Pranjal Bhanap

Others Children

3  

Pranjal Bhanap

Others Children

एकच ध्यास...

एकच ध्यास...

2 mins
299


रघू ताडकन् उठला. शाळेला उशीर होण्याआधी त्याला काही कामं करायची होती. आईने स्टोव्हवर शिजायला ठेवलेल्या वरणाचा स्वादिष्ट वास घुम ला होता, त्यावर नुकतीच लसणाची खमंग फोडणी घातली गेली होती. वरण रघूच्या घरी काही नेहमीचं नव्हतं. डाळ महाग होत चालली होती म्हणून कित्येकदा आई फक्त कोरडी चटणी किंवा उरल्या-सुरल्या कांद्यांची भाजीच करत असे जेवायला. हा-हा म्हणता-म्हणता रघू पटकन तयार होऊन घराबाहेर पडला देखील.


रघू वयाच्या मानाने तसा किडकिडीत, उंचीने कमी असूनही ती कमतरता त्याची चपळाई भरून काढत होती. रघू आईसोबत राहायचा, ती कधीकधी त्याला एखाद्या देवीसारखी वाटे. आजी जेव्हा गावाकडून राहायला येई तेव्हा ती हमखास रघूवर देव-देवतांच्या गोष्टींचा भडीमार करी. रघूला मात्र त्या गोष्टींमधल्या देव्यांमध्ये अन् त्याच्या आईमध्ये एक विलक्षण साम्य दिसे. आजीची मनापासून इच्छाअसे की रघूनेदेखील आपल्या देवांना तितकंच मानावं. पण रघूला मात्र आजीच्या त्या जगावेगळ्या जगाची सफर करण्यातच भारी मजा येई.  


रघूच्या मनात एक यादी तयार होती. अन् आज सकाळपासूनच त्याला त्या यादीमधल्या गोष्टी जमवायला सुरुवात कारायची होती. काही दुकानांतून त्याने चौकशीसुद्धा केली पण तिथे त्याला गोष्टी जरा महाग वाटल्या. शेवटी नाईलाजाने रघू शाळेच्या दिशेने चालू लागला, आधीच उशीर झालेला होता. जवळच्या रस्त्याने जावे म्हणून पळत-


पळतच तो एका बोळात शिरला. रघू शक्यतो हा भाग टाळत असे कारण ही भटक्या कुत्र्यांची गल्ली होती. टोळीतले काही कुत्रे तर स्वतःपेक्षाही टगे वाटत रघूला. वाटेत रघूला एक जुनाट दुकान दिसलं. रघूला वाटलं त्या कळकट्ट दुकानातल्या काही गोष्टी तर त्याच्या स्वतःच्या वयापेक्षाही जुन्या असतील. पुसटश्या आशेने रघू दुकानात शिरला.


दुकानदार मनसुखदा त्रासलेले, वयस्क गृहस्थ होते. त्यांचा जुना-पुराणा भिंगाचा चष्मा घालून ते कॉउंटरवर बसत. मधेच कधीतरी येणाऱ्या-जाणाऱ्यांवर एखादा राकट कटाक्ष टाकत. दुकानातील रेडिओवर दिवसभर कोण जाणे काय सुरु असे. रस्त्यावरच्या एखाद्या कुत्र्याने जर दुकानात घुसायचा प्रयत्न केला किंवा कुत्र्यांमधे आपसांत भांडणं लागली तर त्यांच्यावर तितक्याच जोरात मनसुखदा डाफरत असत. आजुबाजूचे दुकानदारही फारसे मनसुखदांच्या वाट्याला जात नसत कारण मनसुखदा फारसे कशात सहभागी होत नसत, ना कुठल्या उत्सवांमध्ये त्यांना रस होता ना कुणाच्या आयुष्यात. 


काउंटरच्या दुसऱ्या बाजूने पाय उंचावून रघूने मनसुखदांना त्याची यादी सांगितली. रघूला फक्त चार गोष्टींची गरज होती. त्यातल्या तीन तर मनसुखदांकडे होत्याच अन् त्याही आजुबाजूच्या दुकानांपेक्षा कमी किमतीला. राघूच्या मनात परत नवीन उमेद निर्माण झाली. रघूने बिलाची एकूण रक्कम विचारली, पण ती त्याच्याकडे सध्या शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा थोडी जास्त होती. तरीही ‘आपण काहीतरी करूच!’ असं रघूला वाटून गेलं. तेवढ्यात एक माणूस दुकानात आला. त्याला बिस्किटांचा पुडा हवा होता. बळेबळेच मनसुखदा खुर्चीतून उठले अन् बिस्किटे ठेवलेल्या फळीपाशी गेले. त्यांनी ग्लुकोजचा एक पुडा काढून त्याला दिला. त्या माणसाला काही तो पटला नाही. त्यावर ‘पुडा ताजाच आहे’ असे मनसुखदांनी त्याला ठासून सांगितले. त्यावर तो माणूस त्रासून उत्तरला की त्याला मारी बिस्कीट हवं आहे. मनसुखदाही मग तितक्याच आवेषाने म्हणाले, “हेच सर्वांत चांगलं, जास्तीत-जास्त खपणारं बिस्कीट आहे”, पण तरीही नाईलाजाने परत बिस्किटांच्या फळीवर शोधाशोध करू लागले. तेवढ्यात रघूने तत्परतेने त्या माणसाला हव्याअसलेल्या पुड्याकडे बोट दाखवले. 


तो माणूस गेल्यावर मनसुखदा रघूकडे वळले. थोडे चिडूनच म्हणाले, “तुला तुझं सामान हवंय की नको?” 

रघू क्षणभर गडबडला अन् तोंडातल्या-तोंडात बरळला, “हो म्हंजे हवं तर आहे सगळं.. पण असंय की माझ्याकडे आत्ता पुरेसे पैसे नाहीत..”

मनसुखदा भुवया जुळवून रघूकडे रोखून पाहत म्हणाले, “किती आहेत?”

“अं... काहीच नाहीयेत खरं तर सध्या...”, रघू हळूचकन् बिचकत म्हणाला. 

“निघ चल मग इकडनं, उगाच माझा वेळ घालवतोय!”, मनसुखदा ओरडून म्हणाले. 

थोडं धाडस करून रघू म्हणाला, “तुम्ही माझ्यासाठी ते सामान बाजूला ठेवलं का? मी पैसे जमवतोय..”

मनसुखदा आता चांगलेच नाराज दिसत होते. “चल रे, निघ इथून! असं थोडी असतं! ‘पैसे जमवतोय’ म्हणे! हंह्!”

“ठेवा नं काका, मी खरंच नक्की पैसे आणीन..”, तरी रघू विनवण्या करत होता पण मनसुखदा मात्र हात हलवत नकार देत होते अन् रघूला हाकलत होते.

“किंवा मी तुम्हाला शिकवू शकतो..”, आता रघूच्या डोळ्यात थोडी मिश्किल चमक होती.

“काय शिकवतो मला?”, मनसुखदा परत भुवया बारीक करून म्हणाले. 

रघू पटकन पुढे म्हणाला, “मी तुम्हाला वाचायला शिकवीन आणि त्या बदल्यात तुम्ही मला ते सामान द्या..”

मनसुखदांना एकदम स्वतःची लाज वाटली पण ते क्षणात ताठ झाले. 

आता मनसुखदा खूपच चिडले, “चालता हो! निघ!”, जोरात गरजले. 


रघूने तिथून धूम ठोकली. नंतर दोन-एक दिवस रघू परत त्या वाटेला गेला नाही. पण तो विचार काही रघूच्या मनातून जाईना. हा एकच पर्याय आता रघूला दिसत होता. शिवाय त्याने आधीच पैशांची जमवाजमव सुरुही केली होती. 


थोडे आणखीन बळ एकवटून रघुने पुन्हा एकदा दुकानात जसं पाऊल टाकलं तसं मनसुखदांनी पुन्हा त्याचा प्रस्ताव हाणून पाडला, पैशांच्या मोबदल्यात दुकानात मदत करण्याचा. “मी लहान मुलांना कामावर ठेवत नाही!”, मनसुखदांनी सुनावलं. पण रघूचे प्रामाणिक प्रयत्न मनसुखदांना त्याच्याकडे ओढून घेत होते. ते रघूकडे एक टक पाहत होते, त्यांना विश्वासच बसत नव्हता एका चिमुरड्या मुलाच्या त्या ध्यासावर. आणि रघूला विश्वास बसत नव्हता की मनसुखदा आता तेवढे चिडलेले दिसत नव्हते. दोघेही थोडा वेळ शांत झाले. रघू इकडे-तिकडे बघत वेळ घालवत होता, त्याला सुचत नव्हतं की आता मनसुखदांना असं काय म्हणावं की ते तयार होतील. मनसुखदा खाली मान घालून विचारमग्न होते. पुन्हा वर बघून त्यांनी रघूला काळजीपूर्वक न्याहाळले. तेव्हा भिंतीवरच्या मोट्ठ्या घड्याळाने नऊ वेळा जोरात ठोके वाजवले अन् रघू एकदम भानावर आला; शाळेला पुन्हा उशीर झाला होता. 

......................


मनसुखदांनी दुकानात सगळ्या प्रकारचं सामान ठेवलं होतं; जुनं, बाजारापेक्षा कमी किमतीला विकता येण्याजोगं अन् अगदी नवंही. रघुने पाहिलं होतं की कधीकधी ते छोट्या टोपल्यांमध्ये काही भाज्या अन् फळंही विकायला ठेवत; थोडी अति-पिकलेली पण खातायेण्याजोगी. कधी मग दुकानातलं उरलं-सुरलं अन्न ते रस्त्यावरच्या कुत्र्यांना घालत. मनसुखदा विशेष बोलत नसत, शक्यतो स्वतःतच असत.


अनिच्छेनेच का होईना पण मनसुखदा रघुच्या बोलण्याकडे कानाडोळा करू शकत नव्हते. त्यांना लहान मुलं आवडायची, “मुलं निरागस असतात, त्यांच्याशी वागणं-बोलणं सोप्पं असतं.”, असं त्यांना वाटे. शिवाय ह्या सगळ्यात मनसुखदांचं काय जात होतं? स्वतःचं अशिक्षित असणं त्यांना कायमच खूपत होतं.   


खूप मन वाळवल्यानंतर रघुने मनसुखदांशी एक सोप्पा करार केला. रघु मनसुखदांना वाचायला शिकवणार. मग दर पंधरा दिवसांच्या अशा एका 

सत्रानंतर मनसुखदा त्याला मोबदल्यादाखल त्याच्या यादीतली एकएक गोष्ट देणार. रोज दुपारी मनसुखदा चार तासांसाठी दुकान बंद ठेवत. शाळेनंतर त्याच वेळेत मनसुखदा रघुबरोबर वाचनाचे धडे गिरवत. त्यांच्याकडे रघुला हवी असेलेली चौथी गोष्ट नव्हती खरी, पण सहजच एकदा बोलता-बोलता त्याची काहीतरी व्यवस्था करण्याचं आश्वासन त्यांनी राघूला देऊन टाकलं. 


रघुचा आनंद गगनात मावेनासा झाला होता कारण आता त्याला त्याच्या कामासाठी पैशांची चिंता करायची गरजच उरली नव्हती. तसं बघायला गेलं तर जेव्हापासून त्याने यादी बनवायला सुरुवात केली होती, रघुकडे पैसे जमवण्याची काहीच योजना नव्हती. आई आधीच तीनतीन कामं करत होती आणि तरीही तिला पैशांच्या बाबतीत कुठलाही आराम नव्हता. त्यातून कुठलंही काम कायमस्वरूपी असं नव्हतं. ती कचरा गोळा करायची, मग त्यातल्या त्यात चांगल्या, पुन्हा वापरतायेण्याजोग्या वस्तू सापडल्या तर त्या जुन्या बाजारात नेऊन विकायची. दुपारी बोहारणीचं काम करायची; घरोघरी जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात भांडी विकायची. आणि संध्याकाळी चौकातल्या एका कोपऱ्यावर कणसं भाजून विकायची (हे काम पण तसं ऋतूप्रमाणे बदलायचं). अशा रितीने, ती सतत पडेल ते काम करत राहायची अन् नवीन कामाच्या शोधात असायची. आजी जेव्हा यायची तेव्हा रघुला खाऊसाठी थोडेफार पैसे द्यायची. जेव्हापासून त्याला ही कल्पना सुचली होती, त्याने ते पैसे साठवायला सुरूवात केली. 


मनसुखदांना वाचनाचं महत्त्व तेव्हा कळलं जेव्हा त्यांनी मुलांना शाळेत टाकलं. त्यांनी खूप खस्ता खाऊन मुलांची शिक्षणं केली. पण आता मुलांनाच त्यांच्या अडाणी बापाची लाज वाटायला लागली होती, विशेषतः त्यांच्या आईच्या जाण्यानंतर. मनसुखदाही काही कमी हट्टी नव्हते, तेही बाणीचे होते. परंतु मनसुखदांना दुकानातले हिशेब मात्र चोख ठेवता यायचे. त्यांना नोटानाण्यांची चांगली जाण होती अन् दुकानाचे खाते अद्ययावत ठेवता यायचे. त्यांनी आपल्या चवथीपर्यंत शिकलेल्या बायकोकडून कामापुरते हिशेब शिकूनघेतले होते. वर्षानुवर्षे तीच दुकानाचे हिशेब सांभाळायची पण त्यांनीही कुतूहलाने लक्ष घातले होते. लहानपणी मनसुखदांना थोडी अक्षरओळखही झाली होती. 


रघुबरोबरचा वेळ मनसुखदांसाठी दिवसातला अतिशय आवडीचा असायचा. मनसुखदांना एका स्वप्नपूर्तीचा आभास होई; असं स्वप्न जे त्यांनी नकळत पाहिलं होत. आणि ते आज, ह्या वयात, असं अनपेक्षितपणे पूर्ण होत होतं. अतिशय उत्साहात मनसुखदा सकाळी उठत अन् दिसेल तिथे, असतील ते शब्द वाचण्याचा प्रयत्न करीत. जेव्हा त्या शब्दांचा अर्थ त्यांना प्रतीत होई तेव्हा अगदी आनंदाने जणू उडीच मारीत, स्वतःलाच टाळी देत. रघुने त्यांना स्वतःची शाळेची जुनी पुस्तके देऊ केली होती. पंधरा दिवसांनंतर मनसुखदा स्वतःवरच इतके खूष झाले होते की अत्यानंदाने त्यांनी रघुला त्याच्या यादीतली पहिली गोष्ट देऊन टाकली - डिंकाची बाटली


महिनाअखेरपर्यंत मनसुखदा शब्द वाचून छोट्याछोट्या वाक्यांचा अर्थही लावू लागले होते. रघुला मात्र अजूनही आळीतल्या कुत्र्यांशी जमवून घ्यायला काही जमत नव्हतं. कुत्रेही त्याच्या येण्याला हवे तसे वरमले नव्हते. म्हणून रघुला त्याचे रविवार विशेष आवडीचे झाले होते कारण त्या दिवशी त्याला ते भयावह भुंकणं ऐकावं लागत नव्हतं.


मनसुखदांबरोबर निभावणं तेवढंही अवघड नव्हतं जेवढं रघुला सुरुवातीला वाटलं होतं. ते खेळीमेळीच्या वातावरणात अभ्यास करीत. एखाद्वेण मधेच थोडे कुरकुर करीत, जेव्हा त्यांना थोड्या मोठ्या वाक्यांना तोंड द्यावं लागे. रघुने मनसुखदांना मोठं वाक्य कसं तोडायचं, मग त्यातल्या प्रत्येक छोट्या वाक्याचा अर्थ लावून शेवटी सबंध वाक्याचा अर्थ कसा लावायचा हे अगदी छान शिकवलं होतं. ह्या गोष्टीने मनसुखदा त्याच्यावर चांगलेच प्रभावित झाले. रघूच्या मागण्या कितीही गोंधळून टाकणाऱ्या असल्या तरीही मनसुखदांना आता खात्री पटली होती की रघु वयाच्या मानाने तसा हुशारच होता. रघुने जेव्हा एक लवचिक तारेची गुंडाळी मागितली, तेव्हा त्यांना लगेच कळून चुकलं की रघुला नक्की माहित आहे की त्याला काय हवंय. मनसुखदा स्वतःच्या प्रगतीवर इतके खूष होते की ते त्याला दुकानातल्या आणखी कुठल्याही गोष्टी द्यायला तयार होते, कदाचित थोडे वरचे पैसेसुद्धा. पण लगेच त्यांनी हा विचार बदलला. ते एक पक्के व्यापारी होते आणि म्हणूनच त्यांना रघुने दररोज येत राहायला हवं होतं. 


दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला रघुने मनसुखदांना वर्तमानपत्र वाचण्याचं सुचविलं, जसं त्याला शाळेतही करायला सांगितलं होतं. पण मनसुखदाही भलते कंजूष, त्यांनी रद्दीच्या दुकानातून जुनी वर्तमानपत्रं आणून वाचण्यास सुरुवात केली. त्यांचा वाचनचा वेग बराच कमी होता पण लवकरच त्यांना वाचनाची इतकी गोडी लागली की बऱ्याचदा सकाळी ते नवीन वर्तमानपत्राच्या शोधात बाजारात भटकू लागले.


दुसरीकडे, रघूला लक्षात आलं की मनसुखदांच्या दुकानात विक्री कमी होत चालली होती. तसाही आधी फार खप होत होता असं नव्हेच. पण अलीकडे नवीन मालही येईनासा झाला होता. फळं आणि भाज्यांची टोपली रिकामीच दिसे, कधीतरी फार-फार तर लिंबं-मिरच्या असत. 


अशाच एका दुपारी, मनसुखदा रघूच्या मार्गदर्शनाखाली त्याचंच एक जुनं पुस्तक वाचत बसले होते. तेवढ्यात दुकानबाहेर दोन भटकी कुत्री विचित्र भुंकू लागली. त्यातील एक जखमेने किंकाळ्या फोडत होतं, रडत होतं. मनसुखदांनी क्षणात त्या विव्हळणाऱ्या कुत्र्याकडे धाव घेतली व त्याला पाणी पिऊ घातलं. पाणी पिऊन, थोडी बिस्किटं खाऊन कुत्रं शांत झाल्यासारखं वाटलं. मनसुखदांनी त्याला प्रेमाने गोंजारलं. रघु दारातच उभा राहून हा सगळा प्रकार बघत होता. 


“तुला कुत्रे आवडत नाहीत का रे?”, मनसुखदांनी विचारलं. 

“मला भीती वाटते.”, रघु म्हणाला. 

“अरे किती गोड प्राणी आहे हा. सर्वांत प्रामाणिक. आणि आपल्याला शिकावं लागतं की एखाद्या प्राण्याला कस हाताळायचं. त्यांना काय आवडतं अन् काय आवडत नाही हे ही. एकदा का हे समजलं की भीतीला जागाच नाही. शिवाय, प्राण्याच्या डोळ्यात बघावं. तसं केलं की आपण त्याचा विश्वास संपादन करतो. चल ये! विश्वास ठेव माझ्यावर. ह्याच्या डोक्यावरून असा हात फिरव मायेने..“, कुत्र्यांशी खेळताखेळता मनसुखदांनी आग्रहाने रघूकडे पाहून 

म्हटलं. आता अजून दोन कुत्रे मनसुखदांजवळ जमा झाले होते. 

रघु मात्र अजूनही जागेवरच उभा होता, त्याला संकोच होत होता. 

“अरे ये रे.. फक्त कुत्रा तर आहे. तो काय उगाच नाही चावणार. आणि मी त्याला धरून ठेवलाय ना. बघ!”, कुत्र्याला जवळ घेत, मिठी मारत मनसुखदा 

म्हणाले.


रघुला जवळ जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्याने हळूच कुत्र्याला हात लावला. कुत्र्याने रघूच्या हाताचा वास घेतला अन् कान मागे घेऊन डोळे बंद केले. रघु पहिल्यांदा कुठल्यातरी प्राण्याच्या इतक्या जवळ गेला होता.

.............................

पंचेचाळीस दिवसांच्या प्रशिक्षणानंतर मनसुखदांना रघुमध्ये एक मित्र आणि एक गुरुही दिसू लागला. ही गोष्ट मनसुखदांसाठी खूपच महत्वाची होती कारण कित्येक वर्षांनी त्यांनी कुणाशीतरी अशा प्रकारे संवाद साधला होता. रघूचा आत्मविश्वासही वाढत चालला होता. आणि एकदाची त्याने सर्वांत महागड्या गोष्टीची मागणी केलीच - विजेचा छोटा दिवा. आणि मिळवालाही की!

 

दिवसागणिक मनसुखदांना छान वाचता येऊ लागलं. रोज सकाळी त्यांना मोठ्ठ्या आवाजात बिनधास्तपणे पेपर वाचताना पाहून येणारे-जाणारे आश्चर्यचकित होत. पण ह्या माणसाच्या चेहऱ्यावर शरमेचा लवलेशही नसे. 


पण दुसरीकडे रघु मात्र दिवसेंदिवस चिंताग्रस्त होत चालला होता. चवथी आणि शेवटची जी गोष्ट त्याला हवी होती ती अजून दुकानात कुठेही दृष्टीस पडत नव्हती. ती अत्यंत महत्वाची गोष्ट होती आणि तिला अगदी शेवटासाठी ठेवणंही गरजेचं होतं. मनसुखदांना मात्र ह्याचा काही फरक पडत असलेला दिसत नव्हता. शेवटी आपल्याला ती गोष्ट ‘बाहेरूनच विकत घ्यावी लागणार की काय?’ अशी शंकेची पाल सारखी रघूच्या मनात चुकचूकत होती. रघूकडे साठवलेले पैसे होते हे खरं, पण सगळं इतकं छान चाललेलं पाहून त्याने त्या पैशांचा वेगळा, जास्त व्यावहारिक आणि आवश्यक गोष्टींसाठी वापर करायचं ठरवलं होतं. सर्वांत महत्वाचं म्हणजे हे सगळं वेळेत पार पडेल की नाही ह्याचीही त्याला धास्ती वाटत चालली होती. 


त्यांच्या सत्राचा शेवट जवळ आला होता. मनसुखदांना आता राघूच्या मदतीची गरज उरली नव्हती कारण आता त्यांना फक्त सरावाचीच गरज होती. शेवटच्या दिवशी जेव्हा रघु घरी जायला निघाला, मनसुखदांनी त्याला थांबवलं आणि त्याच्या हातावर एक छोटं बीट ठेवलं. हेच तर रघूला हवं होत. त्या बीटाकडे बघून रघूला अतिशय आनंद झाला, “अगदी ताजं-ताजं”, त्याने विचार केला.

“हे विसरलास की काय रे बेटा?”, मनसुखदांनी गमतीने हसत-हसत म्हटलं. 

रघुलाही मनापासून हसू आले. सरतेशेवटी त्याचा ध्यास पूर्ण झाला. 

“पण ह्या सगळ्या विचित्र गोष्टी तुला हव्यात तरी कशाला रे बाळा?”, मनसुखदांनी कुतूहलाने विचारलं.

“कळेल लवकरच तुम्हाला..”, असं म्हणत रघु वाऱ्याच्या वेगाने दुकानातून पळाला. इतका अवर्णनीय आनंद त्याच्या ह्या इवल्याश्या आयुष्यात त्याने कधीच अनुभवला नव्हता.

“आपली भेट होईल का मग परत?”, पाठमोऱ्या रघूला मनसुखदानीं आवाज दिला.

“दिवाळीनंतर!..”, रघुने ओरडून सांगितले.


रघु जसा घराच्या दिशेने पळत होता तसा त्याचा आनंद ओसंडून वाहत होता. त्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी आता त्याच्याकडे होत्या आणि अजूनही हातात काही वेळ शिल्लक होता. रघु झटकन घरात शिरला. आई अजूनही आली नव्हती. कदाचित नेहमीच्या कोपऱ्यावर कणसं विकत होती. रघूने घाईघाईने त्याचं ठिगळ लावलेलं जुनं पोतं उघडलं, जे त्याने रद्दी वस्तूंनी भरलं होतं. कधीकधी तो आईबरोबर जाई, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उचक-वाचक करून त्याला आवडतील त्या गोष्टी धुंडाळून काढी; पुस्तकं, फेकून दिलेली खेळणी, कागदी डबे, कधी अगदी जुने कपडेही. रघूला हा सारा खजिन्याचा शोध वाटत असे. अशाच एका रविवारी सकाळी रघूला वापरलेले कागदी कप सापडले. रघूला ते स्वच्छ वाटले म्हणून त्याने ठेवून घेतले. आणि तेव्हाच त्याला ही कल्पना सुचली. त्याने ते सगळे कप त्याच्या शाळेच्या सामानाबरोबर घरातल्या त्याच्या आवडत्या कोपऱ्यात दडवून ठेवले होते. आतापर्यंत रघुने ऍल्युमिनमच्या एका छोट्या भांड्यात पाणी उकळायलासुद्धा ठेवले होते. हळूच मग त्या भांड्यात त्याने बीटाचा कीस करून घातला.


अजून पहाटही झाली नव्हती. आईने परत वरण करायला घेतलं होतं, वरण रघूच्या सगळ्यात आवडीचं होतं. त्याला माहित होतं आज उत्सवाचा दिवस आहे. आईने केलेल्या जेवणाचा सुवास, रघूने आपल्या आवडत्या गोष्टी लपविलेला कोपरा, अशा छोट्या-छोट्या गोष्टी त्याला बारा-बाय-चौदाच्या ह्या लहानशा घरात घरपणाची जाणीव करून देत. रघु उत्साहात लगेच उठला. आई स्टोव्हवरचं वरण ढवळत बसली होती. हळूच मागून तो आईच्या गळ्यात पडला.

“नेहमी दिवाळीला तू मला भेट देतेस. ह्यावेळी माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक भेट आहे..”, रघूच्या आनंदाला पारावार उरले नव्हते.

रघुने एक सुंदर कोरीव काम केलेला आकाश कंदील आणून तिच्या पुढ्यात ठेवला.

“हा तू बनवलास?”, आईने कौतुकाने विचारले.

“हो.”, रघुला अगदी मोठ्ठं हसू आलं. 


त्याने आईला सर्वकाही सांगितलं, की कसं त्याने कपांचा बूड कापून, ते सगळे एकमेकांना चिकटवून, मग त्यांना तारेने अजून पक्कं जोडून एक गोलाकार कंदील बनवला. बीट किसून, उकळून आणि मग गाळून त्याने बीटाचा रस काढला व नंतर कपांच्या सगळ्या बुडांना त्याने हाताने रंग दिला. आई आश्चर्यचकित होऊन कंदिलाकडे बघतच राहिली. तिला गहिवरुन आलं. तिने कंदील दाराला लावला. मग त्यात राघुने आणलेला दिवाही बसवला. जेव्हा राघुने दिवा लावला तेव्हा कंदील सुंदर प्रकाशाने उजळून निघाला. रघुने कपाच्या बुडांना छिद्रे पाडली होती ज्यातून निघालेले लहान-लहान प्रकाशझोत जिकडे-तिकडे पसरले होते. रघुचा सगळ्यात मोठा प्रकल्प यशस्वी झाला होता. त्याला हुश्शं वाटलं. शेवटी, दिव्यांच्या उत्सवाची छान सुरुवात झाली होती!


Rate this content
Log in