Mangesh Phulari

Inspirational Others

4.3  

Mangesh Phulari

Inspirational Others

बदल...

बदल...

12 mins
2.3K


कॉलेजला बाहेरगावी शिकणारा राम संक्रांतीच्या सुट्ट्यांसाठी गावी आला. गावामधे फक्त बारावीपर्यंत शिक्षण होत, पदवीच्या शिक्षणासाठी तालुक्याला किवा जिल्ह्याला कॉलेज असल्यामुळे बाहेरगावी जाणे अनिवार्य होते. राम जिल्ह्याच्या शिवाजी महाविद्यालयात समाजशास्त्र विषयात विषयात बी. ए. करत होता. सणासुदीला किंवा सलग सुट्ट्या आल्या की तो लगेच गावाकडे येई. त्या यादिवशी दुपारी राम गावात आला पाठीवर बॅग आणि हातात पिशवी घेऊन, गल्लीतून येताना ओट्यावर बसलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांची विचारपूस त्याने केली. चालत चालत तो घराजवळ आला, घराला कुलुप लावलेलं दिसलं, आईबाबा शेताला आणि लहान बहीण शाळेला गेली असल्याने घरी कुणीच नव्हतं. आई नेहमी जाताना बाजूच्या गोदामावशींकडे चावी ठेवते हे रामला माहिती होतं, म्हणून तो गोदामावशीच्या घरात गेला आणि त्याने आवाज दिला ''गोदामाय ऐ गोदामाय" .... गोदामावशीने बाहेर येऊन पहिले तिला अंगणात थांबलेला राम दिसला. रामा तू हाईस व्हय, ये कि बस बस संक्रांतीला आलास, सुट्टी हाईत काय ? तिने विचारलं. हो , गोदामाय सुट्ट्या आहेत. आईने चावी दिली का गं तुला ? राम. हां,दिली की सकाळीच, संक्रांतीच्या आदल्या दिवशी काम आटपली की मग सणासुदीच्या दिशी घराकडे निवांत बघता येते म्हणून सकाळीच भेगी गेलेत दोघं बी. थांब मी चावी देते असं म्हणत गोदामावशी देवळीत ठेवलेली चावी आणायला आत गेली. तेवढ्यात घरातून रामला कुण्या लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला . रामने गोदामावशीला विचारलं, कोणाचं लेकरू रडतयं गं गोदामाय? अरे आपल्या शालूला मुलगी झाली बघ , झाले पंधरा इस दिवस, तिचीच लेक रडती बघ.अशी सहज बोलल्यासारखी एक साधी बातमी असावी तशी गोदामावशी बोलून गेली, मुल जन्मल्यावर समोरच्याला उत्साहाने सांगतात तो उत्साह गोदामावशीच्या चेहऱ्यावर दिसलाच नाही .

शालू रामपेक्षा एका वर्षाने मोठी होती, गेल्याचवर्षी तिचं लग्न झालेलं . दोघेही लहानपणापासून सोबत राहायचे ,खेळायचे ,शाळेला जायचे. पण १२ वी नंतर घरच्यांनी शालूला शिकवलच नाही. एक दीड वर्ष शेतात कामावर गेली आणि लगेच तिच लग्न लावून दिलं. राम परगावी असल्यामुळे तिच्या लग्नाला येऊ शकला नव्हता. पण त्याला या गोष्टीचं कौतुक वाटत होतं. आतून हाड हाड गाई...म्हणत शालू बाळाला शांत करत बाहेर आली,रामला पाहताच ती खुश झाली, रामाकडे बोट दाखवत ''मामा आला बघ मामा'' असं म्हणत बाळाला तिने रामाकडे पाहायला लावलं. त्याचे रंगीबेरंगी कपडे पाहून तिची लहानशी लेक शांत झाली आणि ऐकतात त्याच्या शर्टकडे पाहू लागली.

काय रे रामा,किती दिवसांनी भेटायलास, असंच का रे ? आता तू परगावी शिकायलास मोठ्या कॉलेजला, मोठा साहेब होणार तू , मग आमची कशी काय आठवण येणार तुला ? शालू म्हणाली.

साहेब वैगेरे काही नाही, तूच लग्नानंतर भेटली नाहीस, आता काय नवी गावात रमलीस तू, आता आमची आठवण कशी काय येईल बाई तुला? आम्ही जुनी माणसं, होय ना ग गोदामाय ? राम हसत हसत शालूला म्हणाला. मग गोदामावशी म्हणाली,तुम्ही इतके मोठे झालात तरी तुमची भांडण काय संपली नाहीत .. बघा जरा ते लेकरू पण ऐकायलय तुमचं भांडण . तिला काय कळतंय ग गोदामाय आत्ताच ..राम हसत हसत म्हणाला.

आता असंच बोलणार आहेस की भाचीला उचलून पण घेणार आहेस राम मामा ? शालू म्हणाली. नको नको मला लहान लेकरं आवडत नाहीत,भिती वाटते मला. राम. शालू समोर येऊन बाळाला रामकडे नेऊ लागली. अगं थांब , रामा तू आधी हात पाय धुवून घे , बाहेरून आलास नव्हं . असं बाळ असलेल्या घरी पाय धुवून यावं नाहीतर पीडा येती घरात, गोदामावशी म्हणाली.

रामने हातपाय धुतले आणि ओसरीवरच्या बाजेवर येऊन तो बसला. शालूने अलगद नको नको म्हणताना रामच्या हाती दिले. तो पण बाळाला खेळवू लागला, त्याने विचारलं नाव काय ठेवलंस हिचं शाळूबाई? शीतल ठेवलंय छान आहे ना ? शालू. कधी नाही बाळाला जवळ घेणारा राम शीतलला कुशीत घेऊन खेळवत होता. तिचे कोवळे कोवळे नाजूक हात रामच्या गालावर लागत होते , त्याच्या शर्टला ती ओढत होती. त्या कोवळ्या स्पर्शाने रामचं मन भरून आलं होतं , शालू सोन्यासारखी गोंडस आहे तुझी मुलगी , राम म्हणाला.

मुलगी आहे सोनं कशाला म्हणायचं, सोन्यासारखं पोरगा असतोय, तुझ्यासारखा. यावर राम म्हणाला, सगळे जण सारखे असतात गोदामाय, मुलगा काय आणि मुलगी काय. आता झाली पोरगी नशिबाला त्यात पहिली पोरगीच आवरत बसा आता , गोदामावशी कंटाळून म्हणाली. राम पुढे काही बोलणार इतक्यात शालूने रामच्या हाती चहा दिला आणि बाळाला घेतलं. मुलगी झाल्यामुळे घरच्यांना निराशा होती, म्हणून रोज अश्या डिवचण्या शालूला खाव्या लागायच्या. शीतल जन्मल्यापासून तिच्या सासरच्या बायकाच येऊन भेटून गेल्या होत्या , आणखी तिच्या नवऱ्याने आपल्या लेकीचं तोंड देखील पाहिलेलं नव्हतं. या सगळ्या गोष्टींचं दुःख तिला होतंच, तरीही स्वतःच्या मुलीवर तिचा फार जीव होता. बोलता बोलता गोदामावशीने मुलीच्या जन्माचा राग काढत सगळ्या गोष्टी रामला सांगितल्या, ते ऐकून तो या लोकांच्या मानसिकतेबद्दल विचार करू लागला. त्याला या लोकाबद्दल त्यांच्या या विचारसरणीबद्दल वाईट वाटले . अजूनही समाजात मुलगा मुलगी हा भेद संपलाच नाही, त्यात शालूं आणि तिच्या लहान पोरीची काय चूक ? हे कुठंतरी थांबायला हवं असं त्याला एकमेकांसोबत खेळणाऱ्या त्या मायलेकींकडे पाहून वाटलं. तितक्यात बाहेरून दादा दादा म्हणत रामची लहान बहीण चिऊ त्याला येऊन बिलगली ,शाळा सुटली होती आपल्या दादाला पाहून तिचा चेहरा उजळला होता,तेवढ्यात मागून रामचे आईबाबा पण आले,सगळीजण रामच्या येण्याने खूप खुश होती. जाता जाता रामने शीतलच्या हाती दहा रुपयांची नोट दिली आणि येतो म्हणून तो घरी परतला.

सायंकाळी चिऊने घर, अंगण व ओसरी झाडून काढली . आईने म्हशीला चारा टाकला,रामच्या घरची म्हैस गाभण होती लवकरच ती एका पिल्ल्याला जन्म देणार होती . चारा टाकल्यावर आई म्हणाली ,देवा खंडेराया म्हशीला म्हैस होऊ दे रे ..तुझ्या पाय पडते ..आईचे हे शब्द ऐकल्यावर रामचे मन परत विचारात गुंतले , त्याने लगेच आईला विचारले ,'' आई , मला सांग बाईच्या पोटी मुलगा व्हावा म्हणून नवस मागतात आणि तू म्हशीच्या पोटी म्हैस व्हावी म्हणून नवस मागतेस असं का ? आई गालातल्या गालात हसली आणि तिने केविलवाण्या नजरेने रामकडे पाहिलं. तिला रामच्या अश्या प्रश्नांची त्याच्या लहानपणापासूनच सवय होती. आपलं लेकरू काहीतरी नवं करेल हे त्या मायबापाला खूप आधीच कळलं होतं. रामचे आईवडील सुशिक्षित नव्हते पण समजायला अश्या कुठल्याच गोष्टीत त्यांच्या मते भेदभाव नव्हता . सगळ्यात जास्त त्यांचा कामावर भर होता .असं का गं आई ? सांग की , रामने पुन्हा विचारलं . बाळा म्हैस दूध देती आणि ती रेड्यापेक्षा जास्त कामाची असती , फायद्यापायी म्हैस असावी असं सगळ्यांना हवं असतं, आणि पोरीचा जीव म्हणलं कि काळजी असती लोकास्नी ,पुढे लगीन ,हुंडा, या गोष्टीचा त्रास नको म्हणून मुलीच्या जीवाला नाकारतात लोकं. पण, पोरगी म्हणजे लक्ष्मी असतिया आपली चिऊ झाली तेव्हा पासून आपल्या घरात लक्ष्मी आली बघ, आम्हाला तुम्ही दोघे सारखेच आहात रे रामा , आईने रामला कुरवाळत त्याच्या डोक्यावरून हातात फिरवला , तू गोदाची किरकिर ऐकली असशील , तिला कितीपण सांगितलं तरी पोरा पुरताच जीव तिचा शालू झाली तवा पण तिला आवडलं नाही आणि आता पण नातू झाला नाही म्हणून शालूला चिडचिड करते ती . ते जाऊदे, या वेळेस जास्त दिवस राहा उगाच लवकर जायची गडबड करू नको , असं म्हणून आई तिच्या स्वयंपाकाला लागली.

रामने त्याची पिशवी काढली, त्याने चिऊ साठी बांगड्या आणल्या होत्या, बांगड्या पाहून चिऊ खूप खुश झाली,बाबांसाठी नवीन दस्ती आणली होती आणि संक्रांतीच्यासाठी रंगबेरंगी काटेतीळ त्याने आणले होते, कारण गावात फक्त साधे पांढरे तीळ भेटत होते. त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली आणि झोपताना रामच्या मनात तोच विचार चालू होता की समाजाच्या या बंधनात आपण आपल्या चिऊला मुळीच फसू द्यायचं नाही. दुसऱ्या दिवशी पारावार कसलीतरी बैठक होती,राम बाबांसोबत बैठकीत गेला , तिथे गावातली बरीच मंडळी जमली होती .रामचे शिक्षक माने गुरुजी पण तिथे होते . तो गुरुजींच्या शेजारी बसला . त्याच्या पुढे सदाभाऊ बसला होता , प्रत्येक चर्चेत पुढाकार घेऊन बोलणारा गावचा हा नावाजलेला माणूस याच्या वाचून कुठलीच चर्चा पार पडत नव्हती .सदाभाऊ माने गुरुंजींना म्हणाला, गुरुजी तुम्हाला दुसरा बी मुलगाच झाला ना वं? हो सदाभाऊ, गुरुजी. त्यावर सदाभाऊ हसत हसत म्हणाला चांगलं हाय , आम्हाला तर पहिल्यांदाच दणका बसला पहिली पोरगीच बघा , यावर गावाची मंडळी खदाखदा हसू लागली, ते पाहून गावाची मोठी मंडळी पण मुलीच्या जन्माबद्दल असं विचार करतात हे पाहून रामला वाईट वाटलं . मुलगी झाली दाणकाच बसला या प्रकाराची त्याला चिड आली. मुलगी झाली तर शांत बसावं उगाच तिच्या जन्माचे हसू करून इतरांना सांगण्यात कसला आलाय मोठेपणा ? अश्या पद्धतीने समाजाच्या नकारात्मक विचारसरणीचे गूढ रामच्या मनात वाढत होते .

संक्रांत म्हंटलं कि बायका -पोरींचा सणं. त्यांचे कार्यक्रम चालतात . पहिल्याच दिवशी रामच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता . घरी बायका पोरींची वर्दळ होती. गोदामावशी ,चांदाक्का,शांताकाकू, आवाडाक्का गल्लीतल्या या सगळ्या बायका बसून बोलत होत्या . राम नुकताच गावात तिळगुळ वाटून आला होता .शालू कुणाशी तरी फोनवर बोलत होती. काय? कधी? केव्हा? बरं बरं सांगते असं म्हणत तिने फोन कट केला . काय बातमी आहे हे ऐकायला बायका उतावीळ होत्या .शालू म्हणाली ,आपल्या पुष्पाताईंच्या मुलगी झाली ते ऐकून शांताकाकू बोलली मुलगीच झाली काय? आ रा रा रा ..असं म्हणत शांताकाकूने तोंड वाकडं केलं.बाकीच्या बायका पण मिच मिच करत होत्या , तेवढ्यात अवडाक्का म्हणाली काय बाई ज्याला त्याला पोरीच व्हायल्यात ...अशी बायकांची कुजबुज चालू होती तिकडून राम हा सगळा प्रकार पाहत होता परत एकदा मुलींच्या जन्मावर स्वतः स्त्री असणाऱ्या या वयस्कर बायकांच बोलणं पाहून त्याला त्यांच्या बोलण्याची घृणा आली. लहानपानापासुन ज्यांनी आपल्याला अंगाखांद्यावर खेळवले अश्या आईच्या मैत्रिणींचा त्याला किळस आला . दुसरीकडे शालू उभी होती , तिला पण यावर काही बोलता येईना , जग पुढे गेलंय तरीही मुलीबद्दलची ही विचारसरणी , समाजमान्य अंधश्रद्धा कधी नष्ट होईल? त्या कोवळ्या जिवावरची बंधने कधी संपतील ? संपली तरी मुूलीला तिच्या मनाने जगू देईल का हा समाज ? कशी जगेल एक मुलगी? अश्या कित्येक प्रश्नांचा गरा रामच्या मनी चालू होता,आणि त्याच्या मनातील मुलगी हे कोडं आणखीच फसून बसलं होतं. रामची नजर शालूच्या चिमुरड्या शीतलवार गेली . ती कालसारखीच हसत एकटक रामकडे पाहत होती .रामला काय वाटले काय माहित त्याने शीतलला उचलून घेतले चिऊला पण सोबत घेऊन तो घराबाहेरच्या देवळाच्या पायरीवर बसला . कारण , या दोन जीवांना समाजाच्या चर्चेपासून त्याला दूर आणायचं होतं,आणि देऊळात बसून तो दिलासा त्याने स्वतःला आणि त्या दोघींना दिला होता. रामला हा प्रश्न वारंवार सतावत होता,विशेष म्हणजे लहानपासूनच या सगळ्या गोष्टी रामच्या आजूबाजूला घडत होत्या. पण त्याला त्याची तेवढी जाणीव नव्हती. जेव्हा तो शहरातल्या वातावरणात गेला तेव्हा त्याने सगळ्या गोष्टी वेगळया पद्धतीने अनुभवल्या, ना कुठला भेदभाव सर्वांचं समान आयुष्य त्याच्या क्लास मधल्या मुली सुद्धा नव्या विचाराच्या होत्या, शहरात त्याने स्वतः गावाकडून आलेल्या मुलींना त्या बंदिस्त वातावरणातून बाहेर पडून स्वच्छंदी पणे जगताना पहिल होतं. कुठेतरी तसं स्वातंत्र्य त्याला गावातल्या मुलींमध्ये आणि स्त्रियां मध्ये दिसत नव्हतं. त्यातल्या त्यात गोदा मावशी, चंदाआक्का, शांताकाकू, आवडाक्का या बायकांना ते नकोच होतं. त्या शेवटपर्यंत बाईचा जीव म्हणुन जगणार आणि इतरांना पण जगवणार हे निश्चित होतं. या सगळ्या गोष्टी रामला समोर दिसत होत्या तशी त्याची बेचैनी वाढत होती, तो पण जिद्दी होता, त्याने पण ठरवलं की या समस्येचे निवारण केलेच पाहिजे, त्या दिशेने रामाने पाउले उचलायला सुरुवात केली.

संक्रांतीच्या एका दिवसानंतर तो शाळेच्या माजी मुख्याध्यापिका खरे बाईना भेटायला गेला. राम नववीत असताना त्यांनी रिटायरमेंट घेतली. बाई सोबत या मुलींच्या विषयावर तोडगा काढावा या उद्देशाने तो गेला. रामला पाहून बाईंना आनंद झाला, रामाने त्यांना नमस्कार केला. बाईंनी विचारपूस करायला सुरुवात केली. कसं चालू आहे कॉलेज? कसा चालू आहे अभ्यास? चांगली प्रगती कर तुझ्यावर घरची जबाबदारी आहे राम. राम यावर हो हो म्हणत होता. पुढे बाईनी विचारलं तुला लहान बहीण आहे ना राम? कितव्या वर्गात आहे ती? बाई, आठवीला आहे ती. रामाने उत्तर दिले. त्या पुढील बाईंचं बोलणं ऐकून राम अवाक झाला, असं एकदम अनपेक्षित घडेल हे त्याला मुळीच वाटलं नव्हतं. बाई म्हणाल्या की चार वर्षे शिकेल ती, तोवर तू पण कामाला लागशील लवकर लग्न लावून टाक तिचं आणि तू मोकळा हो. पुढे शिकवायच्या नादात पडू नकोस, शिकून तरी काय रे घरीच नांदतात पोरी शेवटी. हे सगळं काही ऐकून रामला होत्याचं नव्हतं झाल्यासारखं झालं. स्वतः मुख्याध्यापिका असं बोलत आहेत यावर त्याचा विश्वासच बसेना. पुढे काय बोलाव काय विचारावे त्याला कळेना त्याने चहा घेतला आणि बाईंना नमस्कार करून तो शेताच्या वाटेने निघाला. त्याला जाणवलं की किती खोल ही विचारसरणी गावातल्या लोकांमधे रुजलेली आहे. एवढ की स्वतः खरे बाई पण या विळख्यात गुंतलेल्या आहेत आणि याची त्यांना पण कल्पना नाही. सगळं चित्रं अगदी भयानक होतं. आता पुढे काय? रामचा अपेक्षाभंग झाला होता, वारंवार त्याच्यापुढे चिऊ चा चेहरा येत होता. बाईंचं बोलणं त्याला मुळीच पटलं नव्हतं. आता एवढ्या तेवढ्याने काहीही होणार नव्हतं अर्थातच काहीतरी मोठं कराव लागणार होतं. मुलगी हे कोडं सोडविण्यासाठी खूप वेळ शेतातील त्याच्या आवडत्या बोराच्या झाडाखाली बसुन त्याने विचार केला. संध्याकाळी त्याने माने सरांची भेट घेतली आणि दुसर्‍या दिवशीच्या सकाळच्या गाडीने तो त्याच्या कॉलेजला परतला.

कॉलेजला येऊन त्याने त्याच्या समाजशास्त्राच्या मित्रमैत्रिणींना आणि शिक्षकांना हा गावाकडचा सगळं प्रकार सांगितला.रामला आलेले अनुभव पाहून कित्येक मुली मॅडम चकित झाले होते .या अशा गोष्टी ऐकून त्यांना राग पण आला अखेर विचारविनिमय केल्यावर सर्वांनी रामच्या गावी जाऊन या विचारसरणीला बदलायचं असं ठरवलं, त्यासाठी त्यांनी वेगवेगळे जनजागृतीचे नियोजन केले आणि त्यानुसार तयारी करायला सुरुवात केली . रामने एकदम चांगली वेळ ठरवली होती. तो दिवस होता २६ जानेवारीचा , झेंडावंदन,शाळेतले कार्यक्रम, त्या निमित्ताने दोन -तीन गावातली लोकं एकत्र येतात आणि त्याच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण लोंकाच्या मनातील ही मुलींच्या प्रती असणारी नकोश्या भावनेची जाणीव कढून टाकू असं सगळ्यांनी ठरवलं. तिकडे पण परत येताना त्याने या गोष्टींची कल्पना माने गुरुजींना देऊन ठेवली होती. माने गुरुजींनी मुख्याध्यापकांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. सरपंच गावकरी आणि आजूबाजूच्या गावात या वर्षी २६ जानेवारीचा मोठा कार्यक्रम होणार,बाहेर शहराततून कॉलेजची मुलंमुली सहभागी होणार अशी बातमी पसरली. बाहेरगावातून नवीन मान्यवर आणि कॉलेजची मुले येणार यामुळे या वर्षी कार्यक्रमाला वेगळी शोभा येणार याची उत्सुकता गावकऱ्यांना लागली होती.

२५ तारखेला राम त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिनींना आणि शिक्षकांना घेऊन गावी आला , आपले विद्यार्थी समाजात मोलाचं कार्य करत आहेत हा अभिमान त्या प्राध्यापकांना वाटत होता . आदल्या दिवशी येऊन सगळ्यांनी उद्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरु केली , शाळेमधल्या मुलामुलींना एकत्र घेऊन कुणीतरी प्रथमच इतक्या नव्याने घडणाऱ्या बदलाला साकारण्याची जिद्द हाती घेतली होती. अखेर तयारी संपली आणि उजाडला तो प्रजासत्ताक दिन , राम आणि चिऊ सकाळीच घराबाहेर पडले, बाकी मंडळी शाळेतच मुक्कामाला होती. सकाळी प्रभातफेरी निघाली आणि या वेळेस फेरीमध्ये मुलींना समोर करण्यात आलं, समोर सावित्रीबाई, झाशीची राणी ,जिजाऊ , किरण बेदी, या महिलांच्या रूपात मुलींना सजवलेलं होतं . मुली पुढे होऊन घोषणा देत होत्या, देशभक्तीची गाणी म्हणत होत्या, त्यांच्या मागे मुले आणि शेवटी राम आणि त्याचा संघ होता. अशा नव्या प्रभातफेरीकडे गावाची लोकं अतिशय कौतुकाने पाहत होती , आपल्या घरचं किंवा गल्लीतलं लेकरू कुठे दिसतंय काय हे सगळी जण त्या घोळप्यात शोधत होती. त्यानंतर सगळी शाळेसमोर झेंडावंदनासाठी जमली, आणि या प्रसंगी मुख्याध्यापकांनी समोर येऊन सरपंचाच्या पत्नीला ध्वजारोहणासाठी समोर बोलावलं ते पाहून सगळी लोकं आणि विद्यार्थी चकित झाले. या वेळेस झेंडा चढवायला सरपंच बाईंना कसं काय बोलावलं हे त्यांना कळेना . मग मुख्याध्यापकांनी सांगितलं की आपल्या गावतील मुली व स्त्रियांच्या विकासासाठी आपण अशी नवी सुरवात करत आहोत. झेंडा चढवला , झेंडा झळकताच राष्ट्रगीत सुरु झालं आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.

सर्वात आधी लहान वर्गातल्या मुलांची नृत्य झाली, इवल्याश्या लेकरांना नाचताना गावची लोक कौतुकाने पाहत होती , माने सरांनी सगळ्यांकडून जबरदस्त भाषणाची तयारी करून घेतली होती, मुलामुलींनी एकाहून एक दमदार भाषणे सादर केली. त्यानंतर कर्तुत्ववान स्त्रियांच्या आयुष्यावर काही नाटके सादर करण्यात आली. त्यानंतर राम आणि त्याच्या मित्रांनी पथनाट्य सादर केले. त्यातून मुलींना पण समाजात महत्त्व आहे, सगळयांना समान हक्क आहे, त्यांच्या शिक्षणासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे हे त्यांनी प्रखरतेने सादर केले. मुलींच्या आयुष्याची विटंबना त्यांनी विविध प्रसंगातून दाखवली ते प्रसंग पाहून गावकऱ्यांच्या अंगावर काटाच आला. त्याच्यानंतर शहरातून आलेल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं त्या पाहुण्यांमध्ये शहरातील डॉक्टर, पोलीस, समाजसेविका, वकील, उद्योजक अश्या यशस्वी महिलांनाच बोलावलं होतं, त्या सगळ्यांनी आपापल्या आयुष्याचे अनुभव आणि स्त्री शिक्षण काळाची गरज आहे हे सांगितले. डॉक्टर मॅडमनी मुलीच्या जन्माचे स्वागत करा, त्यांना दुहेरी वागणूक देऊ नका, मुलगा मुलगी समान असतात हे आपुलकीच्या शब्दात सांगितलं. स्त्रियांवर होणाऱ्या विविध प्रसंगाचे गांभीर्य त्यांनी लोकांना सांगितले ते गंभीर प्रसंग ऐकून गावच्या बायका अवाक झाल्या, भीती पायी अससस.... आणि देवाची नावे त्यांच्या तोंडून निघू लागली, त्या तोंडाला पदर लावून सगळं काही ऐकत होत्या, शेवटी स्त्री सक्षमीकरण यावर बोलून डॉक्टरांनी भाषण संपवलं.

सगळ्यांच्या भाषणाने स्त्रीयांना जगाव्या लागणार्‍या परिस्थितीची जाणीव लोकांना झाली होती. मग राम आभार प्रदर्शनासाठी आला त्याने त्याला आलेले सगळे अनुभव सांगितले त्याच बरोबर गावातल्या लोकांनी मुलींना त्यांचे हक्क देऊन, त्यांच्या प्रति आदर करायला सांगितले. आज जर आपण आपल्या मुलींना शिकवले तर उद्या त्या पण या सर्व महिलांसारख्या मोठ्या होऊन इतर लोकांना जागरूक करतील आपल्याच गावाचं नाव उंचावतील. अखेर या सर्व स्त्रिया आहेत म्हणुनच आपण आहोत असं म्हणत त्याने चिऊ कडे आणि आईकडे पाहिलं त्याचे डोळे पाणावल्यागत झाले त्याने निरोप घेतला. त्यानंतर सगळ्या मुलींनी सगळ्या गावकऱ्यांना कार्यक्रमासाठी बनवलेल्या बेसणाच्या वड्या दिल्या. त्या मुलींचा आनंद आणि प्रेम पाहून सार्‍या लोकांची मने पण भरून आली. राम आई व चिऊ जवळ गेला, बाजूलाच गोदामावशी तिच्या नातीसोबत खेळताना त्याला दिसली, तिकडे सदाभाऊ पण त्याच्या मुलीला कुरवाळताना दिसला. ते सर्व चित्र पाहून त्याला दिलासा मिळाला, कारण कुठेतरी त्याच्या कार्याचं सार्थक झालं होतं. शेवटी हा एक बदल आहे, तो एका दिवसात होणे शक्य नाही पण एक सुरुवात रामच्या विचाराने आज केली होती. मुलगी हे काही कोडं नाही हे सगळ्यांना समजलं होतं.


Rate this content
Log in

More marathi story from Mangesh Phulari

Similar marathi story from Inspirational