Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

कलीम तांबोळी

Horror

3.7  

कलीम तांबोळी

Horror

चकवा

चकवा

23 mins
7.3K


"बाप्या, ऐक लका, उगंच रिस्क कायला घेतो?" बाप्याचा हात धरून त्याला खाली बसवत नाऱ्या म्हणला.

"नाऱ्या, लका रिस्क त्यात असती, ज्यात धोका असतो. ह्याच्यात काय धोका?"

"आरं येड्या ****, आमचं नाना सांगायचं, त्यांच्या बापाच्या टायमाला एक देवऋषी व्हता, त्यो त्या झाडाखाली भुतांचा बाजार दावायचा आनी त्यांच्यासोबत कुस्त्या बी करायचा. त्याला मंत्र येत असल्यामुळं भुतं त्यो सांगल ते करायची. तू येड्यागत करू नको लका."

"ही गोष्ट तुला आज्यानं सांगितली?"

"हा ना. त्याला त्येच्या बापानं सांगितली."

"आन त्येच्या बापाला त्येच्या आज्यानं सांगितली असणार." बाप्या हसत बोलला.

"अय नाऱ्या, आता ह्यो जातो म्हणतोय तर तू टंगडं कायला मधी घालितो? जाऊ दे त्येला, मग खरं खोटं आपल्यालाबी कळंलच की." कुंभाराचा गण्या म्हणला.

"वा रं वा! तुला खरं खोटं काय हे बघायचय, आन त्येच्यासाठी बाप्याला लिटमस पेपर करतोय काय? तू जा की मग."

"वो शास्त्रज्ञ, आमचा लिटमस लालचा लालच हाये, तुमी का पिवळा व्हायला लागलाय पन?"

आन्यानं पंच हाणला तशी सगळे फिदीफिदी हसायला लागले.

"बाप्या, तू माजं ऐकनार हायेस का नाही त्यवडं सांग." नाऱ्यानं काकुळतीला येऊन विचारलं.

"आयला नाऱ्या लका तुला माहिताय मी आसलं काय मानीत नाय, भित्यापाटी राक्षस आसतो भावा! आनी आपन भित्रे नाय. आनी आजून एक, भुतं - खेतं सब झूट हे मला सिद्द करायचंय. त्यामुळं, मी च्यालेंज घेतलंय. फिक्समदी."

आता नाऱ्याचा नाईलाज झाला. नाऱ्या कातावून जाऊ लागला.

"अय भावा, पैज जिंकल्यावर उद्या पार्टीला य बर का" बाप्या हसत हसत मोठ्याने म्हणाला.

बाप्या आणि नाऱ्या दोघे जिगरी दोस्त होते. पण दोघांचेही स्वभाव कमालीचे विरुद्ध. नाऱ्या भूत, करणी, भानामती, देव - देवऋषी मानणारा. प्रचंडच अंधश्रद्ध. तर याउलट बाप्या.. त्याचा या कशावरच विश्वास नव्हता. तो अगदी देवही मानत नव्हता. नास्तिकच! नाऱ्या दर अमावस्येला म्हसोबाला कोंबडं कापायचा, ते खायला मात्र न चुकता बाप्या जाई. म्हसोबाच्या पुढं ठेवलेलं अंडं घरी नेऊन खायचा, त्याच्यासमोरचा लिंबू कालवणात पिळून खायचा. एखाद्या ठिकाणी कुणी उतारा टाकलेला असेल तर त्यावरचा नारळ सुद्धा हा फोडून खाई! तो म्हणे भुतं बितं सब झूट असतं.... नारबा याच्या पूर्ण उलट! घरी कुणी आजारी पडलं तर देवऋषी गाठून इलाज करी.. भुतांना तर जाम घाबरायचा. रात्री बेरात्री त्याला कसले कसले आवाज यायचे. एकदा उसाच्या रानात रात्री बारी देत होता. अचानक पाणी बंद झालं. लाईट तर गेलेली नव्हती, मग पाणी का गेलं? मोटारीनं पाणी सोडलं काय म्हणून हा विहिरीकडे निघाला, जस जसा तो विहिरीच्या जवळ जात होता, कानोसा घेत होता की मोटारीचा आवाज येतोय का. पण अगदी विहिरीवर पोहोचेपर्यंत मोटारीचा आवाज आला नाही. म्हणजे मोटार बंद झाली होती.

'आयला, लायटीनं झटका नाय मारला काय नाय, मोटार बंद कशी काय झाली?' त्यानं मनाशीच विचार केला.

त्याच्या मनात एक शंका आली की रानात घुशी लय झाल्यात, एखाद्या घुशीनं वायर कुरतडली असंल, चेक करायला पायजे. त्यानं गडबडीत बॅटरीच आणलेली नव्हती. आता अंधारातच अंदाजानं त्याला विहीरीत उतरावं लागणार होतं. रात्र अमावस्येची नसली तरी अंधार खूप होता. पण नाऱ्याला सगळं सरावाचं असल्यानं तो डोळे झाकून सुद्धा विहिरीत उतरू शकत होता. तो आधी लाईटच्या बोर्डापाशी गेला, वायरी ओढून बघितल्या, कनेक्शन फिट होतं. त्यानं बोर्डाचं झाकण लावलं आणि विहिरीकडे वळला, अचानक बोर्डाचं झाकण आपोआप उघडलं. 'वारं नाय काय नाय आन झाकन आपोआप उघडलं कसं?' तो झाकण लावायला वळला तेव्हा, विहिरीत अचानक काहीतरी पडलं. नाऱ्याच्या अंगावर भीतीने झर्र्कन काटा आला. आणि एवढ्यात मोटार चालू झाल्याचा आवाजही त्याला आला! नेमकं काय होतंय त्याला कळेच ना. वेळ काय असावी याचा अंदाजही त्याला येईना. आता त्याची भीती अजून वाढली होती, छातीचा आवाज तर शेजारच्या माणसालाही ऐकू यावा..पुन्हा मोटार बंद झाली. नाऱ्याचं नरडं कोरडं पडलं. कारण गावात लाईट दिसत होती. आणि इथे वेगळंच काही घडत होतं.. आता पुन्हा पाण्याचा आवाज आला, पण यावेळी पाण्यात काही पडलं नव्हतं, काहीतरी बाहेर आलं होतं! नाऱ्याच्या मनात पळायचा विचार आला, पण जणू त्याचे पाय कुणीतरी घट्ट धरून ठेवलेले. त्याला जागचं हालताही येईना.. विहिरीत आता बांगड्या किणकीणत होत्या...वाऱ्याची बारीक झुळूक आली तशी नाऱ्याला वाटलं, कुणीतरी कानापाशी शीळ घालतय. त्याचं अंग भीतीनं थरथर कापत होतं... ना ना तऱ्हेचे विचार त्याच्या मनात येत होते. आता बांगड्यांच्या आवाजात घुंगरांचा आवाजही मिसळला. पैंजणातले घुंगरू! पायातले पैंजण! बांगड्या.... पैंजण.... किणकिण.... छुम छुम.... कुणीतरी विहिरीतून वर येतंय.... छुम छुम छुम छुम.... विहिरीत अंधुक प्रकाश दिसायला लागला! आता नाऱ्याचे डोळे फिरले, बुबुळ जणू बाहेरच पडतील. ओरडावं म्हटलं तर घशातून आवाजच निघेना. जिभेला लकवा मारल्यासारखं झालं.. घडत असलेलं खरं की स्वप्न??? प्रकाश आणि आवाज वाढत होता... हळूहळू कुणीतरी विहिरीतून बाहेर येत होतं. नाऱ्या बघण्याशिवाय काहीही करू शकत नव्हता. आता गावातली लाईट गेलेली, पण विहिरीत मोटार चालू झालेली... तिची घरघर... किणकिण... छुम छुम... विहिरीतून एक आकृती बाहेर आली. तिच्या हातात मेणबत्ती होती.. मोठीच्या मोठी ज्योत... पण ज्योत वाऱ्याने जराही हलत नव्हती! नाऱ्याला त्या बाईचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता.. पिवळसर रंग... काळेभोर डोळे... काळेच त्यात पांढरा भागच नाही! लांबसडक केस... केस पार जमिनीवर लोळत होते... लालसर ओठ.... कपाळावर भलंमोठं कुंकू... जुन्या रुपयाच्या नाण्याऐवढं...हिरवीगार साडी नेसलेली ती बाई विहिरीच्या काठावर येऊन उभी राहिली होती.

नाऱ्याचे डोळे बाहेर पडायची वेळ आली. वाऱ्याचा वेग वाढला, धूळ उडायला लागली. सांय सांय सांय सांय.... वाऱ्याचं गाणं सुरू झालं, वाऱ्याबरोबर तिचे केस उडू लागले. अरे.... पण हे काय.... हेच केस मागून पुढे कसे काय उडायला लागलेत! आणि... आणि हातातली मेणबत्ती का विझत नाहीये?? विझायचं राहू द्या पण तिची ज्योत या भरारणाऱ्या वाऱ्यातही हलत नव्हती. नाऱ्याचं तोंड सताड उघडं होतं, त्यात माती जायला लागली, तो तोंड बंद करायचा कसोशीनं प्रयत्न करत होता. पण जणू त्याचा जबडा आखडला होता. नरड्यात माती जायला लागली. श्वास कोंडायला लागला, त्याचा जीव गुदमरायला लागला.. बाई आता भेसूर दिसत होती. ती त्या काळ्याभोर डोळ्यांनी नाऱ्याकडे एकटक बघत होती. एवढ्या भयानक वेळी नाऱ्याला अजून एक गोष्ट जाणवली, या बाईच्या डोळ्यांना पापण्याच नाहीत! तिच्या साडीचा पदर पुढून मागे आणि केस मागून पुढे वाऱ्यावर नाचत होते. हिच्या एका हातात मेणबत्ती आहे, दुसरा हात कुठाय? हा विचार नाऱ्याच्या मनात यायला आणि तिनं आपला दुसरा हात पुढे करायला एकच क्षण पुढे आला! तिचा दुसरा हात पुढे येत होता, नाऱ्याच्या दिशेने! तिनं मान हलवली आणि तिच्या तोंडातून एक विचित्र आवाज बाहेर पडला.. जणू कुणीतरी किंकाळी मारली होती, नाही कुत्रा भुंकला बहुतेक, नाही नाही बाळ रडलं जणू.... नाही ....कसला आवाज हा?? हातासोबत आता तिचे केसही याच्याकडे झेपावू लागले, केस कसले, जणू काळेभोर नागच आपल्याला डसायला येत आहेत!

तिचा हात नाऱ्याच्या जवळ आला आणि गपकन मागे जाऊन त्यानं नाऱ्याची मान धरली. केस पुढे आले, ते नाऱ्याच्या गालाला गुदगुल्या करायला लागले. नाऱ्याची छाती इतकी जोरजोरात धडधडत होती की कोणत्याही वेळी त्याचं काळीज बाहेर पडेल! श्वास जोरात जाऊ येऊ लागला, घशातून विचित्र हुंकार बाहेर पडला.. आता बाईचे ओठ हलले, ती काहीतरी बोलत होती.... काय? तिनं हातातली मेणबत्ती सोडली पण ती खाली पडली नाही! तशीच तरंगत राहिली, तिचा भेसूर चेहरा आता आणखीच भयचकित करत होता. दुसरा हात नाऱ्याच्या छातीवर फिरवत ती म्हणाली,

"भिऊ नको, तुला कळायचं बी नाय मी तुजं काळीज काडल्यालं! तुला जास्त तरास नाय व्हायचा..."

हा गड्याचा आवाज का बाईचा?? आणि हिचे दात नेमके कसे काळे? का लाल? काळेच! नाही लाल....

मागच्या हातानं मान सोडून तो आता नाऱ्याच्या पाठीवर फिरत होता, आणि पुढचा हात त्याच्या छातीवर!

"आं.... हां.... तुजं काळीज लईच उडया मारतंय... खायला मजा ईल! आन तुजं गरम रक्त पिऊन तान भागवते बग आज! लय दिवसापासून ताजं खाल्लं नाय रं काय! मेल्याली कुत्री-मांजरं खाऊन कटाळा आलता.... हम्म .... हूं.... हूं....हूं."

नाऱ्याला आपण काय ऐकतोय ते समजेना, कान काम करत होते, पण मेंदू मात्र बंद होता बहुतेक!

नाऱ्याचे डोळे आता बंद झाले! तोंडातून जोरात एक किंकाळी बाहेर आली! सगळ्या अंगातून काहीतरी सळसळतंय असं त्याला वाटलं! त्याच्या छातीवर कुणीतरी जोरात ठोसा दिल्याची त्याला जाणीव झाली.... जोरात गरागरा फिरतोय, त्याला चक्कर आली...गरगरगरगरगरगरगर.... तिचे केस उभे राहिले..

"मला का धरलंय तू? मी तुझ्या वाटं नाय काय नाय. मला सोड"

भयानक हसत म्हणाली

"सांगितलं ना, शिळपाकं खाऊन कंटाळा आलाय, मला तुजं काळीज खायचंय.... तुजं गरम गरम रक्त प्यायचंय..."

नाऱ्या रडायला लागला.

"रडू नको, तुला काय कळायचं नाय... हळूच काडून घेते मी काळीज... हम्म...खाली बघ.."

नाऱ्यानं पायाकडं बघितलं, काळकुट्ट... घट्ट... मिट्ट...

आणि वर बघितलं तर डोक्याला काहीतरी लागलं...काय? दगड? वर दगड कसा काय? आं... आई गं... खाली डोकं वर पाय!! हिचे केस उभे नाय!

"सोड ना मला, सोड ना... तुज्या पाया पडतो मी सोड ना... आंsss हांs हांs हांs...." नाऱ्यानं हंबरडा फोडला.. ती भेसूर हसत होती..

रडणं...हसणं... भयानकच.

एकाएकी त्याचं डोकं खाली आपटलं, तो धाडकन खाली कोसळला, आणि त्याची शुद्ध हरपली.....

किती वेळ गेला काही माहीत नाही. जागा झाला, डोळे किलकिले करून त्यानं पाहिलं... समोर बाप्या होता, आबा, नाना, आक्का सगळे होते. म्हणजे आपण घरात आहोत तर! ती हडळ...ती कुठं गेली? अरे! माझ्या छाताडाला भोक??? माझं काळीज?? मी मेलोय का काय? स्स...स्स...स्स... श्वास तर येतोय..! अरेच्चा हे गोधडीचं भोक आहे! पण हडळ मात्र आहे... कुठाय ती?

नाऱ्या तापानं फणफणला होता. सगळं अंग मातीनं भरलेलं. नाकातोंडात अजूनही फुफाटा अडकलेला. काकाजी देवरूषी काहीतरी पुटपुटत त्याच्या हातात दोरी बांधत होता.. बाप्या आबाला काहीतरी सांगत होता...डॉक्टर..दवाखाना.. असं काहीतरी. नाऱ्यानं डोळे उघडलेले बघून सगळे त्याच्या भोवती जमले.. आणि कुणी कुणी काय काय विचारायला लागलं...

आबा जोरात ओरडला,

"आरं थांबा लका, त्यो आजून जाग्याव आल्याला नाय. सांगंल.. सगळं सांगंल. जरा हुशारी यिवू द्या त्यला."

"नाऱ्या, लका काय झालतं नेमकं? मातीत का पडला होता?" बाप्यानं काळजीनं विचारलं.

"ह..ह..हडळ." एकच शब्द... पुन्हा याची शुद्ध हरपली.

काकाजी पुढं सरकला, तसा बाप्या म्हणाला,

"काकाजी, बास झालं आता, बंद करा तुमची थेरं, आन आबा, तुमीबी आता काय बोलायचं नाय. मी नाऱ्याला दवाखान्यात नेनार.लय झाली तुमची नाटकं आता."

सच्या गाडी घेऊन आलेला. दोघांनी नाऱ्याला उचलून गाडीत टाकला, आबा काही न बोलता गाडीत बसला, सोबत आक्काही आली... काकाजीनं आपला बाडबिस्तरा गुंडाळला आणि बाहेर पडला. सच्यानं गाडीला स्टार्टर मारला आणि गाडी धुराळा उडवत नांदगाव कडे निघाली..

..... तर पैज अशी होती की अमावस्येच्या रात्री भर बारा वाजता, स्मशानातल्या त्या वडाच्या झाडाला खिळा ठोकून यायचं आणि जो कोणी पैज मारील त्याला पायजे त्या हॉटेलात पायजे ते खाण्याची पार्टी मिळणार. बाप्या पैज मारायला तयार झाला. नाऱ्या याला विरोध करत होता. कारण त्याचा अनुभव! बाप्या आणि त्याचं नातं मैत्रिपलीकडचं असल्यानं त्याला बाप्याची काळजी वाटत होती. बाप्यालाही ते कळत होतं पण पैज मारून त्याला नाऱ्याच्या मनातली भीतीही घालवायची होती.... दोघेही एकमेकांची काळजीच करत होते!

ते वडाचं झाड! जटा सोडून ध्यानस्त बसलेल्या कोण्या योग्यासारखं दिसत असे. नेमकं हे कधी आणि कुणी लावलं हे कुणालाच माहीत नव्हतं. प्रत्येक म्हातारा त्याच्या लहानपणापासून हे झाड असच आहे हे सांगायचा. काही जणांनी त्यावर अनेकदा भुतं बघितली होती.... आणि नाऱ्याच्या आज्याकडं तर त्या झाडाच्या आणि त्यावरच्या भुतांच्या गोष्टींचा खजिनाच होता! म्हातारं अनेकदा त्या गोष्टी सांगायचं. त्याचाच परिणाम नाऱ्यावर झालेला. एकदा नाऱ्या रात्री लघवीला उठला, आणि त्याला अंधारात कुणीतरी मानेने खुणावून बोलावतय अशी सावली भिंतीवर दिसली! नाऱ्याची पाचावर धारण बसली.. उठून पळताना त्याच्या लक्षात आलं की आबाला पाय आखडून झोपायची सवय असल्यामुळे त्याच्या गुडघ्याची ती सावली होती! पण घाबरला मात्र जामच! कोण म्हणायचं रोज रात्री वडावर भुतं मुक्कामाला असतात, तर कोण म्हणे दर अमावस्येला त्यांचा बाजार या झाडाखाली भरतो.. वेगवेगळ्या प्रकारची भुतं इथं बाजाराला येतात. कुणाला हात नसतात, कुणाचे पाय तुटलेले असतात, कुणाचे डोळे, तोंड गायब असते, कुणाचे डोळे बाहेर पडलेले, तर कुणाला मुंडकच नाही! काही सुंदर दिसणाऱ्या घातकी हडळी, मुंजा, खैस, चेटकीणी, झोटिंग, वीर, लावसाट, खुन्या, बायंगी, चकवा.... नाना तऱ्हेची भुतं इथं जमा होतात, आणि ज्यांना तंत्र मंत्र माहीत आहेत, ते लोक यांना काबूत ठेऊन त्यांच्याकडून हवी ती कामे करून घेतात! आणि एखादा साधा भोळा माणूस जर का यांच्या तावडीत सापडला तर हे त्याचे हाल हाल करतात! आणि अशा बाजारात बाप्या स्वतःहून जाणार होता!

आजा एक गोष्ट नेहमी सांगायचा. तलाठ्याची. गावात नुकताच एक तलाठी बदली होऊन आलेला, तो बायको आणि मुलांसोबत इथे गावातच राहायला आलेला. कामानिमित्त तो सतत नांदगावला जायचा, बऱ्याचदा तो रात्री उशिरा घरी परतायचा. त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याच्यासोबत नेहमी कुणी ना कुणी असायचे.... पण त्या दिवशी तो एकटाच होता, त्यामुळं जरा कमी घेतली. गाडीला किक मारून गाडी चालू करायला लागला, पण ती चालूच होईना, दमला. आणि पेट्रोल तर संपला नाही ना, म्हणून पेट्रोलचा पाईप काढण्यासाठी खाली बसला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या बाजूला उभे राहिलोय आणि किक म्हणून स्टँड मारतोय! दुसऱ्या बाजूला जाऊन त्यानं गाडी चालू केली. नाक्यावरच्या हातगाडीवरून पोरांसाठी सफरचंद आणि केळी घेतली. आणि निघाला... दारूची झिंग हळूहळू चढत होती.... स्पीड कमी असल्यानं रात्र बरीच झालेली. नेमक्या वेळेचा अंदाज येत नव्हता... एवढ्यात रस्त्याने एक माणूस पायी जात असलेला त्याला दिसला, मागून गाडी येताना बघून त्या माणसाने हात केला, यानं गाडी थांबवली.

"काय पाव्हनं, इतक्या राच्चं कुटं?"

"हे हिकडंच की." त्या माणसानं एका बाजूला हात करून सांगितलं.

"हिकडं मंजी गाव, वाडी काय नाव हाय का नाय?" फिदीफिदी हसत तलाठी बोलला.

तो पण हसून म्हणाला "तर वो, हाय की मसानवाडी"

"मसानवाडी? कदी ऐकलं नाय राव हे नाव."

"आयला नवं हाय काय की पावनं तुमी? नायतर मसानवाडी म्हाईत नसनारा मानुस नाय गावायचा ह्या भागात."

"व्हय व्हय नवाच हाय वो, कास्तीला तलाठी म्हनून आलोय."

"आस्स, तरीच. मग चला वाडीकडून, मला वाडीत सोडा आन पुडन जावा कास्तीला. शॉटकट हाय."

"व्हय का?, बसा मग"

तो मागे बसला आणि गप्पा मारत दोघे निघाले. थोडं अंतर गेल्यावर त्या माणसाने नेहमीचा रस्ता सोडून गाडी डाव्या बाजूला वळवायला सांगितली.

"ते बगा, तितुन डावीकड आत गेलं का नाय, आमची वस्ती हाय बगा तितं. तितनं जराच पुडं व्हायचं, आन उजविकड टन मारून पुडं गेला की कानेगाव कास्ती रोडला लागतंय."

"चांगला शॉटकटाय राव" म्हणून तलाठ्याने गाडी डावीकडे वळवली... पुढे जाताच एका वेगळ्याच वातावरणात प्रवेश केल्यासारखं त्याला वाटलं. पण भाग नवीन असल्यानं असं वाटत असावं म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं.

" हितुन आता आमची हाद्द लागली बगा, आमची मंजी आमच्या वाडीची वो."

" वाडीचा सरपंच कोनाय आता मग? आन तलाठी कुटलाय?" संवाद वाढवावा म्हणून तालाठ्यानं विचारलं.

" लय वर्ष झाली बगा, आमच्या वाडीत एकच सरपंच हाय, बिनईरोद निवडून देतो आमी."

आता हळूहळू झाडी दाट आणि वाट अरुंद होत चाललेली. रस्त्याने रहदारी अजिबात दिसत नव्हती. कुठल्याही गाडीचा कसलाही लाईट दिसत नव्हता. म्हणजे या रस्त्याने कुणी जात- येत नसणार. निदान आत्ता तरी....

" किती वाजले वो?"

" आयला, मी काय घड्याळ वापरत नाय गड्यानु. तरी पण बारा वाजून गेले असत्याल."

" आजून किती लांबाय?"

" झालं, पाच मिंटात ईल."

एवढ्यात समोर रस्त्याच्या कडेला एक बोर्ड दिसला, त्यावर लाल फुली आणि कवटी असं काहीतरी पुसट दिसलं.

" ह्यो बोर्ड?"

" हां, त्यो ना? हितं आक्सिडन व्हत्यात मनून टाकल्याला."

' असल्या रस्त्याला आक्सिडन?' तो मनाशीच विचार करायला लागला. गाडी बऱ्या वेगाने जात होती. पुढे मागे आणि आजूबाजूला घट्ट काळोख होता. गाडीची लाईट जेवढी, फक्त तेवढंच समोरचं दिसत होतं. तेही अंधुक, अस्पष्ट... तशात रस्त्याच्या कडेने एक बाई कडेवर लहान मूल आणि डोक्यावर कसलसं गाठोडं घेऊन जात असलेली दिसली..

" पाव्हनं, आवो एव्हड्या रात्री ही बाई?" आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती.

" आसंल एकांदी लावसत!"

" लावसत?"

" आवो काय नाय, हितं ते लाल गायावालं उतरल्यात ना, त्यांची एकांदी बाई आसंल."

कुठली का असेना, पण एवढ्या रात्री एकटी बाई? तेही असल्या रस्त्याला? त्याच्या मनात असे विचार येऊ लागले, आणि इतक्यात समोर आणखी एक बोर्ड आला, तसाच! नाही तोच! तोच? तोच पुन्हा कसा असेल? त्यानं वाडीकर पाहुण्याला विचारलं,

" पावनं, आत्ता गेल्याला बोर्ड आदी बी लागला व्हता ना? आपन काय परत तितंच आलो का काय?"

" आवो नाय, आसले चार पाच बोर्ड हायेत. घाबरला का काय राव तुमी?" पावन्यानं हसत विचारलं.

" नाय वो, घाबरायला काय झालं? आता तुमी एवडं मागं बसलाय आनि......"

" आनि काय."

" ती बगा, मगाचीच बाई....." आता मात्र तलाठी घाबरला होता...

" व्हय की राव, ह्ये येगळच काय तरी हाय बर का... तुमी जरा गाडी जोरात हाना बर... दोन मिंटात वाडीत पोचू आपन, हाना जरा जोरात."

तशी त्यानं मूठ पिळली, गाडी सुसाट निघाली, मागं धुराळा उडत होता... गाडी पुढं पळत होती... थोड्या वेळानं पुढं धुराळा दिसला, आणि त्या धुराळ्यातून अंधुक डोकावला तोच तो बोर्ड! पुढे तीच बाई!

तलाठी इतका घाबरला होता की त्याचा आवाजही निघेना..कसाबसा बोलला..

" पावनं आपल्याला चकवा लागलाय, आता?"

पावण्यानं काही न बोलता पाठीमागून त्याच्या पोटाला घट्ट मिठी मारली...

" हं, तसंच बसा, मी गाडी आजून जोरात घेतो..."

मूठ आणखी पिळली, गाडीनं आणखी वेग घेतला, पावण्याची मिठी घट्ट झाली, त्याच्या पोटाला काहीतरी टोचायला लागलं, त्यानं हात जरा ढिला करावा म्हणून पावण्याच्या हाताला धरून मिठी ढिली करायला लागला, त्याच्या हाताला एकाएकी बांगड्या लागल्या... मिठी आणखी घट्ट होत गेली... घट्ट ... घट्ट.. घट्ट मिठी... हात... बांगड्या... वाडीकर.... बाई... बापरे! त्याच्या तोंडून जोराची किंकाळी बाहेर पडली, गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी पुढच्या झाडावर जाऊन आदळली... दुसऱ्या दिवशी तिथे लोकांना फक्त चेंदामेंदा झालेली गाडी, सफरचंद आणि केळी सापडली... असं म्हणतात, अजूनही तो त्या वाटेवर दिसतो... कुणाला तरी लिफ्ट मागतो... आणि......

......तो आमवस्येचा दिवस अगदी उद्यावर आला. पोरांनी सगळी तयारी करून ठेवलेली. स्मशानात मटण नेलं तर भूत लवकर लागतं म्हणून हटकून यांनी पावशेर मटण आणलेलं, ते घेऊन बाप्या जाणार होता.. दुपारीच जाऊन झाडाला एका ठिकाणी खूण करून आले त्याच ठिकाणी खिळा ठोकायचा, आणि खिळ्याला हिरवा रंग पण दिला. आधीच खिळा ठोकून येऊ नये म्हणून. रंगाचं बाप्याला माहीत नव्हतं. या भानगडीबद्दल गावातील कोणत्याच ज्येष्ठ माणसाला कळणार नाही याची खबरदारी घेतलेली. त्यांनी हे करूच दिलं नसतं! नाऱ्या कुणाला सांगण्याची शक्यता होती पण बाप्यानं त्याला शपथ घातलेली.बाप्यानं शपथ घातल्यामुळं नाऱ्याचा नाईलाज झाला... नाऱ्याला एक अनामिक भीती वाटू लागली. काहीही झालं तरी बाप्या त्याचा जिवलग मित्र होता.भले त्याचा कशावरही विश्वास नव्हता, तो खूप धाडसी होता, पण नाऱ्या... त्याला फक्त धोका दिसत होता, आणि मित्राला असं धोक्यात घालणं त्याला मान्य नव्हतं.

तो तडक काकाजीच्या घराकडं गेला..

काकाजी त्याच्या शेतातच वस्तीला असायचा. गावातल्या बारक्या किड्याला सुद्धा त्याचं घर माहीत होतं. कुणाला काहीही अडचण आली की काकाजी ती सोडवत असे. अनेकांची भुतं त्यानं उतरवली होती, कैक झाडं खाली करण्याचा त्याला अनुभव होता. लोक म्हणायचे त्याला अनेक मंत्र येतात, आणि त्यांच्या मदतीने तो भुतांना ताब्यात ठेवतो. भुतं त्याचं सगळं ऐकतात. लांबून काही लोक बायंगी विकत घेण्यासाठी त्याच्याकडं यायचे. हे भूत मालकासाठी काहीही करतं. लोक हेही म्हणायचे की त्याच्या तळघरात त्यानं अनेक भुतं बांधून ठेवली आहेत. कधी कधी त्यांना काकाजी मारतो, तेव्हा ते मोठमोठ्याने रडतात. अनेकांनी त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकलेला होता. पण प्रत्यक्ष बघणारा मात्र कुणीच नव्हता. कारण काकाजी आपल्या तळघरात कधीही कुणाला येऊ देत नसे.

भर दुपार...रणरणतं उन्ह...भरारा वारं सुटलेलं... जणू त्याच्याही मागे भूत लागलंय! तेही जिवाच्या आकांतानं वाट फुटेल तिकडं पळतंय... सूं... सूं...सूं... सांय...सांय...सांय... आणि पायात पाय अडखळल्यानं गोल गोल फिरतंय! बापरे! या वावटळीत पण भुतं असतात म्हणे... किती उंच गेली ही वावटळ! गोल... गोल... गोल... गोल... गोल...

नाऱ्यानं ओढा ओलांडला. समोर काकाजीची वस्ती दिसत होती. मातीच्या सारवलेल्या भिंती आणि पाचट टाकून शाकारलेलं छप्पर.. गेल्या वर्षी पावसाळ्यात ते शाकारलेलं. त्यामुळं आता ते दुधाळ पाचट काळंभोर पडलेलं. ऊन, वारा, पावसानं त्याची पार रया गेलेली. पाचट अस्ताव्यस्त विस्कटलेलं. त्या छपरामागं एक लिंबाचं झाड होतं. उन्हाळा असल्यामुळं ते हिरवंगार झालेलं. आणि छपराला असलेलं दार लालभडक हिंगुळानं रंगवलेलं. ते दृश्य खूपच विचित्र आणि भयानक दिसत होतं. कुणी बाई केस अस्ताव्यस्त मोकळे सोडून कपाळावर भलंमोठं कुंकू लावून हिरवागार शालू नेसून बसलीय का काय? असं वाटत होतं.

नाऱ्या घराच्या अंगणात आला. तिथे गेल्याबरोबर त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. एक अनामिक भीती दाटून आली. अशात एक काळंभोर कुत्रं त्याच्याकडंच बघत झाडाच्या बुडाखाली पडलेलं. ते नुसतंच नाऱ्याकडं बघत होतं. नाऱ्याला कुत्र्याची जाम भीती वाटे. कुत्र्याला म्हणे भुतं दिसतात!

"काकाजी..." नाऱ्यानं आवाज दिला.

आतून कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही.

लिंबावर एक कावळा येऊन बसला. बसला तसाच पटकन उडाला, जणू त्याला कसला चटकाच बसला असावा. त्या झाडाभोवती त्यानं दोन घिरट्या मारल्या. आणि पुन्हा एकदा एका फांदीवर बसला.

"काव काव"

नाऱ्याला एकदम, 'काकाजी' असंच ऐकू आलं!

ते कुत्रं आता त्या कावळयाकडं बघून भुंकत होतं.. कावळा कुत्र्याकडं मान हलवून बघत होता, जणू कुत्र्याला खिजवतच होता. कुत्रा जोरजोरात पायाने माती उकरत भुंकत होता.

वातावरण भेसूरच झालं होतं.

"ओ, काकाजी" नाऱ्यानं पुन्हा हाक मारली.

या वेळी दरवाजा उघडला. अंगात कोपरी आणि गुडघ्यापर्यंत धोतर, पांढरी लांब दाढी, डोक्याचे लांबलचक केस, आणि हातात कायम काठी. असा साधासुधा काकाजी. पण त्याचे डोळे कायम लाल असंत. आणि नजर अशी भेदक की समोरच्याला भीतीच वाटे. त्यात त्याच्या दंतकथा!

"का रं नाऱ्या? आज मायाकं? दावखान्यात गुन पडला नाय जनु"

"काका, आरं तवा म्या जाग्याव व्हतो का लका? मलाच काय कळत न्हवत. त्वा मला सांग, मी तुज्याकडं आज पैल्यांदा आलोय?"

"ते बी हायच म्हना. ये आतमधी." काकाजीनं तिथंच पाठ फिरवली आणि आत शिरला, मागोमाग नाऱ्याही गेला. आत जरा धुरकट वाटत होतं. नुकताच लोबान जाळलेला, त्याचा सुगंध येत होता. बाहेर उन्ह मी म्हणत होतं पण इथं आत मात्र गार वाटत होतं.

"काकाजी, लका आत चांगलं गार वाटतंय राव."

"मंग रं. त्यो समंध बसविलाय की लिंबावर. त्यो छप्पर गरम हुवूच देत न्हाय.. त्यला ताकीतच हाय, जर का छप्पर गरम झालं, तर मी गरम हुईन. आणि मी गरम झालो की...." सुंsssssई खी खी खी... हसत काकाजी म्हणाला.

"गपय लका, मला भ्या वाटतंय आन तू आसलं कायतर सांग."

"बर, उद्या बाप्या जानाराय म्हनं."

नाऱ्या उडालाच! याला कसं कळलं? डोळे मोठाले करून त्यानं काकाजीकडं बघितलं.

"आरं त्यो कावळा, त्यो मला सगळ्या मुलकातल्या बातम्या सांगतो."

"काकाजी आता गप. काय बी बंडल मारू नको. तुला आमच्यापैकीच कुनीतरी सांगितलं आसनार. म्हनं कावळा सांगतोय."

"नाऱ्या, लका माज्यावर इतका इस्वास हाय तुजा आन तरीबी तुला खोटं वाटतंय?"

"हा"

काकाजीनं नाऱ्याकडं विचित्र नजरेनं बघितलं. डोळे मिटले आणि काहीतरी पुटपुटायला लागला. एखादा मिनिट झाला असेल. बाहेर कावळा ओरडायला लागला... काकाजीचे डोळे बंदच होते... तो बोलायला लागला..

"बाप्या, ऐक लका, उगंच रिस्क कायला घेतो?"

"नाऱ्या, लका रिस्क त्यात असती, ज्यात धोका असतो. ह्याच्यात काय धोका?"

"आरं येड्या ****, आमचं नाना सांगायचं, त्यांच्या बापाच्या टायमाला एक देवऋषी व्हता, त्यो त्या झाडाखाली भुतांचा बाजार दावायचा आनी त्यांच्यासोबत कुस्त्या बी करायचा. त्याला मंत्र येत असल्यामुळं भुतं त्यो सांगल ते करायची. तू येड्यागत करू नको लका."

"ही गोष्ट तुला आज्यानं सांगितली?"

"हा ना. त्याला त्येच्या बापानं सांगितली."

"आन त्येच्या बापाला त्येच्या आज्यानं सांगितली असणार."

"अय नाऱ्या, आता ह्यो जातो म्हणतोय तर तू टंगडं कायला मधी घालितो? जाऊ दे त्येला, मग खरं खोटं आपल्यालाबी कळल की."

"वा रं वा! तुला खरं खोटं काय हे बघायचय, आन त्येच्यासाठी बाप्याला लिटमस पेपर करतोय काय? तू जा की मग."

"वो शास्त्रज्ञ, आमचा लिटमस लालचा लालच हाये, तुमी का पिवळा व्हायला लागलाय पन?"

"बाप्या, तू माजं ऐकनार हायेस का नाही त्यवडं सांग."

नाऱ्याचे डोळे पांढरेच झाले! त्यानं काकाजीचे पाय धरले.

"काकाजी, लका तू लय पोचल्याला हायेस, मला मापी कर."

डोळे उघडून हसत काकाजी बोलला,

"आता तू का आलाईस सांग, माजा हिमत्या दुसऱ्या कामाला गेलाय, न्हायतर हे बी त्येनं सांगितलं असतं."

"मला बाप्याची काळजी वाटती. त्यो कुनाचंबी ऐकत न्हाय. त्यो जानारच म्हनतोय. त्येच्यासाटी मला कायतरी दे, त्येला इजा होऊने म्हनून कायतरी कर." त्याच्या शब्दाशब्दात काळजी जाणवत होती.

"नाऱ्या, लका उद्या आमुशा, ति तं त्येंचा बाजार आसतो. त्यात एक जातीचं भूत आसनार का? परतेक भुतासाटी येगळा येगळा उपचार आसतो रं." काकाजी तंबाकू हातावर घेत म्हणाला.

"मग रं? आता काय कारायचं?"

काकाजीनं तंबाकू चोळून त्यावर थाप मारली, चिमटीत तंबाकू घेऊन हातात उरलेला भुगा खाली टाकला, चिमट झटकली आणि खालच्या ओठात त्यातली तंबाकू ठेवली. मुश्किलीनं एखादा मिनिट गेला असेल. पण नाऱ्याला तास झाल्यासारखं वाटलं.

"सांग की लका."

"तंबाकू तरी सुकानं खाऊ दि की लका. दम जरा आलोच मी."

"खाली चालला काय? मी इऊ का?"

"बसतो का गप. तुजा लिटमस पिवळा झाला तर भुतं बी नाय साप करायची माजी. मलाच करावं लागल." जोरात हसत काकाजी आतल्या खोलीत गेला.

याच्या तळघरात खरंच भुतं असतील? आं? हा काय प्रश्न झाला? आत्ताच त्यानं मित्रांच्यात झालेलं संभाषण जसंच्या तसं सांगितलं. जणू तो स्वतः तिथं होता...नक्कीच भुतं याचे गुलाम आहेत. नक्कीच, नक्कीच खाली भुतं असणारच...

हा आवाज? हा कसला आवाज?

नाऱ्या आपल्या जागेवरून उठला, आतल्या खोलीत कधी पोचला त्याचं त्यालाही कळलं नाही. आत संपूर्ण अंधार होता, कुणी डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही इतका घट्ट मिट्ट अंधार! बाहेर जो सुवास जाणवत होता तो इथं नव्हता, इथं एक वेगळाच वास होता. कसला? असा वास कधीच अनुभवात नव्हता. नाऱ्या एक एक पाऊल पुढे टाकत होता, पण नेमकं जातोय कुठं हे कळत नव्हतं.. समोर भिंत असल्याचं त्याला जाणवलं. तो भिंतीला जाऊन चिकटला.. भिंतीला खेटून खाली एक बोळ होतं..त्यानं आत पाय घातला आणि पाय बोळात फिरवून अंदाज घेतला, जेमतेम एक माणूस जाईल असं.. पण पायाला पायऱ्या काही लागल्या नाहीत! पण इथे आत कमालीची उष्णता जाणवत होती. त्यानं कानात प्राण आणून खालचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला, कसलाही आवाज येत नव्हता. अंदाज घेत तो जमिनीवर झोपला, आणि डोकं बोळात घातलं. त्याक्षणी त्याला आतून जोरजोरात किंचाळण्याचा, रडण्या - ओरडण्याचा आवाज ऐकू आला! नाऱ्यानं पटकन डोकं बाहेर घेतलं. त्याला दरदरून घाम फुटला होता.....

"नाऱ्या, अय नाऱ्या" काकाजीचा आवाज त्याच्या कानी पडला.

आवाज तर बाहेरून येत होता! ही काय भानामती? धडपडत उठला, पळत बाहेर येताना कशाला तरी ठेचकळला, केसांसारखं काहीतरी जाणवलं कुणाचं तरी डोकं होतं बहुतेक... नुसतं डोकं?? नाऱ्या जोरात बाहेर आला.

"आत काय करत व्हता गैबान्या?"

"तूच आत गेलता ना? मंग हितं कुटनं आला? आतमधी आवाज... आणि ते मुंडकं..." त्याला नीट बोलताही येत नव्हतं

"आरं नाऱ्या, सांगून बी तुला कळत नाय का? धोका हाय तितं. तुला यिऊ नको म्हनल्यालो ना मी?"

"आरं काय कळलंच नाय मी तिकडं कसं काय गेलो ते." धापा टाकीत नाऱ्या म्हणाला.

"राताळ्या.... हे घे" काकाजीनं नाऱ्याच्या हातात एक ओली दोरी दिली. काळी दोरी. नाऱ्यानं जरा निरखून बघितलं.

लांबसडक केस वळून ती दोरी तयार केलेली, त्यावरची ओल रक्ताची होती. नाऱ्याच्या हाताला ते रक्त लागलं होतं. नाऱ्याला ते जाणवताच त्यानं ती दोरी फेकून दिली. दोरी जमिनीवर पडताच तिनं पेट घेतला, जाळ तर असा लागलेला, जणू कुणी मणभर लाकडावर रॉकेल ओतून पेटवलंय!

"आरं नाऱ्या... येड्या xxxx."

काकाजी पटकन पुढं झाला, त्यानं खिशातून कसली तरी चिमूट बाहेर काढली आणि आगीवर फुंकर मारली. आग विझली. पण दोरी तशीच होती! अगदी तश्शीच! नाऱ्या डोळे फाडून हे सगळं बघत होता. काकाजीनं दोरी उचलली..

"तुला काय आक्कल बिक्कल? कुटानाच करतो लका कायतरी तू. हे लावसत चे केस हायेत. सगळ्यात खतरी भूत. ही दोरी ज्याच्याकडं असंल त्याला दुसरं कोनतंच भूत काय नाय करू शकत. पन... तुला ही दोरी बाप्याच्या हाती बांदावी लागल."

नाऱ्या अजून नीट भानावर आला नव्हता.

"ते रक्त?"

"तुला जेवडी माहिती पायजेल तेवडी दिली. बाकी तुला देनंघेनं नाय. जा आता."

नाऱ्यानं ती दोरी खिशात ठेवली. मंतरल्यागत तिथून निघाला. जणू कुणी अज्ञात शक्ती त्याला बाहेर ढकलत होती, का खेचत होती.

बाप्याच्या हातावर ही दोरी बांधायची कशी या विचारताच तो घरी पोचला. डेऱ्यातलं गार पाणी गटागटा ढोसून तो याचाच विचार करायला लागला. कारण बाप्या काहीही झालं तरी असलं काही बांधू देणारच नाही. काय करावं...

हं... त्यानं मला शपथ घातली, आपण त्याला घालूया!

नाऱ्या उठला आणि तडक बाप्याचं घर गाठलं.

"या सायेब... च्या प्यायचा का?"

"आत्ता? लका गरम किती व्हतंय!"

"म्हाराज, लोकंडच लोकंडाला कापीतय.. तशी उष्णताच उष्णतेला मारिती!"

"व्हय का? बर मग घेतो कपभर."

"चालतंय. कर मग दोन कप."

"तुज्या आयला, कडू. तुला च्या प्यायचा व्हता मनून मला डोस पाजीत व्हता काय?"

नाऱ्या चुलीकडं सरकत बोलला. चुलीतला निखारा फुलवला आणि चार काटक्या टाकून जाळ लावला. भगुल्यात एक कप पाणी आणि एक कप दूध ओतून भगुलं चुलीवर ठेवलं. त्यात गूळ आणि पत्ती टाकली.

"बाप्या तुला माजी शपत हाय रं."

"नाऱ्या, आता गप. आता जर का न्हाय म्हनलो तर इज्जत जाईल आपली. मी जानार."

"जा की. मी आडवत न्हाय रं.. पन..."

"पन काय? च्या उतू चालला बग... पन काय?"

"माज्याकं एक दोरी हाय, ती तुला संगं न्ह्यावी लागन."

"बर, न्हेतो आनी त्या झाडाला फाशी घेतो." फिदीफिदी हसत बाप्या म्हणाला.

"माकडा, फाशी घेन्याहेवडी मोटी नाय रं. फक्त मनगटात बांदन्याजोगी हाय. तुला ती हातात बांदावी लागल."

"तू काकाजीकं गेलता ना?" बाप्या ओरडून बोलला.

"वरडू नको, गरम च्या वतीन नरड्यात बैला. काही आसू, ही दोरी तू हातात बांद तुला माजी शपत हाय." नाऱ्यानंही आवाज चढवला.

"बर, बांदीन. पन पोरांला काय सांगायचं नाय. मी झाडाकं निगालो की बांदीन."

"बग आ, माजी शपत ध्यानात आसू दे. मी आता देतो तुज्याकं."

"हा रं बाबा. दे"

नाऱ्यानं खिशातली दोरी बाप्याला दिली. बाप्यानं बेफिकीरीनं दोरी पॅंटीच्या खिशात टाकली.

"नीट ठीव, खाली पडू दिवू नको काय?"

बाप्यानं नाऱ्याकडं डोळे वटारून बघितलं. चहा संपला होता. नाऱ्या तिथून निघाला...

रात्री अकरा सवा अकरा ची वेळ. सगळी पोरं विसाव्याच्या दगडाजवळ जमलेली. तयारीनिशी बाप्याची वाट बघत होते. जास्त वेळ न लावता, बाप्या आणि नाऱ्या दोघेही तिथं आले. बाप्या निर्धास्त होता. त्यानं लुंगी लावली होती. आणि वर बनियान. हे बघून आन्या म्हणाला,

"लका, फिरायला निगाल्यागत आलाय तू तर. लुंगी लावून? आरं बरमुडा तरी घालायचा. लुंगीनं पळाय जमल का?"

"आरं आन्या, लका पळायचंय कोनाला? आपुन आरामात जानार, काम फत्ते करनार आनि पुडं नाऱ्याच्या हिरीवं जाऊन आंगोळ करून येनार. लय गरम व्हतंय." बाप्यानं असं म्हणताच नाऱ्या म्हणाला,

"बाप्या, काम उरकून गपचिप म्हागारी फिर, हिरीवं जायचं नाय."

"मी जानार, माजी वाट बगत हितं बसू नका. मी निवांत येनाराय परत. रातभर हिंडतो तिकडं. कुटं कुटं भुतं आस्त्यात ते बगतो की." खिंकाळत बाप्या म्हणाला. तसं बाकीच्या पोरांना पण टेन्शन आलं.

धनू हजारे म्हणाला,

"अय दादा, तसं काय करू नको. फक्त खिळा ठोक आणि परत ये." बाप्याला आता उलट चेव आला.

"नाय म्हणलं ना. तुमी आता सामान द्या मायाकं आनि जावा घरी. उद्या भेटू आता आपुन. मी लवकर येनार नाय. सकाळी जाऊन खिळा बगा, आनि लागा पार्टीच्या तयारीला. द्या हिकडं ते सगळं."

पोरांनी सगळं सामान बाप्याच्या ताब्यात दिलं. बारा वाजतच आलेले. बाप्या कुणाचं ऐकणार नव्हताच. सगळ्यांना पुन्हा एकदा घरी जायला सांगून त्यानं स्मशानाची वाट धरली. पोरं थोडा वेळ थांबून पांगली....

बाप्याला निघून दहा एक मिनिटं झालेली. अचानक त्याच्या लक्षात आलं, की नाऱ्यानं दिलेली दोरी पँटीच्या खिशात राहिली. त्याला नाऱ्याची शपथ आठवली. पण आता माघारी जाता येणार नव्हतं. बाप्या मनाशीच म्हणाला, 'शपत कुटं खरी असती काय? नाय मरायचा नाऱ्या.' तो स्वतःशीच हसला. पण अजून कुणीतरी हसल्याचा त्याला भास झाला. त्यानं चमकून इकडं तिकडं बघितलं. पण अशा घुडुप्प अंधारात काय दिसणार? 'आयला, आता मला बी भास व्हायला लागले.' मनाशीच बोलत बाप्यानं पाय उचलले. पाच दहा पावलं चालतो न चालतो, त्याच्यासोबत मागं कुणीतरी चालत येत असल्याचं त्याला जाणवलं. नाही त्याला पावलांचा स्पष्ट आवाज आला...त्याला वाटलं, काळजीपोटी नाऱ्या लपत छपत येत असावा. तो म्हणाला,

"नाऱ्या, तू आसशिन तर समोर ये आपुन सोबत जाऊ. उगच घाबरशीन एकटा."

कुणीच प्रतिसाद दिला नाही. बाप्या चालू लागला. चालत चालत कुरणात आला. कुरण संपलं की स्मशानच पुढं.

पायवाट नेहमीची असल्यानं तो झपाझप चालत होता. पण नेमकं आलोय कुठं हे कळायला मार्ग नव्हता. दोन्ही बाजूला झाडं झुडुपं होती. त्यांचे आकार रात्रीच्या या काळोखातही विचित्र दिसत होते. जणू कुणा माणसाच्या आकृत्या असाव्यात. बाप्या जसा झपाझप पाय उचलत होता तसा मागून येणारा पावलांचा आवाजही वाढत होता. बाप्या थांबला की आवाज थांबे... बाप्याला शंका आल्याने तो पटकन जागेवर थांबला, त्यानं कानोसा घेतला... सन्नन्नन्ननन सन्नन्नन्ननन फडफडफड झूप... वारं वहात होतं... किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र... रातकिडे किरकिरत होते.. क्षणात इकडून क्षणात तिकडून.. हे नेमके असतात कुठे? शोधलं तरी सापडत नाहीत... मधेच काही वटवाघळं बाजूने उडत गेली... टिव्ह..टी टी टी टी टिव्ह.. टीटीव्ह टिव्ह... लांब कुठेतरी टिटवी ओरडत होती... कधीही न घाबरणारा बाप्या, आता मात्र त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तरी मनातली भीती झटकून तो जोरात म्हणाला..

"मनाचे खेळ रे मनाचे.. भित्यापाटी भ्रम्मराक्षस!"

"हो."

"कोण म्हनलं? कोन हाय ते पुडं या. मी काय घाबरायचो नाय. मायला तुज्या."

बाप्या निघाला, कुठे? पुढे का मागे, इकडे का तिकडे? त्याला दिशाच कळेना. तरी त्यानं अंदाजानं एक दिशा ठरवली आणि त्या बाजूनं पुढं जायला लागला. सोबत पावलांचा आवाज होताच. तो स्वतःला समजावत होता. बहुतेक रात्रीच्या शांततेत झाडांमुळे आपल्याच पायांचा आवाज परत रिफ्लेक्ट होत असावा.. हो असंच आहे.

पण 'हो' कोण म्हटलं?

नाही, हे विचारच नको. आपण गाणं म्हणू एक. कोणतं बर आपलं आवडतं? ते हे.. ते नाय का हे...

घुं..घुं..उक्क घुं

घुबडाचा आवाज आला, भीतीने पुन्हा एकदा सरसरून काटा आला. त्यानं लुंगीचा सोगा हातात पकडला. झपाझप पावलं टाकीत चालला. अचानक समोर ते झाड दिसलं.. वाटेच्या मधेच.? नाय नाय.. अंधारात आपल्यालाच वाट दिसली नाय, आपणच आडवाटेने आलो.. चला, खिळा ठोकू या. बाप्यानं एका हातात खिळा आणि दुसऱ्या हातात दगड घेतला.. झाडाच्या बुडाकडे निघाला.. भल्यामोठ्या आकाराचं अस्ताव्यस्त पसरलेलं ते झाड, अंधारात विचित्रच दिसत होतं.. बाप्या जवळ जात होता तसं जणू झाडाचा आकार बदलत होता. झाडाची पानं सळसळत होती.. त्यांचाही भयानक विचित्र आवाज येत होता.. पावलांचा आवाज आता जवळ येऊ लागलेला.. बाप्या थरथर कापत झाडाच्या बुंध्याशी गेला.. थरथरत्या हातानं बुंध्याला खिळा चिकटवला, दुसऱ्या हातानं दगड...

"ठोक..."

बाप्याच्या कानापाशी कुणीतरी बोललं..

बाप्यानं जिवाच्या आकांतानं खिळ्यावर दगड आपटला, माघारी वळला... आणि... त्याला जाणवलं की कुणीतरी त्याची लुंगी धरली आहे......

दुसऱ्या दिवशी लोकांना बाप्याचं प्रेत झाडाखाली दिसलं...त्याच्या लुंगीचा सोगा खिळ्यात अडकलेला.


Rate this content
Log in

More marathi story from कलीम तांबोळी

Similar marathi story from Horror