अशी मी...
अशी मी...
उमा वय वर्षे अठरा, रंगाने गोरी पान, मजबूत बांधा समाजातील मागास समजल्या जाणाऱ्या कुळात जन्मलेली पण स्वातंत्र्य पूर्व काळातही टोपलीभर दागिने असलेल्या घरात जन्मलेली एकुलती एक मुलगी! दोन भावात एकच बहीण म्हणून आई वडील आणि दोन्ही भावांची लाडकी, लाडा-कौतुकात वाढलेली! घरकामाची अजिबात सवय नव्हती. रमाचे वडील मुकादम होते, लोकांना व्याजाने पैसे द्यायचे आणि चोपडीत सुंदर तिरकस अक्षरांत लिहून ठेवायचे. मुंबईत छोटीच पण दोन घरं होती. मोठा भाऊ कष्टाळू तर धाकटा स्वतःच्या विश्वात रममाण आणि आई गृहिणी पण बाणा करारी होता.
उमाला अठरा वर्षाची असतानाच तिला स्थळं बघायला सुरुवात झाली कारणही तसेच होते, तिच्या आईला कॅन्सर असल्याचे कळले होते, जगण्याचे दिवस फार कमी होते. एकुलत्या एक मुलीचे सुख पाहावे म्हणून घाई सुरु होती.
रमेश हा एक शांत,सुस्वभावी, मितभाषी, संयमी मुलगा होता. चार बहिणी आणि दोन भाऊ आई वडील असा मोठा परिवार होता. वय जास्त नव्हते, सहज मित्रांसोबत कार्यक्रमासाठी आला असता उमा त्याला आवडली आणि तिची घरची स्थिती समजली तो लगेच लग्नाला तयार झाला. त्याच्या घरी गरिबी होती. दोन वेळा जेवणाची मारामार होती. नोकरीं साधीच होती. दिसायला तोही उमदा तरुण होता. साखरपुडा पार पडला. दोन -चार दिवसात आई गेली. अतीव दुःखातून सावरत पुढच्याच महिन्यात उमाचे लग्न झाले. रमेशला राहायला घरं नव्हते. मोठ्या भावाचे दहा बाय दहाचे घर चार जणांचे कुटुंब त्यात एक अविवाहित बहिणी त्यात उमा आणि रमेशची भर !लग्नात मोठया भावाने पैसा उकळला आणि खर्च मात्र काहीच केला नाही. साखरपुड्यातही रमेशने रोजच्या वापरातील सदरा धुवून इस्त्री करून घातला होता.
लग्नात रमेशची पडती बाजू सासऱ्यांनी सांभाळली होती.उमाला मोठ्या कुटुंबाची सवय नव्हती पण तिने सर्व काही मनापासून स्वीकारले होते. सुरुवातीला त्यांना मनाप्रमाणे जगता आले नाही. जाऊबाई घरातील सर्व कामं उमाला सांगायच्या. संध्याकाळी रमेश कामाहून आला की दोन्ही पोरं त्याच्यावर सोडून आरामात झोपा काढायच्या.रमेशला उमाचे हाल पाहवत नव्हते पण पर्याय नव्हता. कंटाळून गावी जायचं ठरलं. उमा गावी आणि रमेश मुंबईला राहणार होता. सासूला उमा पटत नव्हती कारण रमेशने घाईने समोरच्या व्यक्तीची अडचण ओळखून लग्न केले होते. रमेशची आई अजूनही रोजंदारीने मळ्यात कामाला जायची, त्यांच्या घरी अठराविश्व् दारिद्र्य होते, लहानपणापासून रमेशच्या वाट्याला भाकरीचा चतकोर तुकडा यायचा पण तक्रार नसायची. लिहिण्यासाठी वर्षभरासाठी कशीबशी एकच वही मिळायची त्यावर वहीच्या सुरवातीच्या टोकापासून रमेश पेन्सिलने लिहायचा, वही संपायला नको म्हणून. पण कुरकुर नाही कसली!!तालुक्याच्या गावी रोज पाच मैल पळत जावे लागायचे तेही उपाशी पोटी, सांगणार कोणाला?
आईही उमाला टोमणे मारत सारखे 'घर बघ बांधून 'म्हणायची. रमेश मुंबईला कारकून म्हणून होता.तो पैसे गावाला पाठवायचा.
सततच्या कामामुळे व पतीच्या विरहामुळे उमा दुबळी होऊन आजारी पडायला लागली. रमाच्या वडिलांना तिची फार काळजी होती, त्यांनी जावयाला भाडोत्री म्हणून दोन कुटुंब एकत्र होती अशी जागा पाहून दिली. उमाला आनंद झाला तिने छोट्याश्या जागेत संसार मांडला. थोडे दिवसात बाळाच्या आगमनाची चाहूल लागली.रमेशला उमाला सर्व झेपेल का ही चिंता होती, त्याला तिच्या माहेरच्या सुखाची जाणीव होती, तो तिला तेव्हढे सुखी ठेवू शकत नव्हता त्याला मनात खंत वाटायची.
मुलगी झाली!! गोरीपान नाव शुभ्रा. माहेरपणाला गेली तेव्हा घरचे वासे फिरलेले जाणवले, दोन भाऊ वाटणी झाली. वडील कधी इकडे,कधी तिकडे! साडीचोळीही भावांनी नाही तर वडिलांनी केली. लवकरच ती घरी परतली, आजूबाजूच्या बायांनी बाळाला न्हाऊ माखू घालायचे शिकवले. परिस्थिती माणसाला शिकवते हेच खरं! उमाला परिस्थिती सर्व शिकवत होती आणि ती शिकत होती.बापाचे काळीज मात्र पोरीच्या काळजीने पिळवटून निघत होते.
डोंबिवलीला पागडीवर स्वस्त घरं आहेत समजले आणि वडिलांनी गूपचूप रमासाठी घरं घेतले. जावयांना माहित होते फक्त!
त्यावेळी डोंबिवली म्हणजे माळरानच. नवीन जागेत आल्यावर उमाने स्वतः कुटुंबासाठी हातभार म्हणून नोकरीं साठी अर्ज करायला सुरुवात केली. शुभ्रानंतर दोन वर्षांनी शेखर झाला तोपर्यंत रमेशला त्याच्या खडतर तपश्चर्येचं फळ म्हणून मुंबई हायकोर्टात लिपिकाची नोकरीं मिळाली. आनंद झाला पण तोही जास्त टिकला नाही.उमाच्या वडिलांचे घारे डोळे सरकारी दवाखान्यात चुकीची औषधं दिल्यामुळे कायमचे गेले. वडील पराधीन झाले, रमा खूप रडली पण इलाज नव्हता. वडिलांचे खूप हाल सुरु झाले, अन्नपाण्यावाचून वडील गेले हे कळताच तिचा संयमाचा बांध तुटला. पितृछत्र ही हरपले,तिचे माहेरपण संपले. एका धनवान माणसाचा मृत्यू असा व्हावा! नियतीपुढे कोणाचे चालत नाही हेच खरं! वडिलांचे छत्र हरवल्यापासून उमाने कंबर कसली आणि परिस्थितीशी लढायचे ठरवले. तिने केलेल्या नोकरीच्या अर्जाला एका नामांकित शाळेतून होकार आला. आकाशच ठेंगणे वाटू लागले पण दिलेल्या कालावधीत डी. एड पूर्ण करण्याची अट होती. तिने जोखीम स्वीकारली. संसार, मुले सांभाळून तिने शिक्षण घेतले. तिची खूपच फरफट होत होती, पण मुलांना खूप शिकवायचे होते तिला. मुले मोठ्या शाळेत जाऊ लागली. इंग्लिश बोलायला लागली की तिला खूप समाधान वाटायचे.
रमेशही दरम्यानच्या काळात बी. ए. पास झाला आणि चांगल्या कामामुळे पदोन्नकी घेत विभागीय अधिकारी झाला. दिवस बदलले, सुखाचे भरभराटीचे दिवस आले. वयाची पन्नाशी गाठताना रमेश राजपत्रित अधिकारी तर उमा एम. ए. बी. एड झाली. आता मात्र त्यांनी भूतकाळाला मागे टाकत दोघांची पावले उज्वलभविष्याकडे वाटचाल करीत होती. मुले मोठी होत होती, एकाची दोन घरं झाली होती. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत शुभ्राने आईचा वारसा पुढे नेला ती शिक्षक झाली तर शेखर एम. बी. ए झाला. लाखभर पगाराची नोकरी मिळवली होती. पण उमा आणि रमेशचे पाय जमिनीवरच होते. आयुष्याची एवढी स्थित्यंतर पाहिल्यावर त्यांना कशाचेही अप्रूप वाटत नव्हते. त्यांनी मुलांना प्रामाणिकपणे येईल त्या परिस्थितीला तोंड देत कसं जगावं हे शिकवलं होतं. मुलांनीही आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली होती. जगातील सारी सुखं त्यांच्या पायाशी लोळणं घेत होती. दोघांनाही कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते.
"दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!"
