याचसाठी केला अट्टाहास
याचसाठी केला अट्टाहास


लहानपणी सुट्यांमधे गावाला जायचो, त्यावेळी गावापर्यंत बस जायची नाही, मग फाट्यावरुन दमणीने जायचे, मजा यायची दमणीतुन जाताना. ती मजा आता नाही राहिली. गावी पोहोचल्यावर मग काय दिवसभर हुंदडणे चालायाचे शेतात, नदीवर जाणे, पारावार धिंगामस्ती करणे... दिवस कसा मावळायचा काही कळायचे नाही. घरातून खेळायला जाण्याच्या रस्त्यावरुन जाता येताना ती नेहमी दिसायची, पाठकोळीत बाळाला पालवात बांधलेलं आणि डोक्यावर शेणाची पाटी घेतलेली नेहमीच घाईत ती दिसायची. शेणाच्या गवऱ्या थापून त्या विकणे, सोबतच वावरातील पडेल ते काम... निंदन असो, कापूस वेचण असो वा काडीकचरा वेचण असो... कुठलंही मोलमजुरीच काम करून संसाराचा गाडा रेटायचा आणि एकुलत्या एक पोराला मोठ करायचं आणि उत्तम शिक्षण द्यायचं, असं तिचं स्वप्न होतं.
ती नुसती स्वप्नंच पाहत नव्हती तर ते सत्यात उतरविण्यासाठी संघर्षही करीत होती. त्यावेळी तिच्याबद्दल खूप आत्मीयता वाटायची आणि तिचे स्वप्न प्रत्यक्षात घडो असे खूप वाटायचे आणि आम्ही सारे तशी त्या निर्मिकाला प्रार्थना करायचो. नंतर शाळा, करिअरच्या गुंत्यात एवढं काही गुंतलो की अधेमधे गावाला जाणे व्हायचे पण ते सगळं धावपळीत... त्यामुळे तिच्याकड़े बघणे झाले नाही वा दुर्लक्ष झाले म्हणा... काही दिवसांपूर्वी एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने गावाला जाण्याचा प्रसंग आला होता, गावापर्यंत पक्के डांबरी रस्ते झाल्यामुळे गावात बस जाते, बस स्टॅण्डवरुन पायीपायी घरी निघालो. एकदम तिची आठवण झाली म्हणून रस्त्याने जाताना बघू या तिचे काय सुरु आहे म्हणून... तिचा मुलगाही आता कमाईला लागला असेल.
गावातही आता खूप बदल झाला होता, झालेला बदल न्याहाळत न्याहाळत तिच्या घरासमोर केव्हा येऊन पोहोचलो काही कळलेच नाही. घरासमोर थांबून नजर तिला शोधू लागली, पण ती काय तर तिचं घरही तिथे नव्हते, घर असल्याच्या खाणाखुणा मात्र तिथे दिसत होत्या. वाटले... चला तिचा मुलगा चांगल्या नोकरीवर लागला असेल आणि तिला सोबत घेऊन गेला असेल. तरीपण कुतुहलापोटी शेजारच्या दुकानदाराकडे चौकशी केली तर तो म्हणाला,"अहो, ती गाव वगैरे सोडून नाही गेली, ती काय समोर त्या पटांगणात त्या लिम्बाच्या झाडाखाली आहे ती, मी तिकडे बघितले तर त्या झाडाखाली तीन दगडाची चूल करून त्यात जमा केलेले कागद पेटवून एक गंजात तिने आंधण मांडलेलं दिसल, तिची काया म्हातारपणामुळे दुरुनही थरथरताना दिसत होती, तिच्या डोळयात मात्र अजूनही कुणाच्या तरी येण्याची आर्तता दिसत होती. मी पुन्हा दुकानदाराकड़े प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तो म्हणाला, मुलाच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतलेत तिने, राहते घरही विकले, तो शहरात कुठल्यातरी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे म्हणतात, त्याने तिकडेच लग्न केले. लग्नानंतर त्याचे येणेही बंद झाले. मग काय मिळेल ते मागून खाते ती.
दुकानदाराने पुढे काय सांगितले ते मला ऐकायलाच आले नाही. मी विचारात पडलो की, "याचसाठी केला होता का अट्टहास," संपूर्ण आयुष्य म्हातारपणाच्या आधारासाठी लागणाऱ्या काठीची व्यवस्था करण्यात काबाडकष्ट करीत घालवायचे आणि त्यातून काय तर ही व्यवस्था होणार म्हातारपणीची... ह्या कोड्याच्या गुंत्यात घर आलेले कळलेच नाही आणि तो गुंता काही सुटला नाही.