STORYMIRROR

Dr. Shrikant Khair

Inspirational

3  

Dr. Shrikant Khair

Inspirational

आशीर्वाद

आशीर्वाद

4 mins
341

आपण दगडांचे देव बनवतो.त्यांच्या मूर्ती कोरतो.त्यांना देव्हाऱ्यात,देवळात बसवतो.त्यांना पुजतो.भजतो.त्यांची किर्ती गातो.आरती करतो.त्यांना करतो नमस्कार नी अपेक्षितो,त्याने करावे चमत्कार.कधी-कधी संकटातून आपोआप तरतो तर कधी अनपेक्षित पणे आपण हरतो.मग म्हणतो,देव देव असा नसतो कुठे कोण.आपण त्यावर विसम्बुन प्रयत्नांची शर्थ करीत नाही.नुसताच वेळ वाया घालवतो.याला काही अर्थ नाही.

        

        मग कोणी म्हणतात,देव ही अंधश्रद्धा आहे.आपल्या खुळ्या पूर्वजांनी बनवलेली बनवाबनवी आहे.या तुमच्या साऱ्या देवांना निलंबीत केलं पाहिजे किंवा चक्क सेवा निवृत्त केलं पाहिजे. पण मला सांगा, हा देव तुमच्याकडे कधी कामाला होता?तो त्याचं काम बिनबोभाट,मानद मेहताना सुध्दा न घेता करीत असतो.तो का तुमच्या कडे वेतन मागतो?तुमच्या कडून कसलीही,अगदी नमस्काराची,आभार मानायचीही अपेक्षा न करता, त्याचं काम करीत असतो.त्याला म्हणे निवृत्त करा.

                 

मित्रांनो,देवा संम्बधी बोलताना आपण त्याची नीट व्याख्याही करीत नाही.देव तो जो देतो.मग त्याने आपल्याला काय द्यायचं,हे आपण ठरवायचं की त्याचं त्यालाच ठरवू द्यायचं?आपण एकटेच काय त्याचे गि-हार्ईक आहोत की सगळा चांगला माल मला, नी उरला सुरला शेजाऱ्याला.त्याचं त्यालाच आपली योग्यता ठरवून काय द्यायचंय ते देवू देत ना.फक्त त्याला नमस्कार करून,सुखी ठेव असं सांगून कार्य सिध्धीस नेलं तर काय हरकत आहे?

        

        आणि असं तो थोडंच म्हणतो, "मैं हुंना आप चूप रहो.काही करूनका.मी सारं काही करतो.तुम्ही आराम करा.मी तुमची भांडी घासतो,धुणी धुतो?''आपली कामं तर आपल्यालाच करावी लागणार ना? मग कशाला त्याला एव्हढा मान द्यायचा?त्याची पूजा करण्यात, स्तोत्र म्हणण्यात, फुकट वेळ वाया घालवायचा?गन्ध फुलं अक्षता यात पैसा खर्च करायचा? मी म्हणतो,बरं बाबांनो,तुम्हाला कोणाला देवाला निवृत्त करायचंय, निलंबित करायचंय तर करा.पण खरं सांगू?मला एकदा या देवांची रादर कुल-दैवतांची गम्मत अनुभवायला मिळाली.

                 

काही दगडांना आपण देव बनवतो.म्हणजे आपल्या वाड-वडिलांनी,पूर्व-पूर्वजांनी काही देवांना,कुल-दैवत मानलं असतं.पुढच्या सर्व पिढ्यांनी त्या पिढीजात कुल-दैवताचं आयुष्यात किमान एकदा तरी दर्शन घेण्यासाठी जायचंच असा एक अलिखित नियम पळायचा असतो.आपल्या घरी झालेल्या सुख-सम्मेलनात त्या देवतांना सामील करून घ्यायचं अशी एक संभावना.लग्न-कार्य झालं, मुलांची मुंज झाली की कुल-दैवताची पूजा करायची,त्याच्या नावाने गोंधळ घालायचा,त्यांच दर्शन घ्यायला जायचं.अशी प्रथा, पिढ्या न पिढ्या सांभाळली जाते.रादर सांभाळायची असते.

                 

तेव्हा मी विचार केला,आपल्या गुण -सूत्रांचे पूर्वज,ज्या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी येऊन गेले असतील,एकदा तरी त्या ठिकाणच्या वातावरणात राहून -श्वास घऊन गेले असतील, त्या ठिकाणी आपण आपली हजेरी लावणं,हे आपलं पितृ-ऋण आहे.हे आपलं कर्तव्य आहे.कारण परंपरा मोडणं सोपं.पण आपला वाटा उचलणं,ही आपली ऐच्छिक जबाबदारीआहे.ही मालिका आपल्या मार्फत आपण चालू ठेवावी.दुसरं असं की या मंदिरांचे पुजारी आपल्या देव-भेटीची,त्यांच्या कडील यादीत नोंद ठेवतात.आपल्या पूर्वजांच्या नावाची त्यांच्या व्यवसायाची,रहात्या ठिकाणांची नोंद त्या यादीत असते.भलं मोठं बाडच ते बाळगून असतात.म्हटलं,हे इंटरेस्टिंग,आणि त्या माहितीचे प्रथम साक्षीदार म्हणजे त्या कुल-दैवतांच्या मूर्ती.देव स्वरूप दगड आहे, असं मानायला काय हरकत आहे.कदाचित त्या मूर्तीं मार्फत आपल्या पूर्वजांचे,परम-पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळू शकतील ही भावना जोपासायला काय हरकत आहे.

                

  पुष्करची बारावीची परीक्षा झाली होती.त्या पूर्वी आमचं लग्न झालं, पुष्करची मुंज झाली. आमचं कुल-दैवत दर्शन राहिलं होत. औंधची यमाई नी म्हसवडचे सिध्धनाथ हीआमची कुल-दैवतं.आई- नाना, दादा- वहिनी अनेक वेळा दर्शनाला जाऊन आले होते.आमचंच जाणं राहिलं होतं. गोंदवल्याला राहून,सकाळी,सकाळी सूर्योदयाच्या वेळी आम्ही औंधच्या यमाई गडावर पोहोचलो.प्रसन्न सकाळ,कोवळं ऊन,त्यात कधीही न पाहिलं एवढ्या क्षितिजाचा परिसर.देवळात गेल्या गेल्या जाणवलं,हात पसरून आई यमाई देवी मला ये म्हणतेय.म्हणालो,श्रीकांत?वेडा झाला.अंधःश्रध्ध झाला.खुळा झाला वगैरे वगैरे.पण तेंव्हा जाणवलं.मित्रांनो,ही अनुभूती घ्यायला हवी. सा-या श्रदधा अंधश्रदधा बाजूला ठेवून.


         दुपारी,साधारण बारा साडेबारा वाजता, म्हसवडला पोहोचलो.श्री सिध्धनाथ मंदिरात गेलो.देवळात श्री सिध्धनाथ नी आई जोगेश्वरी,सोबत कोणीही नव्हतं.आम्ही गेल्यावर एक दहा बारा वर्षाची मुलगी धावत आली.तिला आम्ही पुजाऱ्या विषयी विचारलं.कारण आई नानांनी,दादा वहिनींनी सांगितलं होतं,तिथे केसकर म्हणून एक पुजारी असतात, ते आपली दर्शनाची सोय करतात.त्याच्याकडे ते नांव-नोंदीचं बाड आहे. त्यात आपलं नांव नोंदवायचं असतं.आपण काय करतो,कुठे रहातो, याची नोंद करून ठेवायची असते.

                   

ती मुलगी म्हणाली,''माझे बाबा पूजा करतात.तिला तिच्या वडिलांना बोलवायला सांगितलं.ती पळत शेताकडे गेली.थोड्या वेळाने,एक उन्हाने रापलेला,काळा,देवाच्या रंगाचा,जेमतेम गुढग्यापर्यंत पांढर शुभ्र धोतर नेसलेला इसम तिच्या बरोबर आला.म्हटलं,हा इतका अडाणी माणूस,याला काय नोंद वही वगैरे माहीत असणार.

                   तो इसम म्हणाला,''मी इथला पुजारी नाही.गुरव आहे.इथली पूजा आर्च्या वगैरे मीच पहातो''.म्हटलं ''ठीक आहे.''

                   देवाला निरोपाचा नमस्कार करत होतो.तर तो म्हणाला,''पाहूणं कुण्या गावचं ?

                   म्हटलं,''चिंचवडचे.पुण्या जवळ''.

                  ''काय काम करता?''

                  ''लहान मुलांचा डॉक्टर,बालरोग तद्न्य आहे.''

                   तो म्हणाला,''म्हणजे पेडियाट्रिशियन म्हणा की.''

                   मी उडालोच.सिध्धनाथ,गाल फुगवून,गालातून,डोळे मोठे करून डोळ्यात डोळे मिसळून मिस्कील हसत होते.

                  मी दचकून म्हणालो,''हो हो पेडियाट्रिशियन.''

                  ''एम. डी. की डी.सी.एच.म्हणजे डिग्री की डिप्लोमा?''

                  म्हणालो,''डिग्री.''

                  थोडं थांबून तो म्हणतो कसा.

                 ''काय हो नेफ्रोटिक सिंड्रोमला स्टिरॉइड शिवाय दुसरी काही ट्रीटमेंट नाही?''

                  मी म्हटलं,''कोणाला झालाय?''


          म्हणाला,''माझ्या मुलाला झालाय.सहा वर्षांचा आहे.गेली तीन वर्षं आम्ही वेग वेगळे तद्न्य डॉक्टर केले.सोलापूरला दाखवलं.ते प्रत्येक वेळी स्टिरॉइड देतात.पण हे चांगलं नाही ना?साधं सर्दी खोकला झाला तर युरीन मध्ये अल्बुमिन दिसतं.हे लगेच रिल्याप्स म्हणून स्टिरॉइड सुरु करतात.पण हे बरोबर नाही ना?म्हणजे प्रत्येक रिल्याप्सला स्ट्रोइडची गरज असतेच का?''

      

            म्हटलं,''प्रत्येक रिल्याप्सला स्टिरॉईडची गरज नसते.तात्पुरता आजार म्हणजे सर्दी,पडसं,थोडा ऍलर्जिक ब्रॉन्कायटिस झाला, तरी युरीन मध्ये अल्बुमिन दिसतं. पण आजार बरा झाला की,अल्बुमिन दिसणं बंद होतं.आपल्याला युरीन मधल्या अल्बुमिन वर नाही,मुलासाठी,मुलावर उपचार करायचे असतात.''

                 तो म्हणाला,''माझाही तसाच अनुभव आहे.मग मला सांगा,हे डॉक्टर भीती घालतात,स्टिरॉइड दिलंच पाहिजे म्हणतात.हे चुकीचं नाही का?''

                 मी म्हणालो,''हा काही घाबरण्या सारखा प्रकार नाही.मुलगा मोठा झाला की हे सारं आपोआप बरं होणार.खरं तर हा लहान मुलांना होणार नेफ्रोटिक सिंड्रोम हा आजारच नाही.ती एक कंडिशन-परिस्थिती आहे.''


                तो म्हणाला,''अगदी बरोबर,तुमच्या नेलसनच्या पुस्तकात मी वाचलय.आणि लहानपणी मलाही हा मिनिमल लीजन नेफ्रोटिक सिड्रोम झाला होता.आता मी टका-टक आहे.शेती करतो.कामं करतो.''

               नेलसनचं पुस्तक वाचलं म्हटल्यावर आणि मिनिमल लीजन नेफ्रोटिक सिंड्रोम,ऐकून मी उडालोच.श्री सिध्धनाथा बरोबर आता आई जोगेश्वरीही गालात हसत होती.माझी गम्मत झाल्या हास्यप्रसंगात,सहभागी झाली होती.

               बोलत-बोलत आम्ही सभा मंडपात आलो.तो म्हणत होता,''फार चांगलं वाटलं डॉक्टर तुम्हाला भेटून,तुमच्याशी बोलून.साऱ्या शंकांचं निरसन झालं. समाधान वाटलं.''

         

      सभामंडपातला हत्ती सोंड वर करून उगाचंच मिश्किल नजरेने पहात होता.मित्रांनो ही अनुभूती अनुभवायची. नुसती वाचून कळणार नाही. मित्रांनो, या निमित्ताने, माझ्या खैर घराण्याच्या पूर्वापार पूर्वजांनी एकत्र जमून एकत्र मिळून त्या गुरवा मार्फत, श्री सिद्धनाथासमक्ष, माझी परीक्षा घेतली, माझी परीक्षा केली. मला आशीर्वाद दिले. असं मला वाटतंय. तुम्हालाही तसं वाटतंय का? ज्याचा त्याचा दृष्टिकोन. श्रद्धा-अंधश्रद्धा, केश रेषेचा फरक. पण आनन्द असा आकाशातून पडत नाही, तो ज्याचा त्याने अनुभवायचा.

               मग काय जाणार ना? कुलदैवत दर्शनाला?


Rate this content
Log in

More marathi story from Dr. Shrikant Khair

Similar marathi story from Inspirational