Raju Bhadre

Inspirational

3  

Raju Bhadre

Inspirational

आठवणीतले प्रसंग

आठवणीतले प्रसंग

4 mins
203


सन 2000 मध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हुनगुंदा या शाळेतून इयत्ता सातवी पास होऊन कै. जयराम अंबेकर विध्यालय अर्जपुर येथे इयत्ता आठवी मध्ये दाखल झालो. शाळेत नवीन असल्यामुळे आणि तब्बल एक महिना अनुपस्थित राहून शाळेत गेल्यामुळे मला शेवटच्या बाकावर बसल्याशिवाय पर्याय न्हवता.मात्र काही दिवसानंतर पहिल्या बाकावर बसण्याची संधी आली. श्री ढगे सर इयत्ता 8वी ब चे वर्गशिक्षक. सर अतिशय शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष. त्यांना आम्ही कॉम्पुटर माईंड म्हणत. कारणही तसेच,एकतर शाळेतील संगणक शिक्षक , दुसरे म्हणजे गणित सगळ्यात सोप्या पद्धतीने आणि लवकर समजावून सांगत. काही दिवसांनी ढगे सरांऐवजी सौ हिमगिरे मॅडम यांना गणित विषय देण्यात आला. ज्यांचे अजून एक आडनाव होते,'मुंगडे'. 


मॅडम बिलोली येथील गांधीनगर येथे राहत होते. जेथे मी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह गांधीनगर ,बिलोली येथेच राहत होतो. त्यामुळे मी मॅडमची चांगली ओळख ठेवली.मी वयाने लहान जवळपास 14 ते 15 वर्ष असेल. त्यामुळे मॅडम मला दळण,किराणा आणि इतर काही कामे सांगत असत. मी पण उत्साहाने ती कामे करत असत. 


एके दिवशी मॅडम सरांना माझी ओळख करून दिली. हा राजू भद्रे माझ्या शाळेत आठविला असून वसतिगृहात आहे . हुशार पण आहे. सरांनी अस आहे का म्हणून माझ्याकडे पाहिले आणि ओळख करून घेतले. या ओळखीचा सरांना किंवा मला तेवढं काही फायदा झाला नसावा. तीन वर्षांनंतर 2003 मध्ये दहावी पास होऊन हू. पानसरे महाविध्यालय अर्जापुर येथे दाखल झालो. परत अकरावी साठी त्याच वसतिगृहात गुणानुक्रमे मला दाखल होता आलं. तेच गांधीनगर,तेच वसतिगृह ,तेच मित्र फक्त शाळा सोडून महाविध्यालयात तेवढा जात होतो.यात माझ्यासाठी नवीन काही होते असे मला मुळीच वाटत नाही. तरीपण शाळा आणि महाविद्यालय यात मात्र नक्कीच फरक आहे याची जाणीव नंतर झाली. 


दररोज कॉलेज मध्ये जात होतो. प्राध्यापकांची ओळख झालेली होती. यामध्ये सर्वात लवकर ओळख झाली ती प्रा. मुंगडे सरांची. कारण सौ हिमगिरे मॅडम यांचे पती होते. महत्वाचं म्हणजे मी अगोदरपासून त्यांच्या घरी जात होतो. यामुळे सरांनी मात्र माझ्याकडे विशेष लक्ष द्यायचे हे एका प्रसंगावरून माझ्या लक्षात आलं. 


एके दिवशी मी भौतिकशास्त्राचा प्रात्यक्षिकाचा तास करण्यासाठी महाविद्यालयात गेलो खरा पण वर्गात न जाता व्हरांड्यात उभा होतो. तेवढ्यात मागून प्रा मुंगडे सर आले. त्यांना पाहून काही विध्यार्थी पळ काढले. मी मात्र तेथेच उभा होतो. सरांनी जवळ बोलावून घेतले. त्यांनी मला ओळखलं हा भद्रे असून वसतीगृहाचा विध्यार्थी आहे. सरांनी माझ्यावर त्यांची तोफ डागली.हातात वही नाही ,पुस्तक नाही अन निघाले कॉलेज करायला! त्यावेळेस मी अक्षरश्या त्यांच्यासमोर ढसा ढसा रडलो. न राहता सरांनी रडण्याचे कारण विचारले. त्याचवेळेस माझ्या प्रामाणिकपणाची जाणीव सरांना झालेली असावी. मी खर ते सांगितलं, आज प्रात्यक्षिक असल्यामुळे मी कालच अरविंद डूमने या मित्राला थेरी लिहिण्यासाठी माझी रफ वही दिलेली होती. आता तर वर्ग भरलेला आहे. कदाचित अरविंद आत तासाला असेल किंवा नसेल हे मला माहित। नाही. जर तो हजर नसेल आणि मी वर्गात गेलो तर माझ्याकडे थेरीची वही नाही म्हणून सर मला शिव्या घालतील या विचारात मी बाहेरच थांबलेलो आहे. माझं उत्तर सरांना पटलेलं असेल म्हणून त्यांनी मला पुन्हा अशी चूक करू नको म्ह्णून सांगितले व पुढे निघाले.


पुन्हा दोन वर्षात सरांनी मला केंव्हाही शिव्या दिलेल्या नाहीत जे काही सांगायचं किंवा मार्गदर्शन करायचे ते अतिशय प्रेमळ भाषेत. पण इतरांच्या बाबतीत असे होत न्हवते. मी सुद्धा तशी वेळ माझ्यावर येऊ दिलेले नाही. सर वेळेशी अतिशय बांधील असायचे. स्वभाव मात्र रागिष्ट. केंव्हा केंव्हा जसा विध्यार्थी तसा स्वभाव त्यांचा दिसायचा. सर रसायन शस्त्रांचे गाढे अभ्यासक, अगदी सोप्या समजेल अश्या भाषेत शिकवायचे. माझ्यासह सर्व विध्यार्थी सरांना घाबरत असत. खर सांगायचे तर महाविद्यालयातील प्राध्यापक सुद्धा! परीक्षेला सरांना पर्यवेक्षक म्हणून कधीच परीक्षा कक्षात पाठवायचे नाहीत. कारण नकला हा प्रकार त्यांना जमत नसे.विध्यार्थ्यांनी नकला नाही केले तर महाविध्यालयाचा निकाल कमी येईल ही भीती कदाचित प्रशासनाची असेल.

 

काही विध्यार्थी तसेच माझे मित्र म्हणायचे सर माझ्या जातीचे (लिंगायत) आहेत . सर सुद्धा आमच्या जातीच्या विध्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देतात.पण असा प्रकार माझ्या निदर्शनास केंव्हाच आलेला न्हवता. कारण सरांनी मला घरी बोलवत असत,अभ्यास विचारत असत,शिकवलेलं समजत नसेल तर पुन्हा विचारा अस सांगत असत. यामुळे त्या शंकेच निरसन झालेलं होत. 


ज्या वेळेस सर गावाकडे जायचे तेंव्हा सरांनी मला त्यांच्या घरी झोपणासाठी सांगायचे. घरी गेल्यावर अभ्यास काही करायचं नाही पण टि व्ही मात्र पाहायचं. गावाकडून आल्यावर सरांनी एकदा मॅडमला मला धोंडे खायला देण्यास सांगितले. मला हसूच आलं . धोंडा हा खाद्यपदार्थ मला अजिबात माहीत न्हवता. मॅडमनी दिलेला धोंडा नक्कीच चविष्ट होता. सर्वात पहिला धोंडा सरांच्या घरी खालेला.हे मी अद्याप विसरलेल नाही.


बारावीची परीक्षा चालू होती.रसायन शास्त्रांचा पेपर देऊन बोलोलीला परत येत होतो,तेवढ्यात मागून सरांची गाडी आली. गाडी थांबवून पेपर कसा गेला? सरांनी विचारलं. चांगला गेला, मी उतरलो.किती मार्काच लिहायचं राहील ? लगेच दुसरा प्रश्न. चार मार्काच,मी सांगितलं. बाकीचे पेपर कसे गेलं? मी म्हणलं खूप छान. एवढं विचारपूस करणारा प्राध्यापक म्हणजे आदरणीय प्रा. अशोक मुंगडे सर होत. सरांच्या धाकामुळे आदरयुक्त, भीतीमुळे,त्यांचा आमच्याकडून असलेल्या अपेक्षेमुळे मी अभ्यास करत होतो. विध्यार्थी जीवनात भद्रे म्हणणारे सर एवढ्यात मला राजू म्हणून बोलू लागले. मी सरांचा विध्यार्थी असून सुद्धा आमच्यात गाढ मैत्री असल्यासारखं कुटुंबाची ईतम्बभूत माहिती सांगत होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजू लग्न वगैरे केलास का? नौकरी लागून सुद्धा तूच मागे राहिलास. योग्य वयात योग्य प्रोसेस व्हायला पाहिजेत. त्यामुळं वेळ वाया घालवू नको. दोनाचे चार हात कर आणि आम्हाला लग्नाला सांग. मी म्हणायचो सर घराचं काम चालू आहे, घर पूर्ण झालं की लग्न करणार आहे. खरच सरांचे ते शब्द मी केंव्हाही विसरणार नाही. कारण तेच प्रा मुंगडे सर आज दि 7 जून 2019 पासून आपल्यात नाहीत. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांना काळाने गतप्राण केलेलं आहे.तरी सुद्धा यावर माझा विश्वासच बसत नाही. खूप दुःखद घटना मुंगडे परिवारावर ओढवला आहे. त्यामुळे सरांना सहृद्यपूर्वक श्रद्धांजली.सरांच्या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो,हीच बुद्धाच्या चरणी प्रार्थना.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational