ऐतिहासिक कथा - बाजीप्रभू देशपांडे
ऐतिहासिक कथा - बाजीप्रभू देशपांडे
मी गाढ झोपेत होते. आणि अचानक मला घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. बघता बघता आवाज अगदी जवळ आल्याचा भास झाला नी मी एकदम डोळे उघडून बघितले तर काय…..
साक्षात बाजीप्रभू देशपांडे माझ्या समोर उभे..!
मला तर काहि कळेनाच. माझ्या तोंडून शब्दच निघेना.
मनात विचार आला, अरे ! हे कसं शक्य आहे ? ते तर पावनखिंडीत ( घोडखिंड) ३०० मावळ्याच्या साथीने लढा देत आहेत.
बाजी व त्यांचे थोरले बंधू फुलाजी.
बाजी माझ्याकडेच बघत होते, अन् मी त्यांच्याकडे.
अतिशय ऊंच मूर्ती, कमावलेले शरीर, डोक्याला फेटा, कमरेला तलवार, पाढीवर ढाल . अहाहा!
काय त्यांचा तो रूबाब. राजांच्या खजिन्यातील असली हिरा…..
मी बाजींना सलाम केला व म्हटलं,
बाजी तुम्ही हिरडसचे ना ?
मी तुमच्यावर लिहीलेल “ पावनखिंड” पुस्तक वाचलय. वाचताना अंगावर काटा येतो बघा. व आपल्या पराक्रमाने ऊर अभिमानाने भरून येतो.
बाजी म्हणाले- व्हय की, आम्ही हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे नव्ह का .
वतनदार बांदलांचे दिवाण आम्ही. आम्हासनी शिवाजीराजंनी आपलंस केलया नी आम्ही धन्य झालो बघा. राजांच्या केसालाबी धक्का लागू द्येयचा न्हाई हे आम्ही मनोमन ठरिवलं बघा.
माझ्याशी बाजी बोलत होते व एकिकडे आपल्या मिशांवरून हात फिरवीत होते.
ते सांगू लागले…
शिवाजी राजे सैन्यासह पन्हाळगडावर आले व्हते नव्ह का. तवा सिद्दी जोहरनं त्यांना वेढा घातला. मराठे फसले व्हते हो. ! तवाच शाहिस्तेखानानबी आपल्या पुन्यावर हल्ला केला व्हता. त्याला रोकन्यासाठी राजांनी तह केलया.
पण प्रयत्न फसले हो. इकडे विंग्रजबी त्यांना दारूगोळा पुरवत व्हता न्हवं.
शेवटाला राजांनी ठरिवलं, पन्हाळा सोडून पलायन कराच. घोडखिंडीच्या मार्गानं विशाळगडावर पोचाच. तो जूलै मास व्हता, मुसळधार पाऊस बी पडत व्हता की. तरीपण राजे डगमगले न्हायती. राजे विशाळगडावर जायला निघालं.
बाजींनी थोडा श्वास घेतला. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त झाला होता. ते जरावेळ बोलायचे थांबले होते.
पण आता मला उत्सुकता लागून राहिली होती कि, यापुढे काय घडले असेल? काय ठरले असेल ? हि सर्व हकिगत बाजींच्या तोंडून ऐकायला मी आतूर झाले होते. त्यांचे ते थोडावेळ थांबणे सुध्दा मला सहन झाले नाही. मी म्हटलं, बाजी सांगा की. पुढे काय घडलं लवकर सांगा. मी अधीरतेने म्हटलं.
त्यांनी एकदा माझ्याकडे रोखुन बघितलं. व परत पहिल्या उत्साहाने मला सांगू लागले. ….
हि कामगिरी राजांनी माझ्यावर सोपिवली नी म्या धन्य झालो. मला माझ्या जन्माच सारथिक झाल्यावानी वाटलं सा. मला मनामंदी लई म्हंजी लईच आनंद झाला. पर एक जबाबदारी बी व्हती नव्हका . राजांची जबाबदारी.
मी, फुलाजी, गुणाजी धन्य झालोया. राजांच्या आमच्यावरिल ईश्वासानं दहा हत्तींच बळ आलंया आमच्या अंगात.
महाराजांना मनापासुन मुजरा केला .
त्याच येळंला मनामंदी ठरिवला की, माझ्या राजाला , ह्या रयतेच्या पोशिंद्यास्नी सुखरूप गडावर पोचवायचा म्हंजी पोचवायचाच.
ठरलं मंग…..
राजेंनी आम्हास सावध केलया, म्हनलं- बाजी, काम जोखमीच हायसा. शत्रु बलाढ्य हाये. सावध रहा. आम्हाला तुम्ही हवे आहात. एवढं बोलू. राजे सांगू लागले की-
आम्ही विशाळगडी पोचलो की, तुम्हास तोफांचे आवाज ऐकवु. कि समजा आम्ही गड गाठला. आम्ही विशाळगडी सुखरूप पोचलो. बाजी सांगत व्हते की, तोफांच्या आवाजाची गोष्ट आम्ही पक्की मनात ठेवली. व राजेंना घेऊन पन्हाळगडावरून निघालो बी.
मला जाम उत्सुकता लागून राहिली होती की आता पुढे काय घडलं असेल.
मी विचारलेच , मग पुढे काय झालं बाजी ?
बाजीपण सांगण्याच्या जोशात होते……
ते म्हणाले, हिकडं विजापूरी सान्याच्या लक्षामंदी आलं नव्ह का , की आपली फसवनूक झालीया. राजा सटकला. म्हनूनशान ते आमचा लागपाठ कराया लागलया. हिथं धोका हाये हे माझ्या लक्षामंदी आलं आन् मी राजांना म्होरं व्हाया
सांगिटलं.
आम्ही या सैन्याला थोपवितो, आपन जावं राजं. राजंनीबी ऐकलं अन् ते म्होरं गेलं. पर जाताना आम्हासनी बी आमची काळजी घ्या म्नुनशान सांगाया ईसारले नाही धनी.
बाजी मोठ्या उत्साहाने व पोटतिडकीने
मला सगळा वृतांत सांगत होते. ते म्हणाले,
फुलाजी, गुणाजीला गजापुरच्या खिंडीत मी , सिद्दीचा महाकाळ म्हनुन उब केल नव्ह का !
आनि मी सवतः खिंडीतून पल्याड जान्याच्या परमुख भागामंदी गोडपिंडीच्या तोंडाशी उबा -हालो. पाच-दहा माणसांच जात्याल पल्याड असा तो भाग व्हता.
दोनीबी हातात दांडपट्टा, पाठीवर ढाल घीऊन शान मी उबा व्हतो. शत्रुचा खतमा कराया. लई याळ लडलोया. पर शत्रुला कनबरभी पुढ जाऊ न्हायी दिलया.
फुलाजी व गुणाजीन बी मावळ्यांच्या साथीनं हजारोंच्या सैन्याला रोखुन धरला व्हता की. ..!
हे सांगताना त्यांची छाती विररसानं भरून आली होती. त्यांच्या चेह-यावर विलक्षण तेज दिसत होतं.
मी , हे सर्व वर्णन ऐकत असताना मला सर्व प्रसंग जसे काहि आत्ता घडतायत असे डोळ्यासमोर दिसत होते. मनोमन या वीरांना मी वंदन केल. व पुढचा पराक्रम ऐकण्यास श्वास रोखुन तयार झाले….
बाजी उत्साहाने सांगत होते….
आम्ही रक्तबंबाळ झालो तरीबी मागे हटलो नाय.
विशाळगडी राजं पोचलं की, इशा-याच्या तोफांचा आवाज देनार व्हते त्याचा वेध माझे कान घेत व्हतं. आवाज ऐकु येई पर्यंत घोडखिंड( पावनखिंड) शौर्याने लढवायची हाये हे तर पक्क व्हतं .
माझ्या मनात बाजींविषयी प्रचंड आदर निर्माण झाला होता.
मी ही विलक्षण तन्मयतेने त्यांच्या पराक्रमाची गाथा ऐकत होते. मला अतिशय उत्सुकता, अधीरता होतीच पण कसलीतरी भितीही वाटत होती. आता पुढे काय घडणार आहे याची…..
मी बाजींकडे अशा संमिश्र भावनेने पहात होते. त्यांना अनेक प्रश्न विचारत होते व बाजी तेवढ्याच शिताफीने व सच्चाईने उत्तर देत होते
मी त्यांना विचारले कि, मग कधी आवाज ऐकु आला तोफांचा तुम्हाला बाजी?
तो आवाज एवढ्या धुम्मश्चक्रीतही तुम्हाला कसा समजला ?
ह्यावर ते फक्त हसले माझ्याकडे बघून व सांगू लागले ….
सांगताना त्यांचा चेहरा विलक्षण करारी दिसत होता. व अभिमानाने फुलून आला होता.
ते म्हणाले-
म्या सिद्दीच्या सैन्याबरोबर दोन हात करत व्हतो. तवा तो आवाज ऽऽऽऽऽऽ आला.
तोफांचा आवाज आला . तोफा कडाडल्या.
आमी धन्य झालो. माझं राजं गडावर सुखरूप पोचलं.
तोफांचा आवाज ऐकुन शान , आमच्या अंगात अजुनच वीरश्री संचारली. आमी जोमानं शत्रुवर चाल केलीया. आमच्या सगल्या शरीरभर जखमा झाल्या व्हत्या. पर त्याचं काय बी वाटेनास झालं.
म्या नव्या जोमान लढत व्हतो ते बघुनशान
विंग्रज खवळलं. त्यांनी आपल्या बंदूकीतुन माझ्या छाताडावर गोळी झाडलीया.
हे ऐकुन मला खुपच वाईट वाटलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
मनात आले, बापरे ! काय ही जिद्द, परकोटीची स्वामिनिष्ठा.
बाजींना गोळी लागून तेखाली पडत असताना त्यांच्या साथीदार मावळ्यांकडून एकच आवाज आला, बाजी ऽऽऽऽऽ, बाजी ऽऽऽऽऽऽ
मी आवाजाच्या दिशेने बघितले तर हा वीर योध्दा, धारातिर्थी पडता पडता, आपल्या स्वामीला, राजांना मुजरा करीत हाक मारीत होता राजेऽऽऽ!
मी बाजीं कडे बघितले तर काय, बाजी जसे आले तसे दौडत जात हेते त्या धुरळ्यात बाजींचा आत्मा विलीन झाला होता ते दिसेनासे झाले.
मी मनोमन राजांना व बाजींना त्रिवार सलाम केला. धन्य ते राजे व धन्य त्यांचे मावळे, धन्य ते बाजी.
थोड्या वेळाने मला जाग आली ती गजराच्या आवाजाने.
मला टापांचा आवाज वाटला ती होती घड्याळाची टिक टिक . …..
म्हणजे आत्ता पर्यंत बघितलं ते स्वप्नच होतं तर !
स्वप्नच पण वास्तविक ऐतिहासिक सत्य .
