्टर कुकने जगभर रन्स केल्या. म्हणजेच परफॉर्मन्स किंवा फिटनेस या दोन्हीपैकी कशासाठीही त्याला कधीही संघातून वगळण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. याआधी सलग टेस्ट मॅचेस खेळण्याचा विक्रम अलन बॉर्डर यांच्या नावावर होता. एका दिग्गजाचा विक्रम कुक नावाच्या महान ताऱ्याने मोडला. हा विक्रम वाचायला, ऐकायला जेवढा भारी वाटतो तितकाच प्रत्यक्षात साकारणं महाअवघड आहे. रन्स करणं हे बॅट्समनचं काम. जगभरातले बॅट्समन तेच करतात. कुकचं एवढं काय कौतुक असं वाटू शकतं. त्यासाठी त्याचा रोल समजून घेणं आवश्यक आहे. कुक ओपनर आहे. टेस्ट मॅचमध्ये नवा कोरा लालभडक चेंडूचा सामना करणं कठीण कौशल्य मानलं जातं. दीड दिवस फिल्डिंग करून शरीर दमलेलं असताना ओपनिंगला येणं किंवा मॅच सुरू होताना, बॉलर्स फ्रेश असतात. त्यावेळी त्यांचा सामना करणं- दोन्हीमध्ये कौशल्याचा कस लागतो. बहुतांशांची हे करताना भंबेरी उडते. कुकचं तसं झालं नाही. समोरचे संघ त्याच्या खेळातल्या उणीवा हुडकून त्याला आऊट करायला लागले की तो ग्रॅहम गूच यांच्याकडे जायचा. काय चुकतंय ते समजून घ्यायचा. व्हीडिओंचा अभ्यास करून काय बदल करायचा हे जाणून घेतलं की प्रचंड सरावाला सुरुवात व्हायची. नवीन तंत्रं घोटून तो मैदानात उतरायचा, पुन्हा धावांची टांकसाळ सुरू.


घरच्या मैदानावर सगळेच रन्स करतात, खरी कसोटी बाहेर होते. कुकचं महानत्व तिथं दडलं आहे. आशियाई उपखंड म्हणजे भारत, श्रीलंका, बांगलादेश. इथल्या खेळपट्यांवर चेंडू हातभर वळतो. स्पिनर्सना बॅकफूटवर जावं का फ्रंटफूटवर खेळावं उमगेपर्यंत दौरा संपायला येतो. त्यात प्रचंड उकाडा. इंग्लंडमधल्या सुखावणाऱ्या वातावरणातून येणाऱ्या खेळाडूंसाठी ही उष्णता जीव काढते. पण कुक इथे सहजतेने रन्स करतो. इंग्लंडचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणजे ऑस्ट्रेलिया. तिथं बाऊन्सी विकेट असते. हे कमी की काय, ऑस्ट्रेलियन्स मजबूत स्लेजिंग करतात. कुक अविचल असतो. शेरेबाजीचा काहीच परिणाम त्याच्यावर होत नाही. तो खोऱ्याने धावा करतो. न्यूझीलंडमध्ये बाऊन्सी पिचच्या जोडीला मजबूत थंडी आणि बोचरे वारे असतात. कुकचं धावाचं मिशन सुरू राहतं. दक्षिण आफ्रिकेत पिचच्या जोडीला तेजतर्रार बॉलर्स असतात. कुक आपलं काम इमानेइतबारे करत राहतो.


जगाच्या दुसऱ्या टोकाला कॅरेबियन बेटं आहेत. भल्याभल्या बॅट्समनची तिकडे त्रेधातिरपीट उडते. हसा-खेळा-नाचा संस्कृती असणाऱ्या कॅरेबियन बेटांवर कुकची बॅट तळपत राहते. आता राहिलं इंग्लंड - घरच्या मैदानांवर तो रनमशीन आहे. कुकच्या खेळात रोबोटिक सातत्य आहे. त्याच्या खेळात लारा-जयवर्धनेसारखी नजाकत नसेल, पॉन्टिंग-संगकारासारखं वर्चस्व नसेल. त्याची बॅटिंग क्रिकेटच्या सौंदर्यशास्त्रात मोडणारी नसेल पण तो रन करणार हा विश्वास आहे. संघाने ठेवलेला हा विश्वास कुकने 12 वर्षं काटेकोरपणे जपला आहे. पदार्पणानंतर अवघ्या काही वर्षात तो संघाचा मुख्य बॅट्समन झाला आणि सहा वर्षांत तो इंग्लंडचा कर्णधार झाला. कर्णधाराचा काटेरी मुकूट डोक्यावर असताना त्याने अनेक चढउतार पाहिले. जबाबदाऱ्या वाढत गेल्या पण रन करण्याच्या कोअर कामाशी त्याची बांधिलकी कधीही तुटली नाही.

कुकची शतकं आणि इंग्लंडचं जिंकणं हे एकरुप झालं होतं. आव्हानं वाढली तसा कुक आणखी कणखर झाला. कसं वागू नये याचे नमुने आजूबाजूला असताना कुकची अख्खी कारकीर्द कसं वागावं याचा मूर्तीमंत उदाहरण होती.


कुकच्या तालमीत तयार झालेला जो रूट आज इंग्लंडचा कर्णधार आहे. कुक कर्णधार असताना इंग्लंडचा संघ खऱ्या अर्थाने बहुपेडी झाला. संघात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले मात्र इंग्लंडमध्ये दाखल झालेले खेळाडू होते. आशियाई पार्श्वभूमी असलेले खेळाडू होते. या सगळ्यांची एकत्रित मोट बांधण्याचं कसब कुककडे होतं. विविध संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, विभिन्न आचारविचार असणारे खेळाडू कुकच्या नेतृत्वात संघाशी एकरुप झाले. अनेक नव्या खेळाडूंच्या मागे हक्कानं उभं राहणाऱ्या कुकनं बेताल वर्तनाची कधीही भलामण केली नाही. या कठोरपणाचा त्याला फटकाही बसला पण त्याने तत्व सोडलं नाही. कर्तृत्वाने मोठं झाल्यावर मनाजोगतं जगता येत नाही म्हणतात. कुक या सिद्धान्ताला ठोस अपवाद आहे. कुकने 2006मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. दोनच वर्षांत आयपीएल अवतरलं. अवघ्या दीड महिन्यात वर्षभराचा पैसा-प्रसिद्धी-ग्लॅमर देणारी ही स्पर्धा.


आयपीएलचं गगनचुंबी यश पाहून जगभरात ट्वेन्टी-20 लीगचं पेव फुटलं. पण कुक या कल्लोळापासून सुरक्षित अंतरावर राहिला. ट्वेन्टी-20 आपला प्रांत नाही हे त्याने जाणलं. त्याचं वैषम्य वाटू दिलं नाही. थोड्या वर्षांनी त्यानं वनडेही सोडलं. मात्र टेस्टमध्ये आपल्या कामात अव्वल दर्जाची हुकूमत सदैव राखली. क्रिकेटच्या मैदानावरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्यानंतर कुक शेतकरी होतो. विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. आणि यातलं काही चमकोगिरीसाठी नाही. शेतीच्या सगळ्या कामांच्या बरोबरीने कुक मेंढ्यापालन करतो. इंग्लंडमधल्या लेघटन बझार्डजवळ कुकची शेती आहे. क्रिकेट नसलं की कुक तिकडेच रमतो. 'मेंढ्या मला क्रिकेटबद्दल काहीच विचारत नाहीत. म्हणून तिथे राहणं, वावरणं मला आवडतं', असं कुक सांगतो.


अनेक वर्षांची मैत्रीण असलेल्या अलिस हंटशी कुकनं लग्न केलं. शेतातल्या ट्रॅक्टरवर बसूनच कुक लग्न मंडपात आला होता. पत्नी आणि दोन मुलं हा कुटुंबकबिला कुकचं प्राधान्य आहे. या गोजिरवाण्या घरात लवकरच नवा सदस्य दाखल होणार आहे. शिस्तबद्ध योग्याप्रमाणे जगणारा कुक उत्तम गातो. लंडनमधल्या सेंट पॉल्स कॅथेड्रल स्कूल आणि नंतर बेडफोर्ड स्कूलचं प्रतिनिधित्व करताना कुकने संगीताची साधना केली. ज्या हातांनी कुक मॅरेथॉन शतकी खेळी रचतो त्याच हातांनी क्लॅरिनेट आणि सॅक्सोफोनवर सुरेल सुरावटी वाजवतो. गेले एक तप इंग्लंड क्रिकेट संघाचा आधारस्तंभ असलेला कुक विविध माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांशी संलग्न आहे. मात्र याबाबत तो स्वत:हून काहीच बोलत नाही. यंदा वर्षभर कुकची धावांची गंगा आटली होती. अख्खी कारकीर्द अद्भुत सातत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुकसाठी रन्स न होणं क्लेशदायक होतं.


मोठ्या माणसांचे मापदंडही मोठे असतात. 'क्षमता होती, तेवढं पुरेपूर दिलं, आता देण्यासारखं काहीच उरलं नाही' हे कुकचे शब्द जगभरातल्या चाहत्यांना दु:ख देणारे आहेत. कुकने खोऱ्याने रन्स करताना प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं. रन करणं त्याचं काम होतं, पण त्यापल्याडच्या कुकनं जगभर माणसं जोडली. म्हणूनच त्याचे कट्टर प्रतिस्पर्धीही त्याच्याबद्दल आदराने बोलतात. दिवसेंदिवस खेळ व्यावसायिक होत आहेत. कडवेपणाही वाढत चालला आहे. दडपणाची जबाबदारी असतानाही अलिप्तपणे मूल्यं जपत काम करता येतं ही कुकची शिकवण सर्वसामान्य माणसालाही खूप प्रेरणा देणारी आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Ashok Doiphode