STORYMIRROR

Pushpa Patel

Inspirational Others

3  

Pushpa Patel

Inspirational Others

छत्रपती संभाजी राजे

छत्रपती संभाजी राजे

3 mins
138

आज फाल्गुन अमावस्या... स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस! सर्वप्रथम तेज:पुंज राजेंच्या पावन स्मृतींना माझा त्रिवार मानाचा मुजरा !!!

   अगदी लहान असल्यापासून संभाजीराजेवर अनेक संकटे आली. त्या संकटांसमोर हतबल न होता,त्यावरच धिटपणे पाय रोऊन संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. अशा राजा बद्दल आणि अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात त्या आज आपण जाणून घेऊया...

१) छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला होता.

२) छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल, असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता.

३) संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर,समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व त्यांनी गाजविले.

५) अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे ,करारी,आणि शूर होते.

६) लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसात केले होते.

७) छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी " बुधभूषण " हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान,राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे.

८) याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर " समयनय " हा ग्रंथ संभाजी राजेंनी लिहून घेतला.

९) " धर्म कल्पलता " हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला.

१०) युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची तहेदिलसे प्रशंसा केली आहे.

११) यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो.

    छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपूण होते. ते कुशल संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती.हे विसरता येणार नाही.

१२) छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनी राज्यकारभार मुद्रा तयार करवून घेतली होती.

ती अशी -

" श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते ।

यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ।। '' 

१३) छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला.

१४) मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला.

१५) संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते.

१६) संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकाही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे तत्कालीन हिंदुस्थानात एकमेव योद्धा होते.

१७) संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता.

१८) छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजी राजेंनी पुढे चालू ठेवले. अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरूष यांना वार्षिक नेमणुकाही त्यांनी पूर्ववत करून दिल्या.

१९) देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे, यासाठी पूर्वीचीच धोरणे ठेवून, इनामे व सनदा पूर्ववत केल्या. एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत, हे तत्कालीन पत्रव्यवहारांतून दिसते.

   १६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रू सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश मिळविले. छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे हजर करण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट घातली होती.पण...हिंदू धर्माभिमानी संभाजी राजेंनी त्याचा उद्दाम अटीला स्पष्टपणे नकार दिला.

    औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी फाल्गुन अमावास्या (११ मार्च १६८९ ) रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली.छत्रपती संभाजी राजेंचे हे बलिदानाप्रती सार्थ अभिमान बाळगणे हे आपले आद्य कर्तव्य होय. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने " धर्मवीर " ही पदवी बहाल केली.

    अशा या धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंनी आपल्या अजोड व अतुलनीय कार्यकर्तृत्वाची ,व हिंदु धर्मरक्षणाची लावलेली तेजस्वी ज्योत आजही तेवत ठेवणे हीच खरी संभाजीराजेंना  खरी श्रद्धांजली ठरेल.

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना त्रिवार मानाचा मुजरा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational