अशी ही दिवाळी
अशी ही दिवाळी
रामा आणि रमा हे मस्त जोडपं. हसतखेळत आनंदी कुटुंब होतं. कुंभाराचा व्यवसाय होता. मातीशी नाळ जुळलेली होती. दिनरात मातीत कष्ट करायची. माती आणणे, गाळणे, चाळणे, भिजवणे, सुंदर सुंदर मडकी, सुरई, पणत्या बनवणे ही कला अप्रतिम दिली होती देवाने. गरिबीचा संसार पण समाधान असायचे जीवनात. दोघांच्या जीवनात ज्योती नावाची मुलगी पणती बनून तेवत होती. गरिबीच्या अंध:कारमय आयुष्यात तेजाची ज्योती प्रकाश द्यायची. ज्योती चौथीच्या वर्गात शिकत होती. रामा म्हणायचा, "लेक माझी लय भाग्याची. मी गरिबीत दिस काढीन पण माझ्या लेकीला लय मोठं करीन, लय शिकवीन. तशी ज्योती चुणचुणीत, हुशार मुलगी तिच्या डोळ्यात हुशारीचे तेज झळकत होते.
भाद्रपद महिना आला. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू होती. मस्त गणेशमूर्ती बनवण्याचे काम रमा आणि रामाने घेतले होते. ज्योतीही त्यांना रंगकामात मदत करायची. पावसाळा होता. त्यातच पावसाने जोर धरला. मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. वरचेवर पाऊस काही थांबायचे नावच घेईना. घराघरात पावसाचे पाणी घुसू लागले. पाण्याचे तांडवनृत्य सुरू झाले. पावसाने नदीने धोक्याची पातळी ओलांडली. रामा आणि रमाचा संसार उध्वस्त झाला. सगळे घरातील समान, धान्य, वस्तू वाहून गेले. गणेशमूर्तींचे खूप नुकसान झाले. कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. डोळ्यातील आसवांनाही पूर आला. पाहतापाहता काडीकाडी जमवलेला संसार कोलमडला. सगळीकरून थोडीथोडी कशीबशी मदत मिळत होती, पण डोळ्यासमोर सुखी संसार मातीमोल झाला. झाडं कोलमडली घरटी कोसळली, पक्षी पुन्हा नव्याने घरटी बांधायला लागली. हे बघून प्राण्यांकडून, पक्ष्याकडून एक संदेश घेत डोळे पुसले आणि पुन्हा नव्याने सुरवात केली. पावसाचा पूर ओसरला तसतसे घराची ओढ लागून राहिली. स्वतःला सावरत सावरत रमा, रामा, ज्योती घरी परतले आणि पुन्हा संकटाशी सामना करत, गरिबीशी झगडत राहू लागले.
दिवाळी आली. या वर्षी पहिल्यांदाच दिवाळीत पाऊस मुसळधार पावसाने थैमान घातले. चिखल खूप झाला. माती आणता आली नाही. यंदाची दिवाळी खूप अंध:कारमय जाते की काय असे वाटू लागले. रामा, रमाला झोप येईना. झोपेतही चिंता सतावू लागली. किराणा आणायचा राहिला, सगळीकडे दिवाळी फराळ सुरू झाला, पण रमा मात्र किरणाची वाट पाहतेय. आजूबाजूच्या खमंग वासाने ज्योती खूप खुश व्हायची.
ती म्हणायची, आई ए आई आपल्याला कधी करायचं गं गोडधोडाचे पदार्थ... मला लाडू लय आवडतो बग... बनव बरं का?
व्हय गं बाई माझी माय बनिवणार नं...
खोटंखोटं समजूत घालत कसंतरी ज्योतीला मनवायचा प्रयत्न करत होती. डोळ्यातील आसवं लपवत होती. गरिबांची दिवाळी कशी असायची. चटणी भाकर जरी मिळाली तरी खूप. लोकांच्या घराघरात दिवे लावणाऱ्या हातात मात्र अंधार होता. दिव्याखाली अंधार असतो त्याप्रमाणे. ज्योतीला वाटायचं शेजारी मैत्रिणीचे नवे कपडे, फटाके, पाहून मनात वाटायचे मला का नाही मिळत हे सारं सुख. दिवसभर रस्त्यावर पणत्या विकायला बसले पण पाऊस काही थांबेना. पावसामुळे पणत्याही कोणी विकत घेईना. वारं, पाऊस सरसर अचानक कोसळणाऱ्या सरींनी अंगणात दिवेही लावता येईना. रमा नाराज होत होती. पण निसर्गापुढे कोणाचे चालते. चोच देणारा परमेश्वर दाणाही देईल, अशी श्रद्धा होती दे
वावर. घरीतर देवाचा दिवा लावायलाही तेल नाही. लोकं नंदादीप लावतात. देवा कुठून आणू एवढे तेल एवढ्या तेलात तर माझी दोन दिवसाची भाजी होईल. परमेश्वरा काय सत्वपरीक्षा पाहतोय रे? काय गुन्हा केलाय आम्ही म्हणून तू आम्हाला शिक्षा देतोस?
संकटावर संकटं येत होती, आकाशात दुःखाचे मळभ साचतच होते. दुःखाचे सावट काही केल्या कमी होईना. आनंदाचे प्रकाशकिरण कधी घरात येतील, असे झाले. आपल्या आईवडिलांची परिस्थिती पाहून ज्योती खूप नाराज झाली. बाईंनी शिकवलेला धडा आठवला. अश्रूंचे झाले मोती... तिनेही आई-बाबांना मदत करायचे ठरवले. अमावास्येचा दिवस दारोदार जाऊन पणती विकू लागली.
"घ्या हो बाई पणती", एक पणती आपल्या आयुष्यातील अंधःकार दूर करेल... माता लक्ष्मी प्रसन्न होईल." काकू, माई, अक्का... घ्या हो पणत्या... गल्ली-बोळात जाऊन ज्योती पणत्या विकू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचे तेज झळकत होते. पाहतापाहता चांगलेच पैसे जमा झाले. संध्याकाळ होत होती. जमा झालेल्या पैशातून ज्योती थोडेसे तेल, लक्ष्मीचा छोटा फोटो, एक फुलांचा हार, छटाक पेढे घेऊन पळतपळत घरी गेली. आई आश्चर्यकारक नजरेने बघत होती.
आई ए आई... चल गं लक्ष्मी देवीची पूजा करू.
ज्योतीने छान पणत्या पेटवल्या सगळ्या अंगणात एक एक पणती ठेवू लागली. रामा, रमा, ज्योतीने लक्ष्मीची मनोभावे पूजा केली. शिऱ्याचा नैवेद्य दाखवला. चटणी, भाकरी, शिरा आनंदाने खाल्ला. मनोभावे प्रार्थना केली.
हे माते आम्हाला आधार दे. कष्ट करण्याची ताकद दे. जीवनात अंध:कारावर तेजाने विजय मिळवू दे. आमचं आयुष्य सूर्य तेजासारखं प्रकाशमान होऊ दे...
प्रार्थना करतकरत ज्योती झोपली. खूप थकली होती. आई-बाबांना लेकीचं खूप कौतुक वाटलं. जीवनात कधी निराश व्हायचं नाही. यालाच तर जीवन म्हणतात हा धडा घेत रमा आणि रामाची पाडवा पहाट उजाडली. सकाळीसकाळी ज्योती उठली पाहाते तर काय सुंदर सूर्योदय झाला. रविराज हळू हळू पूर्वेला गोल केशरी गोळा उगवत होता. आकाश निरभ्र होते. दारात सुंदर रांगोळी रेखाटली होती. ज्योतीने पाडव्याला रामाला औक्षण केले, उटणं लावून अंघोळ घातली. रामाच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. लेकीला ओवाळणी काय घालू?
ज्योतीने बाबांना समजावले,"बाबा ओवळणीचे काय हो... तुमचा आशीर्वाद, प्रेम लय हाय माझ्यासाठी. मी शिकून मोठी होईल, खूप अभ्यास करीन, तुमचं नाव समद्यांनी काढलं पाहिजे.
एवढं मोत्यासारखं बोलणं ऐकून रामाला राहवलं नाही. त्याचं मन भरून आलं. लेकीचे शब्द जगण्याला प्रेरणा देत होते. रमा नि रामाने लेकीला कडकडून मिठी मारली. देवा असेच प्रेम, माया, आपुलकी राहू दे, अशी प्रार्थना करत पुन्हा नव्याने जीवनाची सुरवात केली.
अशी ही असते गरिबांची दिवाळी. मित्रांनो दिवाळी हा सण खूप आनंदाचा, प्रकाशमय सण, खूप उत्साह असतो, नवीन कपड्यांची खरेदी करतो, गोडधोडाचे पदार्थ करतो, मोठ्यामोठ्या दुकानात जातो पण रस्त्यावर बसणारे छोटे कुटुंबही असतात रामा, रमासारखे... जिथे खूप गरीबी असते त्यांच्याकडून आवर्जून वस्तू खरेदी करू या, जेणेकरून आपला एक मदतीचा हात त्यांच्या जीवनातील अंधःकार कमी करण्यास मदत करू शकतो. बघा पटतंय ना करू आनंदाची दिवाळी साजरी