प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

4.5  

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Inspirational

छडी लागे छम छम,विद्या येई घमघम

छडी लागे छम छम,विद्या येई घमघम

3 mins
324


  शाळेची शेवटची घंटा झाली शाळा सुटली. आपापली दप्तरे सावरत मुलं गलका करत वर्गातून बाहेर पडत होती.कदम सर देखील उदास अंतकरणाने मुलांच्या किलबिलाटातूनच गेटच्या बाहेर पडले सुद्धा. मजल दर मजल करीत विचारांच्या तंद्रीतच ते घरी आले. कुलूप उघडून टेबलाशेजारच्या खूर्चीत डोळे बंद करून पडून राहिले. वर्गातला आजचा प्रसंग सारखा त्याच्या नजरेसमोर येत होता.

त्यांना आठवलं पाच महिन्यांपूर्वी या देवरुख गावात बदली होऊन आलो तेव्हा खोडसाळ मुलांच्या आठवीच्या वर्गाचा मी वर्गशिक्षक म्हणून मुख्याध्यापकांनी माझी नियुक्ती केली होती. प्रथम वर्गात गेलो तेव्हा मला मुलांनी नाना प्रकारे त्रास दिला होता. वर्गात गेल्याबरोबर कोल्हे, लांडगे अशा प्राण्यांचे आवाज मधूनच ऐकू येऊ लागले होते. फळ्यावर लिहायला घेतले की पाठीमागून कागदाचे बोळे, खडूचे छोटे तुकडे माझ्या दिशेने यायचे. मधल्या सुट्टीनंतर तर निम्मा वर्ग रिकामा दिसायचा. अशा या बेताल वर्गाला वळण लावण,त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण व स्वतःचा तोल ढळू न देण हे मोठच आव्हान माझ्यापुढे होतं. पण हार मानून चालणार नव्हती.

वर्गातील खोड्या काढण्यामध्ये सर्वांचा म्होरक्या असणारा अजय भोसले हा गावच्या पंचायत समितीच्या अध्यक्षा चा मुलगा. त्यामुळे त्याचा दरारा सगळ्या मुलांवर असायचा. त्याच्या नादाने मोरे,साने, शिंदे ही मुले देखील त्याच्या गलक्यात असायची. या मुलांना शिस्त लागावी, जीवनमूल्यांचे त्यांच्यावर संस्कार व्हावे म्हणून आपण त्यांना रामायण, महाभारत यातील गोष्टी, शिवाजी महाराज, विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कितीतरी थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगून त्यांना जीवनरुपी बाळकडू पाजण्याचा प्रयत्न केला होता.

 दिवस असेच जात होते सहामाही परीक्षा जवळ आली होती. कदम सरांनी सराव परीक्षेला सुरुवात केली होती. गणिताचा तपासलेला पेपर देताना वीस पैकी दोन गुण मिळवणाऱ्या भोसले ची मी चांगलीच कानउघाडणी केली तर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या कांबळे चे कौतुकही केले. भोसले ला मात्र स्वतःची नाचक्की व कांबळेला मिळालेली शाबासकी रुचली नव्हती.

“ त्या म्हारद्याला एवढे गुण कसे ?” सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला. त्याच्या या शंकेमुळे सरांचे मन उद्विग्न झाले व ते गरजले, “भोसले, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हव असेल तर त्याचा पेपर घे आणि बघ उघड्या डोळ्यांनी” असं म्हणत ते भोसलेच्या बाका शेजारी गेले. त्याचा कान पिरगाळत म्हणाले, “कांबळेची माफी माग.”

पण नजरेला नजर देत भोसले तसाच उभा घुश्यात. “मी माफी मागणार नाही.” त्यासरशी आपल्या मजबूत हाताचे सडेफटिंग तडाखे द्यायला त्यांनी सुरुवात केली. “सरस्वतीच्या या मंदिरात मला सगळे सारखेच, कांबळेची माफी मग नाही तर चालता हो वर्गातून.” गाल, कान चोळत तो तडक वर्गातून बाहेर पडला. कदम सरांनी कधी मुलांवर हात उगारला नव्हता पण आज त्यांचा संयम सुटला होता. “मुलांनी आपला पराभव केला तर?”

विचारांच्या या तंद्रीतच रात्री ते अंथरुणात तळमळत राहिले. सकाळी त्यांना जाग आली ती दरवाजावरील आवाजाने. ते गडबडून उठले. एवढ्या सकाळी कोण असेल? या विचारातच त्यांनी दार उघडले. दारात भोसले व कांबळे उभा. काही विचारायच्या आतच कांबळे म्हणाला, “ सर, याला माफ करा. त्याला आपली चूक उमगली आहे. त्याने माझी माफी मागितली व तुमची माफी मागायला आला आहे.

           त्याच वेळी डबडबत्या डोळ्यांनी भोसलेने सरांच्या पायावर डोके ठेवले व म्हणाला, “ मला माफ करा सर, अहंकाराच्या गुर्मीतच मी ते बोलून गेलो. पण सर तुम्ही पिरगाळलेला कान रात्रभर ठणके देत होता. माझ्या चुकीची जाणीव करून देत होता. सर, आम्ही तुम्हाला इतका त्रास दिला पण तुम्ही कधी सूडबुद्धीने वागलात नाहीत की मुख्याध्यापकांकडे तक्रार केली नाहीत. तुम्ही जे सांगत होता ते आमच्या भल्यासाठी, कल्याणासाठी. ‘माणूस जातीने नाही तर आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो’. हे तुमचे शब्द विसरून गेलो होतो. चिखलातील किड्या मुंग्यां प्रमाणे चिखलातच राहिलो. पुन्हा कधी अशी चूक होणार नाही”.

 भोसलेच्या गहिवरल्या शब्दाने सरांना भरून आलं. त्याला छातीशी धरत ते स्वतःशीच म्हणाले, अखेर चिखलातून कमळ उमलल होत, फुलणार होत व आसमंत सुगंधितही करणार होत. नक्कीच .............


Rate this content
Log in

More marathi story from प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Similar marathi story from Inspirational