Bhavnesh Pohan

Tragedy

3  

Bhavnesh Pohan

Tragedy

तिला पाहता आजही

तिला पाहता आजही

3 mins
631


आपण भिजलो तरी चालेल, पण मोबाईल नाही भिजला पाहिजे, या एकमेव कारणासाठी, अगदी जिवाच्या आकांताने, सुरु झालेल्या या अनपेक्षित पावसाला कसंबसं चुकवत, मी धावत सुटलो होतो. हवा होता तो फक्त एक आडोसा. आणि तितक्यातच मला रस्त्यालगत एक चहाची टपरी दिसली. मी माझा मोर्चा लगेच तिथे वळवला. पावसाच्या सरी जमिनीला भोकं पाडतील इतक्या वेगाने बरसत होत्या. वर असलेलं छप्पर जेमतेम असलं तरी या अनपेक्षित हल्ल्यापासून त्यानं मला वाचवलं होत. ती तेवढीशी जागा आल्याच्या सुगंधाने दरवळून उठली होती. मी लगेच त्या टपरीवाल्याला २ कटिंग देना, असं म्हटलं. वाफाळलेला चहा त्या २ ग्लासांमध्ये ओतत असताना, मी लगेच त्याला म्हटलं कि, सॉरी एक हि देना.


कुठलाही problem असला, निर्णय घ्यायचे असले किंवा मग अगदी भांडायच जरी असल, तरी त्यात, या २ कटिंग चा मोलाचा वाटा असायचा. तिच्यामुळेच मला चहाची सवय म्हणण्यापेक्षा व्यसन जडल होत. पण शेवटी ती माझ मनं मोडुन गेली. आणि मला मात्र हि सवय आजतागायत काही मोडता आली नाही. पावसाचा वेग आता जरा कमी झाला होता. पण या अल्लड आणि रिमझिम बरसणाऱ्या पावसात पुन्हा भिजायची नामुष्की नको, म्हणून बहुतेक जणांनी मिळालेल्या आडोशाची साथ सोडली नव्हती. तितक्यात माझी नजर समोर असलेल्या बस स्टॉप वर गेली. आठवणींची एक झड आली. आणि मी ओला झालो. अगदी या आडोशात सुद्धा. समोर "ती" उभी होती. तिच्या चेहऱ्यावर या पावसावरचा राग अगदी स्पष्ट दिसत होता. तिच्या कुरळ्या केसांमध्ये अडकलेल्या याच पावसाला ती सारखं झटकत होती. राहून राहून हातातलं घड्याळ सारखं पाहत होती. नेमकं आजच का आपण छत्री आणायचं विसरलो, याची खंत, अस्वस्थता आता तिच्या डोळ्यांमध्ये उमटत होती. तिने मग तिच्या बॅगेतून फोन काढला. ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर होईल असं कळवण्यासाठी असेल बहुदा. फोन वर बोलणं झाल्यांनतर तिने पुन्हा एकदा घड्याळाची ओली काच पुसत वेळ पाहिली आणि बरसणाऱ्या पावसाकडे एकदा केविलवाण्या नजरेने पाहिलं. या पावसाच्या जागी मी असतो, तर कधीच थांबलो असतो. कारण मला कळायचं ना नेहमीच, तिच्या मनातलं.


जाउन बोलाव का तिच्याशी? माझ मन तर कधीच तयार झाल होत, पण पाय मात्र तिथेच घुटमळत होते. मी तो निवलेल्या चहाचा कप ठेवला आणि त्या आडोशातून बाहेर पडलो. थंड पाण्याच्या सरींनी माझं लगेच स्वागत केलं. रस्ता क्रॉस करणार इतक्यातच सिग्नल सुटला. १२० सेकंद. आता या क्षणी मला, त्या सर्व गाड्यांचा, त्यांच्या त्या कर्कश हॉर्नचा, कासवाच्या गतीने पुढे सरकणाऱ्या त्या लाल आकड्यांचा राग येत होता. अगदी या पावसाचा सुद्धा. काळ्या ढगांसोबत लपंडाव खेळणाऱ्या चंद्रासारखी मला ती त्या गाड्यांच्या मधून दिसत होती. पुन्हा सिग्नल लागला. तसा मी धावत पुढे गेलो. आणि मध्ये असलेल्या डीवायडर वर जाऊन उभा राहिलो.


आता ती अगदी हाकेच्या अंतरावर होती. तेवढ्यात डावीकडून एक स्कुल बस आली, आणि तिच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. जेव्हा ती बस तिथून पुढे गेली, तेव्हा तिथे तिचं बोट धरून एक लहान मुलगी तिच्यासोबत उभी होती. तसेच कुरळे केस, तसंच हसणं आणि तसंच रडणंहि. ती लहान मुलगी आता घातलेला रेनकोट काढण्यासाठी हट्ट करत होती. तिने त्या लहान मुलीचा रेनकोट काढला. ती मुलगी आता बस स्टॉप जवळ साचलेल्या पाण्यात उडया मारत होती. मधेच तिच्या इवल्याशा ओंजळीत पाणी घेऊन, हिच्यावर उडवत होती. हिने तेव्हा तिला हाक मारली, "स्वरा, जास्त वेळ नाही हा भिजायचं. चला, आता घरी जाऊ या". स्वरा. मी ते नाव ऐकताच, मागे वळालो. एकत्र असताना, स्वप्न रंगवताना दोघांनी मिळून गिरवलेलं एक नाव. जे पुसट झालं होतं, पण आज त्याला सामोर जाण्याची माझी हिम्मत नव्हती. सिग्नल पुन्हा सुटला होता. पण मी तसाच चालत राहिलो. आजूबाजूने गाड्या भरदाव वेगाने जात होत्या. पण मला काहीच सुचत नव्हतं. मी फक्त चालत राहिलो, मागे एकदाही न वळता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy