अविस्मरणीय अनोळखी दिवस
अविस्मरणीय अनोळखी दिवस
जीवनामध्ये काही अनुभव हे अगदी लक्षात राहण्यासारखे असतात. कधी कधी अनोळखी व्यक्तींच्या रुपाने देव आपल्या मदतीला येत असतो पण् हे त्यावेळी लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येते त्यावेळी उशीर झालेला असतो. असाच मलासुध्दा अनोळखी सहकाऱ्यांच्या सहकार्याचा एक सुरेख अनुभव मिळाला. आपण म्हणतो अनोळखी व्य्क्तिच्यांवर विश्वास ठेऊ नये परंतू मला त्या एका दिवसात भेटलेली सगळीच अनोळखी तरीही मदत करणारी माणसे आजच्या जगात अनुभवायला मिळाली. त्यांची नांवेही मला आज आठवत नाहीत. मी ही त्यांना आठवत नसणार. कदाचित हे मी लिहलेले ते वाचतील की नाही हे ही मला माहीत नाही तरीसुध्दा त्या सर्वाना मनापासून थँक यू म्हणण्यासाठी हा सगळा लेखनप्रपंच.
साधारण 6-7 वर्षापुर्वीची गोष्ट. त्यावेळी मी सांगली येथील कृषी महाविदयालयात नोकरी करीत होते. सध्या मी तिथे नोकरी करीत नाही. कृषी महाविदयालयाची कामे ही म.फुले कृषी विदयापीठ, राहुरीशी निगडीत असतात त्यामुळे कधी कधी कामानिमित्त राहुरी येथे जावे लागत असे. मलासुध्दा असेच एकदा कामासाठी राहुरी येथे जाण्याचा प्रसंग आला. आमच्या कॉलेजचे काम पाहणारे श्री. वंजारे सर म्हणजे सहकार्याची वृत्ती असणारे आणि आम्ही खूप लांबून कामासाठी विदयापीठात येतो त्यामुळे आमचे काम लवकरात लवकर संपावे जेणेकरुन स्त्रीवर्गाला तेथे मुक्काम करावा लागू नये यांकडे कटाक्ष् असणारे असे एक हसतमुख व्यक्तिमत्व.
मी कामासाठी गेले त्या दिवशीसुध्दा सरांनी माझे काम लवकर आटोपले आणि तुम्ही आता कशा जाणार याबाबत विचारले. तुमची पुण्यापर्यत जाण्याची व्यवस्था होईल कारण् कृषी महाविदयालय पुणेचे दोन प्राध्यापक त्यांची गाडी घेऊन आले आहेत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर कॉलेजपर्यत जाऊ शकता असे सांगितले. सरांनी लगेच दोन्ही सरांशी माझी ओळख् करुन दिली आणि या मॅडमना तुम्ही पुण्यात आपल्या कॉलेजपर्यत सोडले तरी चालेल असे सांगितले. त्याप्रमाणे मी त्यांच्या बरोबर राहुरीमधून निघाले. जरी ते प्राध्यापक चांगले होते तरी कधीही अनोळखी, पहिल्यांदाच भेटलेल्या कोणत्याही व्यक्तिंबरोबर जाताना कोणत्याही स्त्रीच्या मनात शंका, घबराहट ही होणरच ना. तसेच माझेपण झाले होत परंतु मी स्वामी समर्थांवर भरवसा ठेऊन निघाले होते. मनांत स्वामींचे स्मरण् करीत होते.
आम्ही थेाडे अंतर पुढे आल्यानंतर एका सरांनी मली त्यांची सासूरवाडी येथेच
जवळ आहे. तेथे जाऊन आपण पुढे जाऊया तुम्हाला कांही अडचण् नाही ना असे विचारले. मी त्यांच्या बरोबर येत होते त्यामुळे मी काय बोलणार..आम्ही त्यांच्या सासूरवाडीला पोहचलो. त्यांच्या सासूरवाडीचे घर म्हणजे शेतातील एक छोटेसे टुमदार झोपडीवजा घ्रर. मातीने सारवलेल्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन, बाहेर अंगणामध्ये चूल, समोर हिरवीगार डोलत असलेली पिके वा..वा..किती छान..मी असे फक्त चित्रात बघितलेले प्रत्यक्षात अनुभवत होते. घरांतल्यांनी गेल्यावर पाणी आणि गुळाचा खडा
खेडेगांवातील प्रथेप्रमाणे दिला. आणि आता जेवण करुन जायचेच असे आग्रहाने सांगितले. मी गुपचुप इकडेतिकडे बघत बसले होते. कोणी ओळखीचे ही नव्हते त्यामुळे बोलणार तरी काय असे अवघडल्यासारखे झाले होते. जेवणाचा बेत पण अगदी झकासच होता. चुलीवरची गरमागरम भाकरी, शेतातल्या ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी, दाण्याची चटणी, तळलेले कुरडई पापड खूपच आठवणीत राहिलेला बेत..अजुनही त्याची चव जीभेवर रेंगाळते आहे. इतके रुचकर आणि चविष्ट जेवण करुन आम्ही निघलो. मॅडम पुन्हा आलात की आठवणीने या असा निरोप त्यांनी मला दिला. परंतू दुर्देवाने आज मला ज्यांच्याकडे गेले, जेवले त्या आडवळणावरील गांवाचे नांव आठवत नाही.
मला खरंच मनातून खूप अवघडल्यासारखे झाले होते. एकतर कांही ओळख नसताना मी त्यांच्या गाडीतून आले होते आणि आता तर त्यांच्या सासूरवाडीला जाऊन जेवण. सगळेच अनाकलनीय आणि अवर्णनीय होते. शेतकरी माणसे किती आपलेपणाने वागणारी आणि माणुसकीला जपणारी असतात याचा प्रत्यय आला. आपण शहरातील कोणी अनोळखी माणूस दाराबाहेर आला तर त्याला पाणी पण देताना विचार करतो जेवण तर खूपच दूर. माझया मनातली अनोळखी भीती केव्हाच पळून गेली होती आणि मी पुढचा प्रवास निवांतपणे करीत होते. आयुष्यात अशी चांगली अनोळखी माणसे भेटली त्यांच्यामुळे माझी येण्याची, जेवणाची, पुण्यापर्यंत सुखरुपपणे पोहचण्याची सगळी व्यवस्था झाली होती. आता इतकी वर्षे झाली तरी हा दिवस माझया चांगला स्मरणात आहे. जेव्हा मी सगळयांना हा प्रसंग सांगते त्यावेळी श्री. वंजारे सरांच्या रुपाने स्वामींनीच माझी काळजी घेतली हे सांगायला विसरत नाही. त्यामुळेच मी श्री. वंजारे सर, कृषी महाविदयालय, पुणे येथील दोन प्राध्यापक, त्यांच्या सासूरवाडीमधील कुटुंबीय यांना थँक यू न म्हणता त्या सर्वांना आणि त्यांनी दिलेल्या सहकार्याला शतशः प्रणाम करते.