Sangeeta Deshpande

Tragedy Others

3  

Sangeeta Deshpande

Tragedy Others

मामाच्या गावाला

मामाच्या गावाला

5 mins
1.1K


"सांभाळून जा रे, आईला त्रास देऊ नका. आणि हो, नो दंगा मस्ती. मामाजवळ हट्ट करायचा नाही."

"हो रे बाबा, किती सूचना करतोस. आम्ही नाही देणार आईला त्रास आणि हट्ट ही करणार नाही मामांजवळ. तू नको काळजी करू. अच्छा बाय!"

"शहाणे ते माझे बबडे."


समोरच्या बाकावरच्या फॅमिलीचा हा संवाद चालू होता. मला गंमत वाटली. आजकालची मुलं, काही बोलूं देत नाहीत. त्यांच्या बोलण्यावरून ते बहुतेक आजोळी जात असावे असे वाटले. काही विचारले तर तो भोचकपणा वाटण्याची शक्यता होती म्हणून गप्प बसले. तोंडासमोर मासिक धरले पण माझे सर्व लक्ष समोरच्या बाकावरच होते. जागेवरून दोघांची थोडी तनातनी झाली पण थोड्या वेळात पूर्वपदावर आले. इतक्यात त्यातल्या मुलीने बॅगेमधून काहीतरी काढले. 

"आई बघ ना हिने आताच बाहेर काढली सीडी. अशाने ती खराब होईल हं." म्हणताच तिच्या भावाने ती सीडी ओढून घेतली. लागलीच हीने भोकाड पसरले. 

"ये आशु, नको रे त्रास देऊस तिला. तू गं कशाला काढलीस ती सीडी. दे रे ती इकडे. आता आजिबात उचकाउचकी करायची नाही समजले."

"आई, मामाच्या गावातही वाॅटर पार्क, माॅल आहेत का गं? आपण जायचे तिथे?" मुलीने विचारले.

"आई, तू प्राॅमिस केले आहेस हं, रोज स्वीमिंगला पाठवेल म्हणून." लगेच मुलाने आपल्या आईला आठवण करून दिली.

मुलांचे प्रश्न ऐकून ती बाई गडबडली, गोंधळल्यासारखी वाटली. तिने स्वतः ला सावरले. 

"नाही गं, अजून त्या गावात हे सगळे नाही आले, ते छोटेसे गाव आहे."

" ई... how boaring! " लगेच ती दोघेही ओरडली. "मग आपण इतके दिवस काय करायचं. म्हणत त्यांनी तोंड़ वेडेवाकडे केले. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिला वाईट वाटले. ह्यात त्यांचा तरी काय दोष... आपणच तर कारणीभूत आहोत ह्या सगळ्यांना. नवीन गॅझेट, माॅल आणि बऱ्याच गोष्टींची सवय आपणच लावतो... माझ्या मनात येऊन गेले. 

"Boaring काय त्यात. तुम्हाला कळणार पण नाही कसे दिवस सरले ते. तिथे खूप सारे मँगो खायला मिळतील. अंगणात खेळायला मिळेल."... ती असेच काही सांगत होती पण मी तिचे ऐकताऐकता मनाने केव्हाच माझ्या आजोळी, मामाच्या वाड्यात जाऊन पोहचले होते.


मामाचे गाव तसे छोटेसे होते पण खुप सुंदर. चोहूकडे पर्वताच्या रांगा आणि मधोमध वसलेले टुमदार गाव. गावाच्या प्रवेशद्वारावर ग्रामदेवतेचा शिल्प आणि सुस्वागतम् लिहिलेले होते. पाटलाच्या चिरेबंदी वाड्याच्या आणि पंचायतीच्या बरोब्बर मध्ये मामाचे छोटे बंगलाटाइप घर होते. प्रत्येक घराचे छप्पर लाल कौलांचे होते. जवळपास सर्वांच्याच घरासमोर ताडा-माडाची, पोफळीची झाडे होती. जणू ते गाव म्हणजे एक सुंदर चित्राचे रेखाटन होते. इतरांच्या घरासारखेच मामाच्या घरासमोर व परसदारी खूप मोकळी जागा होती. त्या जागेवर फणस, पेरू, माड, जांभूळ इत्यादी झाडे लावलेली होती. पाठीमागे विहिर होती. पाणी भरण्यासाठी व वरकामासाठी गडी माणसे होती. एवढी मोठी जागा, त्यात फळा-फुलांची झाडे, भाजीपाला असुनही कुठेही कंपाउंड वाॅल नव्हती. आम्ही जेव्हा केव्हा जात असू तेव्हा आमची खूपच बडदास्त ठेवली जात असे. आम्ही शहरात राहत होतो ह्या गोष्टीचेही त्यांना कोण अप्रूप वाटे. आंबे, फणस, ताडगोळे, करवंद, जांभूळ आम्ही यथेच्च खात असू. कुठलीही रोकटोक नसे. सकाळ-संध्याकाळ तळ्यात डुंबण्याचा आनंद तर अवर्णनीयच होता. एकदा मामासोबत आम्ही बच्चे कंपनी तळ्यात पोहायला गेलो होतो. आम्ही सगळे मस्त आनंदाने एकमेकांवर पाणी उडवत होतो. ज्यांना सूर मारता येत होता ते सूर मारत व आम्ही त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी टाळ्या वाजवत होतो. मामांनीही सूर मारला पण तो वर आलाच नाही. आम्ही सगळे घाबरून ओरडू लागलो पण तो काही वर येईना. ओरडणे थांबले व त्याची जागा रडण्याने घेतली. आम्हा सर्वांचे रडू बहुतेक त्याने ऐकले असावे." अरे काय झाले रडायला. मी इथे आहे." मामा दुसऱ्या टोकावरून बोलत होता. त्याच्या आवाजाकडे आमचे लक्ष गेले. तो हसत उभा होता. त्याला पाहताच आम्ही सर्व आनंदाने चित्कारलो. त्याने असा काही सूर मारला होता की एका झटक्यात तो दुसऱ्या किनाऱ्याजवळच निघाला. मामाची ही पोहण्यातली कसब पाहून आम्हाला खूपच नवल वाटले अन् अभिमानही.


सवंगड्यांसोबत विटीदांडू, लगोरी, बिलोरी, चंफूल खेळण्यात आमचा दिवस सरत असे. कधीतरी इतरांच्या बागेमधले आंबे चोरण्याचे उद्योगही मित्रांच्या संगतीने करत होतो शिवाय दुपारी घरातल्या बायकांना फणस पोळी, आंबा पोळी-वडी, पोह्याचे पापड़, उडदाचे पापड़ करण्यात लुडबुड करत असू ते वेगळेच. संध्याकाळी आजीसोबत मंदिरात जात होतो त्यामुळे सगळ्यांशी ओळखही होत होती. सगळे आम्हाला आमच्या नावानिशी ओळखत होते. विशेष म्हणजे तिथे आम्हाला बाबांची मुलं नाही तर आईची मुलं म्हणून सारे ओळखत. ओळख करून देतांनाही बाबांचे नाव न घेता आईचे नाव घेऊन तिची मुलं म्हणून सांगत. त्या गोष्टीचे नवलही वाटे आणि आवडून ही जात असे.


त्या मंदिरा बाहेर एक माणूस नित्य नियमाने दिसत असे. नीटनेटके कपडे, पण डोळ्यात कसलेच भाव नाही. कुठेतरी शून्यात पाहात बसे. कुणीतरी येई व घेऊन जाई. रोज हा क्रम चाले. हे सगळे पाहून मला उत्सुकता लागली. रोज रात्री आजी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे. कधी त्यात देवी-देवतांच्या कथा, परिकथा, बोधकथा तर कधी चक्क गावातल्या गमतीजमती असत.


वर्षातून दोन वेळेस आम्ही आजोळी येत होतो. ह्या सगळ्या गमतीजमती उपभोगत कधी आमचे बालपण सरले हे कळलेच नाही. बालपण सरताच आमची विचारसरणी बदलली. तारूण्याचा जोश. नवनवीन पाहण्याची, शिकण्याची ओढ, ऊर्मी त्याच त्या गोष्टी करण्यापासून पुरावृत्त करू लागली. शिवाय वाढता अभ्यासक्रम ह्या गोष्टींमुळेही आमचे मामाच्या गावाला जाणे कमीकमी होत गेले. कालांतराने मामाची मुलंही शिकतीसवरती झाली. शहरातच ती पण स्थायिक झाली. आजी होती तोपर्यंत मायेची नाळ घट्ट होती. तिला भेटायचे म्हणून जायचो. आजी गेली आणि नकळत ते पाश, ती वीण सैलावत गेली. मामा खूप मायाळू होता. कधीकधी जायचोही पण हळूहळू सर्वच कमीकमी होत गेले. 


आधुनिकीकरणाचे, विकासाचे वारे वाहू लागले. मामाचे गाव त्या विकास आराखड्यात येत होते. मामाही थकला होता. वयोमानाप्रमाणे त्यालाही होत नव्हते. मामेभाऊही शहरीकरणाला भुलले होते शिवाय ते उच्चशिक्षित होते त्यामुळे परत गावात येऊन रूजणे अशक्यच होते. मामाच्या मुलांनी सर्व जायदाद विकली. त्याचबरोबर आमचे गावाशी असलेले नातेही तुटले.


आजकालच्या मुलांना मामाचे गाव माहीतच नाही शिवाय आता तशी गावेही राहिली नाहीत. काही गावे शहराशी जोडली गेली त्यामुळे ते गाव वाटतच नाही. काही खूपच मागासलेली तर काही अर्ध्या हळकुंडाने रंगलेली. त्यामुळे गावाशी पहिली जशी ओढ़ वाटत होती ती वाटेनाशी झाली. वाढत्या व्यापामुळे, जीवनमानामुळे हे सगळे कालबाह्य झाले. राहिले ते फक्त गेट टूगेदर. आता आपण फक्त गेट टूगेदरच्या नावाखाली एकत्र येतोत. काही वेळ (क्षण) सोबत राहतो. हो क्षणच... कारण मोबाइलमुळे त्यांचे अर्धे लक्ष नसतेच की एक किंवा दोन दिवसांनी परत आपल्या उद्योगाला लागतात. पहिल्यासारखे महिनाभर मामाकडे तेही एकाच ठिकाणी राहण्याची कल्पनाही करू शकत नाही कुणी.


ह्या मुलांकडे पाहून तीव्रतेने जाणवले की, मामाचे गाव ती झुकझुक गाडी आपणच आपल्या हाताने आधुनिक म्हणवण्याच्या नादात दूर सारली व नवनवीन गॅझेटच्या आहारी कधी गेलो तेही लक्षात नाही आले. ते काही नाही, आपण याकरता काहीतरी करायला पाहिजे. कमीतकमी समरकॅम्प काढून मामाचे गाव व ती गावाकडची गोडी मुलांना अनुभवण्यास द्यायची असे मनोमन ठरवले तेव्हा मला बरे वाटले. विचाराच्या तंद्रीतून बाहेर आले तर समोरच्या बाकावर चिडीचूप झाली होती. माझे लक्ष त्या मुलांच्या चेहऱ्याकडे गेले. त्या मुलांच्या चेहऱ्यावर निरागस हसू खेळत होते. त्या माऊलीने काय समजावले माहित नाही पण त्या हास्यात मला आशेची किरणे दिसत होती आणि मन झुक झुक आगिन गाडी... हे गाणे गात होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy