बालपण...एक मार्गदाता!
बालपण...एक मार्गदाता!
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।
ज्याचे अंगी मोठेपणा । तया यातना कठीण ।।
तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।।
-संत तुकोबाराय.
*पूर्वी एखाद्या वस्तू मध्ये थोडासा बिघाड झाला तर ती वस्तू दुरुस्ती करून घेऊन वापरण्याकडे लोकांचा कल होता. त्याचे कारण म्हणजे घरबसल्या लोकांना या वस्तू दुरुस्त करून मिळायच्या.*
*पूर्वी तांबे-पितळेची भांडी लोक वापरत असत. कधी कधी जास्त वापर झाला की भांडी गळायला लागत. मला आठवतंय माझी आजी माझ्या आईला सांगायची ‘जा ग, जरा पातेल्याला ‘चाती’ बसवून आण, लहानपणी ते काही कळायचे नाही. पण मला आठवतेय पूर्वी दारावर अशा दुरुस्त्या करणारी माणसे यायची. त्यांच्या ठराविक आरोळ्या असत. बहुतेक दुपारच्या वेळात हे लोक यायचे. ‘बंबाला, पिंपाला डाग देणार, फुटकी भांडी नीट करणार.’*
*ही माणसे घरी येऊन म्हणजे वाड्यातच गळणारे बंब, पिंप, गळणारी पातेली, तपेली सगळ्यांना डाग देऊन किंवा चाती बसवून दुरुस्त करायचे. त्यांच्या जवळ दुरुस्तीचे सगळे सामान असायचे.*
*अजून एक म्हणजे, ‘डबे बनवणार, झाकणे बनवणार, चाळणी बनवणार’ असे ओरडत काही लोक यायचे. पूर्वी ‘डालडा’चे डबे मिळायचे. त्याला खूप लोक झाकणे बनवून वापरायचे. किंवा तेलाचे मोठे डबे मिळत. त्याचेही गोल डबे किंवा त्यालाच पत्र्याची झाकणे बनवून घेत.*
*त्या माणसाच्या खांद्यावर एक लोखंडी पेटी असे, त्यात पत्रा कापण्याची मोठ्या दांड्याची कात्री व अन्य बरेच काय-काय सामान असे. आणि ते डबे, झाकणे बनवताना बघायला खूप मजा वाटायची. मग वाड्यातल्या सगळ्या लहान मुलांचा तेवढा वेळ तिथेच त्याच्या भोवती मुक्काम असायचा. अगदी थोड्या वेळात सफाईदारपणे डबे, डब्यांची झाकणे अंगणात बसून तयार व्हायची. त्याच्या जवळ पत्रा पण असायचा, जरुरी प्रमाणे त्याचाही वापर करायचा. व हे सारे थोडक्या पैश्यातच व्हायचे.*
*‘छत्री दुरुस्ती’, छत्रीच्या काड्या बदलणे, छत्रीचे कापड नीट करणे इत्यादी दुरुस्त्या करणारे कारागीर यायचे. मोडक्या छत्र्या थोडक्या पैश्यात घरी दुरुस्त करून मिळायच्या. त्याच्या खांद्यावर एक पिशवी, व त्यात एक चपटा चौकोनी लोखंडी डबा असायचा त्यात दुरुस्तीला लागणारे खूप सारे सामान असायचे. पिशवीत छत्रीच्या काड्याही असायच्या.*
*‘नाव घालायची, ..भांड्यावर नाव..’ अशी एक आरोळी देत धोतर, शर्ट व टोपी घातलेला माणूस यायचा. त्याच्या कानावर नाव घालण्याचे साधन-पंच ठेवलेले असे, व एका कानावर हात ठेवून तो आरोळी द्यायचा. ते ‘नाव’ असं म्हणण्याच्या ऐवजी, ‘नामु घालायची नामू’, असेच काहीसे ऐकू यायचे.*
*घरी येऊन त्याच्या जवळच्या लहानशा हातोडी आणि High Carbon Steel पंचने ठोकून, तो भांड्यांवर सुबक नावे घालून द्यायचा. हल्ली मशीनने नाव घालतात. अगदी डझनाच्या हिशोबाने भांडी असायची. दुपारी पाठीवर पोते घेऊन तांबे, पितळेची मोड घेणारा माणूससुध्दा दारावर यायचा. पूर्वी पितळी Stove वापरायचे खूप लोक. ते सुध्दा दुरुस्त करणारा माणूस दारावर यायचा.*
*तसेच, तांबे पितळेच्या भांड्यांना ‘कल्हई’ करणारी माणसे तर ‘कल्हईची भांडी कल्हई’ अशीही आरोळी असायची. पितळी ताटे, वाट्या, पातेली अशा सगळ्या भांड्यांना कल्हई करत, लगेच त्यांचे रुप एकदम पालटत असे. भांड्यांना कल्हई म्हणजे एक मोठा कार्यक्रमच असायचा घरी ! कल्हई करताना बघताना खूप मजा वाटायची. एक वेगळाच वास यायचा - नवसागराच्या धुराचा. नवीन कल्हई केलेल्या भांड्यात जेवताना खुप छान वाटायचे. हे सगळे करत असताना माझी आजी व आई त्यांच्याशी पैसे ठरवताना घासाघीस पण करायच्या. भांड्यांची कल्हई यावर एक वेगळा लेख लिहिता येईल.*
*फार पूर्वी पिंजारी देखील दारोदारी येत. त्यांच्या खांद्यावर भलेमोठे धनुष्य-सदृश्य - तुणतुणे वाटेल - असे अवजार असे. कापसाच्या जुन्या गाद्यांमध्ये वापराने गोळे पुंजके होत. पिंजारी तो जुना कापूस पिंजून झकास reconditioned उशा-गाद्या बनवून देई.*
*तर असे होते हे दारावर येणारे तंत्रज्ञ ! अगदी घरीच थोड्या वेळात, थोड्या पैश्यात अगदी डोळ्यासमोर दुरुस्ती व्हायची. कुठे हेलपाटे नाहीत, धावपळ नाही, की काही नाही. लहानपणी हे घराच्या अंगणात बसून बघताना खूप मजा वाटायची. हळूहळू सगळे बदलले व या कसबी जमाती गायब झाल्या. नामशेष झाल्या.
- *खेळ* - माझ्या काळात विटी - दांडू, झोका चढवणे, लपा- छपी, अरा - धरी, पोहणे, मामाची टोपी हरवली, फुगडी, चोर - शिपाई चिठ्ठ्या, अश्या अनेक प्रकारचे जूने खेळ खेळायचो; अन् खेळून उशीरा घरी आल्यावर आईच्या हातचे मार आयो - बाबो sss म्हणत, नाही जाणार ना आता परत खेळायला... अन् माराची मजा न्यारीच असायची.
जसे तारुण्यात पदार्पण केलं तसेच हळूहळू सर्व काळाच्या पडद्याआड गेलं ... आता त्या आठवणी आठवताना मन खुपचं गहिवरुन येतं हो...!
डोळ्यांमधून पाण्याचा दंड केंव्हा फुटेल सांगता येत नाही. सांगण्यास खूप आहे... आता विराम घेतो आणि ह्या जीवनाला धन्यवाद देतो की खरंच... आम्हाला असं जीवन जगायची संधी निसर्गानं दिली...
मी हंसराज निसर्गाचे मनापासून आभार व्यक्त करतो की मला भक्कम पाया असणारे अनुभव, मित्र, सबंध, आई- बाबा, भाऊ - बहीण, आणि अर्धांगी प्रदान केली... निसर्गाचे पुनः एकदा आभार...!
-बुद्ध म्हणतात-
आपल्या मुलाचे, आपल्या एकुलत्या एक मुलाचे, स्वतःच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या आईप्रमाणे, प्रत्येकाने सर्व प्राणिमात्रांबद्दल अमर्याद प्रेम आणि करुणेचे हृदय जोपासले पाहिजे. आई आणि वडिलांना आधार देणे, पत्नी आणि मुलांचे पालनपोषण करणे आणि शांततापूर्ण व्यवसायात गुंतणे - हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे.
