Pranjal Bhanap

Tragedy Others

4  

Pranjal Bhanap

Tragedy Others

व्यथेची गाथा..

व्यथेची गाथा..

5 mins
349


एका अधू पायाने तो रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. सकाळची रहदारीची वेळ होती. ह्या सगळ्या गदारोळात तो काहीसा उपरा वाटत होता. कुठल्याही गाडीला क्षणभरही थांबण्याची इच्छा दिसत नव्हती. तरीही त्याचे घाबरलेले, गांगरलेले डोळे मात्र सप्पासप जाणाऱ्या गाड्यांकडे पाहताना आश्चर्यकारकरित्या निश्चयी भासत होते. त्याच्या त्या अपंग शरीरासहितसुद्धा “आयुष्य किती सोप्पं आहे” असं जणू काही तो भासवत होता. देवावर, दैवावर किंवा कोणावरही, ज्यांच्यामुळे त्याची ही दैना झाली, तो संतापलेला वाटत नव्हता..


त्याच्या आयुष्याने दिलेली ही भेट त्याने कुठलाही प्रतिप्रश्न वा तक्रार नं करता सरळ-सरळ स्वीकारून टाकली होती का? हे सगळं अमानवी वाटत होतं. का त्याच्याही मनात ते शाश्वत युध्द चालू होतं, जगण्याबद्दलच्या कधीही नं मिळणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचं, आयुष्याचा अर्थ शोधण्याचं? तोही दस्तुरखुद्द देवाशी हुज्जत घालत असेलच की त्याच्या “का?”च्या निरसनासाठी? तो स्वतःला दुर्दैवी समजत नव्हता? कसं शक्य आहे हे?


नक्की काय ते कुणालाही कधी कळणार नाही. आजूबाजूच्या लोकांच्या नजरांना तो पूर्णपणे निर्विकार होता जणू; सहानुभूतीच्या नजरा, सकाळच्या नित्यक्रमात उपद्रव आणल्याबद्दल त्रासलेल्या नजरा, अचानक उचपटलेल्या त्या विचित्र प्राण्याला भेदरलेल्या नजरा, ‘असं भयंकर काही आपल्या नशिबी नाही आलं’ असं वाटून हायसं वाटलेल्या नजरा, स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या कुत्सित नजरा, वगैरे. त्याला फक्त स्वतःच्या आयुष्याच्या हेतूनुसार तटस्थपणे पुढे जाणं माहित होतं, मग तो हेतू काहीही असो, खाणं-पाणी शोधणं, सुरक्षित जागा शोधणं. क्षणिक, क्षणापुरतं जगण्याची असाध्य कला त्याला मुळातच अवगत होती. पीडेचा लवलेशही नव्हता त्याच्या इवल्याश्या चेहऱ्यावर.


कोण्या एका सज्जनाने त्याला रस्ता ओलांडू दिला आणि तो सिग्नल पर्यंत पोहोचला. अजूनही अर्धं युद्ध बाकी होतं. आता गाड्या दुसऱ्या बाजूने भरधाव सुटल्या होत्या. तो शांतपणे उभा होता, मधूनच एखाद्या आगाऊ गाडीस्वाराला सिग्नल तोडून सुसाट जाताना पाहत. तो मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा करत स्थितप्रज्ञ होता. मग काही वेळाने दुसऱ्या बाजूचा रस्ताही पार झाला सहज आणि तो पाणपोईपाशी पोहोचला..


त्याच्याबरोबर जे काही गंभीर घडून गेलेलं होतं ते सगळं त्या मुक्या प्राण्याने मुकाट्याने सहन केलं होतं अन् त्याचे परिणाम अजूनही सहन करत होता. प्राक्तनात वाढलेलं अगदी काहीही असलं तरीही ते कवटाळून तो शिस्तीत पुढे जात होता. “काहीही” ह्या शब्दाचा खरा अर्थ ह्या बिचाऱ्याला अगदी पुरता समजला होता बहुतेक, तो शब्द उच्चारण्याची गरज पडल्याविनाही. कदाचित त्या सगळ्यावर रडून-पडून त्याचं केव्हाचं झालेलं होतं. ह्या आघाताशी त्याने कसा सामना केला असेल, किती वेळ त्याने कण्हत काढला असेल हे सर्व आकलनाच्या पलिकडलं आहे. तीव्र वेदना त्याच्या सवयीच्या झाल्या होत्या, इतक्या की नित्याचं दुःख आता जाणवेनासं झालं होतं. तो एक क्षुल्लक जीव होता. त्याला कुणापुढे त्याचं मन मोकळं करण्याचं स्वातंत्र्य, कुणाविषयी द्वेष व्यक्त करण्याची क्षमता दैवाने मंजूरच केली नव्हती. तरीही कशी काय ह्या क्षुद्र प्राण्याला आयुष्याविषयी इतकी स्पष्ट समज होती कोण जाणे. पण मूग गिळून गप्प राहण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायही तर त्याच्याकडे उपलब्ध नव्हता.


पाणपोईवरच्या काकूंनी त्याला पाणी प्यायला दिलं अन् तो तृप्त झाला. लहानग्यांशी खेळत सावलीत थोडा पहुडला. त्याचं कर्मटलेलं शरीर, त्याच्या कानाजवळची जखम अशा कश्शा-कश्शाची त्या बाईच्या पिल्लांना पर्वा नव्हती. त्यांना तो मनापासून आवडला होता, तो त्यांच्यातीलंच एक होता जणू. इतक्या गोंगाटातही थोड्या वेळ त्याचा डोळा लागला..


कदाचित त्याचं निर्बुद्ध असणं हेच त्याच्या यशामागचं खरं गमक होतं. विचार (आणि पर्यायाने अति-विचार) करण्यासाठीची असमर्थता ही त्याला मिळालेला आशीर्वादच होता जणू. अन् म्हणून त्या विचारांमुळे येणाऱ्या थकव्यापासून तो वंचित होता, त्याचं आयुष्य सरळमार्गी होतं. त्याच्या यशाची गुरुकिल्ली ही होती की त्याची छोटीशी बुद्धी इतका लांबचा पाल्लाच गाठू शकत नव्हती की तो स्वतःच्या परिस्थितीची तुलना इतरांशी करू शकेल. आणि म्हणूनच त्याची परिस्थिती त्याला जाचक, त्रासाक, मारक असं काहीही भासत नव्हती. तो फक्त त्यातून सहजी मार्ग काढू पाहत होता. शिवाय, आपल्या संपत्तीला कवटाळून बसत तिचं जतन करण्याची गरज अन् पर्यायाने ओझं ह्या गरिबावर अजिबातच नव्हतं. ती गमावण्याची भीतीही त्याला नव्हती. हे मात्र खरं की बुद्धिवंतांनाही क्षणभर विचारात पाडण्यास तो सक्षम होता, की असा मेंदू मिळणं हे खरच भाग्याचं लक्षण आहे की एका अर्थी हा शाप आहे! स्वतःवर दबाव टाकून आपल्या आयुष्याचा मतीतार्थ शोधण्याचा प्रयन्त करणं हे त्याच्या स्वभावापलीकडचं होतं. आणि मग आपण कधीकाळी स्वतःकडून केलेल्या अपेक्षांवर खरे उतरू शकू का, आपल्याच इच्छांची पूर्तता करण्यालायक आपण आहोत का अशा विचारचक्रांमध्ये अडकून पडणं त्याला करमप्राप्तही नव्हतं. त्याचा भूतकाळ जगून झाला होता अन् आता तो कदाचित विसरलाही होता. भविष्याची चिंता करणं त्याच्या वृत्तीला अनुसरून नव्हतं अन् म्हणून तो त्याबाबतीत उदासीन होता. “तेव्हाचं तेव्हा पाहू” असं काहीसं त्याचं जगणं होतं. 


काही वेळाने काकूंनी त्याला स्वतःच्या जेवणातलं थोडंसं खायला घातलं. काकू, तीची पिल्लं आणि त्यांचा सवंगडी ह्यांनी मिळून जेवणावर ताव मारला, भरपेट पाणी प्यायलं आणि वडाच्या पारावरच सुस्तावले सगळे..


ह्या सगळ्या असमर्थतांच्या पार्श्वभूमीवर जर त्याच्यामध्ये काही अतुलनीय, अविश्वसनीय होतं तर ते त्याचं जीव ओवाळून टाकणं, त्याची नैतिक जबाबदारी- एखाद्याचं रक्षण करणं; अशांसाठी ज्यांनी त्याला अगदी किंचितही प्रेमाची वागणूक दिली. अशांना लक्षात ठेवणं आणि त्यांच्या प्रति अखंडपणे प्रामाणिक राहणं. त्याच वेळी क्षणात त्यांच्यावर अबाधित विश्वास टाकणं, निर्व्याज प्रेम करणं, जेणेकरून ह्या निष्कपट प्राण्याला हानी पोहोचविण्याआधी एखाद्याला क्षणभर विचार करणं भाग पडेल. कदाचित त्याच्या आयुष्यचं हेच एक सर होतं की ही निरागसपणाची देण सतत टिकवून ठेवणं, त्याच्या जिवलगांवर आलेल्या संकटापुढे शौर्यानं उभं ठाकणं; असा निस्वार्थीपणा सदैव तेवत ठेवणं. हे काही असे सद्गुण होते ज्यांच्यापासून तो कधीही नामानिराळा राहू शकत नव्हता, त्याला ते जमलं असतं असंही नाही म्हणा. त्याची युगानुयुगे फारशी उत्क्रांती झाली नसली तरीही आयुष्य कशाशी खातात हे त्याचं त्याला पक्कं माहित होतं अन् म्हणूनच त्या पामराला आयुष्याचा अर्थ-बिर्थ शोधण्याच्या फंदात पडावं लागत नव्हतं. उतावीळपणे, ‘एखादा तरी बदल घडून यावा आपल्या आयुष्यात’ अशी वाट बघत बसण्यापेक्षा आयुष्याला त्याने आदराने, सन्मानाने जसं असेल तसं कबूल केलं आणि अनिश्चिततेची भीतीच काढून टाकली. नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींना त्याच्या लेखी शून्य महत्व होतं. आपल्या वेळेच्या लायकीची गोष्ट शोधत बसण्यापेक्षा तो त्याच्या परीने जेवढं होऊ शकेल तेवढं करू पाहत होता. भूतकाळातल्या त्या उत्पाताने तो हुशार झाला होता, त्या नकारात्मक अनुभवाने तो जागरूक नक्कीच झाला होता, तो जास्त सतर्क झाला होता. त्याने जगण्याचा अर्थ त्याच्या परीने लावला आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहिला. स्वतःच्या भूतकाळापासून शिकण्याची आणि पुढे जाण्याची छोटीशी प्रवृत्ती त्याने विकसित केली होती. त्याला आयुष्यात शिक्षकाची गरजच नव्हती, त्याचे अनुभवच त्याचे गुरु होते. तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता. The DoG was the GoD of his own life. 


दुपारनंतर काकूंची आवराआवर सुरु झाली. त्याला जाग आली तेव्हा त्याने पाहिलं तर आपलं सामान कवटाळून ते छोटं कुटुंबं दूर जाऊ लागलं होतं. त्याला काय करावं कळेना. क्षणभर तो तसाच बसून राहिला, पण लांब जाऊ लागलेल्या आपल्या मित्रांना पाहून काहीसा बेचैन झाला. म्हणून उठून पोरांमागे शेपटी हलवत चालू लागला. पोरं आपसांत खेळण्यात गर्क होती. त्याने पोरांना आवाज दिला पण संध्याकाळच्या रहदारीत त्यांना ऐकू येईना. शेवटी आपल्या तीन दुर्बल पायांवर त्या कुटुंबामागे धावू लागला. तेवढ्यात चिमुरडीने मागे वळून पाहिलं आणि तळहात पुढे करून म्हणाली, “फीसs, फीसs, ये टॉमी ये!” त्याबरोबर त्याला जोर चढला. तो कुणाचातरी “टॉमी” झाला होता. तो धावत जाऊन त्यांच्यात मिसळला. नवीन सदस्याबरोबर, चौघांचं ते कुटुंब आता घरी परतायला निघालं होतं. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy