Renuka Vyas

Inspirational

4.0  

Renuka Vyas

Inspirational

आजीची गोधडी

आजीची गोधडी

4 mins
321


बऱ्याच कालावधी नंतर आजी कडे जायचा योग आला...साधारण तीन-चार वर्षे लोटून गेली होती.. लग्न झालं तसं आजोळ सुटलं... माहेरीच मुळी कारणा शिवाय जाणं होत नसे...आजोळी तर अशक्यच...मी माहेरी गेले की आजी तिकडेच मला भेटायला यायची.. मग आवर्जून असं आजीकडे जाणंच होत नसे म्हणून या खेपेला व्यवस्थित नियोजन करून आजीकडे जायचं ठरवलं...


एक मुक्काम करून लगेच परतायचं होतं.. सुट्टी बेताची होती... त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना भेटून पुण्याला परतायचं ठरलं होतं... प्रवास जरा दूरचाच...त्यामुळे रस्त्याच्या दूतर्फा झाडी बघत, हसत खेळत,गप्पा मारत गाणी ऐकत प्रवास सुरू झाला..मी माझे पती अन साडे तीन वर्षांची स्वरा.. असे आम्ही निघालो...स्वराशी रंगलेल्या गप्पांमध्ये विषय निघाला अन आजोळच्या गमती-जमती सांगतांना माझ्या ही नकळत तो रस्ता मला दूर खोलवर भूतकाळात माझ्या बालपणी घेऊन गेला...माझी आजी...माझी सगळ्यात जवळची मैत्रीण...नऊवार साडी कपाळावर् मेण लाऊन त्यावर भरलेलं मोठ्ठ कुंकू... केसांचा आकडा लाऊन बांधलेला अंबाडा.. लांबसड़क केस...गंगावण वगैरे नाही बरं का..खरे-खुरे...काठांची नऊवार कॉटन ची लुगडी... सगळं कसं अगदी व्यक्तीमत्वाला साजेसं.... 


एक भारदस्त पण मायाळू व्यक्तीमत्व.... पहाटे चारला तीच्या दिवसाची सुरुवात होत असे अगदी कुठल्या ही गजराविना...रोजची अंगवळणी पडलेली दिनचर्या...अंगण,सडा.. रांगोळी... सगळ कसं सागरसंगीत...प्रातः अभ्यंगस्नान झालं की प्रभु वैद्यनाथाचं दर्शन... कधी मेरू पर्वत प्रदक्षिणा...वारांनुसार कधी शनिदेव तर् कधी पांडुरंगाचं दर्शन...तर कधी जगमित्र नागा दर्शन...


चुकून लवकर उठलोच तर आम्ही भावंडही तीच्या सोबत दर्शनाला जायचो... विशेषतः उन्हाळाच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये... तिथून परतलं की घरातील साधारण वीस माणसांचा रोजचा स्वयंपाक... एकत्र कुटुंब पद्धती...आणि खटल्याचं घर...आज तिनं वयाची सत्तरी पार केलीय तरीही ती अन्नपूर्णा हे काम तितकच जीव ओतून करते...विश्वच आहे ते तिचं... तरुणाईला लाजवेल असा तिचा तो उत्साह. 


आजोळपण हे माहेरपणापेक्षा कधीही हवंहवंसं वाटणार नाही का... आई बाबांचा धाक आणि प्रसंगी भीती ही वाटत असे..पण आजीची कायम मायाच होती आहे आणि राहील... दिवस भर हवं ते खायचं... मुरकुल.. लेमन गोळ्या... पेप्सी... भरपूर खेळायचं...मनसोक्त हुंदडायचं... संध्याकाळी दारावर येणाऱ्या मलाई कुल्फ़ीचा वरवा तर ठरलेलाच असे... 


या सर्वांहून आजोळची ऊबदार प्रेमळ दुर्मिळ आठवण म्हणजे आजीची गोधडी.. तीच्या मऊ ऊबदार नऊवारीच्या घड्या एकमेकांवर आखून स्वतः च्या हातांनी ती त्यावर शिवण घालत असे... तिची प्रत्येक शिवण म्हणजे मायेचा प्रेमाचा जिव्हाळ्याचा झरा... प्रत्येक रेशीम विण ती इतकी घट्ट घालते असे...जणू माझ्या अन तीच्या नात्याची वीण अधिकाधिक मजबूत करतेय... 


हिवाळ्याच्या सुस्त मस्त धुक्याची चादर पांघरलेल्या सकाळी... आजीची उबदार गोधडी जी ऊब निर्माण करत असे. तीची सर कुठल्या ही महागड्या ब्लैंकेटला नाही... नसेल... सोबतीला रात्री झोपताना तीच्या छान छान गोष्टी... कधी रामायणातील कधी माहभारतातील... सगळीच मज्जा... मस्ती...त्या गोष्टींमधून आयुष्याचं गणित उलगडत असे... त्यातून मिळालेली शिकवण मला खऱ्या अर्थाने समृद्ध करत गेली....


आठवणींच्या गावात मी इतकी हरवून गेले, की कधी आजीचं घर आलं समजलच नाही... आजी धावत भाकरीचा तुकडा घेऊन ओवाळायला दारात हजर झाली.. घर अगदी आहे तसं होतं... फक्त मातीच्या लादनीची जागा आता सीमेंटच्या लादनीने घेतली होती... गल्ली बोळातल्या काकू आजी,दादा ताई सगळे मला न्याहाळत होते...कित्ती मोठी झाली ग माय...म्हणून मायेनं कुरवाळ होते...याच गोतावळ्यासमोर,सोबत मी लहानाची मोठी झाले होते... आजीच्या संस्कारांनी समृद्ध... एक सुजाण माणूस म्हणून मी घडले...या ही वेळी माझं जंगी स्वागत झालं... अगदी थाटामाटात... पुरण पोळीचा माझ्या आवडीचा बेत होता...सगळं मला हवं ते... हवं तसं... 


मामा मामीशी,भावंडांशी मनसोक्त गप्पा झाल्या.सगळ्या जुण्या आठवणीना आज उजाळा मिळाला....एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं... मर्यादित सुट्टी होती त्यामुळे निघण भाग होतं.... त्या रात्री मी आणि माझी मुलगी स्वरा दोघी ही आजी जवळच अंगणात अंथरूण घालून झोपलो...माझ्या जागी आज स्वरा होती...आजी आज छोट्या स्वराला गोष्ट सांगत होती...आकाशातील तारे ही चमचमत आजीच्या गोष्टीला मस्त दाद देत होते... मध्येच ढगाआड लपलेला चांदोमामा बाहेर डोकावून गोष्टीचा आस्वाद घेत होता...गोष्ट ऐकत ऐकत स्वरा केव्हाच झोपली..आजही सोबतीला होती तीच्या जांभळ्या लुगड्याची मऊ मुलायम गोधडी...त्या गोधडीनं जगातील सगळ्या अशुभ दुष्ट शक्तींपासून आम्हाला संरक्षित ठेवावं... एक अनामिक सुख... जणू आनंदाचं गुपित... जिव्हाळ्यानं मी अंगावर पांघरावं... आणि स्वाधीन करावं स्वतःला निद्रादेवीच्या हाती... 


मी अन् आजी मात्र लहाणपण च्या आठवणीना उजाळा देत राहिलो... ऊशीरा केव्हा तरी डोळा लागला... पहाटे मी उठण्याआधी आजीने सर्व तयारी केली होती, ज्वारी उडदाचे पापड,सातूचे पीठ,खारवड्या,कुरड्या...शहरात दुर्मिळ होत चाललेली ही मायेची शिदोरी...जेवणाच्या डब्ब्या बरोबर सगळं बांधून तयार... आवरासावर झाली तसे आम्ही निघालो.. मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघाणार.. तेवढ्यात आजीनं तीच्या लाकडाच्या कपाटातून ती मौल्यवान वस्तू काढली... पण आज ती माझ्यासाठी नव्हती...ती चिमुकल्या स्वरासाठी होती...आजीची गोधडी आज पणजीची गोधडी झाली होती... 


पूर्णावतार वासुदेव श्रीकृष्ण जेव्हा सुदाम्याच्या पोह्याची पुरचुंडी सोडून एक मूठ आपल्या मुखात घालत होते तेव्हा रुक्मिणीने यावं अन त्यांचा हात धरून तो वाटा आपल्या मुखात घालावा... असं काहीसं होत होतं... द्वारकाधिश श्रीकृष्ण, त्रिभुवनाचा स्वामी खरा... पण त्या पोह्यांनी तो संपूर्णतः तृप्त झाला... कारण त्याला अमृताची गोडी होती... स्वराला आत्यंतिक आनंद देणारं ते गिफ्ट तिने जीवापाड जपलं... किती नशिबवान होतो आम्ही... आहोत...डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारांनी तो अनमोल ठेवा नाहून निघत होता...आजी दृष्टीआड होऊस्तर मी तिला भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिले... 


स्वरा आज आठ वर्षाची झालीये... पण आजही तीच गोधडी पांघरते आणि तिला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपते... आजी हळूहळू म्हातारी होतेय..थकतेय हे पचवणं मनाला फ़ार कठीण जातय...पण तिची ऊबदार रेशमी मऊ गोधडी पाहिली की लक्षात येतं.. ती जितकी जुनी होत ज़ाईल तितकच आजीचं आपल्यावरील प्रेम कायम वृद्धिंगतच होत जाइल..आणि सोबत त्यातील ऊबदारपणा ही...


देव तिला दीर्घायुष्य देवो.... हीच ईश्वरचरणी प्रार्थना.... 


Rate this content
Log in

More marathi story from Renuka Vyas

Similar marathi story from Inspirational