VINAYAK RANE

Inspirational

4  

VINAYAK RANE

Inspirational

बकुळा

बकुळा

6 mins
221


आज बकुळा पाटील यांचा महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंडळातर्फे लोककलाकार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभ ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ६ वाजता सुरु होणार होता पण त्याची लगबग त्यांच्या घरी काल रात्रीपासूनच चालू होती. त्यांचा मुलगा रोहन व सून त्यासाठी खास अमेरिकेहून आले होते आणि मुलगी डॉ . नेहा व जावई गडचिरोलीहून आले होते. आज बकुळा पाटील यांची बडदास्त एखाद्या अति महत्वाच्या व्यक्तीप्रमाणे चालू होती. गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी सकाळपासूनच हार तुरे घेऊन त्यांच्या अभिनंदनासाठी येत होत्या. काही मंडळी जिव्हाळ्याचे दोन शब्द बोलण्यासाठी येत होती. बकुळा ताईचे मन समाधानाने फुलून गेले होते. त्या समाधानापाठी त्यांनी उपसलेल्या अपार कष्टाची पार्श्वभूमी होती. आज सर्वांचे चीज झाल्याची भावना त्यांच्या मनात होती, मनाला चांदण्या रात्रीची शीतलता लाभली होती पण हीच स्थिती काही वर्षांपूर्वी तापलेल्या सूर्याचे चटके सोसणाऱ्या त्या माउलीला माहित होती. आजूबाजूला सर्वांची लगबग चालू असतानाही तिचे मन नकळत भूतकाळात गेले.

बकुळा ताईचं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी शेजारच्या गावातील मारुती पाटील या शेतकऱ्याशी झालं. मारुती पाटील स्वभावाने फारच तापट, त्यात त्यांना दारूचं व्यसन. घरची परिस्थिती बेताची. बकुळा सुरुवाती पासूनच मेहनती असल्यामुळे ती शेतीच्या सर्व कामात नवऱ्याला मदत करायची. शेतीसुद्धा बेताचीच असल्याने त्यांचे कसेबसे भागत असे. सासू वारल्यामुळे त्यांचे लग्न घाईघाईत जमवून उरकून घेण्यात आले त्यामुळे घरी म्हातारे सासरे आणि नवरा यांची सर्व व्यवस्था बकुळालाच करावी लागे. नवरा संध्याकाळी शेतीची काम झाल्यावर दारूच्या दुकानाची वाट धरी आणि रात्री आल्यावर भांडण आणि मारहाण हा जवळ जवळ रोजचा कार्यक्रम असे. याच हालात वर्ष सरत होती. रोजच्या दारू व इतर व्यसनामुळे नवऱ्याची परिस्थिती खालावत होती दरम्यान बकुळाला दोन मुले झाली. मोठा मुलगा रोहन व मुलगी नेहा यांना बालपणापासूनच परिस्थितीची जाण होती. बकुळाने त्यांच्यावर संस्कारच तसे केले होते. मुलांना नियमितपणे शाळेत पाठवणे, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेत त्यांच्यावर चांगले संस्कार होतील याची पूर्ण काळजी बकुळा घेत असे. दिवसेंदिवस खालावत जाणारी नवऱ्याची परिस्थिती तिला काळजीत टाकत होती आणि असाच एके दिवशी काळाने घाला घातला आणि तिचा नवरा तिला तिच्या मुलं आणि सासऱ्यांच्या जबाबदारीसह सोडून त्यांच्यातून निघून गेला.

शाळेत जाणारी मुलं आणि सासऱ्यांची जबाबदारी आणि खर्च कसा सोसावा हेच बकुळाला कळेनासं झालं. आता इथून पुढे एकटीला शेती करणं शक्य नव्हतं. रोजचा खाण्यापिण्याचा, मुलांचा शाळेचा आणि सासऱ्यांच्या औषधपाण्याचा खर्च कसा चालवायचा हाच विचार करून बकुळाचा रात्ररात्र डोळ्याला डोळा लागत नसे. सकाळी घरात जे असेल ते शिजवून मुलांना खायला घालून शाळेत पाठवणे आणि उद्याची चिंता करत बसणे हाच तिचा दिनक्रम झाला होता. पण हे फार काळ चालणं शक्य नव्हतं. गावच्या ठिकाणी कुणाच्या घरी मोलमजुरी करण्याचं काम मिळणं सुद्धा कठीण होतं, त्याकाळी शेतीची काम सुद्धा सर्वजण आपणच करीत असत, मजूर ठेवण्याची सुद्धा गावात कुणाची ऐपत नव्हती. गावच्या पाटलाकडे जाऊन काम मागायचा सुद्धा तिने प्रयन्त केला परंतु विधवा स्त्री कडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन चांगला नाही हे लगेच तिच्या ध्यानात आलं म्हणून तिने परत ती पायरी चढली नाही.

अशातच गावात एक तमाशा आला. तमाशाचा फड गावच्या वेशीवर लागला आणि बकुळाला त्यांच्यासाठी जेवण करणाऱ्या बाईची गरज आहे असं समजलं. नवऱ्याच्या तमाशाच्या वेडापायी एरवी तमाशाच्या नावाचा जरी कोणी उल्लेख केला तर चिडणाऱ्या बकुळाने त्यांच्या फडात जाऊन काम करण्याचे मान्य केले. हा तमाशा गावात दोन महिने राहणार होता आणि तिथेच राहून आजूबाजूच्या गावात खेळ करणार असल्याचे तिला समजले. दोन महिन्याचे तरी काम होईल पुढचं पुढे बघू असं ठरवून तिने दुसऱ्या दिवसापासूनच फडात जेवण बनवायचे काम सुरु केले. आपल्या घरचे काम संपवून मुलांना शाळेत पाठवून बकुळा फडात जाऊ लागली. जेवणाचं काम उरकल्यावर दुपारचं जेवण झाल्यावर तालमीला सुरुवात होत असे. बकुळाला लहानपणापासूनच नाचाची आवड असल्यामुळे तालमीला सुरवात झाल्यावर तिचा पाय तिथून निघत नसे.मग ती थोडा वेळ त्यांची तालीम बघत बसे. नटून सजून पायात चाळ बांधून जेव्हा त्यांचा नाच चालू होई तेव्हा नकळत बकुळा सुद्धा पायाने बसल्या जागी ठेका धरत त्यांच्या तालिमीत स्वतःचे दुःख विसरून हरवून जाई व उशीर व्हायच्या आत घरी निघून येई. आठवडाभरात तिथल्या मंडळींशी व नर्तकींशी तिची चांगलीच गट्टी जमली. तमासगीर मंडळी जेव्हडी बाहेर बदनाम असतात तेव्हडी ती खरोखर वाईट नसतात आणि केवळ पोटासाठी आणि आपल्यातल्या कलेच्या वेडापायी ती या मार्गाला जातात याची तिला खात्री पटत होती. फडातल्या अनेक मंडळींपैकी वयस्कर शाहीर असलेल्या उमाजींनी बकुळाच्या ताल धरण्याच्या ठेक्यामुळे तीच नाचाच वेड ओळखलं व तिला एके दिवशी सगळ्या बरोबर नाचायची गळ घातली. सुरवातीला बकुळा तयार नव्हती पण वयस्कर उमाजींचं मन तिला मोडवेना म्हणून मनाला विरंगुळा म्हणून ती तयार झाली. त्या दिवशी बकुळा तालमीत अशी काही नाचली की फडातल्या मंडळींनी तोंडात बोटं घातली, जणू काही बकुळा वर्षानुवर्षे तमाशात नाचत होती असं वाटावं. सगळ्यांनी तीच तोंड भरून कौतुक केलं. उमाजींनी तिच्यातली कला ओळखली होती पण बकुळा काही तमाशात काम करण्यासाठी आली नव्हती त्यामुळे त्यांनी आपल्या मनाला मुरड घातली. बकुळा सुद्धा आज खूप खुश होती. आज लहानपासूनची तिची इच्छा तिने पूर्ण केली होती. आपल्या आवडीचे काम आणि कलेचा आनंद तिच्या मनात ओसंडून वाहत होता. त्या रात्री बकुळाला कुटुंबाची चिंता असूनही रात्री शांत झोप लागली. हळूहळू बकुळा वेळ मिळेल तेव्हा तालमीत नाचू लागली तिने अनेक गाणी आणि बतावणी सह अनेक लावण्यांवर नाचून आपली हौस पुरेपूर भागवून घेतली. आता ती त्यात पारंगत झाली होती. फडाचे खेळ संपून दुसऱ्या गावी जायचे दिवस हळूहळू जवळ येत चालले होते, अशातच एके दिवशी तमाशाची मुख्य नर्तिका सुंदराबाई आजारी पडली. तिला सकाळपासूनच ताप चढला होता. डॉक्टरने येऊन तपासून तिला कावीळ झाल्याचे सांगितले आणि आठवडाभर आराम करायचे बजावून तो निघून गेला. सर्व फडावर आता चिंतेचं वातावरण पसरलं आता काय करायचं कुणाला सुचेना. उमाजींनी बकुळाला आल्या आल्या सर्व प्रकार सांगितला आणि सर्व फडाला यातून बाहेर काढायची विनंती केली, सर्वानी हातपाय जोडले कारण खेळांची बुकिंग आधीच झाली होती. बकुळा कशीबशी तयार झाली त्या दिवशी तिने सकाळपासून तालीम केली आणि रात्रीच्या खेळात असा काही बार उडवून दिला कि तिच्या नाचाची चर्चा दुसऱ्या दिवसापासून गावागावात सुरु झाली. सात दिवस बकुळाने फड नुसता सांभाळला नाही तर त्याची कमाईपण वाढवली. दरम्यान सुंदराबाई पण बऱ्या झाल्या आणि त्यांचा गाव सोडून दुसरीकडे जाण्याचा दिवस उजाडला. आज बकुळाचं इथलं काम संपणार होतं. सर्वानी डोळ्यात अश्रू आणून एकमेकांना निरोप दिला.

त्या रात्री बकुळाला झोप येणारच नव्हती. ती फक्त बिछान्यावर तळमळत होती. एकीकडे उद्यापासून नवीन काम शोधण्याची काळजी आणि दुसरीकडे आता आपल्यातील नाचाचे वेड इथेच संपल्याची खंत. तिने रात्रभर विचार केला आणि निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ती लवकर उठून तडक फडावर गेली तिथे मंडळींची सामानाची आवराआवर चालू होती. समोर उमाजी उभे होते. ती उमाजीच्या पाया पडली. तिने आपल्या मनातली गोष्ट उमाजींना सांगितली " उमाजी आज मी मनाशी पक्क केलंय, आज पासून मी तुमच्या फडाचा एक भाग आहे. आता मी लोकांची पर्वा करणार नाही. माझ्या मुलांना मी शिकून सवरून मोठं करणार. माझ्यातली कला जोपासणार" तिचा निर्णय ऐकून फडात हर्षउल्हासाचं वातावरण पसरलं. सुंदरबाईंनी बकुळाला मिठी मारली. आजपासून दोघीनी फड गाजवायचा असा सर्वांच्या साक्षीने पणच केला. त्यारात्रीच त्यांनी गाव सोडलं आणि नवीन गावात आपलं बस्तान तात्पुरतं बसवलं. सुंदरबाईंनी बकुळाला सर्वांगाने एक लावणी नर्तकी म्हणून तयार केलं. नवनवीन गावात प्रयोग होऊ लागले. हळूहळू वयोमानानुसार सुंदराबाईंनी काम कमी केलं आणि फडाची मुख्य नायिका म्हणून बकुळा नावारूपाला आली. दरम्यानच्या काळात फड कुठेही असला तरी बकुळा नियमित गावाला येऊन मुलांचं शिक्षण त्यांचा व सासऱ्यांचा सर्व खर्च उचलत असे. हळूहळू मुलं मोठी होत होती, अभ्यासातही प्राविण्य मिळवत होती. जशी वर्ष सरत होती, लावणी या लोककलेला आता मान मिळू लागला होता. गावागावात फिरणारी फडाची लावणी आता उच्चभ्रू लोकांच्या भव्य दिव्य हॉल मध्ये तिकीट लावून खेळ करू लागली. त्यातून कलाकारांना चांगले मानधनही मिळू लागले. बकुळाला आता इतर कलाकारानं प्रमाणे मान मिळू लागला . तिला आता मोठ्या मोठ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणी येऊ लागली. या कलेने तिला अमेरिकेत जाऊन आपली कला दाखवण्याचीही संधी मिळाली . कुण्या छोट्याश्या गावात नोकरीसाठी वणवण फिरणारी बकुळा आज या कलेमुळे एक प्रतिष्टीत व्यक्ती म्हणून समाजात वावरत होती.

आजूबाजूच्या कोलाहलाने बकुळा भानावर आली तोपर्यंत दारात गाडी तयार होती. तिने आपली बॅग घेतली व गाडीत जाऊन बसली. गाडी हॉल जवळ पोहचताच संस्थेचे पदाधिकारी हार तुरे घेऊन स्वागताला हजर होते. अनेक प्रतिष्ठित लोकांच्या हजेरीत बकुळाताईंनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारला. त्यांच्या भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली. तिला हालाखीच्या परिस्थितीत साथ देऊन जीवनात यशस्वी होणाऱ्या तिच्या मुलांवरही कौतुकाचा वर्षाव झाला, त्यांचाही स्टेजवर बोलावून सत्कार झाला. तिची कहाणी सर्वाना प्रेरित करून गेली. माणसाने आपली इच्छाशक्ती जागृत ठेऊन मेहनत केली तर जीवन कसं बदलू शकते याच्या त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या.

कालची बकुळा आज बकुळा ताई झाली होती. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या सर्व नर्तकी त्यांना गुरुस्थानी मनात होत्या. रात्री उशिरा समारंभ संपला. अनेकांच्या शुभेच्छा, कौतुकाचा वर्षाव बकुळाताईंवर झाला. बकुळाच्या आयुष्यभराच्या मेहनतीचं आज चीज झालं होत. आजचा दिवस तिला आयुष्यातला सर्वात जास्त समाधान देणारा दिवस होता. त्या रात्री दिवसभराच्या अनेक सुखद आठवणींच्या हिंदोळ्यावर बकुळा सुखी समाधानाने झोपी गेली.


Rate this content
Log in

More marathi story from VINAYAK RANE

Similar marathi story from Inspirational