Ms Shradha Shetye

Inspirational

3  

Ms Shradha Shetye

Inspirational

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

6 mins
1.2K


माझा जन्म शिक्षक कुटुंबात झाला. आई-बाबा दोघेही शिक्षक. त्यामुळे लहानपणासूनच शिस्त, ज्ञानग्रहणासाठी जिज्ञासा, वडीलाधाऱ्यांचा मान ठेवणे व शिक्षकांकडे नेहमीच आदरयुक्त पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ होत गेला. आई-बाबांना शिक्षणाचं महत्त्व फार होतं. कारण त्यांच्या लहानपणी त्यांना शाळेसाठी मैलोनमैल पायी चालत जावे लागायचे. ऐपत नसल्याने पायात घालायला चप्पल नसायची मग पायाला पानं बांधायचे. गरीबी असायची म्हणून दप्तराऐवजी पुर्वी स्वस्तात अल्युमिनियमची पेटी मिळायची ती वापरून शिकले. म्हणूनच माझ्या शिक्षणाकडे आणि प्रगतीकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असे. मला प्रत्येक गोष्ट सहजगत्या मिळायची पण त्याचबरोबर त्याचा योग्य विनियोग कसा करायचा हे नक्की समजावलं जायचं. आई शिक्षिका असल्याने गुरूंचं, आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे सांगणारे गीत नक्की बोलायला लावायची,


"गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा..."


या प्रार्थनेचा प्रत्यय मला आला जेव्हा माझं डी. एड.चं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी पदवीधर होण्यासाठी एडमिशन घेतले. नियमितपणे माझं कॉलेज सुरळीत सुरू झाल्यावर माझी सर्वप्रथम ओळख झाली ती म्हणजे मराठी विषयाचे प्राध्यापक सन्माननीय श्री. नन्नवरे सर यांच्याशी. त्यांच्यामुळेच मला खऱ्या अर्थाने कळत गेलं की जीवनात गुरूशिवाय सारं काही व्यर्थ आहे. त्यांनी मराठीदिनाचं औचित्य साधून एक काव्यसंमेलन आयोजित केलं. ज्यात मी सहभागी झाले आणि माझ्यातील कलागुणांना वाव मिळाला. सरांमुळे भविष्यातील कवयित्री, लेखिका, अनुवादीका माझ्यात जागृत झाली होती. पण माझी गुरुवंदना काही इथेच थांबणारी नव्हती. मराठीप्रमाणेच इतिहास हादेखील माझा जवळचा आणि आवडता विषय होता. आजही जिजाऊ जयंती, शिवजयंती वा संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने मी, जिजाऊंची भूमिका किंवा कोणती ऐतिहासिक भूमिका, नाटिका, एकपात्री सादरीकरणाची कला याद्वारे साकारते याचं श्रेय जाते ते माझ्या इतिहास प्राध्यापक सन्माननीय श्री. गायकवाड सर यांना. त्यांच्यामुळेच इतिहासाचा पाया भक्कम झाला आणि माझ्यातला वक्ता जागृत झाला.

 

कॉलेजमधील दोन वर्ष नवनवीन अनुभूती घेण्यात, अभ्यासात, अवांतर वाचनाची रुची घेण्यासोबतच जीवन जगण्याचा खरा आनंद घेण्यात उत्तमरित्या गेली. पण आता तृतीय वर्षाला प्रवेश घेण्याची वेळ आली आणि मला खूप संभ्रम निर्माण झाला की, मराठी, इंग्रजी का इतिहास यापैकी कोणता विषय निवडावा. कारण तिन्ही विषय माझे अत्यंत प्रिय झाले होते आणि मला त्यात खूप रुची होती. अशावेळी बुद्धीची देवता आणि विद्येची देवता दोन्ही माझ्यासाठी माझ्या दोन प्राध्यापकांच्या रूपात धावून आले की काय? असंच मला वाटलं. कारण इंग्रजी विषयातील माझी अधिक अभिरुची ओळखून माझ्या इंग्रजीचे प्राध्यापक, गणपती मुळीक सर आणि प्राध्यापिका रामस्वामी मॅडम यांनी मला हाच विषय निवडावा असे सुचवले आणि त्यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळेच पाहिल्या दोन वर्षांप्रमाणेच तिसऱ्याही वर्षी मी प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व घटनांनी मला ऋषितुल्य गुरु मिळल्याचेच जाणवले.


गुरूंचं माझ्या हृदयात अढळ स्थान आणि श्रद्धा असण्याचं आणखी एक कारण म्हणजे लहानपणी आजोळी गेल्यावर आजी आम्हा सर्वांना नेहमी श्रीराम-वसिष्ठ, श्रीकृष्ण-अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी अशा गुरु-शिष्यांच्या गोष्टी आवर्जून सांगायची. बाल्यावस्थेत या सगळ्या गोष्टी मी केवळ रंजकतेने सांगितल्यामुळेच ऐकायचे. पण या कथांचा खोलवर विचार आणि अनुभूती तेव्हा झाली ज्यावेळी या गोष्टींचं प्रतिबिंब आपल्याही जीवनात महत्त्वपूर्णरित्या वास्तव्य करत आहे हे लक्षात आलं. वास्तविक पाहता, या गुरु-शिष्य परंपरेचा, त्यांच्या नात्यांचा आणि त्याहीपलीकडे आपल्या भारतीय संस्कृतीमधील गुरु-शिष्य परंपरेचा मी स्वतः एक भाग बनेल असे मलाही वाटले नव्हते. पण या गोष्टीची अनुभूती लवकरच मला अनुभवायला मिळाली.


पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच दोन्ही गुरूंनी मला इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा दिली. यातही काही दैवी योजनाच दडली होती असंच आजही मला वाटतं. कारण दोन उत्तम गुरूंकडून ज्ञान ग्रहण करून मला अजून एक उत्तम आणि विलक्षण व्यक्तिमत्व असणाऱ्या गुरूंकडे पाठवण्याचे मनसुबे जणू नियतीनेच रचले होते. मुंबईमधील एका नामांकित महविद्यालयात म्हणेजच पनवेल येथे असणाऱ्या सी.के.टी. महविद्यालयात, नेमून दिलेल्या अगदी शेवटच्या तारखेला शेवटच्या दिवशी मी प्रवेश घ्यायला गेले. कारण घरगुती अडचणींमुळे मला प्रवेश घेणं शक्य होऊ शकलं नव्हतं. आणि शेवटच्या दिवशी मी सकाळपासून रांगेत उभी होती. महाविद्यालय नामांकित असल्याने व शेवटचा दिवस असल्याने प्रवेश घ्यायला खूप जण रांगेत उभे होते. हळूहळू मात्र माझी चिंता वाढू लागली होती. अन् त्यातही माझा नंबर येईपर्यंत दुपारचे तीन वाजले होते. एकेक अर्ज काळजीपूर्वक वाचला जात होता. सगळं काही सुरळीत होईल असं वाटतं असतानाच अचानक मला कॅश काऊंटरवर सांगण्यात आलं की माझं एडमिशन होऊ शकत नाही कारण पैसे भरण्यासाठीची वेळ संपली आहे आणि चार वाजून गेल्याने माझा अर्जही स्वीकारला जात नाही. अशावेळी मी एक क्षण खूप निराश झाले आणि काय करावं काही सुचेना. पण त्याचवेळी जसं अर्जुनसाठी श्रीकृष्णाने धावावे तसे माझ्यासाठी जणू माझे श्रीकृष्ण बनून आले ते याच कॉलेजमधील इंग्लिश विषयाचे प्रमुख डॉ. येवले सर. त्यांनी माझी एडमिशन घेण्याची तळमळ पाहिली आणि त्याचवेळी त्यांचं तिथे उपस्थित होऊन माझ्यासाठी अगदी लीलया कार्य करणं आणि माझं एडमिशन निश्चित करणं हे आजही माझ्या संशोधनाचा विषय बनून राहिला आहे. पण त्यावेळी मी निराश झालेले पाहून त्यांनी अगदी पितृतुल्य भावनेनं मला धीर दिला आणि माझा प्रवेश निश्चित झाला होता हे अगदी विलक्षणच होतं.


आजही त्यांची आणि माझी झालेली अवलीया भेट माझ्या कायम स्मरणात आहे. *आयुष्याला कलाटणी देणारा हा क्षण होता ज्याने माझं जीवन बदलून तर गेलंच पण त्याचसोबत मला जीवनात अनेक गोष्टी मिळवून दिल्या.* आणि हाच तो सुवर्णमयी क्षण होता ज्याने मी सुनिश्चित केलं होतं की मी याच महाविद्यालयात टॉपर बनून इथेच प्राध्यापिका म्हणून काम करेल. याचं सारं श्रेय जाते ते, माझ्या मनात ज्यांनी अगदी देवाप्रमाणे वास्तव्य केले त्या येवले सरांना. सरांनी दोन वर्षात खूप मार्गदर्शन केले आणि वेळोवेळी विविध स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले. इंग्रजी विषयाचे सखोल ज्ञान कसे करावे यासाठी विविध पर्याय सांगितले. यामुळेच माझा इंग्रजी विषयाचा सांगोपांग अभ्यास होत राहिला. माझं इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं आणि अचानक सरांचा फोन आला. त्यांनी मला विचारलं की तू आपल्या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करशील का? तो क्षण माझ्यासाठी सुवर्णमय झाला होता. पुढे मी महाविद्यालयात सरांची सहकारी म्हणून काम करू लागले. सरांकडून शिकण्यासारखे इतके उत्तम सद्गुण होते की मला ते सगळे गुण आत्मसात करण्यासाठी खूप यत्न करावे लागेल. पण म्हणतात ना की गुरूसारखं शिष्य श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो पण होईलच असे नाही. माझ्यासाठी सरांची प्रतिमा एक गुरू म्हणून कायम आहेच पण त्याहीपलीकडे मी त्यांना माझे मार्गदर्शक, तत्त्वज्ञ, पितृतुल्य व्यक्ती, आणि मला साक्षात्कारी अनुभूती देणारे साक्षात परमेश्वर रूपातील श्रीकृष्णचं मानते. कारण अर्जुनासाठी जसे श्रीकृष्ण प्रत्येक क्षणी हजर असायचे तसे माझ्यासाठी सर नेहमीच उत्तम मार्गदर्शन करायचे. इतकंच काय तर माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला कोणतीही गोष्ट त्यांच्याशी चर्चा करावीशी वाटली की मी त्यांना सांगू शकत होते. माझ्या कुटुंबाशीही त्यांचं नातं विलक्षणरित्या बांधलं गेलं होतं आणि आजही कायम आहे. ते नेहमी माझ्या आई वडिलांना सांगायचे की,


"श्रद्धाकडे इंग्रजी विषयाचं असं काही बाळकडू आणि संपत्ती आहे की ज्यामुळे ती आत्ताच काय पण भविष्यातही कुठेच कमी पडणार नाही आणि तिच्या अविरत परिश्रमाने ती नेहमीच सगळ्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरेल."


आज मी एक प्राध्यापिका, कवयित्री, लेखिका अनुवादिका, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, सामाजिक कार्यकर्ता अशा वेगवेगळ्या भूमिका अगदी लहान वयात साकारू शकले याचं संपूर्ण श्रेय माझ्या आई-बाबांना तर आहेच पण त्याचबरोबर माझ्या आयुष्यात आलेल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असणाऱ्या माझ्या सगळ्याच गुरूंना जातं. मला आजही माझ्या आजीने सांगितलेल्या गुरु-शिष्यांच्या गोष्टींचा प्रत्यय येतो आणि एक जाणीव नक्कीच होते की या सगळ्या गुरूंचे माझ्यावर *न फिटणारे ऋण* आहेत ज्यांची उतराई होणे शक्य नाही आणि ज्यांच्या ऋणांचे वर्णन करण्या माझे शब्द अपुरे आहेत अन् वाणी, मती कुंठीत होते. म्हणूनच मीदेखील हेच ठरवलं की माझ्या विद्यार्थ्यांनाही मी असंच उत्तम आदर्शवत व्यक्ती म्हणून घडवेल. कदाचित हीच खरी उतराई असेल किंवा काही प्रमाणात का होईना पण मी माझ्या गुरूंचे ऋण फेडू शकेल. आणि स्वाभिमानाने पुन्हा हेच गीत म्हणेन,


"गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational