तुझ्यात जीव गुंतला
तुझ्यात जीव गुंतला
"ए वेडाबाई, अशी रुसून का बसलीस. पसंती आली म्हणजे सर्व झाले असे थोडीच आहे. उठ, जा चेहरा बघ कसा झालाय तो. तू नको काळजी करुस, मी बोलते तुझ्या बाबाशी.."
"खरंच बोलशील? मला खूप शिकायचे आहे. देश-विदेश पहायचे आहे. मोठे नाव कमवायचे आहे."
"हो, मला माहित आहे ग बबडे. जा फ्रेश होऊन ये. आपण मस्त काहीतरी खायला करू."
"हो आलेच."
शामली, सविताचा संवाद चालला होता. शामली, शंतनुराव व सविता यांचे जेष्ठ अपत्य. शामलीच्या पाठीवर अजून दोन मुलं. पाठचा गौरांग व सर्वांत छोटी ऋतुजा. शंतनुराव म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये क्लार्क होते. होता होईल तेवढी हौसमौज करत समाधानी कुटुंब होते त्यांचे. झाले असे की एका स्नेह्याच्या लग्नात, शामलीला कार्तिककडच्यांनी पाहिले. कार्तिकसह ती सर्वांनाच आवडली होती. त्यांनी लग्नाची मागणी घातली.
कार्तिक सरदेशमुखचे घरंदाज प्रस्थ. आयटी कंपनीमध्ये नोकरीला होता. सरदेशमुखांचे चौकोनी कुटुंब होते. कार्तिक, त्याची बहीण काजल, माधवराव व माधवी सरदेशमुख. काजलचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. ती तिच्या मिस्टरांसोबत अमेरिकेला राहात होती. कार्तिकला मुली पाहायला सुरवात केली होती, पण त्याला एकही मुलगी पसंत पडत नव्हती. तो म्हणायचा, 'अगं, सगळ्याच मुली चांगल्या आहेत, पण मला जशी हवी तशी कुणी नाही. ह्यांना पाहून, 'मेरे दिल की घंटी बजती ही नही'. ज्या वेळेस असे होईल त्यावेळेस मी एका पायावर तिच्याशी लग्न करायला तयार असेन." त्याला ही लग्नात दिसली अन् त्याच्या 'दिल की घंटी बजी'.
त्यांनी शामलीची सर्व चौकशी केली व मध्यस्थामार्फत तिला मागणी घातली. जेव्हापासून हे शामलीला समजले ती अशी चेहरा पाडून बसली होती. आईने समजावल्यावर ती आता शांत होती व किचनमध्ये आईला मदत करत होती.
शंतनुराव दमूनभागून ऑफिसमधून आले. पण त्यांच्या अंगात उत्साह सळसळत होता. ते आज खूपच आनंदात होते. "अगं, ऐकलंस का. शामलीने नशीब काढले हो. मी आताच माधवराव सरदेशमुखांकडे जाऊन आलो. त्यांना फक्त नारळ व कन्या हवी आहे. लग्नाचा सर्व खर्च तेच करणार. आपण फक्त त्यांच्याकडे जाऊन बसायचे. आयुष्याची एक मोठी चिंता मिटली माझी. "
"हो ते खरे! आहे पण मी काय म्हणते, शामलीचे शिक्षण पूर्ण होऊ दिले तर..."
"तुला काय वाटलं, मला काय माहित नाही तिच्या शिक्षणाची आवड. मीही तयार नव्हतोच इतक्यात. पण ते थांबणार आहेत, तिचे graduation पूर्ण होऊ दे, मग बघू म्हणाले. तर ते म्हणाले... आता फक्त साखरपुडा करू. तिची फायनलची परीक्षा झाली की मग लग्न उरकून टाकू. आता सांग मी ह्यावर काय बोलणार. मी होकार देऊन आलो. काय बबडे, आता तरी खुश आहेस नं?"
तसा कार्तिक शामलीला आवडलाच होता, पण शिक्षण सोडून तिला लग्न करायचे नव्हते इतकंच. शंतनुरावांनी असे विचारताच, ती लाजून आत पळाली. सविताबाईंनी समाधानाचा सुस्कारा सोडला व त्या कामाला लागल्या. योग्य वेळी कार्तिक-शामलीचे लग्न झालं. दोन्ही कुटुंबं आनंदात होती. दिवस जात होते. शामलीला दोन मुलं झाली. पहिला मुलगा व दुसरी मुलगी. मुलगा सारंग jr kg ला होता व मुलगी मधुलिका दोन वर्षाची होती. पण दैवाला हे सुख बहुतेक पाहवले नसावे. कुणाची तरी दृष्ट लागली ह्या सुखी कुटुंबाला. त्याचे झाले असे की सारंगला शाळेत सोडून ते मार्केटला गेले अन् ती काळी वेळ आली. कार्तिक शामलीशी बोलत चालला होता अन् एका भरधाव गाडीने त्यांच्या गाडीला उडवले. कार्तिक, खूप दूर फेकला गेला, त्याला जबदस्त मार लागला. डिव्हायडरवरची सळई त्याच्या बरगडीत शिरली होती. खूप रक्तस्राव झाला होता. शामलीपण पडली होती. तिला फक्त खरचटले होते. तिने स्वतःला कसेबसे सावरले. ती कार्तिककडे धावली. त्याची स्थिती पाहून ती जोरजोरात रडायला लागली. रस्त्यावरच्या लोकांना मदतीची याचना करू लागली पण कुणीही मदत करायला तयार नव्हते. तिला काहीच सुचत नव्हते. ती हताशपणे कार्तिकजवळ रडत बसली. तिचे दैव चांगले होते म्हणून तिला मदत मिळाली. कार्तिकला दवाखान्यात भरती केले व दोन्ही घरी कळवले. सगळे दवाखान्यात जमा झाले. डॉक्टरने कार्तिकला तपासले. त्याचे लिव्हर पूर्णपणे डॅमेज झाले होते. त्यांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सर्वांना सांगितले. शामलीचे रडूनरडून हाल झाले. तिच्या नजरेसमोर तिच्या पिल्लांचा चेहरा आला. मग शामलीने स्वत:ला सावरले व ती डाॅक्टरच्या केबिनमध्ये गेली.
"डाॅक्टर, कार्तिकला नेमके काय झाले",तिने हिम्मत एकवटत विचारले.
"बसा नं. खरं सांगायचे तर कार्तिक बरा होऊ शकतो पण ती सुविधा खूप कमी हाॅस्पिटलमध्ये उपलब्ध आहे."
"कुठली सुविधा."
"लिव्हर प्रत्यारोपणाची."
"म्हणजे.?"तिने थरथरत, स्वत:ला सावरत विचारले
"हं, म्हणजे कार्तिकचे लिव्हर खूपच डॅमेज झाले आहे आम्ही ते शिवण्याचा प्रयत्न केला पण...."
"अरे देवा, आता हे नवीनच काय? ह्याच्यावर उपाय?"
"दुसरा दवाखाना, निष्णात डाॅक्टर व सर्वांत महत्वाचे कुणी डोनर मिळणे."
"ओ, कुठे मिळेल डोनर."
"डोनर मिळाला तरी त्याचे व कार्तिकचे सगळे मॅच व्हायला हवे."
"अच्छा, मग तो कसा व कुठे मिळेल डोनर? काय करावे लागेल?"
"वेल, त्याच्या फॅमिलीमधले किंवा त्याला मॅच होईल असे कुणाचेही."
"ओ किडनीसारखे का ?"
"नाही. शरीरात किडनी दोन असतात व त्यातून एक दिली तरी पेशंट व डोनर जिवंत राहू शकतो."
"म्हणजे इथे...", तिने वाक्य अर्धवट सोडले.
"नाही, नाही तसे नाही. आपल्या शरीरात लिव्हर हा सर्वांत मोठा अवयव आहे. त्याचा थोडा पार्ट काढला व त्याचे प्रत्यारोपण केले तर दोघांनाही त्याचा फायदा होतो व दोघेही काही दिवसांनंतर पूर्ववत नाॅर्मल जीवन जगू शकतात. पण आधी मी काय म्हणतो ते नीट लक्षात घ्या. एकतर आपल्या हाॅस्पिटलमध्ये ही सुविधा नाही व ते करणारे निष्णात डाॅक्टरही नाहीत. शिवाय डोनरही शोधावा लागेल."
"बाप रे मग आता."
"काही नाही. तुम्ही आता त्यांना घरी घेऊन जाऊ शकता."
"म्हणजे ?"
"म्हणजे जेवढा ईलाज शक्य होता इथे करण्यासारखा तेवढा केला."
शामलीला काय करावे काही समजत नव्हते. ती सुन्न झाली होती. तिचा कार्तिक तिच्यासमोर होता पण कुणीच काही करू शकत नव्हते. माधवरावने सर्व परिस्थिती घरच्यांना सांगितली व कार्तिकला घरी घेऊन जायचा निर्णय झाला. घरी आणल्यामुळे तिला थोडा वेळ मिळाला. तिने हिमतीने, धीराने घेतले. तिने, काजलने व काजलच्या मिस्टरांनी नेटवर डाॅक्टर व हाॅस्पिटल शोधण्यास सुरवात केली. त्यांचे दैव बलवत्तर होते. त्यांना व डाॅक्टरांना सोईस्कर होईल असे मुंबईतले दोन हाॅस्पिटलचे अॅड्रेस मिळाले. लगेच त्यांनी संपर्क साधला. त्यापैकी दोन डाॅक्टरांनी असमर्थता दर्शवली. शेवटची आशा आता फक्त दिल्लीच्या डाॅ. सिंहवर होती. थरथरत्या हातानी त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शांतपणे सर्व केस ऐकून घेतली व होकार दर्शवला. पैशांचा प्रश्न नव्हताच.
पहिले घरातले, नातेवाईक आपल्या लिव्हरचा हिस्सा द्यायला तयार आहेत का ते पहा व मग त्यांच्या व कार्तिकच्या काही टेस्ट करा जेणेकरून ते एकमेकाशी मॅच होते का ते पाहाता येईल. मॅच झाले की पुढच्या तयारीलाही लागता येईल असे डॉक्टरांनी सुचवले.
शामलीला थोडी आशा वाटली. कार्तिकला कोण डोनर मिळेल ह्याचा शोध घेणं सुरू झाले, पण कुणीच मिळेना. वेळ हातातून निसटून जात होता. जमेची बाजू म्हणजे कार्तिकमध्ये काही सुधारणा जरी नसली तरी तब्येत स्थिर होती. औषध-गोळ्यांवर अजुन तीन-चार दिवस तो राहु शकेल, असे डाॅक्टरांचे म्हणणे होते.
शेवटी कार्तिकच्या आईचे म्हणणे मान्य केले. त्यांच्या टेस्ट करून घेतल्या पण काहीच मॅच झाले नाही. माधवरावांनीही सर्व टेस्ट केल्या पण... शेवटी लेकीच्या सुखासाठी शंतनुराव व सविताबाईने टेस्ट केल्या. आता राहिल्या काजल व शामली. काजलने नवऱ्याकडे पाहिले. त्याच्या नजरेतील भाव पाहून ती काय ते समजली.
आता शामलीच्या मनात काहूर माजले होते. तिला नवरा हवा होता पण मुलांचे चेहरे समोर येत होते. नाना शंका येत होत्या. फेल झाले तर मुल बिना आई-बापाचे वाढतील. समजा आपण दिले तरी नाही वाचला तर? आपण पण अधू झालो तर..? डाॅक्टरांनी सांगितले तरी... कार्तिकशिवाय जगायचे? नाही शक्य नाही! त्याच्यात माझा जीव गुंतलाय. थोडासा हिस्सा तर द्यायचाय... काय सांगावे! कार्तिक ठिक होईल... ही अशी द्विधा मनःस्थितीत ती सापडली. शेवटी मनाचा हिय्या करून ती तयार झाली.
सुदैवाने तिचे रक्त व इतर जरूरी गोष्टी मॅच झाल्या. डाॅक्टर व हाॅस्पिटलची वेळ घेतली व ते सर्व मुंबईला आले. हाॅस्पिटलमध्ये अॅडमिटही झाले पण परिक्षा तर पुढेच होती. शामलीचा अर्ध्यापेक्षा थोडा जास्त लिवरचा हिस्सा द्यायचा होता व हे करणे कायद्याच्या चौकटीत राहुन करावे लागणार होते. शामली तेवढ्या हिश्श्यावर जगू शकेल का? तिला काय त्रास होईल वगैरेच्या टेस्ट तीनतीनदा झाल्या. हे सर्व ओके झाले न झाले काऊन्सिलिंगचा ससेमिरा पाठी लागला. शामली हे सर्व मर्जीने करते की तिच्यावर दबाव टाकला जातोय? तिच्या नावावर प्राॅपर्टी किती आहे? तिचा इन्शुरन्स आहे का? असेल तर त्याचा फायदा कुणाला होणार? अशा सर्व प्रश्नांतून तिला जावे लागले. पण कार्तिकमध्ये तिचा जीव गुंतला होता म्हणून ती हिमतीने, संयमाने सगळ्याला सामोरी गेली. अखेर शेवटी सगळे सोपस्कार पूर्ण झाले. त्यांच्या सर्व प्रश्नांचीे समाधानकारक उत्तरे मिळाली व आॅपरेशनकरता हिरवा कंदिल मिळाला. सर्वांनी मोठा सुस्कारा सोडला. इकडे माधवीताई व सविताबाई देव पाण्यात घालून बसल्या होत्या. दोन छोटी नातवंडं प्रश्न विचारायची पण डोळ्यातले पाणी न दिसू देता त्यांचे सर्व करावे लागायचे.
शेवटी ऑपरेशनचा दिवस उजाडला. शामली व कार्तिकला तयार केले. दोघांनाही थिएटरमध्ये आणले. आॅपरेशन थिएटर, तिथले वातावरण पाहून शामली घाबरली. पळून जावं असे तिला वाटू लागले. तितक्यात तिला भूल दिल्या गेली व ऑपरेशन चालू झाले. तीन तासांनंतर एकाएकी कार्तिकचा बीपी वाढला. ऑपरेशन थांबवून पहिले तो नाॅर्मलला आणावा लागला. हे कमी होते म्हणून की काय इकडे शामलीचापण बीपी फ्लक्च्युएट होत होता. सगळ्या परिस्थितीवर मात करत एकदाचे ऑपरेशन झाले. जवळजवळ ते २० तासांपेक्षा जास्त वेळ चालले. सगळे हतबल होऊन त्या लाल दिव्याकडे पाहात बसले. लेक व सुन बरे व्हावे म्हणून अखंड नामस्मरण चालू होते. शेवटी दोघांनाही ICU मध्ये आणले. घरचे एकएक करून त्यांना पाहून येत होते. आधी शामली शुद्धीवर आली. बराच वेळ झाला तरी कार्तिक काही शुद्धीवर आला नाही. इकडे घरचेही काळजीत होते. शामलीही काळजीत पडली. आपले लिव्हर त्याच्या शरीराने स्वीकारले नाही तर... मॉनिटरवरचा ग्राफ पाहून तिथल्या डाॅक्टरांना शामलीची अवस्था लक्षात आली, त्यांनी तिला झोपेचे इंजेक्शन दिले.
बाहेर सर्वजण कार्तिक शुद्धीवर येण्याचीच वाट पहात होते. जेव्हा काहीच हालचाल दिसेना तेव्हा माधवीताई माधवरावाला म्हणाल्या, "अहो, डाॅक्टरांना विचारा ना, कार्तिक का शुद्धीवर येत नाही ते? बराच वेळ झाला. शामलीपण शुद्धीवर येऊन बराच वेळ झाला."
"हो, हो विचारतो. माधवराव पुटपुटले.
"तो कोमात तर गेला नसेल नं." कुणीतरी बोललेले त्यांच्या कानावर आले. ते आता खूपच घाबरले. तडक डाॅक्टरांच्या केबिनमध्ये गेले. पण तिथे कुणीही नव्हते. विचारावे तर कुणाला विचारावे. नर्स उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. दोघांच्याही घरच्यांचे प्राण कंठाशी आले. तब्बल आठ तासांनंतर कार्तिक शुद्धीवर आला. त्याने शुद्धीवर आल्याबरोबर शामलीची चौकशी केली. तिला आपल्या बाजुच्याच बेडवर जेव्हा त्याने पाहिले तेव्हा त्याली समाधान वाटले. त्याने समाधानाने डोळे बंद केले. त्याचे डोळे नुसते वाहात होते. थोड्याच वेळात शामलीही शुद्धीवर आली. दोघांनी एकमेकांकडे पाहिले व स्मितहास्य केले.
दोघांचाही एकमेकांत जीव गुंतला होता त्यामुळे ते जगले होते असेच म्हणावे लागेल. तब्बल सहा महिन्यांनी दोघांनाही घरी सोडले होते. दोघांचेही लिव्हर पूर्णपणे विकसित झाले. सामान्य माणसाप्रमाणे ते आता उर्वरित आयुष्य जगण्यास सक्षम झाले.