अनाहिता
अनाहिता
अनाहिता, हेच नाव दिलेय मी तिला. तिचे खरे नाव मला माहीत नाही. मी कधी विचारलेही नाही. सगळे तिला छोटी बहु, भाभी, चाची अशी हाक मारतात.मी अनाहिता म्हणतो, मनातल्या मनात.प्रत्यक्षात कधीच बोललो नाही तिच्याशी. तिला खुपदा पाहतो मी , तिच्या नकळत. चोरून. तिला कळत असेल का, मी चोरून बघतो, ते? पण उमललेलं फुल बघत रहावं इतकं पावित्र्य आहे त्यात. दवबिंदू इतकाही दोष लागायला नको.
छतावर कितीदा येते ती. माझ्या खिडकीला लागुनच असलेलं तिचं छत. तिच्या येण्याने रम्य होऊन जातं. कधी काही सुकत टाकायला येते ती. तिची नाजूक लांबसडक बोटं अलवार फिरतात त्यावरून. संध्याकाळी परातीत भरून खाली घेऊन जातानाचा तिचा समाधानी चेहरा पाहणं केवळ सुख. कधी दुपारी, एखादं जाड पुस्तक घेऊन वाचत बसलेली असते, तेव्हा समाधी लागलेली असते तिची. त्या पुस्तकातले भाव तिच्या चेहऱ्यावर उमटत जातात. गाडीच्या बाजूच्या आरशात मागे पडत जाणारे दृश्य दिसतात, अगदी तसेच. कधी बच्चे कंपनी जमवून अभ्यास, तर कधी दंगामस्ती. कधी तानपुरा घेऊन एखादा अनवट राग आळवत असते. ते सूर मात्र मन विदीर्ण करणारे असतात. तिच्या कुटुंबातल्या कित्येकांना मी तिच्याही नकळत डोळे टिपताना बघतो, जेव्हा ती असं काही वाजवत असते. अनाहिता रवींद्र संगीतातील गीतासारखी वाटते, शब्द कळत नाहीत, पण सूर उमटत जातात हृदयात खोलवर.
“संध्याकाळी जेवायला या आमच्या सोबत. आनंद होईल आम्हाला. ”बाबूजी, तिचे सासरे आवर्जून बोलवायला येतात. मी कामामुळे सणावाराला सुद्धा घरी जात नाही, हे कळल्यावर जेवायचा खूप आग्रह असतो . मोठं प्रेमळ कुटुंब.छोट्या गावात तुम्हाला परकेपणा येऊ देत नाही कोणी. मी यांच्याकडे खोली घेऊन भाड्याने राहतोय खरं. माझं काम संपलं, की काही महिन्यातच जाणार. पण या कुटुंबाचा एक भाग झालोय आता. भल्या मोठ्या टेबलावर विविध पदार्थांची रेलचेल असते. मां आग्रहाने वाढतात. “ छानच झालाय स्वयंपाक.” माझ्या तोंडून सहजच निघतं. “ छोटी बहु ने केलंय सगळं.” मां कौतुकानं म्हणतात. बाहेर राहणार्यांना घरच्या जेवणाची चव अमृतापेक्षाही गोड असते.
प्रत्येक जण आपापल्या पतीला प्रेमाने वाढण्यात गुंतलेली. माझी नजर अनाहिताला शोधत असते. तिचे पतीही कधीच दिसले नाहीत आजपर्यंत. कोणाच्या तोंडून कधीच उल्लेख ऐकला नाही मी. विचारणं बरं दिसत नाही, म्हणून मी ही शब्द ओठातच गिळतो.
बरेच दिवस झालेत. तिच्या विषयीची ओढ, उत्सुकता, यावर आता माझा ताबा राहिला नाहीये. मी खूप प्रयत्न केला, तिचे विचार झटकून टाकायचा. हल्ली छतावर दिसत नाही ती. मी ही कामात गुंतवून घेण्याचा प्रयत्न करतो. पण नजर सतत शोधत असते तिला. मन बचैन होऊन जातं .आज तर तापाने अंग सडकून निघालेय. डोकेही दुखतेय. एवढ्यात दारावर टकटक. कसेबसे उठत मी दार उघडतो. समोर अनाहिता. “मां ने काढा पाठवलाय.” ती बाजूच्या टेबलावर ठेवते. मला काय बोलावं सुचत नाही. बोलायचं तर खूप काही असत.
मला कधीचे बोलायचं होते तुमच्याशी.” ती दारातूनच बोलते. आत या म्हणावं , की नाही, या संभ्रमात पडलेला मी. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन अशी माझी अवस्था झालेली. ती मात्र गहन शांत.
“स्पष्टच बोलते, माफ करा. तुम्ही माझ्याविषयी जो काही विचार करताय, ते चूक आहे.” माझ्या हृदयाची धडधड मला ऐकू येतेय. तिचं नजरेला नजर देऊन बोलणं माझ्या मनात अपराधबोच निर्माण करून जातं. माझी चोरी पकडल्या गेली आहे. पण अव्यक्त प्रेम केलेय मी, त्यात गैर काय आहे? मनात बंड उठलेलं. द्वंद्वात अडकलोय मी. तिची तयारी असेल तर साथ द्यायलाही तयार आहे मी तिला. मग कोणाची परवा नाही करणार मी. पण हे सगळं उघड बोलता येत नाही मला. नजरेतून वाचलं असावं तिने.
“तुमच्या लक्षात आलेच असेल, विवाहित स्त्री आहे, मी.”
“पण तुमचे पती?” मी धाडस करून विचारतो.
“ते सैन्यात आहेत. आमचं लग्न झालं, तेव्हाच त्यांना जावं लागलं.”
“ओह...मग आता कुठे आहेत ते?” मला राहवलं नाही.
“बेपत्ता आहेत, तेव्हापासून.” अंगावर वीज पडावी तसा धक्का बसतो मला. ती स्थितप्रज्ञ. दुखाचे सारे वादळ पचवून पर्वतासारखी निश्चल उभी. मला तिची काळजी वाटू लागते, “ पण तुमच्यापुढे उभं आयुष्य आहे....”
“मला माझ्या कुटुंबाने, माहेरच्या माणसांनी, सर्वांनीच जाणीव करून दिलीय याची. पण माझा निर्णय अटल आहे.”
“पण समजा.....” शब्द अपुरेच राहतात.
“ते परत आलेच नाहीत तर, असंच ना?”
मी पापण्यांनीच होकार भरतो.
“मग मी ही त्यांची वाट बघेन. त्यांचं कुटुंब सांभाळेन. ही सुद्धा एक प्रकारे माझी देश सेवाच असेल.”
..........................................................
मी निघून जातोय, कोणाला काहीही न सांगता. वाटलं होतं , अनाहिताच्या आठवणी तरी नेईन सोबत. पण मनात तिची प्रतिमा नेतोय, दुर्गा म्हणून पुजण्यासाठी.