Bhavnesh Pohan

Others

0.6  

Bhavnesh Pohan

Others

पत्र : स्वतःला, स्वतःकडुन

पत्र : स्वतःला, स्वतःकडुन

3 mins
1.5K


आजकाल कुणी एकमेकांना क्वचितच पत्र लिहितं. पण माझ्या वाढदिवसाला मला आलंय कुणाकडुन तरी पत्र. एखाद्या खिन्न संध्याकाळी समुद्र किनारी, माझ्यापासून थोड्याच अंतरावर तो बसलेला असतो. त्याला बोलायच असत खुपकाही, पण तो काहीच बोलत नाही. आज मात्र या पत्रातुन तो व्यक्त झाला आहे.


प्रिय भावनेश,(2019)

सर्वांत प्रथम तुला वाढदिवसाच्या तु लिहिलेल्या प्रत्येक कवितेइतक्या उत्स्फूर्त शुभेच्छा. एका गोष्टीचा मनापासुन आनंद आणि अभिमान आहे कि, तु finally तुझ्या मनातलं कागदावर उतरवायला लागलास. मला नाही जमायचं ते. तुला असेलच ना लक्षात. पण आज माझं जाऊ दे. आज तुझ्याबद्दलच बोलुयात. आज इतक्या वर्षांनी मलाही लिहावंसं वाटतंय, तुझ्याबद्दल व्यक्त व्हावंसं वाटतंय.


शाळेत असताना मधल्या सुट्टीत, गच्चीजवळ जाणाऱ्या पायऱ्यांवर एकटा बसून डबा खाणारा तु, लाजाळु, मितभाषी, घाबरट अशा स्वभावाचा तु, कॉलेजच्या अगदी दुसऱ्या वर्षापर्यंत कुठल्याही मुलीशी अगदी मोजकंच बोलणारा तु, आज जेव्हा ऑफिस पार्टी मध्ये १५० लोकांसमोर उभा राहुन सूत्रसंचालन करतोस किंवा स्वतःची एखादी कविता सादर करतोस हे पाहुन मला विश्वासच बसत नाही. आपण अमुक शर्ट घातलं तर बरे दिसू ना? लोकं हसली तर? असे प्रश्न आताही तुला पडतात. पण तु त्यांची उत्तरं शोधण्यात वेळ दवडत नाहीस. उलट तुला जे वाटतं, ते तु करतोस. तुला हे असं मोकळं वावरताना पाहुन, मी त्यावेळी कोंडलेल्या श्वासांची घडी अलगद उलगडत असतो.

तू लिहिलेले लेख, कविता यातून कधीकधी तू मागे भूतकाळात येत असतोसच. निर्जीव झालेल्या त्या साऱ्या क्षणांना थोड्यावेळा साठी का होईना पण जिवंत करतोस. सुकलेल्या प्राजक्ताला कुणीतरी येऊन पाणी द्यावं आणि मग त्याने पुन्हा मोहरून जावं. असा तो अदभुत क्षण असतो. आणि त्या झाडाखाली मग तु गतकाळाचे टपोरे क्षण कितीतरी वेळ वेचत बसतोस. मी मात्र भरल्या डोळ्यांनी, अगदी दूर उभा राहुन, तुला पाहत असतो.

तुला आठवतंय ना शाळेतलं पहिलं प्रेम. हा म्हणजे, कुणी त्या वेळी जर विचारलं असतं कि, प्रेम म्हणजे काय? तर आपोआप माझ्या नजरेची शाळा नकळतच तिच्याच डोळ्यांत भरायची. पण ते पहिलं-वहिलं, अव्यक्त, अबोल प्रेम शेवटी अपूर्णच राहिलं. पण त्याची खंत नाही. ते आजही मनाच्या एका कप्प्यात आपण सांभाळून ठेवलंय. पुढे जाऊन प्रेमाच्या तुझ्या व्याख्या थोड्याफार बदलल्या. समोरची व्यक्ती बदलली. पण तुझं प्रेम तितकंच खरं आणि अस्सल राहिलं. आणि तु ते शेवटपर्यंत टिकवायचा प्रयत्न केलास, याच समाधान आहे. तु प्रेम केलंस, अनुभवलंस, तुटल्यावर रडलास, मोकळा झालास. आणि ते संपल्यावर स्वतःची कीव न करता जगत राहिलास, मुळात ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होणार असतो, तीच गोष्ट तु accept करायला शिकलास, हे खूप चांगलं केलंस.


पण अजूनही मला तुझ्यामधल्या काही गोष्टी खटकतात. सर्वांत पहिली म्हणजे, तू "नाही" बोलायला कधी शिकणार आहेस, देव जाणे. तुझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्याच लोकांना तू खुश ठेवू शकत नाहीस. कुणी ना कुणी तरी hurt तर होणारच ना. पण त्याचा तु त्रास करून घेणं बंद कर. लोकं म्हणतात कि काळानुरूप माणसाने बदलावं. आणि ते बरोबरही आहे. पण काही गोष्टी असतात त्या कधीच बदलत नाहीत. तुझ्या आणि माझ्यामध्ये एक तशी गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं हळवं मन. खूप लोकांना तुझं हे असं emotional असणं fool वाटेल. त्यांना पटणार नाही. पण आपण असेच आहोत. आणि ते तु जपावंसं, अशी माझी तुझ्याकडे एक विनंती असेल. बाकी तु खूप लिहीत राहा. वाचत राहा. व्यक्त होत राहा. काही वर्षांनी जेव्हा तुझं एखाद पुस्तक प्रकाशित होत असेल, तेव्हा तिथे जमलेल्या गर्दीमध्ये कुठेतरी कोपऱ्यात मी उभा असेनच. तुला मी दिसेन. तेव्हा मात्र ओळख विसरू नकोस. इतकंच.


भावनेश,

उर्फ भाऊ (२००९)


Rate this content
Log in