अम्मी
अम्मी
समर्पणाची बाराखडी गिरवून घेणाऱ्या एका कादंबरीच्या पानांत माझं बालपण फुललं. ‘अम्मी’ नावाची ही कादंबरी. अम्मीनं घेतलेल्या जगाच्या निरोपानं या कादंबरीची पानं माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहिली. अम्मीची प्रत्येक हालचाल समर्पणाचा एक भाग होता. तिच्या दानधर्माची भाषा फार न्यारी होती. लहान, मोठं, श्रीमंत, गरीब यांच्यातलं अंतर संपवून ती अपेक्षाविरहित मदतीचं देणं द्यायची. सुगंधानं फुलाला बिलगून राहावं, तसा आईजवळ कमी आणि अम्मीजवळच जास्त वेळ राहण्याचा योग आला. जमिनीचं आणि माझं नातं अम्मीपर्यंत जाण्यासाठीचं अंतर कापण्यापुरतंच...! एकदा अम्मीजवळ गेलं, की तिच्या मांडीवर बसायचं, किंवा तिच्या कडेवर बसून इकडंतिकडं फिरायचं. जमिनीचा आणि माझा संबंध तिथेच संपायचा. आजतागायत एवढी सुरक्षित जागा मला नंतर सापडली नाही.
मी ‘अम्मी’ अशी हाक मारली, की ती वेगळ्याच लयीत ‘ओ अम्मी’ असा प्रतिसाद द्यायची. खाणं-पिणं सारं तिच्याच हातानं. तिच्या घरची साधी रोटीही पुरणाच्या पोळीपेक्षा गोड लागायची. ‘सालन’ या शब्दाचा अर्थ त्यावेळी कळायचा नाही; पण त्या नुसत्या गोड शब्दातूनही खाण्याची गोडी लागायची. अम्मीनं तिखट वरणात कुस्करून दिलेली काळ्या ज्वारीची भाकरी खाताना माझ्या छोट्याशा विश्वात परमोच्च आनंदाचे क्षण निर्माण व्हायचे. बकरीचं कच्चं दूध, ईदचा शिरखुर्मा, मोहरमचे चौंगे आणि तुपात भिजवलेल्या ‘रोट’साठी खास असा कोणता मौसम नसायचा. बारा महिने कधीही हे पदार्थ मला भेटायचे. एखाद्या घरची भाजी, एखाद्या घरचं वरण, कुठल्या तरी घरची रात्री उरलेली कढी, कुठल्या घरचा मिरचीचा ठेचा, चटणी...अम्मी जिथं कामाला जायची, त्या घरच्या स्त्रियांनी दिलेलं असं सगळं सामान ती घरी घेऊन यायची. ते सगळं एकत्र करून त्याला फोडणी द्यायची, त्यात पाणी टाकून ते उकळलं, की चार- आठ दिवसांपूर्वीच्या, वाळलेल्या भाकरीचे तुकडे करून त्यात टाकायची, शिजू द्यायची. लाकडं चुलीच्या बाहेर ओढली, की ते आता खायचं- किंबहुना लाकडं चुलीच्या बाहेर ओढल्याशिवाय चुलीवरचं अन्न खाता येत नसतं, एवढंच माझ्या बालबुद्धीला कळायचं. ते मी खाऊ नये म्हणून अम्मी मला दुसरं ताजं अन्न खायला द्यायची; पण दस्तऱ्यावरची भाकरी, ते भिजवलेलं सारण, जर्मनच्या प्लेट्समध्ये खाताना जो आनंद मिळायचा, तो कधीही न विसरणारा होता...आणि अम्मीची कौतुकानं माझ्यावर स्थिरावलेली ती नजरही...!
चिंध्या-चिंध्या एकत्र करून, जोडून तिनं शिवलेली गोधडी अम्मीच्या मायेचा उबदारपणा कैद करूनच शिवली जायची. माळाकोळीत ज्योतिर्लिंगाची यात्रा भरायची. अम्मी माझ्यासाठी खेळणी आणायची. घरातली परिस्थिती अत्यंत बिकट असताना मन मात्र आभाळागत मोप पसरलेलं...! घरातल्या एका खूप जुन्या संदुकीत तिचं काही सामान होतं. छोट्या- छोट्या वस्तूंनाही तिथं दागिन्याचं स्वरूप प्राप्त व्हायचं. जगण्याचं हे मोठेपण तिनं कधीच ढळू दिलं नाही.
तिच्यासोबत गावभरची मुशाफिरी हा माझं रोजचा उद्योग...! अम्मीचा मऊ सहवास, घरभर पसरलेला चुलीचा धूर, उबदार शेकोटी, मंदिरात गायलं जाणारं भजन, अम्मीचं अल्लाला याद करणं... अर्थ समजायचा नाही; पण एकमेकींत मिसळून गेलेल्या त्या सगळ्या घटना केवळ अद्भुत, मंतरलेल्या होत्या. अम्मी मला मंदिरात घेऊन जायची. हातात नारळ आणि फुलं देऊन दहा-बारा पायऱ्या वर असणाऱ्या गाभाऱ्यात दर्शनासाठी पाठवायची. ‘‘खाली उभं राहून मी तुझी चप्पल सांभाळते. कुणी घेऊन जाईल...’’ असं म्हणून खालीच थांबायची. माझा एक देव वर आणि एक देव खाली अशी माझी गोंधळल्यागत अवस्था व्हायची; पण त्या भावनेला शब्दांत मांडता यायचं नाही. आजच्या जातिवादाच्या, धर्मांधतेच्या वातावरणात जाणवतं... तिची आणि माझी जात एक नव्हती, धर्मही एक नव्हता; पण तिनं माझ्या बुद्धीपर्यंत कधी ‘अधर्म’ पोचू दिला नाही. माझ्या चांगुलपणाची ‘जात’ इथंच विकसित झाली.
पूर्वी अम्मीच्या घरासमोरचा चबुतरा घराच्या समोरून आडव्या जाणाऱ्या रस्त्याच्या समतल भागापासून हातभर उंच होता. अम्मी त्याला रोज सारवून घ्यायची, तिचे हात मातीत मिसळायचे... तळहातांवर उमटत असलेल्या ओरखड्यांचा विचार न करता ती चबुतऱ्यावरचे ओरखडे मिटवायची. अम्मीचा तो चबुतरा म्हणजे येणाऱ्या-जाणाऱ्या मुशाफिरांचं क्षणभर विश्रांतीचं स्थानच होतं. अम्मीच्या घरी पंखा नव्हता. उन्हाळ्यात रात्रभर ती मला वारं घालायची. सर्वसामान्य मुलीला असा ‘राजकन्ये’चा मान देणारी तिची वृत्ती म्हणजे तिच्या समाधानाचा एक राजमार्गच होता.
सूर्याची चाहूल लागायच्या आधीच तिचा दिवस उगवायचा. सकाळी-सकाळी कोवळ्या प्रकाशात रस्त्यासहित वेशीपर्यंतचा परिसर ती झाडून काढायची, तेव्हा मनात आणि हाताच्या गतीत कोणतीच अपेक्षा नसायची. त्याच चबुतऱ्यावर सकाळची उन्हं अंगावर घेत येणाऱ्या-जाणाऱ्यांशी गप्पा मारणारी, थंडीच्या दिवसांत शाल पांघरून धुक्याच्या गर्दीत बसलेली अम्मीची मूर्ती आजही जशीच्या तशी आठवते. ती प्रसन्न सकाळ चुलीतल्या धुरानं भारून जायची. हौदात पाणी ओतताना लोखंडाच्या घागरीचा, हौदाच्या दगडी कड्यासोबत घासून येणारा, त्याला लगटूनच हौदात वरून पडणाऱ्या पाण्याचा आवाज घरभर गुंजायचा. त्या आवाजानं सकाळचे सारे बंध जुळून यायचे. तेव्हा झोपेतून आलेली जाग दिवसभराच्या काळजीच्या ओझ्याची नसून सुखद आत्मभान देणारी असायची. इवलंसं सामान असणाऱ्या चार भिंतीच्या त्या छोट्याशा घरात अशा छोट्या-छोट्या गोष्टींनी जगण्याची उमेद भेटायची. चुलीवर उकळणाऱ्या चहाच्या सुगंधानं कधी फुलांच्या सुगंधाची आठवण होऊ दिली नाही. अम्मीच्या खानदानी वैचारिक श्रीमंतीचं हे नातं तिच्यातल्या सकारात्मक विचारशक्तीत पूर्णपणे एकवटलं होतं...म्हणूनच की काय, कोणत्या फुलांनी सजलेल्या बागेची तिथं कधी कमतरता भासायची नाही.
अम्मीच्या घराच्या बाजूला दगडांनी रचून तयार केलेली एक छोटी तटबंदी होती. तिथं मातीने लिंपून घेतलेलं रांजणही होतं. त्याच जागेवर एक भलं मोठं लिंबोणीचं झाड डौलदारपणे उभं होतं. दफनापूर्वीचे सारे विधी तिथंच करण्यात आले. त्याच जागेवर कधी काळी बाजेवर बसून केस वाळवले जायचे, उंच-उंच झोकेही घेतले जायचे. शेवया करण्यासाठी जमलेल्या बायकांच्या गप्पाही तिथं रंगायच्या. उन्हाळ्यात तिथंच बसून मनसोक्त ताक पिण्याचा आनंदही कैकदा अनुभवला होता. त्या झाडाखाली किती सुख-दुःखं नांदली होती, याचा हिशेब नाही लावता यायचा. अम्मीचं आयुष्यही बेहिशेबी त्यागानं झळाळून निघालेलं होतं. त्या जागेवर नांदलेल्या त्या साऱ्या घटनांचा हिशेब त्या झाडालासुद्धा कधी मांडता आला नव्हता.
उत्तरेकडून भरभरून वाहणाऱ्या वाऱ्याचं स्वागत करण्याचा संदर्भ आता पूर्वीच्या संदर्भांहून फारच वेगळा होता. सायंकाळी ज्या चबुतऱ्यावर बसल्यानंतर वारे पाठशिवणीचा खेळ खेळायचे, थोड्या-थोड्या वेळेला येऊन धडकायचे, तोच चबुतरा आता जमिनीला समांतर झाला होता. पूर्वी वारे कोणत्या दिशेनं वाहत येत आहेत, इतका खोल प्रश्नसुद्धा पडायचा नाही कधी. तिथं फक्त हिशेब नसलेला, प्रश्न न पडणारा आनंदच असायचा. माझ्या चांगुलपणाच्या जातीसोबत विकसित झालेली ही आनंदाची दुसरी बाजू होती. आयुष्यभर या दोन बाजू सोबत वाहून नेणाऱ्या अम्मीला मात्र आप्तांच्या दुर्दैवी गर्दीत आपला जीव गमवावा लागला होता. त्या छोट्याशा तटबंदीच्या आत उभं राहिलं होतं, तसं एक झाड अम्मीच्या कबरीवरही उभं राहिलं तर?... असा विचार सहजच डोकावून गेला. शेवटी झाडांचं काय, ती कुठंही रुजतात; पण अम्मीसारखं चांगुलपण मनात रुजायला काय करावं लागत असेल?...