कलीम तांबोळी

Tragedy

3.7  

कलीम तांबोळी

Tragedy

आघात

आघात

13 mins
1.8K


*आघात*

लेखक- कलीम तांबोळी (विद्यानिकेतन क्र. ८)

संपर्क- ९९७५३४७५९६.
 आज त्याच्या डोळ्यांतून पुन्हा पाणी येऊ लागलं, आता त्याला याची जणू सवयच झाली होती. त्याचं मन आताशा जरा जास्तच हळवं बनलं होतं. तो स्वतःलाच विचारत होता, 'प्रत्येक वेळी मीच का? सगळी दुःखं सदा माझ्याच वाट्याला का? हाती आले आले म्हणता दर वेळी आनंद माझ्या हातून का निसटून जातो? का का का?' या प्रश्नांनी तो इतका हैराण झाला की त्याला कुठेतरी डोकं आपटावसं वाटायला लागलं. डोकं एकदम जड झालं त्याचं. काय करावं त्याला सुचेना. इतक्यात त्याला कुणीतरी हाक मारली.

         त्यानं स्वतःला सावरलं, डोक्यातल्या विचारांचे मोहोळ झाडून टाकलं आणि त्यानं आवाजाच्या दिशेनं बघितलं... कोण? अरे ही तर तृप्ती! ही इथे कशी? आणि इतक्या दिवसांनी हिनं मला अचूक कसं काय ओळखलं? कमालय...विचारांच्या तंद्रीत तो तृप्तीच्या समोर उभा राहिला, तृप्तीने त्याच्या नजरेतील प्रश्न वाचले की काय माहीत नाही पण तिने त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली... तिची नुकतीच इकडं बदली झालेली आणि ती आज रुजू व्हायला आली होती. कुणी ओळखीचं दिसतंय का म्हटलं तर तिला अचानक हाच दिसला! याच्या डोक्यातल्या प्रश्नांचा भुंगा मेंदू पोखरून सध्या तरी शांत बसला होता. पण त्यानं मेंदू पोखरल्यानं झालेल्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. तृप्तीला ते जाणवलं की नाही काय माहीत! दोघे बोलत उभेच होते. जरा भानावर येत तो तृप्तीला म्हणाला, 'थांब जरा, आलोच.' तृप्तीला आपला हा असा चेहरा दिसू नये म्हणून तो तोंड धुवायला जात होता! काय विचित्राय ना माणूस? तोंड धुवून मनातले विचार पुसायचा प्रयत्न करतो! ते पुसले जातीलच या भाबड्या आशेनं! खरेतर त्याला मनोमन तृप्तीनं विचारावं असं वाटत होतं, हिच्याजवळ आपलं मन मोकळं करावं, आणि मनावरचं ओझं कमी करावं असा विचार त्याच्या मनात आला, पण दुसऱ्याच क्षणी त्यानं विचार केला की, आपणच आपले प्रश्न सोडवायला हवेत, का इतरांना सांगून त्यांची डोकेदुखी आपण वाढवावी? त्या व्यक्तीला जर आपली काळजी असेल तर आपल्यामुळे तीही काळजीत पडेल! त्यापेक्षा नकोच! 

             दोघे कॅन्टीनमधे आले. चहा हा त्याचा वीक पॉईंट होता, मस्त वाफाळलेला चहा आणि भजींची ऑर्डर देऊन दोघे एका टेबलावर बसले. तृप्तीनं बोलालयला सुरुवात केली.

तू इथं आहेस हे माहीत होतं, पण आपली भेट इतक्या लवकर होईल असं नव्हतं वाटलं.

तो हसला, म्हणाला,

काही भेटी आणि विरह आपल्या हातात नसतात.

आपण पुन्हा त्याच विचारांच्या गर्तेत जात आहोत याची जाणीव होताच त्यानं विषय बदलण्यासाठी तिला विचारलं,

तू कॉलेज कट्टा ग्रुपवर नाहीस ना? नंबर दे मी ऍड करतो.

ती म्हणाली,

नाही रे बाबा, मी साधाच मोबाईल वापरते. मला नाही आवडत ते फेसबुक अन व्हाट्सअप.

ही कोणत्या काळात जगतीये, अशा अविर्भावात त्यानं तिच्याकडं बघितलं, त्याच्या नजरेतला प्रश्न समजून ती खुदकन हसली. आणि म्हणाली

 गंमत केली रे. घे नंबर.

त्यानं नंबर घेतला आणि लगेच ग्रुपवर ऍड करून तिचं वेलकमही केलं.. त्या वेळी जे जे ऑनलाईन होते, त्या सगळ्यांनी मला वेलकम चे मेसेज टाकले..

ती म्हणाली

बघ आता, आपण दोघे एकमेकांच्या समोर बसलोय, इतक्या दिवसांनी भेटलोय पण तू मला वेलकम केलंस ते व्हाट्सअप वर! आपल्याला या व्हाट्सअप ने जवळ आणलंय की दूर केलंय?

जवळ आणि दूर

जवळ आणि दूर

भेट आणि वियोग

भेट आणि वियोग....

गोल गोल गोल गोल गोल गोल... पाण्यातला भोवराच... पोहता येणाराही एकदा भोवऱ्यात सापडला की... खेळ खल्लास! 

नाही नाही! 

त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले..

काय रे? काय नाही नाही?

भानावर येत तो म्हणाला, 

नाही गं मी म्हणालो तंत्रज्ञान आहे ते, त्याचा वापर आपणच खुबीने करायला हवा.

दोघे बराच वेळ बोलत होते, दोन दोन वेळा चहा घेऊन झाला होता......
ती दोघे बराच वेळ कॅन्टीन मध्ये बसून बोलत होते. पार कॉलेज पासून ते आत्ताच्या आयुष्यापर्यंत ते भरभरून बोलत होते ... निदान तृप्ती तरी बोलत होती.. तिच्या सुखी आयुष्याविषयी तिला किती सांगू नि काय करू असं झालेलं. हा ऐकत होता, मधेच मानेनं, कधी शब्दानं होकार-नकार देत होता.. थोड्या वेळानं ही गोष्ट तृप्तीच्या लक्षात आली, आणि ती म्हणाली,

अरे कधीची मी एकटीच बडबडतीये, तुझं काय? तुझ्याबद्दल सांग ना.

समुद्रातून जाताना, अचानक वादळ यावं आणि त्या खवळलेल्या समुद्रात आपल्याला कुणीतरी लोटून द्यावं. निळंभोर पाणी अचानक काळंभोर व्हावं, ते नाकातोंडातून भसाभसा फुफ्फुसात जावं.. श्वास अडकावा, जीव गुदमरावा.. हातपाय हलवून जीव वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा, हळूहळू भान हरपू लागावं... संपलं सगळं... आणि अचानक डोकं भसकन पाण्याबाहेर यावं.... त्याची अशीच अवस्था आत्ता झालेली. एवढा वेळ हृदयात दाबून ठेवलेला ज्वालामुखी अचानक उफाळला आणि तो ढसाढसा रडायला लगला. तृप्तीला क्षणभर काय होतंय कळेच ना. तिला याची अपेक्षा तर बिलकुलंच नव्हती. याला आता शांत कसं करावं तिला कळेना. तिला वाटलं याचा आवेग संपू द्यावा, नकोच थांबवायला याला. काही वेळाने हा भानावर आला.

सॉरी

आणि उठून बेसिनकडे गेला, तोंडावर सपासप पाणी मारलं, पुन्हा मनातली घालमेल धुण्याची वृथा खटपट! पण आता तृप्तीला सगळं सांगावं लागणार होतं. एका अर्थी त्याच्या मनासारखं झालं.

तो पुन्हा तृप्तीजवळ आला.

तृप्ती म्हणाली,

बरं वाटतंय ना?

हो.

चल जरा बाहेर जाऊ मोकळ्या हवेत. इथे एखादी बाग आहे का? आपण तिथेच बसू थोडा वेळ... तृप्ती.

चालेल, इथे आहे एक बाग... तो.

दोघे रिक्षाने बागेत आले.

संपूर्ण प्रवासात दोघेही शांत होते.

काय विचारायचं हे तृप्ती ठरवत होती, आणि सुरुवात कोठून करायची याची जोडणी त्याच्या मनात चालू होती.

एका झाडाखालच्या बाकावर दोघे बसले..

हं.. बोल आता, नक्की झालंय काय? _ तृप्ती

नक्की सुरुवात कोठून करावी कळत नाहीये. _ तो

सुचेल तिथून कर.  _ तृप्ती

तृप्ती अगं मी नोकरीच्या बाबतीत तुमच्यापेक्षा जरा कमनशिबी ठरलो. मला खूपच उशीरा जॉयनिंग मिळाली. या कालावधीत मी अत्यंत खचलो होतो. मला कुणाचाच आधार नाही असं वाटायचं. आयुष्यात एक प्रकारची पोकळी असल्यासारखं वाटायचं. आपलं कसं होईल या विचाराने रात्र रात्र झोप लागायची नाही.. नोकरी कधी मिळेल याची खात्री नसल्याने मी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. शिकवणीत मन रमायचं. हळूहळू मुलांची संख्या वाढायला लागली आणि मला सहायकाची गरज जाणवू लागली. मी दोन चार जणांना त्याविषयी सांगून ठेवलं. एकेदिवशी एक मुलगी माझ्याकडे शिकवण्यासाठी आली. पहाताक्षणी नजरेत भरावी अशी होती ती. त्या वेळी तिला नोकरीची गरज होती अन मला सहायकाची. तिला दुसऱ्या दिवशी बोलावलं आणि एक भाग शिकवायला सांगितला, तिने तो छानच शिकवला. मी तिला नोकरी दिली. आता मी अजून एक खोली भाड्याने घेतली, एका वेळी दोन वर्ग चालत. वेळापत्रकानुसार सगळं चाललेलं. ती मला सर म्हणे. माझ्याशी जरा कमीच बोलायची. आणि तेही अगदी अदबीने.

तू तिच्यावर प्रेमबीम करू लागलास की काय? _ तृप्ती.

सांगतो ना.

एके दिवशी क्लास संपल्यावर मी तिला थांबायला सांगितलं. ती थांबली. मी या वेळी तिला ठरल्यापेक्षा हजार रुपये जास्तीचे दिले, आणि तू छान शिकवत असल्याने आपल्याकडे मुलांचे ऍडमिशन वाढले आहे, आणि त्यामुळे मी तुझा पगार वाढवतोय म्हणून सांगितलं. ती खूप खुश झाली. मला धन्यवाद देऊन ती निघून गेली. आताशी माझ्या डोक्यात तिच्याबद्दल जास्तच विचार येऊ लागले होते. ती सारखी समोर असावी असं वाटायचं. मला प्रेम झालं होतं. तिने जर होकार दिला तर तिच्याशी मी लग्नच करायचं ठरवलं.... पण मी अजून तिला विचारलं नव्हतं, ती काय म्हणेल मला माहित नव्हतं. मनात मांडे खाणं योग्य नाही म्हणून उद्याच तिला विचारायचं ठरवलं. 

दुसऱ्या दिवशी मी जरा लवकर क्लासवर गेलो. ती यायला अजून अवकाश होता. साधारण अजून पंधरा मिनिटे. पण मला हा एवढासा वेळ युगांसामान वाटायला लागला. मिनिटा मिनिटाला मी घड्याळ बघत होतो. पण वेळ तिच्याच गतीने पुढे सरकत होती. आणि अचानक ती समोरून येताना दिसली. माझ्या काळजाचा ठोका वाढला, मी काय बोलायचं हे ठरवलंच नव्हतं! ऐनवेळी शब्द शोधायला लागलो, ते जुळवायला लागलो. ती आली. मला गुड मॉर्निंग म्हणून वर्गात गेली. मी तिला रिप्लाय दिलाच नाही. भानच नव्हतं मला. मी नकळत तिच्या मागे वर्गात गेलो. ती म्हणाली,

काही काम आहे का सर?

अं? हो... म्हणजे हेच की सिलॅबस किती झालाय? आपण चाचणी घ्यायला हवी.

अहो सर, मागच्या आठवड्यात घेतली की चाचणी आपण. _ ती.

ओह, सॉरी. विसरलोच होतो मी.

इतक्यात मुले आली म्हणून मी निघालो.

सर काही काम असेल तर थांबते क्लास झाल्यावर.. _ ती

मी हो म्हणालो.

शिकवण्यात लक्षच लागेना. काय बोलायचं याची मनात जुळवाजुळव केली, आणि मनातल्या मनात उजळणीही केली. 

क्लास सुटल्यावर ती माझ्याच वर्गात आली.

बोला सर.

मी सरळ विषयालाच हात घातला..

तू मला आवडतेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्याशी लग्न करायचंय. तुझा निर्णय तू सांग.

एका दमात सगळं सांगितलं... ती शांतच होती. तिच्या चेहऱ्यावर नेमके भाव कोणते आहेत हे कळतच नव्हतं.. किती वेळ गेला मला कळलं नाही. मी खाली मान घालून बसूनच होतो.. मी वर पाहिलं तेव्हा ती माझ्याकडेच बघत होती. मी तिच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. मी दुसरीकडे बघायला लागलो.. ती म्हणाली 

मला काहीच कळेनासं झालंय. हे स्वप्न की वास्तव काय माहीत. मी आता घरी जाते. तुमचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल.

ती निघून गेली.

मी विचार करत तिथेच बसून होतो.... किती तास आठवत नाही.        दुसऱ्या दिवशी मी जरा धाकधुकीतच क्लास गाठला. तिला माझं विचारणं आवडलं की नाही? ती काय विचार करेल माझ्याबद्दल? तिने जर मला नकार दिला तर आपण काय प्रतिक्रिया द्यावी? आणि होकार दिला तरी काय करावं? रात्रभर असे अनेक विचार मला छळत होते, मी फक्त कूस बदलत होतो, झोप नाहीच. ती आली. नेहमीप्रमाणे मला गुड मॉर्निंग म्हणून क्लास मध्ये गेली! अरे! मला इथे रात्रभर झोप नाही, विचारांनी पार डोकं फुटायची वेळ आलेली, आणि ही? अशी कशी? हिने काही विचार केलाय की नाही? नाहीच बहुतेक. नाहीतर ही अशी वागली नसती.. नकार असता तर ही हसून गुड माँर्निंग नसती म्हणाली. मग होकार असेल. पण मग लाजली कशी नाही.. पुन्हा विचार.. पुन्हा चक्र..गोल गोल..

 अरे मुली अशाच असतात, त्यांच्या मनाचा अंदाज सहजासहजी नाही बांधता येत. तृप्ती हसून म्हणाली.

अगं हो ना... त्या दिवशी माझे मन कशातच लागेना. कधी क्लास सुटतोय असं झालेलं. मधल्या वेळात एकदा ती माझ्या वर्गात येऊन खडू घेऊन गेली. चेहरा तसाच... 

क्लास सुटला. ती माझ्या वर्गात आली. मीच लाजलो. मला तिच्याकडे बघावेच वाटेना. ती म्हणाली,

बोला सर.

मी काय बोलू? तूच बोल ना. काल म्हणाली होतीस आज सांगणार म्हणून.

हो, सांगणार ना.

असे म्हणून तिने मला गुलाबाचे एक टपोरे फूल दिले. गुलाबी.

बस? मिळाले उत्तर.

हे... हे म्हणजे काय? शब्दात नाही सांगता येत का?

नाही. काही भावना शब्दात व्यक्त करू नयेत माणसाने. त्या भावना आपल्या शब्दांच्या पलीकडल्या असतात. त्यांना शब्दात पकडू म्हणता, त्या फिक्या पडू शकतात. सो, नो वर्ड्स.

मला वाटलं 

काय भारी आहे यार ही.. खूप छान बोलते. हिने बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं असं वाटत होतं. पण ही वेळ आणि जागा योग्य नव्हती. तिला म्हटलं आता तू जा, मी फोन करिन तुला बोलू आपण. 

काय गंमत असते नाही? आपले काहीच नसते ना, तेव्हा आपल्या मनात पण काहीच येत नाही! पण आपल्यात जेव्हा नातं बनतं तेव्हा मात्र आपल्याला कुणी बघेल का? कुणी काही बोलेल का? उगीच मनात विचार येतात. 

तो हसला, अगदी खळखळून हसला, तृप्तीलाही बरं वाटलं.

तेव्हा दोघांकडेही साधे मोबाईल होते, व्हाट्सऍप चा अजून शोधही लागलेला नव्हता आणि मोबाईलवर इंटरनेट ही परवडणारी गोष्ट नव्हती. फोनवर खूपच कमी बोलणं व्हायचं. 

हळूहळू आम्ही दोघे एकमेकांत गुंतत गेलो. आणाभाका झाल्या, एकमेकांना कधीही सोडणार नाहीच्या शपथा झाल्या. भेटायचं असल्यास आम्ही पुण्यातच येत असू. 

त्या दिवशी आम्ही दोघे गणपतीच्या दर्शनाला गेलेलो. मनोभावे दर्शन घेतले, त्याला म्हणालो, बाप्पा बास! आता काही नको. आज मी तुझ्याकडे काहीही मागणार नाही. माझ्याकडून तुला आज सुट्टी.

ती खूप वेळ डोळे मिटून होती. काय मागितलं म्हणून विचारलं तर ते सांगायचं नाही म्हणाली..

आमचं नातं बहरत होतं

फुलत होतं..

दोघेही खूप आनंदात होतो.

तिच्या परीक्षा संपल्या की ती गावाला जात असे. यावेळीही गेली. नियमित फोनवर बोलणं व्हायचं. तिला गावी जाऊन चार पाच दिवस झाले. आणि एक दिवस ती आजारी असल्याबाबत तिने मला सांगितलं. नेहमीप्रमाणे, काळजी घे, डॉक्टर ला दाखव म्हणून झाले. रोज तिचा फोन यायचा. तिचा आजार जास्तच बळावला होता. तिची सगळी सुट्टी आजारपणातच गेली. माझी अवस्था प्रचंड वाईट झालेली, जेवणही जात नव्हते नीटपणे... माझी तब्येतही खालावली होती.... दिवस जात होते. तिच्या सुट्या संपल्या आणि ती पुन्हा क्लासमधे यायला लागली. पण तिच्यात काहीतरी बदल झाला होता. ती माझ्याशी नीट बोलत नव्हती. चिडचिड करायची. तिला पटकन राग यायला लागला होता. मी समजून घेत होतो.. 

प्रेमात असं होतं रे. असा पॅच येतोच कधीतरी प्रत्येकाच्या नात्यात. _ तृप्ती.

हो. मी असाच विचार करून पुढे विषय वाढवत नव्हतो.

आणि अचानक एक दिवस ती मला म्हणाली.

आपण लग्न करण्याचा विचार केला होता, करुही आपण. पण लग्न झाल्यानंतर अनेक गरजा असतात, त्या आपण कशा भागावणार? आपल्या या एवढ्याशा क्लासवर नाही चालणार आपला संसार.

तू आज अचानक असं का बोलत आहेस? माझं काही चुकलं असेल तर तसं सांग.

चुकलं नाही. पण मी जरा प्रॅक्टिकल विचार करतीये.

बरं. मग तुझ्या मते आपण काय करायला हवं?

तुमचं मला नाही माहीत पण मी मात्र काय करायचं ते ठरवलंय.

काय ते?

माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक मुलगा बघितला आहे. त्याला मी आवडले आहे.

आणि तुला?

मलाही तो आवडला आहे.....

डोक्यात दगड पडल्यावर काय होतं याचा अनुभव मी घेत होतो. मला पुरेसा विचार करायला वेळही न देता ती म्हणाली,

मला विसरून जा. आणि प्लिज मला यापुढे फोन करू नका.....

ती निघून गेली.

रेशीमकीडा....

हं! रेशीकिड्याचं मन त्या तुतीच्या पानावर येतं, तो ते पान खायला लागतो. त्याच्यातून रेशमाच्या तारा निघतात, त्या याच्याच भोवती कोष तयार करतात. याला जाणीव होते की आपण पाने खात असल्याने आपल्याभोवती हा कोष बनतोय, यात आपण कायमचे अडकू! त्याला माहित असतं सगळं! पण ... प्रेमापोटी तो खातच राहतो. शेवटी एक वेळ अशी येते की तो त्या कोषात बंदिस्त होतो, सगळीकडे अंधार, ना पान ना प्रेम... एकटाच... आता त्याच्या सोबत असते फक्त चिरनिद्रा! त्याची सुटका फक्त मरणानेच! कारण हा कोष त्याने स्वतःच इतका घट्ट केलेला असतो की त्याला स्वतःलाही त्यातून बाहेर पडता येत नाही... मी रेशीमकीडा! 

ती गेली.

माझ्या हृदयात प्रचंड पोकळी निर्माण करून गेली...

निव्वळ स्वार्थापोटी ती निघून गेली...

सगळी स्वप्न, आणाभाका खोट्या...

प्रेम खोटं...

ओल्या कोरड्या भावना खोट्या...

ती खोटी! खरंच? ती खोटी?

मग खरं काय? नाही! काहीच खरं नाही....

विचारांचं आग्यामोहोळ डोक्यात घुमायला लागलं. त्या माशा मेंदूला कचाकच चावायला लागल्या...

डंख.. मेंदू.. मेंदू .. डंख.. 

.

.

.

.

आता तृप्तीच्या डोळ्यात आसवं दाटी करू लागलेली, त्यापैकी एक चुकार थेंब तिच्या गालावर ओघळला. ती भानावर आली.

सॉरी. बोल पुढे.

मी कधी सावरलो नेमका आता मला नीट आठवत नाही. पण आता आपणही स्वतःचाच विचार करायचा असं ठरवलं होतं मी. तिचा विचार मधेच डोकं वर काढी आणि मी अस्वस्थ व्हायचा.. पण ती मला कधीच विसरली असेल म्हणून मग मीही तिचा विचार मनातून झटकून टाकायचो...

वर्षे सरली. या गोष्टीला दहा वर्षांचा काळ लोटला.

या काळात मला नोकरी लागली.

चांगला स्थिरस्थावर झालो. गाडी घेतली. पण गाडीतून कुठेही जाताना शेजारची मोकळी जागा सलते हृदयात... आजही!

मग ठरवलं, आता तिला शोधून काढू. आणि आपला रुबाब दाखवू. माझेही दिवस पालटले, जरा तिला शरम वाटते का पाहू. शोधायचा प्रयत्न केला... खूप खूप प्रयत्न केला... तिच्या कॉलेजच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. पण कुणीच काही सांगू शकलं नाही. ती ज्या कॉलेजमध्ये होती, तिथे माझा मित्र आहे. त्याला सांगून कॉलेजच्या जुन्या रेकॉर्डमध्ये काही सापडतंय का बघायला सांगितलं. तिथून तिच्या घरचा पत्ता मिळाला.. एक दिवस मी तिथे जायचं ठरवलं. तिथे हिच्याविषयी नक्की कळेल!

गेलो.. घरी एक लहान मुलगा खेळत होता.

कदाचित हिचाच असेल.

आली असेल माहेरी.

बरं झालं!

पाहू ओळखते का..

मी आत गेलो. बहुतेक तिचे वडील असावेत, ते पेपर वाचत बसले होते. मी नमस्कार केल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहून नमस्कार केला आणि पेपर खाली ठेवला. मी ओळख करून दिली. त्याबरोबर ते रडायलाच लागले! अरे! हे एक नवीनच! मला काय करावं सुचेना. मी त्यांच्या बाजूला जाऊन बसलो आणि त्यांना आधार दिला, मला काहीच माहीत नसताना माझ्याही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं... थोड्या वेळाने ते शांत झाले. घरी अजून कुणीच नव्हतं. त्यांनी मला पाणी दिलं. घोटभर पाणी तोंडात घेतलं पण ते मला समुद्राएव्हढं वाटायला लागलं.. काय झालं असेल नेमकं. ती कुठे आहे? मला तिला भेटायचंय...

बाबांनी सांगायला सुरुवात केली.

मला तिने तुमच्याबद्दल सांगितलं होतं. मी तिला शिक्षण संपल्यावर बघू आणि मुलगा चांगला असेल तर माझी काहीच हरकत नाही असं सांगितलं होतं. खूप खुश होती.

बाबा तुम्हाला ते शंभर टक्के आवडणार म्हणायची! खूप कौतुक करायची तुमचं.

बिन आईची ती लेक.. मी तिला खूप जपायचो. तिला कसलाही त्रास मी होऊ द्यायचा नाही..

ती एका सुट्टीला इकडे आली होती.

मैत्रिणीसोबत तिच्या शेतावर गेलेली.

तिथून परतत असताना आमच्याच नात्यातील एका पोरानं तिला अडवलं... आणि...

बाबांचा बांध पुन्हा फुटला.

आता मीही माझ्यातला समुद्र मोकळा केला..

बाहेरचं ते लेकरू आत आलेलं. ते भांबवून आमच्याकडे बघत होतं.

हा?

तिचाच!

मी उठून त्याला जवळ ओढलं. घट्ट मिठी मारली आणि....

बाबा सांगत होते.

तिथून पुढे ती खूप खचली. मी तुमच्याशी लग्न करायचा सल्ला दिला तर म्हणाली नाही.. मला त्यांना फसवायचं नाही.. 

अगं पण त्यांना सांगणार काय तू?

बघू काहीतरी.

एक दिवस तिच्या पोटात खूप दुखायला लागलं. दवाखान्यात नेलं तेव्हा हिला दिवस गेल्याचं कळलं! मला तर कुणीतरी उचलून आपटल्यासारखं झालं. डोक्यात फक्त मुंग्या! आसपासचं काहीच भान नाही.. 

तिला मी म्हणालो.. हे मुलं.....

हवंय मला बाबा.

काय??

हो.

बोलणं बंद...

मग एके दिवशी ही तुमच्याकडे आली. काय सांगितलं माहीत नाही. पण दोन दिवस खोलीतून बाहेर नाही आली. नुसती रडत होती. मी तिला खूप समजावलं. ती मला म्हणायची हे एक दिवस मला शोधत इथे नक्की येतील. तेव्हा त्यांना ही डायरी द्या वाचायला. ती सारखी डायरी लिहीत असे. आम्ही तिच्या खोलीत होतो. बाबांनी कपाटातून तिची डायरी काढून मला दिली.

मी म्हणालो..

हो बाबा, पण ती कुठाय?

मला भेटायचंय तिला. माझ्यावर इतका अविश्वास का दाखवला? मी तिला स्वीकारलं असतं. माझ्या प्रेमाची कुचेष्टा का केली तिनं? मला तिला जाब विचारायचाय. कुठे असते ती आता? मला आत्ताच्या आत्ता तिच्याकडे घेऊन चला. मी या मुलासह तिचा स्वीकार करीन.. बाबा..

बाबांचे डोळे आता कोरडे झालेले. ते इतकंच बोलले..

ती आता आपल्यात नाहीये.

.

.

.

हा आघात प्रचंडच होता...

.

.

.

डायरीचं एक पान..

" मी तुला असं अरेतुरे बोलावं असं तुला सारखं वाटायचं ना! घे तुझी इच्छा पूर्ण करतीये! आणि आता जरा हस पाहू. मी तुला खूप दुःख दिलंय. माझ्याही वेदनांना अंत नाही रे..

ऐक.. आपण ज्या बागेत जायचो ना, तिथे जा. आणि तिथेच पुढचं पान वाच."

" तो समोर फुलांचा ताटवा आहे ना? मस्त टवटवीत टपोरी फुलं! जा त्या ताटव्यात.. त्या ताटव्यात जा आणि त्यातलं एक सर्वात सुंदर, तुला मनापासून आवडलेलं फूल घेऊन ये... पण एक अट आहे, ती कसोशीनं पाळायची बरं का! एकदा का तू पाऊल पुढे टाकलंस की पुन्हा मागे यायचं नाही.. पुढेच जायचं. जा. उठ फूल घेऊन ये...


मंतरल्यासारखा मी उठलो, ताटव्यात शिरलो..

कित्ती कित्ती सुंदर फुलं होती!

मनमोहक! आकर्षक! आणखी खूपच काही.

हे एक प्रचंडच आहे! यातलं फक्त एक निवडायचं? 

कोणतं? कोणतं घेऊ?

हे? अंहं, ते?

नको नको ते पुढचं घेऊ!

ताटवा संपला!

.

.

.

आता शेवटी राहिली होती काही कोमेजलेली फुले!

मला आता यातलंच एक निवडायचं होतं.

मी त्यातल्या त्यात बरं फूल निवडलं आणि आलो.

.

.

.

.

" आयुष्य हे असंच असतं!"

.

.

.

.

आता मी आणि तृप्ती दोघेही मनसोक्त रडत होतो...

समाप्त.Rate this content
Log in

More marathi story from कलीम तांबोळी

Similar marathi story from Tragedy